थ्रासोच्या भूमिगत थडग्यातील भित्तिलेपचित्राचे अंशदृश्य, रेम, ४ थे शतक.

भूमिगत थडगी : (कॅटकोम).जमिनीखालील, भुयारी दफनभूमी.मूळ ग्रीक शब्द ‘cata’ म्हणजे खाली व ‘comb’ म्हणजे पोकळी यावरून ‘कॅटकोम’ ही संज्ञा आली आहे. रोमच्या दक्षिणेस ५ किमी. अंतरावर असलेल्या सेंट सीबॅसचनच्या बॅसिलिकेच्या खाली दफनासाठी जी विवरे होती, त्यांना प्रथम ही संज्ञा वापरली गेली. अशी भूमिगत थडगी रोमच्या आसपासच्या परिसरात तिसऱ्या शतकापासून अस्तित्वात होती. सुरूवातीस ही संज्ञा फक्त रोमच्या परिसरातील थडग्यांपुरतीच मर्यादित अर्थाने वापरली जात असली, तरी साधारणपणे नवव्या शतकापासून ती सर्वच ख्रिस्ती भूमिगत थडग्यांसाठी वापरली जाऊ लागली. कालांतराने जमिनीखालील कोणत्याही बोगद्यांच्या व विवरांच्या संकुल रचनांना, मुळात त्या दफनासाठी नसल्या तरी, कॅटकोम ही संज्ञा सैल अर्थाने वापरली जाऊ लागली. उदा., पॅरिसमधील तथाकथित कॅटकोम्झ या मूळच्या दगडाच्या खाणी होत्या पुढे १७८७ मध्ये त्यांचा वापर दफनसाठी करण्यात येऊ लागला. रोमखेरीज नेपल्स, मॉल्टा, सिराक्यूस, अँलेक्झांड्रिया (ईजिप्त) इ. ठिकाणीही या प्रकारची भूमिगत थडगी आढळतात.

भूमिगत थडगी ही कल्पना सर्वार्थाने रोमन वा ख्रिश्चन म्हणता येणार नाही. कारण जमिनीखालील खडकाळ विवरांमध्ये प्रेते पुरण्याची प्रथा तशी फार प्राचीन काळापासून अस्तित्वात होती. सुरूवातीच्या कॅटकोम या प्रकारची रचना साधारणपणे परस्परसंलग्न अशा छत्रमार्गांच्या व दालनांच्या जाळ्यांसारखी होती. सुमारे २४० हेक्टर्स (६०० एकर) जागा त्यांनी व्यापली होती. मार्गाच्या आजूबाजूच्या भिंतीमध्ये प्रेते ठेवण्यासाठी कोनाडेवजा जागा असत. अधिक जागेची गरज भासल्यास पहिल्याच्या खाली जादा दालने खणली जात. काही थडगी विटांच्या वा संगमरवराच्या लाद्यांनी आच्छादली जात.


या भूमिगत थडग्यांच्या भिंतीवर भित्तिलेपचित्रेही काढलेली आढळून येतात. ही चित्रे आद्य ख्रिस्ती कलेची महत्त्वाची उदाहरणे मानण्यात येतात. इ. स. सु. १८० ते ४१० या काळातील ख्रिस्ती कलेच्या आशयाविष्काराचे जतन या चित्रांतून झाले आहे. सुरुवातीच्या भित्तिलेपचरित्रांचे विषय बायबलच्या  ‘जुन्या करारा’ तील आहेत.त्यात जोनाची कथा, जलप्रलयातून नौका पार करणारा नोआ, आयझाक या आपल्या मुलाला बळी देण्यासाठी सिद्ध झालेला अब्राहम इ. विषय येतात. सिंहाच्या गुहेतील डॅनिएल किंवा जंगलामध्ये इस्रायली लोकांना पाणी पाजण्यासाठी खडक फोडणारा मोझेस ही ईश्वराकडून मानवाला मुक्ती लाभल्याची प्रतीके आहेत. स्वर्गामध्ये पुनरूत्थान झालेली मृत व्यक्ती हात उंचावून प्रार्थना करीत आहे, अशा प्रकारचे विषयही आढळतात. ‘नव्या करारा’तील काही विषय त्यात आले,तरी ख्रिस्ताचे प्रत्यक्ष चित्रण दुर्मिळ आहे.ते उत्तम मेंढपाळ (गुड शेफर्ड)

पॅम्फिलसच्या भूमिगत थडग्याचा एक भाग, रोम.

या सारख्या प्रतीकात्म रूपात विशेषेकरून आढळते. चित्रांखेरीज ग्रीकमध्ये खोदलेली काही मुक्तिसूचक वचने, तद्वतच दगडी शवपेटिकेवर खोदलेली शिल्पेही आढळतात. तसेच मृतासमवेत पुरलेल्या थाळ्या, दिवे, वेगवेगळ्या प्रकारची भांडी इ. लहानसहान वस्तूही या भूमिगत थडग्यांतून आढळल्या आहेत.

संदर्भ :

1. Adams, W. H. Famous Caves and Catacombs, New York, 1972.

2. Matt. Leonard Von y3wuoi, Enrico, Early Christian Art in Rome, New York, 1961.

दीक्षित, विजय इनामदार, श्री. दे