कमान: बांधकामाच्या भिंतीत काही उंचीपर्यंत मोकळी जागा सोडावी लागते. त्या मोकळ्या जागेवरील बांधकामाचे व इतर येणारे वजन पेलून धरण्याकरिता  कमान हे एक साधन वापरतात. कमानीची उत्पत्ती गुहेच्या विवरापासून झाली असावी. बॅबिलोनियन संस्कृतीच्या अवशेषांत प्राथमिक अवस्थेतील कमानी आढळतात. ज्या जागेवर कमान रचावयाची असेल तेथे दगड अगर विटांच्या आडव्या थरांपैकीप्रत्येक थरातील दगड खालच्या थरातील दगडाच्या बाहेर झुकता ठेवीत ठेवीत दोन्ही टोकांकडून कमान पुरी करतात. या स्थिर कमानीहोत. अशा कमानी सिंधू संस्कृतीच्या अवशेषांत आढळतात. कमानीवर येणारे उभे दाब कमानीच्या वक्र आकारामुळे खवाट्यावर व काहीविशिष्ट आकाराच्या कमानींच्या स्तंभांवरही वाटले जातात. हे तिरकस असतात. या कमानींना अस्थिर कमानी म्हणतात.

आ. १. स्थिर कमान

कमानीच्याअचकोनाचे आकार निमुळते असतात व माथ्यावरील कीलकामुळे (चावीच्या दगडामुळे) सर्व अचकोन एकमेकांशी घट्ट दाटून बसतात.वरून येणाऱ्या दाबामुळे अचकोन जास्त दाटले जाऊन कमान मजबूत रहाते. कमान व तिचे आनुषंगिक विभाग आ. २ मध्ये दाखविले आहेत.एकापुढे एक असलेल्या एकापेक्षा जास्त कमानींना कमान-मालिका म्हणतात. कमानीच्या दोन्ही बाजूंच्या कमानबैठकी, अंतर्नेमी आणिबहिर्नेमी यांमधील कमानीच्या एकूण भागाला कमानीचे कडे म्हणतात. अंतर्नेमी आणि बहिर्नेमी यांच्यामधील अंतर ही कमानीची जाडी होय.

आ. २. कमानीचे विभाग : (१) मध्यरेषा, (२) मध्यबिंदू, (३) झेप, (४) उडाण, (५) कक्षा, (६) त्रिज्या, (७) कटिबिंदू, (८) कटिबिंदूरेषा, (९) अंत:पृष्ठ, (१०) खवाटा, (११) स्फीत, (१२) अंतनेमी, (१३) बहिर्नेमी, (१४) जाडी, (१५) कमानमाथा, (१६) कमानबैठक, (१७) कडभिंत किंवा अंत्याधार, (१८) स्तंभ, (१९) कीलक किंवा चावीचा दगड, (२०) अचकोन. ))

कमानींची वर्गवारी : बांधकामाच्या प्रकारांवरून किंवा आकारांवरून कमानींची वर्गवारी करतात. बांधकामाच्या प्रकारांवरून केलेली वर्गवारी मुख्यत्वे तीन प्रकारांत मोडते : अनघड कमानी, ताशीव कमानी व मापीव कमानी.

(१) अनघड कमानी : ज्या ठिकाणी वरून गिलावा केला जाणार असेल किंवा जेथे कमानीचे बांधकाम दिसण्याचा मुद्दा उपस्थित होणार नाही अशा ठिकाणीच फक्त अशा कमानी करतात. विटांच्या बांधकामातच या प्रकारची कमान संभवते.

या प्रकारात अचकोनाच्या जागी सामान्य विटा न घासता किंवा न तोडता जशाच्या तशा वापरण्यात येतात. अशा कमानीच्या विटांचे मध्यच्छेदच फक्त अरीय असतात.विटांच्या बाजू अरीय नसतात. त्यामुळे लगतच्या दोन विटांच्या मधील अंतर अंतर्नेमीकडे कमी व बहिर्नेमीकडे जास्त राहते व हे अंतर भरून काढण्यासाठी सांध्यात भरावयाच्या संयोजकाचा आकार पाचरीसारखा निमुळता होतो. लवकर आवळणारा तसेच भक्कम आणि कठीण होणारा चुना किंवासिमेंट सांध्यात वापरणे आवश्यक असते. कारण कमानीच्या दोन्ही बाजूंच्या खवाट्यांना पेलून धरण्याचे काम जसे कमानमाथ्यावरील पाचरीच्या आकाराच्याकीलकाचे असते, त्याच प्रकारचे काम त्या प्रत्येक सांध्यावरही थोड्या फार प्रमाणात पडते. सांध्यांची बहिर्नेमीकडील जाडी वाजवीपेक्षा जास्त होऊ नये म्हणून दर्शनीगोलाकारात विटांची रुंदी येईल अशी विटांची रचना करतात. म्हणजे कमानीचा थर १० सेंमी. जाडीचा घेण्यात येतो. कमानीची झेप मोठी असल्यास किंवा कमान एकापेक्षाजास्त थरांची रचावयाची असल्यास थराला गुताव मिळावा म्हणून काही विटा उभ्या म्हणजे दर्शनी बाजूस विटांची लांबी येईल अशा रचतात (आ. ३).

आ. ३. अनघड विटांची कमान : (१) अरीय रेषा, (२)विटा, (३)निमुळता सांधा, (४)गुताव नीट.

सिमेंट किंवा चुन्याचा संयोजक पूर्ण आवळून कमानीस मजबूती येईपर्यंत तिचा उपधारकांचा (आ. १२) आधार काढीत नाहीत.


(२) ताशीव कमानी : ही कमान नरम दगडांची किंवा विटांची असू शकते. यात प्रत्येक अचकोन प्रत्यक्ष कमान रचताना, कामाच्या जागेवरच, साधारण तासून निमुळता करून बसवितात. अचकोन विटांचा असल्यास करवतीने कापता येतो व नरम दगडाचा असल्यास बसुलीने [एक प्रकारच्या तासण्याच्या हत्याराने, → गवंडीकाम] घडविता येतो. विटांची घडणसुद्धा आवश्यक वाटल्यास बसुलीने करता येते. वरून गिलावा केला जाणार नाही अशा ठिकाणी ही कमान दर्शनी भाग मापात कापून घेऊन परंतु आतमध्ये सांध्यासाठी अनघड ठेवून बांधतात. यात सांधे ५ मिमी. इतक्या कमी जाडीचे असतात. अंतर्नेमी व बहिर्नेमी यांच्याकडील सांध्यांची जाडी जवळजवळ सारखी करतात म्हणून या पद्धतीच्या कमानी रेखीव दिसतात. (आ. ४)

आ. ४. ताशीव कमान

(३) मापीव कमानी : दगडांच्या कमानी बहुधा मापीव असतात. या प्रकारच्या कमानीत कमानीचा प्रत्येक भाग म्हणजे अचकोन, कीलक,कमानबैठक वगैरे भाग कमानीत ज्या ठिकाणी बसवावयाचे त्या ठिकाणच्या कमानीच्या आकाराचे असतात. अंतर्नेमी व बहिर्नेमी यांच्याकडील बाजूंचे गोलावे, सांध्याच्या बाजू व दर्शनी बाजू हे प्रत्येक भाग अगदी तंतोतंत मापाप्रमाणे व आकाराप्रमाणे बनवून अथवा घडवून घेतलेले असतात. यामुळे अशा कमानी आकारबद्ध व सुबक दिसतात. मंदिरे, स्मारके व इतर प्रेक्षणीय वास्तूंत यांचा विशेष वापर करतात. विटांच्या मापीव कमानीकरिता अवश्य त्या विशिष्ट आकारांच्या विटा पाडून त्या भाजून घेतात. भाजताना जास्त उष्णतेने त्या विद्रुप होणार नाहीत व सर्वत्र समान उष्णतेने त्या एकविध (सर्वत्र सारख्या) रंगाच्या भाजल्या जातील याची विशेष काळजी घेऊन विटा बनवितात किंवा विशिष्ट तऱ्हेची गाळीव माती व रेतीचे जास्त प्रमाण घालून बेताच्या भाजलेल्या विटा कोठे कोठे बनवितात. अशा विटांवर नक्षीकाम करता येते, त्या करवतीने कापता येतात व दगडावर घासून गुळगुळीत करता येतात. इंग्‍लंडमध्ये अशा विटा बनवितात व त्यांस लालतोंडी किंवा रबरी विटा म्हणून संबोधितात.

जेथे प्रत्यक्ष जागेवर काँक्रीट ओतून कमान बांधणे शक्य नसेल तेथे पूर्वनिर्मित काँक्रीटच्या ठोकळ्यांचा उपयोग विटांच्या ऐवजी करतात. घडीव दगडांच्या कमानी याच प्रकारात मोडतात. अलंकारिक शिल्प म्हणून यांचा उपयोग विशेषतः केला जातो. काँक्रीटच्या कमानीच्या दर्शनी भागावर अशी दगडांची रचना केलेली आढळते.

कमानीचे आकारानुरूप प्रकार : कमानीचे आकार विविध प्रकारचे असू शकतात.त्यांतील काही मुख्य प्रकारांची मुख्यत्वे खालीलप्रमाणे वर्गवारी करतात:

(अ) (१) अर्धवर्तुळाकार, (२) वृत्तखंडी व (३) सपाट. या तीनही प्रकारांत एकच मध्यबिंदू असतो.

(आ) (४) टोकदार द्विकेंद्री किंवा गोथिक. यात दोन मध्यबिंदू व दोन वर्तुळखंड असतात.

(इ) (५) अर्धविवृत्ताकृती. यात ३, ५ किंवा अधिक पण विषम मध्यबिंदू व तितकेच वर्तुळखंड असू शकतात.

(ई) (६) चतुःकेंद्री. ट्यूडर आणि महिराप कमानी. यांत चार मध्यबिंदू असतात.

(१) अर्धवर्तुळाकार कमान : हा प्रकार अत्यंत सर्वसामान्य असला तरी तितकाच महत्त्वाचा आहे. या प्रकारच्या कमानीत स्तंभ किंवा अंत्याधार यावर येणाऱ्या एकूण प्रेरणा लंब रेषेत असतात. बाजूंना ढकलणाऱ्या प्रेरणा या कमानीमुळे निर्माण होत नाहीत. इतर अनेक प्रकारांत एकूण प्रेरणा तिरक्या येतात व त्यांचा परिणाम दोन स्तंभ किंवा अंत्याधार एकमेकांपासून दूर ढकलण्याच्या दिशेने होतो (आ. ५) व त्याकरिता स्तंभ व अंत्याधार यांसाठी पुरेसा रुंद पाया घ्यावा लागतो, तसा अर्धवर्तुळाकार कमानीच्या स्तंभांत घ्यावा लागत नाही. रोमन वास्तूंत आढळणाऱ्या अर्धवर्तुळाकार कमानीस इट्रुस्कन असे संबोधिले आहे. कारण इ. स. पू. तिसऱ्या शतकात इट्रुस्कन वसाहतीत ही कमान वेशीसाठी वापरली जात असे.

आ. ५. कमानीतील प्रेरणा

(२) वृत्तखंडी कमान : ज्या ठिकाणी झेपेच्या मानाने कमानीची उंची कमी ठेवावयाची असेल व साधेच बांधकाम असेल तेथे ही कमान वापरतात. दिसावयास सुंदर व रचना करण्यास सोपी अशी ही कमान आहे. एक मध्यबिंदू असलेला एकच वर्तुळखंड या कमानीची अंतर्नेमी होतो (आ. १). दारे किंवा खिडक्यांच्या चौकटींवर येणारे वजन कमी करण्यासाठी यांचा उपयोग करतात. तेथे यांना मुकी किंवा साहाय्यक कमान म्हणतात.

आ. ६. सपाट कमान : (१) झेप


३) सपाट कमान : या प्रकारच्या कमानीची उंची अगदीच कमी म्हणजे जवळजवळ शून्यच असते (आ. ६). अगदी कमी उंची येण्यास वर्तुळखंडाची त्रिज्या अर्थात खूप मोठी असावी लागते. म्हणून हिला बृहत्‌-त्रिज्येची कमान असे म्हणतात. दारे किंवा खिडक्या यांच्यावर दगडाविटांच्या रचनेत अशी कमान फारच सोईस्कर पडते व बेताचे वजन पेलू शकते.

आ. ७. टोकदार द्विकेंद्री कमान :(अ) बैठी, (आ) समभुज, (इ) उभट. (१)झेप, (२)मध्यबिंदू, (३)त्रिज्या.

(४) टोकदार द्विकेंद्री(गोथिक) कमान : या कमानीम्हणजे दोन निराळेमध्यबिंदू असलेले वर्तुळखंडमाथ्याजवळ एकमेकांस मिळूनहोणाऱ्या टोकदार आकाराच्याअसतात. पर्शियन वास्तूंत अशा कमानी आढळतात. भारतात मुसलमानी अमदानीत मशिदी, कबरस्थाने, राजवाडे, किल्ले यांत या कमानीचा वापर आहे. यूरोपमध्ये गोथिक वास्तूंत या कमानीचा उपयोग केला आहे.आधारस्तंभावर बाहेर ढकलणाऱ्या प्रेरणा या कमानीत येत नाहीत. याचे (अ) बैठी, (आ) समभुज, (इ) उभट असे तीन उपप्रकार आहेत (आ ७). बैठ्या कमानीत झेपेपेक्षात्रिज्या कमी असते व मध्यबिंदू कटिबिंदुरेषेच्या खाली किंवा कटिबिंदुरेषेवर पण दोन्ही कटिबिंदूंच्या आतील बाजूस असतात. समभुज उपप्रकारात झेप व त्रिज्या एकाचलांबीच्या असतात. मध्यबिंदू कटिबिंदूशीच असतात. उभट उपप्रकारात झेपेपेक्षा त्रिज्या मोठी असते व मध्यबिंदू कटिबिंदुरेषेवर पण दोन्ही कटिबिंदूंच्या बाहेर असतात. अशाकमानीच्या अचकोनामधील सांधे त्या खवाट्याशी संबंधित मध्यबिंदूशी अरीय ठेवले व व्यवस्थित बांधकाम केले, तर कमानीच्या माथ्याच्या जागी स्वतंत्र कीलकाचीआवश्यकता नसते. मध्ययुगात या कमानी यूरोपमध्ये फार प्रचारात होत्या. त्यांस गोथिक कमान असे नाव दिले जाते. कमानीच्या बहिर्नेमीच्या सभोवार पुढे झुकणारा नक्षीदारकंगोरा बसवून कमानीचा डौल वाढवितात.

(५) अर्धविवृत्ताकृती (अर्धलंबवर्तुळाकृती) कमान : या प्रकारच्या कमानीत तीन, पाच किंवा अधिक पण विषम मध्यबिंदू व तितके वर्तुळखंड असतात. माथ्याजवळ बनणारे टोक गोलाकार करण्याचे काम एक मध्यबिंदू करतो व तो मध्यरेषेवर कटिबिंदुरेषेच्या खाली असतो. इतर मध्यबिंदू मध्यरेषेच्या दुतर्फा कटिबिंदुरेषेत जोडीजोडीने असतात. जितके जास्त वर्तुळखंड असतील तितके ते एकमेकांत सहजसुलभ मिसळून जातात. म्हणून जास्त मध्यबिंदूंच्या कमानी जास्त आकारबद्ध होतात. तीन वर्तुळ खंडांची कमान रचनेस तसेच दगड घडविणे, उपधारक, विटांचे साचे इ. सर्वच दृष्टींनी सोईस्कर असते. आ. ८ मध्ये तीन मध्यबिंदूंची एक कमान दाखविली आहे. तीन मध्यबिंदूंमुळे तीन वर्तुळखंड असले तरी वर्तुळखंडांचे प्रकार दोनच होतात. कमानीच्या मध्यभागात एक प्रकारचे आणि दोन्ही टोकांस दुसऱ्या प्रकारचे वर्तुळखंड असतात.

आ. ८. अर्धविवृत्ताकृती कमान :(१)मध्यबिंदू, (१)मध्यबिंदू जोडी, (२)मध्यरेषा, (३) कटिबिंदुरेषा.

(६) चतुःकेंद्री कमान : द्विकेंद्री कमानी प्रमाणे चतुःकेंद्री कमानी माथ्याजवळ टोकदार बनतात त्यांना ट्यूडर कमानी म्हणतात. त्यांच्या एका प्रकारात कमानीचा काही भाग अंतर्वक्र व काही भाग बहिर्वक्र असतो, त्यास महिराप अशी संज्ञा आहे. ट्यूडर कमानीच्या चार मध्यबिंदूंपैकी दोनांची जोडी कटिबिंदुरेषेवर व दुसऱ्या दोनांची जोडी कटिबिंदुरेषेच्या खाली असते. जोडीतील मध्यबिंदू मध्यरेषेच्या दुतर्फा सारख्या अंतरावर असतात. चारीही मध्यबिंदू अंतर्नेमीच्या आत असतात. महिराप कमानीत दोन मध्यबिंदू कटिबिंदुरेषेवर व दुसरे दोन कटिबिंदुरेषेच्या वरील बाजूस परंतु बहिर्नेमीच्या बाहेर असतात. महिराप कमानीतील कटिबिंदुरेषेवरील दोन मध्यबिंदू झेपेच्या मध्यावर एकत्रित होतात तेव्हा महिराप कमान त्रिकेंद्री होते. महिराप कमानीच्या अंतर्नेमींना अवश्य तो बाक देऊन नक्षीदार कमान होते (आ. ९). या कमानीचा आकार अन्वस्तीय (पॅराबोलिक) असतो व उंचीपेक्षा झेप मोठी असेल, तर आडवा अन्वस्तीय नाहीतर उभा अन्वस्तीय आकार होतो. मध्यबिंदूच्या परस्पर अंतराप्रमाणे निरनिराळे आकार होऊ शकतात.

आ. ९. नक्षीदार महिराप:म - मध्यबिंदू म१ - कटिबिंदुरेषेवरील मध्यबिंदु जोडी, म२ - कटिबिंदुरेषेच्या वरील बाजूची मध्यबिंदु जोडी, त - त्रिज्या, क - कटिबिंदुरेषा.

इतर प्रकार : उलटी कमान : ज्या ठिकाणी बांधकामाचा भार पेलून धरण्याकरिता पसरट पायाची आवश्यकता असेल, तेथे स्तंभामार्फत येणारा बांधकामाचा भार पायावर सर्वत्र विभागून जावा म्हणून उलट्या कमानीची योजना करतात (आ. १० अ). प्रबलित काँक्रीटच्या प्रसारापासून उलट्या कमानीच्या पद्धतीचा वापर सहसा करीत नाहीत.

वर्तुळाकार किंवा अंडाकृती कमान : दोन किंवा अधिक अर्धाकृती कमानी एकमेकींस उलट्या सुलट्या जोडून पूर्ण वर्तुळाकार किंवा अंडाकृती कमानी बनवितात. शोभिवंत गवाक्षे म्हणून किंवा द्रवपदार्थांच्या अखंडित प्रवाहासाठी अशा कमानी वापरतात. (आ. १० आ). याच पद्धतीच्या नालाकृती कमानीही बनवितात. नालाकृती आकार भारतातील कित्येक लेण्यांत आढळतो.

आ. १०. (अ) उलटी कमान (आ) अंडाकृती कमान : (१) झेप, (२)१/५ झेप

देवळी : रुंद भिंतीत कोनाड्याची किंवा तत्सम पोकळीची पाठभिंत किंवा पाठभिंत व दोन्ही बाजू जेव्हा वर्तुळाकार असतात तेव्हा त्याच्या माथ्यावर बांधलेली ही कमान गोलीय खंडाकार असते. अर्थात देवळीचे अधोदर्शन व पुरोदर्शन दोन्ही वर्तुळखंडाकार असतात. (आ. ११). शोभिवंत काम पाहिजे असेल तेथेच बहुधा अशा देवळ्या बांधतात.


कमानीची बांधणी : दगड, विटा किंवा काँक्रीट यांपैकी कोणत्याही प्रकारची बांधणी करताना प्रथम कमानीच्या अंतर्नेमीशी जुळणारा एक पृष्ठभाग तयार करून अवश्य त्या उंचीवर व पक्क्या आधारावर तो उभारून कमानीची रचना करतात. अर्थात कमानीतील जोड मिळून येईपर्यंत या पृष्ठभागाचा आधार कमानीस आवश्यक असतो. असा पृष्ठभाग व त्याचे आधार लहान झेपेवर उभारतात त्यास कलबूत म्हणतात. झेप मोठी असल्यास लाकडी किंवा लोखंडी सांगाडे बनवून आधार तयार करतात त्यास उपधारक ही संज्ञा आहे.

आ. ११. देवळी : (१) अक्ष, (२)मध्यरेषा, (३)पाचरी आकार

काही बांधकामांत घटक अचकोनांचे आकार विशिष्ट तऱ्हेने कापून घेतल्यास मोठ्या झेपेवरसुद्धा उपधारकांशिवाय कमानीचे बांधकाम होऊ शकते. ही रचना अर्धवर्तुळाकृती किंवा अर्धविवृत्ताकृती याच कमानींच्या बाबतीत शक्य असते व ती चांगलीही दिसते. या पद्धतीने बनविलेल्या कमानींचे सामर्थ्य सांध्यांतील संयोजकाच्या सामर्थ्यावर फारसे अवलंबून नसते. कमानीच्या रचनेचे बांधकाम चालू असताना उपधारकावर होणाऱ्या असम भाराचा तोल सांभाळून उपधारक विकृत आकाराचा होणार नाही, अशा मजबुतीची उपधारकाची व त्याच्या आधारांची बांधणी मजबूत करणे अवश्य असते (आ. १२).

आ. १०.(आ) अंडाकृती कमान : (१) झेप, (२)१/५ झेप

कमानीचे बांधकाम पूर्ण झाल्यावर काही अवधीनंतर बांधकाम मजबूत होते. त्यानंतर कमानीखालील उपधारक उतरवून काढून घेतात. उपधारकांच्या टेकूखाली उलटसुलट एकमेकींवर बसविलेल्या पाचरी बाजूंनी ठोकून सहज सुलभतेने काढून घेता येतात व उपधारक उतरतो व सुटा होतो.

आ. १२. उपधारक :(१)आधारफळ्या, (२)फासळ्या, (३)दाटणी, (४)ताणपट्ट्या, (५)टेकू, (६)उलटसुलट पाचरी, (७)झेप.

संदर्भ : Greenhalgh, R. Ed., Modern Building Construction, Vol. I, London.

नगरकर, अ. म. गटणे, कृ. ब.