पा र्थ नॉ न : ग्रीसमधील अथीना देवतेचे प्राचीन मंदिर. ते अथेन्स शहरातील अक्रॉपलिस टेकडीवर अथीना देवतेच्या सन्मानार्थ इ.स.पू. ४४७ – ४३९ च्या दरम्यान उभारण्यात आले. ते पेरिक्लीझने (इ.स.पू. ४६१ – ४२९) फिडीयसच्या मार्गदर्शनाखाली इक्टायनस आणि कॅलिक्राटीझ या दोन वास्तुविशारदांकडून बांधून घेतले. याचवेळी फिडीयसने तयार केलेल्या अथीना देवतेच्या सुंदर आणि भव्य मूर्तीची त्या मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आली. इ.स.पू.४३२ पर्यंत मंदिरातील शिल्पकाम व अलंकरण चालू होते. इ.स. पाचव्या 

पा र्थ नॉ न अथेन्स

शतकापर्यंत हे मंदिर सुस्थितीत होते. त्यानंतर मात्र येथील अथीना देवतेची मूर्ती हलविण्यात आली.

मूळ मंदिर चकचकीत, गुळगुळीत संगमरवरी दगडांचे असून अभिजात डोरिक शैलीत बांधलेले आहे. या आयताकार मंदिराची रुंदी ३०.८९ मी. व लांबी ६९.५४ मी. असून मंदिर पूर्वाभिमुख आहे. मंदिराचे संपूर्ण छत स्तंभावलींकर आधारित असून प्रत्येक स्तंभ खालून वर दंडगोलाकार, पादविरहित चौरस स्तंभशीर्षाचा आहे. एकूण मोठे स्तंभ ५८ आहेत आणि मंदिराची उंची १९.५ मी. आहे. पश्चिमेला मधोमध गर्भगृह असून त्याच्या मागील बाजूने गर्भगृहापासून स्वतंत्र भांडारगृह आहे. गर्भगृह आणि भांडारगृह यांच्या भिंतींवर बाहेरील बाजूंस छताखाली शिल्पपट्ट खोदलेले आहेत. तसेच स्तंभावलींत प्रत्येक स्तंभावर कोरीव काम असून स्तंभशीर्षापाशी चौकोनी कोनाड्यात मूर्ती बसविलेल्या आहेत. तुला आणि चांदईचा   एका लंबचौकोनी दालनात १२ मी. उंचीची हस्तिदंत व सुवर्ण यांचा उपयोग करून घडविलेली उभी मूर्ती होती. अथीनाच्या उजव्या हातात विजयश्रीद्योतक चिन्ह होते. गर्भगृहाच्या पूर्वेकडील भागात अथीनाचा जन्म, पश्चिमेकडे तिचे पोसायडनबरोबरचे युद्ध आणि तुलापट्टांवर तिच्या उत्सवातील विविध प्रसंग कोरलेले होते. मूर्तिकामात, अपोत्थित, उत्थित, प्रोत्थित, निमग्न वगैरे सर्व प्रकारच्या शिल्पांचे नमुने असून भौमितिक आकृतिबंधही विविध प्रकारचे आढळतात. येथे वास्तुकला  मूर्तिकामातील सहजसुलभता, रचनाकौशल्य आणि प्रमाणबद्धताही प्रकर्षाने जाणवते.

या मंदिराची इ.स. पाचच्या शतकानंतर मोडतोड झाली. पहिल्या जस्टिनिअनने (४८३ – ५६५) ह्याचे रूपांतर ख्रिस्ती चर्चमध्ये केले तर पुढे तुर्की अंमलात (१४५८-१८३१) त्याचे मशिदीत रूपांतर करण्यात आले. तथापि प्रत्यक्ष वास्तूत फारसे फेरबदल झाले नाहीत. परंतु व्हेनिशियन लोकांनी १६८७ मध्ये तुर्कांविरुद्ध लढताना जो दारूगोळा वापरला, त्यांपैकी एका गोळ्याचा मंदिरात स्फोट होऊन मंदिराचा मध्यभाग उद‌्ध्वस्त झाला आणि काही स्तंभ व शिल्पपट्ट उरले. यांपैकी वरील शिल्पे १८०१ – ०३ दरम्यान लॉर्ड एल्जिनने तुर्कांच्या परवानगीने गोळा केली व ब्रिटिश संग्रहालयाला विकली. उरलेली काही शिल्पे लूव्ह्‍र येथील संग्रहालयात ठेवण्यात आली आहेत. या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम ग्रीस शासनाने सुरू केले होते.

संदर्भ : (1) Gardner, Robert, The Parthenon : Its Science of Forms, Washingtron, 1973.

देशपांडे, सु.र.