अहमदाबाद वास्तुशैली : गुजरातमध्ये अहमदाबाद, अनहिलवाड (पाटण), धोलका, खंबायत, भडोच, चांपानेर वगैरे ठिकाणी भारतीय-इस्लामी वास्तुप्रकारांचे विविध व विपुल नमुने आहेत. यांपैकी उत्कृष्ट नमुने अहमदाबादेस असल्याने ही शैली ‘अहमदाबाद वास्तुशैली’ म्हणून ओळखली जाते. मुळातील हिंदू व जैन वास्तुकलेवर ⇨इस्लामी वास्तुकलेच्या झालेल्या परिणामांतून भारतीय-इस्लामी वास्तुकला निर्माण झाली.गुजरात प्रांत इस्लामी वर्चस्वाखाली गेल्यानंतर या संमिश्र वास्तुकलेची सुरूवात झाली. अलाउद्दीन खल्‌जीने नेमलेला तेथी सुभेदार मुझफरखान हा मूळचा राजपूत त्यामुळे त्याला दिल्लीच्या पठाण (अफगाण) वास्तुशैलीऐवजी गुजरातमधील सोळंकी वास्तुशैलीविषयी आपलेपणा होता व त्या शैलीला त्याने उत्तेजन दिले. सोळंकी वास्तुकलेवर चालुक्य शैलीचा प्रभाव होता. मुझफरखान स्वत्रंत झाल्यावर त्याने जी शहरे वसविली मशिदी, कबरी, बागा, किल्ले व राजवाडे बांधले त्यांच्या बांधकामात त्याने पारंपरिक शैलीचा वापर मुक्तपणे करू दिला. या शैलीचा परमोच्च विकास सुलतान महमद बेगडाच्या काळात (१४५९–१५११) झाला होता व तिचा प्रभाव १५७२ पर्यंत टिकून होता. या शैलीत भारवाही स्तंभ व त्यांवरील आडव्या तुळ्यांचा वापर मुख्यत्वे आहे. बांधकामात प्राय: पिवळ्या वालुकाश्माचा व संगमरवराचा वापर आहे. विटांचा वापर अपवादानेत आढळतो. वास्तु-अलंकरणात विविध भौमितिक आकार, त्यांत गुंफलेले पानाफुलांचे डौलदार आकार, स्तंभावर कंठमाला, घंटामाला व स्तंभपदावर उत्फुल्ल सूर्यकमलांचे आकार वापरले आहेत. स्तंभावरील नक्षीदार पडदीमुळे छायाप्रकाशाची मौज दिसते. गरम वाऱ्याचा व सूर्यप्रकाशाचा दाह कमी करण्यासाठी नाजूक कोरीव जाळ्यांचा व कमानींचा वापर केला आहे. शिवाय त्यामुळे खेळता वारा, भरपूर उजेड यांबरोबरच जरूर तो खाजगीपणाही साधाला आहे. जाळ्या विविध तऱ्हेने अलंकृत केल्या आहेत. ऊर्ध्वपर्णाकार कमानी, जाळ्या, छज्जे (छताचे पुढे येणारे भाग) वर इमला असलेल्या वा बांधून काढलेल्या प्रचंड विहिरी वगैरे या शैलीची खास वैशिष्ट्ये आहेत. स्तंभांवरील बैठकींवर कमानी बसविलेल्या असतात. कमानींत भरलेल्या जाळ्यांचे उत्कृष्ट उदाहरण सिद्दी सय्यदच्या मशिदीमध्ये आढळते. या मशिदीतील खांब पसरट व कमी नक्षीचे आहेत आणि त्यांवर जाळीदार कमानी आहेत. एकूण बांधणीत मोकळेपणा आहे. ‘तीन दरवाजा’ ही विजयद्वारा-वास्तू भारतात अद्वितीय आहे. यातील तिन्ही कमानींची उंची समान आहे पण मधली कमान जास्त रुंद आहे. त्यावर अर्धवर्तुळाकृती ढाळ असलेली पडदी आहे. दोन्ही स्तंभकांच्या पडभिंतींवरील सजावट जैन मंदिरातील जोत्यासारखी आहे. जैन वास्तुकलेचा प्रभाव जुम्मा मशिदीच्या बांधणीतही दिसतो. मध्यभागाची उंची बाजूला क्रमाक्रमाने कमी होते. म्हणून दर्शनी भाग त्रिकोणरचनेचा आहे. प्रार्थनादालनातील स्तंभ एकमेकांवर उभारलेले आहेत. वरच्या मजल्यावरील सज्जा व स्तंभांवर उचललेला घुमट यांमधील जाळ्यांतून आत मंद प्रकाश येतो. राणी सिप्रीच्या दर्ग्यात कबर व मशीद समोरासमोर आहेत. त्यांतील नक्षीकाम अप्रतिम आहे. यात कोपऱ्यावरील दर्शनी मनोरा भरीव आहे. दर्याखानाच्या कबरीवरील विटांनी बांधलेल्या घुमटाची रचना विजापूरच्या गोलघुमटाची नांदी मानतात. ‘दादा हरी बाव’ ही बांधून काढलेली प्रसिद्ध विहीर, कांकरिआ तलाव, शाही विश्रांतिगृहे, मशीद या आणखी काही वास्तू. अझमखानाचा राजवाडा व शाहीबाग या मोगलकालीन वास्तू आहेत. मराठी आणि इंग्रजी काळातील जैन हाथीसिंघ मंदिराखेरीज इतर इमारती महत्त्वाच्या नाहीत.

गटणे, कृ. व.

जैन हाथीसिंग मंदिर
शाह आलमची कबर
भद्र किल्ल्याची तटबंदी.