मनोरा: उत्तुंगतेमुळे चटकन नजर वेधून घेणारा व पायापेक्षा अनेक पटींनी जास्त उंच व सडसडीत असलेला वास्तुप्रकार. त्यास मनार ( या मूळ अरबी शब्दाचा अर्थं- जिथे प्रकाश आहे अशी जागा, असा होतो. मनोरा आणि दीपगृह यांतील आकारिक साधर्म्यवरून हे आले असावे), मोनार (उर्दू), अट्टालक, कर्णकूट कर्णहर्म्य (संस्कृत) इ. संज्ञा आहेत. प्राचीन संस्कृत साहित्यात मनोर्‍याची उंची, मांडणी, त्यावरील नक्षी यासंबंधीचे अनेक निर्देश आढळतात. मनोर्‍याचे अनेक आकार-प्रकार त्याच्या वापराप्रमाणे, बांधणीप्रमाणे संभवतात. या वास्तुप्रकारचे उपयोग अनेक आहेत. युद्धकाळात मनोर्‍याचा वापर टेहेळणी करण्याकरता होतो. शांततेच्या काळात स्मारकवास्तू म्हणून मनोरे उभारतात. धार्मिक वास्तूंमध्येही मनोर्‍यांची रचना केलेली असते. उदा., मशिदीत मीनार तर चर्चमध्ये ] घंटाघरे (मनोरे) असतात. अलिकडच्या काळात मनोर्‍यांचा उपयोग वास्तुसौंदर्य वाढवण्यासाठी तसेच अन्ही बर्‍याच कारणांनी केला जातो.जहांगीरच्या

बॅबिलोनियन संस्कृतीतील ⇨झिगुरातचे म्हणजे प्रचंड मंदिर- मनोर्‍यांचे अवशेष हे प्राचीन काळातील (इ. स. पू. तिसरे शतक ) मनोरा-रचनेचे उल्लेखनीय उदाहरण होय. इराक,सिरिया, ग्रीस, रोम इ. ठिकाणी युद्धकाळात तटबंदीवर मनोर्‍याचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यात आला. चीनच्या भिंतीवर, तसेच भारतात आणि अन्य पौर्वात्य देशांतही किल्ल्यांवर मनोरे बांधण्याची प्रथा होती. याची बांधणी दगडी, विटांची वा मातीची असे, तसेच त्यास दगड, वाण, उकळते तेल ओतण्यासाठी झरोके असत. रोमन व मेरिकन लोकांनी प्रारंभीच्या काळात तात्पुरत्या तटवंद्या बांधताना लाकडाच्या (ओंडक्याच्या) भिंती व मनोर्‍यांचा वापर केला. तुर्की लोकांनी सुरूवातीच्या काळात मनोर्‍यांचा वापर कबरीसारखा केला. गुर्गाननजीक आस्ताराबाद येथे काबस राज्याच्या सु. ३०.४८ मी. (१०० फुट) उंचीचा वैशिष्टयपूर्ण तारकाकृती मनोरा उभारण्यात आला.

स्मारक – मनोरे: अफगाणिस्तानातील ‘जाम’ चा मीनार (बारावे शतक), इस्फाहानचा ‘सारा बान’ मीनार, तसेच गझनी व समरकंद येथील मीनारांच्या वास्तू विशेष उल्लेखनीय आहेत. भारतातील मीनारांच्या वास्तुशैलींचे स्थूलमानाने तीन कालखंड मानले जातात: सुलतानशाही शैली, स्थानिक प्रादेशिक शैली आणि मोगल शैली. सुलतानशाही मीनारावर पर्शियन वा अफगाण धर्तीचा घुमट असतो.दिल्लीचा ७२.५६ मी. (२३८ फुट) उंचीचा ⇨कुतुबमीनार (बारावे-चौदावे शतक) हे या शैलीचे उत्कृष्ट उदाहरण होय. हा व दौलताबादचा चांद मीनार हे दोन्ही विजय – मनोरे आहेत. चितोडगढ येथे बाराच्या शतकात महाजन जिजा याने बांधलेला २४.३८ मी. (८०फुट) उंचीचा कीर्तिस्तंभ हा जैन वास्तुकलेचा: तर राणा कुंभयाने उभारलेला ३६.५७ मी. (१२० फुट) उंचीचा नऊ मजली विजयस्तंभ (१४३५) हा हिंदू वास्तुकलेचा उत्कृष्ट आविष्कार मानला जातो. मशिदीला जी उंच मनोर्‍याची जोड देण्यात आली, तिचा प्रमुख उद्देश या मनोर्‍याच्या सज्जातून मुअज्जिनने बांग पुकारणे (नमाज पढण्यासाठी भाविकांना बोलावणे) हा होता.

मीनार म्हणून ज्यांचा सर्वप्रथम वापर करण्यात आला, त्या वास्तुरचना म्हणजे ग्रीकांश (हेलेनिक) काळातील (इ. स. पू. पाचवे शतक) प्राचीन- मंदिर – प्राकाराच्या कोपर्‍यांवरील चार टेहेळणी-मनोरे होत. या मंदिर-प्राकाराचे रूपांतर पुढे दमास्कसच्या भव्य मशिदीत झाले (इ. स. ७०५). इथून पुढे मीनार हा मशिदीचा कायमचा अविभाज्य वास्तुघटक बनला. कालांतराने इस्लामी वास्तुकलेमध्ये मीनाराचे महत्व केवळ कार्योपयोगी घटक एवढ्यापुरतेच मर्यादित न राहता, वास्तुचे सौंदर्य वृद्धिंगत करणारा घटक म्हणूनही त्याची कलात्मक रचना होऊल लागली. त्यायोगे मनोर्‍याच्या आकारकल्पांमध्ये खूपच वैविघ्य व आकर्षकपणा निर्माण झाला. उदा., उमय्या खिलाफतीतील पहिल्यावालिदच्या कारकीर्दीतील (७०५-७१५) मशिदीचा व माराकेश येथील कुतुबिया मशिदीचा मीनार (११४६-९६) हे दोन्ही मनोरे चौरस आहेत. कैरोच्या सुलतान हसन मशिदीचा मीनार अष्टकोनी असून तो ८६ .८६ मी. (२८५ फुट) उंच आहे. इराणमधील इस्फाहानच्या मस्जिद-इ-जामीचा मीनार वर्तुळाकार आहे. तुर्कस्तानातील कोन्या व इस्तंब् ल येथील मीनारांची छपरे शंक्काकृती आहेत.

भारतातील धार्मिक मनोरे सर्वसाधारणपणे स्थानिक प्रादेशिक शैलीत अथवा मोगल शैलीत दिसून येतात. गुजरातमधील मीनार सडपातळ असून, त्यांवर हिंदू देवळाच्या शिखरासारखी दिसणारी छपरे असतात. उदा., चांपानेरच्या जामी मशिदीचा मनोरा. दक्षिणेत हैदराबादव विजापूर येथील मीनारांवर छोटे गोलाकार घुमट असतात. उदा., विजापूरमधील इब्राहिम रोझा मशिदीचा मीनार व हैदराबादच्या प्रवेशद्वारावरचे चार मीनार. मोगल शैलीतील मीनाराच्या वरच्या मजल्यावर उघडे दालन किंवा छत्री असते. आठ स्तंभांवर फुगीर घुमट असतो. यामुळे एकाच ठिकाणाहून चोहोकडे पाहातायेते. हे या शैलीचे वैशिष्टय होय. उदा., लाहोरमधील जंहागीरची कबर व ⇨ताजमहालचे चार मनोरे वास्तूची शोभा वाढविण्याकरता योजले आहेत. सु. सहाव्या शतकापासून चर्चच्या परिसरांत घंटा –मनोरे उभारण्यात सुरूवात झाली. कालांतराने कमानी, पुस्तीच्या भिंती किंवा पडभिंती, मोठ्या वाटोळ्या खिडक्या, शिल्पे, रंगीबेरंगी पाषाण –शिल्पपट्ट, घंटा बांधण्याची जागा इ. वास्तुघटकांनी युक्त असे चर्च- मनोरे बांधण्यात आले. रीम्झ, शार्त्र, कँटरबरी इ. ठिकाणचे चर्च – मनोरे प्रेक्षणीय आहेत. इटलीतील ⇨पीसाचा कलता मनोरा (बांधकाम कालावधी: सु. ११७४ – १३५०) सर्वस्वी आगळा व वैशिष्टयपुर्ण आहे.

आधुनिक मनोरे : आधुनिक काळात लोखंड, सिमेंट – कॉंक्रीट, पोलाद इ. बांधकाम साहित्याच्या वापरामुळे मनोर्‍याच्या आकारकल्पातही महत्वाचे बदल घडून आले. आधुनिक वास्तुकलेत प्रामुख्याने सौंदर्यद्दष्टया मांडणीचा डौल साधण्याकरिता मनोर्‍यांचा वापर अत्यंत कल्पकतेने करण्यात आला. स्टॉकहोमचे नूतन नगर-सभागृह हे ह्या संदर्भातच जगप्रसिद्ध ठरले पॅरिस येथे आलेक्सांद्र म्यूस्ताव्ह आयफेल या फ्रेंच वास्तुविशारदाने ⇨ आयफेल टॉवर हा ३०४.८ मी. (१,००० फूट) उंचीचा लोंखडी मनोरा १८८७-८९ या कालावधीत प्रदर्शनासाठी बांधला. लंडनचा पोस्ट ऑफीस टॉवर हा बिनतारी दळणवळणासाठी व अमेरिकेतील मिशिगनच्या जनरल मोटर्सच्या तांत्रिक केंद्रातील पाण्याच्या टाकीचा मनोरा हे उल्लेखनीय आहेत. विसाव्या शतकातील मनोरे हे कित्येकदा ⇨गगनचुंबी इमारतींच्या रूपात आढळून येतात. लंडनच्या संसद भवनातील बिगबेन हा घड्याळाचा मनोरा या प्रकारातील एक जगप्रसिद्ध उदाहरण होय. मुंबईचा राजाबाई टॉवर हा घड्याळासाठी, तसेच लोकांना मुंबईचे विहंगम दर्शन घडविण्यासाठी बांधण्यात आला. अशांसारख्या सुंदर व उंच मनोर्‍यामुळे शहरांच्या सौंदर्यात विशेष भर पडत असल्याचे दिसून येते.

पहा: इराणी कला, इस्लामी वास्तुकला, मशीद.

संदर्भ: 1. Brown. Percy, Indin Architecture (The Islamic Perlod). Bombay. 1959.

2. Rice, D. T. Inlamic Art. London, 1965.

कान्हेरे, गो. कृ. मुळीक, शं. ह.