‘सेंचरी २१’ प्रदर्शनातील दालनाची नमुनाकृती, सिॲटल, १९६२.यामासाकी, मिनोरू : (१ डिसेंबर १९१२ – ). अमेरिकन वास्तुशिल्पज्ञ. जन्म सिॲटल या शहरी. त्याने आपल्या वास्तुविशारद चुलत्याच्या मार्गदर्शनाखाली, तसेच वॉशिंग्टन आणि न्यूयॉर्क येथील विद्यापीठांत वास्तुकलाविषयक उच्च शिक्षण घेतले. १९३४ नंतर न्यूयॉर्कमध्ये विविध वास्तुतज्ञांच्या कार्यालयांत वास्तुकलेचा अनुभव घेतला. त्यांत जगप्रसिद्ध ‘एम्पायर स्टेट बिल्डिंग’च्या निर्मात्या श्रीव्ह, लॅम व हार्मन या वास्तुकार-संघटनेचाही समावेश आहे. १९४९ मध्ये यामासाकीने सेंट लूइस, मिसूरी येथे वास्तुव्यवसाय सुरू केला. तेथे हेलमुथ व लेनवेबर या भागीदारांबरोबर बांधलेल्या ‘सेंट लूइस’ (१९५३ – ५५) विमानतळाच्या वास्तुनिर्मितीमुळे यामासाकीला प्रथम आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी लाभली. या विमानतळातील स्वागतकक्षांची रचना परस्परांना छेदणाऱ्या भव्य घुमटांनी केली आहे. ही सलोह काँक्रीटमधील घुमटरचना १९५५ मध्ये अत्यंत नावीन्यपूर्ण अशी गणली गेली. यानंतर यामासाकीने डिट्रॉइट येथे आपले नवीन कार्यालय स्थापन केले. १९५८ पासून यामासाकीची स्वतःची प्रतिभासंपन्न वास्तुशैली प्रगत होत गेलेली आढळते. याच वर्षी डिट्रॉइट येथील ‘सोसायटी ऑफ आर्ट्स अँड क्राफ्ट्स’च्या रचनेत वास्तूचे संपूर्ण काचेने साकार केलेले बाह्यांग व स्तंभपंक्तींची नाजुक विभागणी ही त्याच्या वास्तुशैलीची वैशिष्ट्ये आढळून येतात. डिट्रॉइटमधील ‘रेनल्ड्झ मेटल्स कंपनी’च्या वास्तुरचनेत (१९५९) काचेची जागा धातूच्या जाळ्यांनी घेतलेली आढळते. डिट्रॉइट येथील ‘वेन स्टेट युनिव्हर्सिटी’मधील ‘मॅकग्रेगर मेमोरिअल कम्युनिटी कॉन्फरन्स सेंटर’ (१९५८) ही त्याची सर्वोत्कृष्ट वास्तुनिर्मिती मानली जाते. या वास्तुरचनेत त्रिकोणी काँक्रीट तुळ्‌या संगमरवरांनी आच्छादलेल्या नाजुक लोखंडी स्तंभांच्या शिरोभागी दिसतात. यामासाकीने वास्तुभोवती कृत्रिम तलाव, स्थलशिल्परचना, चौथरे इ. घटकांना प्राधान्य दिले. ‘अमेरिकन काँक्रीट इन्स्टिट्यूट’च्या वास्तुरचनेत (१९५८) सलोह काँक्रीट छतरचनेच्या सौंदर्यपूर्ण पद्धतीने उपयोग केला. ‘न्यू दिल्ली’ महोत्सवातील अमेरिकन दालन (१९६०). सिॲटल येथील ‘सेंचुरी २१’ महोत्सवातील दालन (१९६२) ह्या यामासाकीच्या वास्तुशैलीचा उच्चतम विकास दर्शविणाऱ्या वास्तू होत. यामासाकीने न्यूयॉर्कमधील ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’ या प्रचंड वास्तुप्रकल्पाचीही रचना केली (१९६६ – ७४). ११० मजली, ४११·४८ मी. उंच, दोन मनोऱ्यांची ही गगनचुंबी इमारत न्यूयॉर्क शहराचे वैभव मानली जाते. यामासाकी त्याच्या आधीच्या पिढीतील थोर अमेरिकन वास्तुशिल्पज्ञ ⇨ मीएस व्हान डेर रोअला गुरुस्थानी मानतो. रोअच्या शैलीचा नाजुक आविष्कार म्हणून यामासाकीची वास्तुकला ओळखली जाते. आयताकृती अवकाशरचना करताना यामासाकी स्तंभपंक्ती शक्य तितक्या नाजुक ठेवतो छतातून प्रकाशयोजना करतो व वास्तुभोवती पाण्याचे कृत्रिम तळे फिरवितो, बगीचे करतो. सर्व रचनेत भौमितिक आकाराबरोबरच, साधेपणा आणि वास्तुघटकांतील सर्वंकष नाजुकता ही यामासाकीच्या वास्तुशैलीची वैशिष्ट्ये मानण्यात येतात. लाइफ इन आर्किटेक्चर (१९७०) हे पुस्तक त्याने लिहिले.

दीक्षित, विजय