जोन्स, इनिगो : (१५ जुलै १५७३–२१ जून १६५२). प्रख्यात ब्रिटिश वास्तुशिल्पज्ञ. लंडन येथे जन्म. त्याने यूरोपीय देशांत आणि विशेषतः इटलीमध्ये प्रवास करून प्रबोधनकालीन वास्तुकलेचा निरीक्षणपूर्वक अभ्यास केला. आंद्रेआ पाललाद्यो या इटालियन वास्तुशिल्पज्ञाचा त्याच्यावर विशेष प्रभाव होता. आपल्या समकालीनांपेक्षा सर्वस्वी वेगळी अशी वास्तुशैली त्याने हाताळली. जोन्स हा आधुनिक अर्थाने इंग्लंडमधील पहिला व्यावसायिक वास्तुविशारद म्हणावा लागेल. त्याच्या उदयापूर्वी इंग्लंडमधील वास्तुशैलीवर पारंपरिक मघ्ययुगीन गॉथिक व ट्यूडर शैलींचा प्रभाव होता. जोन्सने तीमध्ये इटालियन प्रबोधनशैलीचा प्रवाह आणून तिला नवचैतन्य प्राप्त करून दिले. त्याने  इंग्लंडमध्ये अभिजात वास्तुशैलीचे पुनरूज्जीवन केले. जोन्सने अनेक वास्तुकल्प केले असले, तरी त्यांवरून बांधलेल्या वास्तूंपैकी फारच थोड्या अस्तित्वात आहेत. त्याच्या महत्त्वपूर्ण वास्तूंमध्ये ग्रिनिच येथील राणीचा प्रासाद (१६१६–३५), ‘द बँक्विटिंग हाउस’, व्हाइटहॉल (१६१९–२२), ‘क्विन्स चॅपेल ऑफ सेंट जेम्स’ (१६२३–२७), ‘कॉव्हेंट गार्डन चर्च ’ (१६३०), ‘विल्टन हाउस’ (१६४९–५२) इत्यादींचा उल्लेख करता येईल. वास्तुकलेखेरीज त्याने चित्रकला व रंगमंच-सजावट या क्षेत्रांतही कामगिरी केली. द मोस्ट नोटेबल अँटिक्विटी ऑफ ग्रेट  ब्रिटन, व्हल्गरली कॉल्ड स्टोनहेंज (१६५५) व द आर्किटेक्चर ऑफ पाललाद्यो (४ खंड, १७१५) हे त्याचे कलाविषयक लिखाणही प्रसिद्ध आहे. लंडन येथे त्याचे निधन झाले.

संदर्भ :

1. Gotch, J. A. Inigo Jones, London, 1928.

2. Summerson John, Inigo Jones, 1966.

पेठे, प्रकाश