फतेपुर सीक्री : उत्तर प्रदेशातील इतिहासप्रसिद्ध स्थळ. आग्र्याच्या नैर्ऋत्येस सु. ३७ किमी.वर ते वसले आहे. हे आग्रा राज्यमार्गावर तसेच पश्चिम रेल्वेच्या रुंदमापी लोहमार्गावरील स्थानक आहे. आग्रा–फतेपुर सीक्री यांदरम्यान बस वाहतूक उपलब्ध आहे. अकबराने (१५४२–१६०५) सीक्री या खेड्याजवळ नवीन राजधानी १५६९-७० मध्ये वसविली. आपल्या गुजरातवरील विजयानंतर त्याने त्यास फतेपुर सीक्री हे नाव दिले. अकबराने हे ओसाड भागातील टेकडीवजा पठारी गाव राजधानीसाठी का निवडले, याविषयी एक कथा अशी : अकबराला अनेक मुले झाली पण ती जगली नाहीत. अखेर या सुमारास सलीम चिश्ती या साधूच्या कृपेने त्याचा मुलगा जगला, म्हणून त्याचे नाव त्याने सलीम ठेवले. हा पुढे जहांगीर म्हणून प्रसिद्ध झाला. शेख सलीम चिश्तीच्या सीक्री या गावी त्याने पुढे राजधानी नेली आणि राजकीय व प्रशासकीय दृष्ट्या महत्त्वाच्या तसेच धार्मिक अशा अनेक वास्तू बांधल्या. तथापि पाण्याची कमतरता आणि अपुरे संरक्षण यांमुळे अखेर अकबराने १५८५ मध्ये राजधानी आग्र्यास हलविली.

दिवाण-इ-खास मधील मध्यवर्ती स्तंभाचा शिरोभाग फतेपुर सीक्रीची एकूण रचना आयताकार असून खडकाच्या नैसर्गिक रचनेप्रमाणे तटाचे बांधकाम केलेले आहे. तिन्ही बाजूंना तटबंदी (सु. ५ किमी. लांब) असून चौथ्या बाजूस कृत्रिम सरोवर (आता कोरडे झालेले) आहे. तटबंदीला एकूण नऊ दरवाजे आहेत. त्यांपैकी आग्रा दरवाजा शहरात प्रवेश करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असून, तो सरळ दिवाण-इ-आम इथे जातो आणि पुढे जामा मशिदीपाशी संपतो. शहरात रस्त्यांची रचना पूर्वनियोजित नसली, तरी सर्वत्र फरसबंदी आढळते. निवासाच्या बहुतेक इमारती दगडी कड्याच्या बाजूने बांधलेल्या आहेत. एकूण नगररचनेत व वास्तुकल्पात वास्तुशास्त्रदृष्ट्या कोणतीच विशिष्ट पद्धती आढळत नाही तथापि इमारतींची भव्यता व सुबकता, त्यांवरील अलंकरण आणि बांधणीतील अचूकता यांचे एक आगळे दर्शन या ठिकाणी घडते.

 येथील इमारतींचे स्थूलमानाने दोन भाग पडतात : धार्मिक वास्तू आणि लौकिक वास्तू. लौकिक वास्तूंत राजवाडे, प्रशासकीय इमारती, सराई इत्यादींचा समावेश होतो. या वास्तू पुष्कळ असून त्यांत विविध प्रकारचे अभिकल्प आढळतात. धार्मिक वास्तूंत भव्यता आढळली, तरी त्या पारंपरिक स्वरूपाच्या आहेत. एकूण वास्तूंपैकी बुलंद दरवाजा, शेख सलीम चिश्तीचा दर्गा, जामा मशीद, दफ्तरखाना, दिवाण-इ-आम व दिवाण-इ-खास हे बादशाही दिवाणखाने, जोधाबाई व मरियमबाई यांसाठी बांधलेले महाल, पंचमहाल, बिरबल महाल इ. वास्तू वैशिष्ट्यपूर्ण आहेत.

बुलंद दरवाजा सर्वांत भव्य आहे. अकबराने गुजरातच्या विजयाप्रीत्यर्थ ही वास्तू दक्षिणाभिमुख बांधली (१५७५). या दरवाजाची उंची ५४ मी. असून तो लाल वालुकाश्मात बांधला आहे आणि मधूनमधून अलंकारणासाठी संगमरवरी दगड वापरले आहेत. त्यास दक्षिणेकडून चिरेबंदी पायऱ्या आहेत. दरवाजाची कमान प्रचंड असून दरवाजावरील कोपऱ्यात एकसंध मनोरे मुख्य चौकटीतून वर आल्यासारखे दिसतात आणि दर्शनी भागावर दोन मनोऱ्यांमध्ये असलेले तीन डौलदार घुमट लक्ष वेधून घेतात. या घुमटांच्या पुढे चौकटीच्या माथ्यांवर एका ओळीत महिरपींनी सजविलेले तेरा छोटे घुमट आहेत. या दरवाजावर बाहेरच्या बाजूस अरबी भाषेतील सुंदर सुलेखन आढळते.

शेख सलीम चिश्तीचे स्मारक (१५८१) संगमरवरी आहे. या दर्ग्याची इमारत टुमदार चौकोनी असून वर घुमट आहे. रचना व कलाकुसर या दृष्टीने तीवर द्रविड वास्तुशैलीची छाप दिसते. स्तंभ दक्षिणेकडील मंदिरांसारखे असून मुख्य दर्गा एका सुंदर शिसवी मखरावर उभा आहे. त्याचे दर्शनी स्तंभ पितळी असून त्यांवर रंगीबेरंगी जडावकाम आहे. इमारतीच्या चारी बाजूंना महिरपींच्या कोंदणात संगमरवरी दगडात खोदलेल्या नाजुक जाळ्या बसविलेल्या आहेत. यातून परावर्तित होणाऱ्या प्रकाशकिरणांमुळे तेथे काचेचा भास होतो. अकबराने सलीम चिश्तीसाठी एक मशीदही बांधली होती (१५७१). या मशिदीत तीन दालने असून त्यांपैकी एक दालन हिंदू वास्तुशैली दर्शविते.

पंचमहाल, फतेपुर सीक्री. दिवाण-इ-खास ही वैशिष्ट्यपूर्ण वास्तू बाहेरून दुमजली दिसते पण प्रत्यक्षात ती एकमजली आहे. ती आकाराने लहान असून तिच्या बांधकामात सर्वत्र लाल वालुकाश्म वापरलेला आहे. इमारतीत एक मोठे सभागृह आणि मध्यभागी एक स्तंभ आहे. स्तंभ तळाशी चौकोनी व मध्यभागी अष्टकोनी असून वरच्या बाजूस मध्यभागी स्तंभशीर्षाच्या ठिकाणी सिंहासन आहे. या स्तंभाची रचना छताच्या मध्यभागातून खाली आलेल्या पदकाच्या बरोबर उलट आहे. या नक्षीदार स्तंभातून निघणारे त्रिविध आकाराचे बाकदार आणि नाजुक चोवीस आधार बैठकीच्या बुडाला जाऊन मिळतात. वर्तुळाकार सिंहासन सर्व बाजूंनी कोरलेले आहे. सभोवार जाळीदार कठडे व कोपऱ्यात कोन छेदणारे कठडे असून खालपासून सव्वातीन मीटरवर अष्टकोनी कठडे आहेत आणि सिंहासनाकडे जाण्यासाठी येथून तीन मार्ग आहेत.


अकबराने जोधाबाई व मरियम इमानी या आपल्या आवडत्या राण्यासाठी दोन सुंदर महाल पंचमहालाशेजारी बांधले. या महालांचे वैशिष्ट्य म्हणजे यांच्या बांधणीत हिंदू पद्धतीच्या शिल्पांची पखरण जागोजाग आढळून येते. जोधाबाईचा महाल तर पूर्णतः हिंदू शिल्पशैलीचा नमुना असून त्याच्या महिरपी मंदिराच्या कमानीसारख्या आहेत. कित्येक महिरपींच्या मध्यभागी कमळ आहे आणि महालात हिंदू मूर्तींसाठी कोनाडे आहेत. एका भिंतीवर श्रीकृष्णाचे रेखाचित्र आहे. इतरही भिंतीवर भित्तिचित्रे आढळतात. महालाच्या प्रांगणात तुळशीवृंदावन आहे. दोन महालांची रचना ऋतूंतील बदल लक्षात घेऊन केलेली आहे. एक महाल उन्हाळ्यात थंड व हवेशीर असतो तर दुसरा हिवाळ्यात उबदार असतो. अकबराने बांधलेल्या वास्तूंच्या बांधणीत मुख्यतः स्तंभतोरणशैलीच प्रकर्षाने जाणवते. तथापि एतद्देशीय अभिकल्प, ज्ञापके आणि रूढ संकेत यांच्यावरही भर दिलेला आहे. विविध परंपरागत वास्तुशैलींचे सुरेख मिश्रण येथे आढळते. या वास्तूंच्या भव्यतेत समृद्ध अलंकरणाने भरच घातली आहे आणि त्यात वास्तुशैली व शिल्परचना यांचा उचित समतोल साधला आहे. शिवाय तीरशिल्पे आणि स्तंभ यांच्या संयोजनाने वास्तूत समस्तरीय संयोगावर भर असूनही छायाप्रकाशाचा उभा झोत निर्माण झाला आहे. दोन्ही महालांच्या शेजारी असलेली पंचमहालाची रचनाही वैशिष्ट्यपूर्ण आहे. पिरॅमिडप्रमाणे निमुळत्या होत गेलेल्या या महालाचा सर्वांत वरचा मजला म्हणजे एक छोटीशी गच्चीच आहे. खालचे दोन प्रशस्त मजले सोडले तर उरलेले मजले म्हणजे छोट्या-मोठ्या हवेशीर गच्च्याच वाटतात. फरसबंदीला लागून एक-दीड मी. उंचीचे कठडे आहेत. खालच्या मजल्यांना जाळीदार दगडी भिंती आहेत. प्रत्येक मजला स्तंभावलींनी तोलून धरला आहे. काहींच्या मते ही इमारत राजाच्या दासदासींसाठी असावी. तुर्की राणी रूमी सुलताना हिचे निवासस्थान प्रेक्षणीय आहे. कदाचित खोदकामात आणि कातकामात ही वास्तू अधिक उठावदार असेल. तिच्या तक्तपोशीला रोमन पद्धतीची फरशी असून आतील भागावर वेलबुट्टी व पक्ष्यांची चित्रे आढळतात. बिरबलाचे निवासस्थानही असेच कलापूर्ण आहे.

पंचमहालाच्या पटांगणात एक मोठे व्यासपीठ असून जवळच बुद्धिबळाचा विशाल पट आहे. इबादतखाना, ख्वाबगाह, नौबतखाना, टाकसाळ, कारवान सराई, खनिजा या इतर काही वास्तूही वैशिष्ट्यपूर्ण आहेत. या सर्व वास्तू लाल वालुकाश्मात बांधलेल्या आहेत.

फतेपुर सीक्रीतील बहुतेक वास्तूंवर मोगल, इराणी, रोमन, हिंदू इ. विविध वास्तुशैलींची छाप दिसते तथापि अकबराने या सर्व वास्तुशैलींचा सुरेख मिलाफ करून एक स्वतंत्र वास्तुशिल्पशैली उभी केली. तिला अकबरी वास्तुशैली असे म्हणणे सयुक्तिक होईल. हे स्थळ देशी-परदेशी पर्यटकांचे एक महत्त्वाचे आकर्षण ठरले आहे. फतेपुर सीक्री व सिकंदरा या इतिहासप्रसिद्ध पण उपेक्षित स्थळांचा आधुनिक पर्यटन केंद्र म्हणून विकास करण्यासाठी १० कोटी रुपयांची एक योजना केंद्रीय पर्यटन खात्याने आखलेली आहे.

संदर्भ :1. Brown, Percy, Indian Architecture (The Islamic Period), Bombay, 1956.

  2. Hurlimann, Martin, Delhi, Agra, Fatehpur Sikri, London, 1965.

  3. Rizvi, S. A. A. Flynn, V. J. Fatehpur Sikri, Bombay, 1975.

देशपांडे, सु. र.