चैत्य केंद्रस्थानी स्तूप असणारे प्रार्थनामंदिर. चैत्याचे आरंभीचे स्वरूप म्हणजे स्तूप व त्याभोवतालचा प्रदक्षिणामार्ग ह्यांना आच्छादून घेणारी गोल वास्तू. त्याच्या प्रवेशद्वारासमोर छोटीशी वीथिका असे. राजस्थानात जयपूरनजीक वैराट येथे अशा मौर्यकालीन चैत्याचे अवशेष मिळाले आहेत. जुन्नरचे तुळजा लेणे व गुंटुपल्ली येथील लेणे ही याच प्रकारची उदाहरणे आहेत. या वर्तुळाकार चैत्यासमोर आयताकार,गजपृष्ठाकार छपराची शाला वा मंडप उभारणे, ही दुसरी पायरी होय. अखेरच्या अवस्थेत ह्या दोन भागांना वेगळे करणारी भिंत काढून टाकून एक प्रचंड व सलग चापाकार चैत्यगृह निर्माण करण्यात आले. सांची, सारनाथ, नागार्जुनकोंडा अशा ठिकाणी शुंगसातवाहन काळातील चैत्यगृहांचे अवशेष उत्खनित करण्यात आले आहेत. भारहूत आणि सांची येथील मूर्तिकामात चैत्यगृहांच्या अनेक प्रतिकृती दिसतातपरंतु चैत्यगृहांची उत्कृष्ट कल्पना येते, ती शैलोत्कीर्ण चैत्यगृहांवरून. भाजे, अजिंठा, कार्ले येथे या वास्तूच्या विधानांच्या व रूपांच्या विविध अवस्था पहावयास सापडतात. सर्वांत प्रगत अशा चैत्यगृहात प्रवेशद्वार व त्यावर वीथिका, त्याच्या आत ओवरी आणि ओवरीतून आत गेल्यावर मुख्य मंडप, मंडपात जाण्यास एक आणि दोन्ही बाजूंच्या दोन नासिकांमध्ये (देवडी किंवा ओटी) जाण्यास एकेक असे तीन दरवाजे असतात. आयताच्या छोट्या बाजूमध्ये प्रवेशद्वारे व त्याच्या समोरच्या बाजूमध्ये स्तूप बसविलेला असतो. ही बाजू गोलाकार वा चापाकार केलेली असते. मंडपाच्या दोन्ही बाजूंच्या ओसऱ्या व नासिका स्तूपाभोवतीच्या प्रदक्षिणापथास मिळतात. छप्पर गजपृष्ठाकृती असून, समोरच्या बाजूला अर्धवर्तुळाकृती गवाक्ष असते. चित्र व शिल्प यांच्या सजावटीने चैत्यगृहास सुशोभित केलेले असते.

चैत्यगृहाचा अंतर्भाग, कार्ले, इ. स. पू. सु. १ ले शतक

माटे,म. श्री.