मस्ताबा : प्राचीन ईजिप्शियन थडग्याचा प्रकार. ईजिप्तमध्ये (मिस्र) प्राचीन काळी प्रेते थडग्यात जतन करण्याची प्रथा होती. राजे, सरदार व श्रीमंत वर्गातील लोकांनी बांधलेल्या तत्कालीन थडग्यांना ‘मस्तबा’ अशी संज्ञा आहे. तद्वतच अरबी भाषेत घराच्या अंगणातील बाकांनाही ‘मस्तबा’ असे म्हटले जाते. त्यांच्या थडग्यांशी असलेल्या आकारसाधर्म्यावरून हे नाव पडले असावे.

गीझा येथील तीन प्राचीन मस्ताव्यांची रेखाचित्रे ईजिप्त.मस्ताबा हे दगडी बांधणीचे, दक्षिणोत्तर दिशायोजन असलेले, आयताकार, सपाट माथ्याचे व उतरत्या बाजूंचे असत. कालांताराने मस्ताब्याच्या बाह्य आकारांत बदल होत गेले. त्यातून पिरॅमिडची कल्पना उत्क्रांत झाली. उदा., गीझाची प्रसिद्ध तीन पिरॅमिड्सही त्यांपैकीच आहेत. प्राचीन ईजिप्तमध्ये मरणोत्तर जीवनाची कल्पना रूढ होती. हे जीवन सुखात व्यतीत करण्यासाठी राजे लोक (फेअरो) स्वतःची थडगी स्वतः बांधीत. तसेच राजे-राण्यांची प्रेते जतन करण्यासाठी त्यांवर रासायनिक प्रक्रिया करून ‘ममी’च्या जाणारे त्यांचे मौल्यवान जडजवाहीर यांच्या सुरक्षिततेसाठी जमिनीखाली तळघरे खणून त्यांवर मजबूत व भक्कम बांधकाम करीत. ही सुरुवातीच्या काळातील थडगी जमिनीत सु. २ मी. खोल पुरली जात. त्यांवर लाकडी ओंडक्याचे छत असून त्यावर विटा-मातीचे सु. २ मी. उंचीचे बांधकाम केले जाई. त्यानंतरच्या काळात तळघरे खडकात खोल खणत आणि जमिनीवर उंच दगडी चौथरे बांधीत. आत शिरण्यासाठी चौथऱ्यातून भुयारी वाट असे मात्र राजाचे ममीरुपातील शव आणि धन विधीपूर्वक आत ठेवल्यावर ही भुयारी वाट दगडकामाने पूर्ण बुजवून टाकली जात असे. मस्ताब्याच्या विकसित वास्तुरुपामध्ये चौथऱ्यात प्रवेशदालन व प्रसादगृह यांची योजना असे. दालनाच्या भिंतीवर राजा अथवा राणीचे नाव व स्तुतिपर मजकूर चित्रलिपीत, तसेच दैनंदिन जीवनातील दृश्ये आदी चित्रण खोदले जाई. सकार येथील ‘अहा’ व ‘थी’ आणि बेट खलाफ व गीझा येथील मस्ताबे हे प्राचीन काळातील प्रातिनिधिक मस्ताबे होत.

मुळीक, शं. ह.