अकॉपलिसचे भव्य प्रवेशद्वार (प्रॉपिलीआ), अथेन्स.

सिंहद्वार : (प्रॉपिलीअम). भव्य द्वारमंडप वा प्रवेशद्वार. प्राचीन ग्रीक वास्तुकलेतील ‘प्रॉपिलीअम’ ही संज्ञा भव्य द्वारमंडप वा प्रवेशद्वार ह्या अर्थाने रुढ होती. पवित्र धार्मिक भूमी, राजप्रासाद, ‘ॲगोरा’ (ग्रीक सभास्थान वा सभाचौक), शाही दरबार-दालने अशा वास्तूंच्या भव्य प्रवेशद्वारांसाठी वा प्रवेशमंडपांसाठी प्राचीन ग्रीकांनी ‘प्रॉपिलीआ ’ ही संज्ञा रुढ केली. ‘प्रॉपिलीअम’ हे त्याचे एकवचनी रुप साध्या, बाह्यदर्शनी भागाच्या प्रवेशद्वारासाठी वापरले जाई. ‘प्रॉपिलीअम’ साठी मराठीमध्ये सिंहद्वार वा सिंहदरवाजा, प्रवेशद्वार, मुख्यद्वार, गाभारद्वार अशा वेगवेगळ्या पर्यायी संज्ञा वापरल्या जातात. ‘लायन गेट’ नामक द्वारवास्तुप्रकारासाठीही ‘सिंहद्वार’ हा मराठी पर्याय रुढ आहे. सामान्यतः धार्मिक उद्दिष्टांसाठी वापरात असलेल्या पवित्र भूमीच्या वा बंदिस्त आवाराच्या प्रवेशस्थानी, स्तंभावलीच्या आधारावर उभारलेला द्वारमंडप, असे प्रॉपिलीअमचे प्राथमिक रुप होते. प्रवेशस्थानी द्वार असल्यास त्याच्या पुढे आद्यभागी अथवा प्रवेशद्वार नसल्यास त्याशिवायही असे प्रॉपिलीअम उभारले जात.

प्रॉपिलीअमचे सर्वांत प्रसिद्घ व ठळक उदाहरण म्हणजे अथेन्सच्या ⇨ अक्रॅपलिस (तटबंदीची किल्लेवजा वास्तू) वास्तूचे भव्य प्रवेशद्वार. ते अद्यापही अवशिष्ट रुपात चांगल्या प्रकारे जतन केलेले आहे. या स्तंभावलीयुक्त प्रवेशद्वारातून आत अक्रॅपलिसकडे जाणारा पवित्र मार्ग (सॅक्रीड वे) आखलेला होता. पेरिक्लीझच्या आदेशावरुन इ. स. पू. ४३७– ४३२ या काळात, आधीच्या प्रवेशमार्गाच्या जागीच ह्या भव्य, प्रचंड द्वाराचे बांधकाम करण्यात आले. प्राचीन ग्रीक वास्तुशिल्पी नेसिक्लीझ हा त्याचा वास्तुरचनाकार होता. वास्तुरचनेत ‘पेंटेलिक’ संगमरवराचा वापर केलेला होता. ही वास्तू मध्यवर्ती प्रवेशमार्ग व दोन कोनाडेवजा पाखा यांनी युक्त होती आणि त्यांपैकी एका पाखेत ‘पिनाकोटेचा’ ही चित्रवीथी होती.

प्राचीन मायसीनी संस्कृतीतील ⇨ नॉसस येथील मिनॉसच्या राजप्रासादाचा सिंह दरवाजा (लायन गेट) हा अत्यंत प्रसिद्घ व प्रमुख असा अवशिष्ट वास्तुघटक आहे. मायसीनीच्या टेकडीच्या सगळ्यात उंच भागी दगडी तटबंदीने वेढलेला किल्ला व मिनॉसचा राजप्रासाद असून त्याचे भव्य सिंहद्वार अद्याप अवशिष्ट आहे. हे प्रवेशद्वार अवाढव्य दगडी भिंतींच्या बांधकामाने वेढलेले असून त्याचा प्रवेशमार्ग व त्यालगतच्या चौरस घडीव दगडाच्या चिरेबंदी (ॲश्‌लर) भिंती यांच्यात कालौघात पुनर्बांधकाम व फेरबदल होत गेलेले दिसतात. प्रवेशमार्गाच्या दोन्ही बाजूंच्या उंच उभ्या अजस्त्र दगडी भिंतींनी शिरोभागीच्या भव्य द्वारमाथ्याला आधार देऊन तोलून धरले आहे. मध्यवर्ती स्तंभाकडे तोंड करुन दोन सिंहांच्या, मागील पायांवर उभ्या असलेल्या स्थितीतील, उत्थित शिल्पाकृती हे या सिंहद्वाराचे लक्षणीय वैशिष्ट्य होय.

‘प्रॉपिलीआʼ ही संज्ञा अर्वाचीन काळातील काही प्रचंड मोठ्या व भव्य प्रवेशद्वार-वास्तूंना अनुलक्षूनही वापरली गेली. प्रामुख्याने अठराव्या शतकाचा उत्तरार्ध ते एकोणिसावे शतक ह्या दरम्यानच्या कालखंडात नव-अभिजाततावादी व स्वच्छंदतावादी वास्तुशैलींमध्ये उभारलेल्या प्रचंड भव्य प्रवेशद्वार-वास्तूंच्या संदर्भात ही संज्ञा विशेषत्वे वापरली गेली. बर्लिन येथील ‘ब्रांडेनबुर्ग’ (१७८४) व ‘प्रॉपिलाएन ऑफ म्यूनिक’ (१८६२) ह्या ‘प्रॉपिलीआ’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या सिंहद्वार-वास्तूंचे उदाहरणादाखल निर्देश करता येतील.

इनामदार, श्री. दे.