नगररचना : (टाउन प्लॅनिंग). आधुनिक काळात नगररचना आणि तीत अंतर्भूत होणाऱ्या अनेक घटकांचे स्वरूप फार व्यापक आणि गुंतागुंतीचे झाले आहे. नगराच्या विकास-विस्तारासाठी केलेले नियोजन म्हणजे नगररचना, असे स्थूलमानाने म्हणता येईल. त्यात नव्या नगरांच्या स्थापनेचाही अंतर्भाव होतो. नगराची सद्यःस्थिती लक्षात घेऊन त्याच्या संभाव्य वाढीचा आराखडा तयार करताना नागरी सुखसोयी, स्वास्थ्य, आरोग्य, दळणवळण यांचा तसेच नगराची नैसर्गिक ठेवण व सौंदर्य इत्यादींचा विचार केला जातो. नागरी जीवनाच्या गरजांच्या महत्त्वसापेक्षतेनुसार निवासस्थाने, शिक्षणसंस्था, धार्मिक वास्तू, व्यापारपेठा, बँका, कारखाने व अन्य औद्योगिक वास्तू, शासकीय संस्था, क्रीडागृहे, उद्याने, तलाव, स्नानगृहे इ. वास्तू तसेच दळणवळण-केंद्रे, वाहतूकमार्ग, मैदाने व मोकळे परिसर या सर्व घटकांची सुसंवादी व सौंदर्यपूर्ण मांडणी नगररचनेमध्ये अभिप्रेत असते. त्याचप्रमाणे नगराची भविष्यकालीन लोकसंख्या व आर्थिक-सामाजिक-सांस्कृतिक परिवर्तनाच्या दिशा यांचा अभ्यासही नगररचनेसाठी आवश्यक असतो. वास्तुकला, मूर्तिकला, उद्याननिर्मिती आदी कलांच्या सहयोगाने नगररचना सौंदर्यपूर्ण केली जाते. आदर्श नगररचनेमध्ये नगररचनाकार, वास्तुशिल्पज्ञ, स्थलशिल्पज्ञ, समाजशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ यांसारख्या अनेक क्षेत्रांतील तज्ञांच्या विचारांचा योग्य समन्वय साधलेला दिसून येतो.

मानवी संस्कृतीच्या विकासामध्ये नगररचनेचे स्थान महत्त्वाचे आहे. नगरे ही संस्कृतीच्या प्रगतीची खूण मानली जाते. नगरांचा इतिहास हा मानवी संस्कृतीच्या इतिहासाइतकाच प्राचीन आहे. संस्कृतीचा उदय होण्यापूर्वीच्या प्राचीन काळी मानव गुहेत राहत असे. घराचा वास्तुरूपात्मक अनुभव त्याला गुहेतूनच लाभला. पुढे जमिनीवर जे आपोआप उगवतील असे खाद्यपदार्थ आणि शिकार यांच्यावर उदरनिर्वाह करण्याच्या काळानंतर, माणूस पशुपालनाबरोबरच जमिनीची मशागत करून धान्योत्पादन करू लागला. त्यायोगे निर्माण झालेली सुबत्ता व स्वास्थ्य टिकविण्यासाठी आणि स्वतःच्या निवासासाठी तो निवाऱ्याचे स्थान बनवू लागला त्यातून प्रत्येकाचे मालकी हक्क निर्माण झाले. त्यांचे संरक्षण व्हावे म्हणून श्रमविभागणी कौशल्य वाढवून माणूस समूह करून राहू लागला, तेव्हापासून गावांची सुरुवात झाली. सुरक्षितता व संरक्षण या दृष्टींनीच त्यावेळी गावे वसलेली आढळतात. शारीरिक अगर दैवी शक्तीच्या बळावर पुष्कळ गावांचे वर्चस्व काही लोकांच्या हाती आल्यावर त्यांच्या आधिपत्याखाली गावांची मांडणी काही धोरणांनी होऊ लागली. त्या त्या काळानुरूप ही मांडणी कशी असावी, याबद्दलचा विचारही प्राचीन नगररचनाशास्त्रात झाल्याचे दिसून येते.

जसजशी माणसाची असुरक्षितता कमी होत गेली, त्याची संपत्ती वाढली, शासनव्यवस्था बलवान व केंद्रीभूत झाली, कामाच्या हत्यारांत व संरक्षणाच्या आयुधांत सुधारणा झाली, तसतसे ग्रामांचे रूप बदलत गेले. दिग्विजयी राजांनी नवीन सुंदर नगरे योजनापूर्वक वसविली, तसेच नवीन पेठा वसविल्या. सुरक्षित जागी राजवाडा व राजघराण्यातील लोकांची विलासस्थाने, त्यांच्या आसपास सरदार-मानकऱ्यांच्या ऐसपैस हवेल्या व त्यापलीकडे बाजारपेठ व लोकवस्ती अशी सर्वसाधारणपणे तत्कालीन नगररचना असे. पालख्या, मेणे, हत्ती, उंट, घोडे इ. तत्कालीन वाहनांना सोयीस्कर व शत्रूपासून संरक्षणास योग्य असे फरसबंद बोळ वाहतूकमार्ग म्हणून असत. निरनिराळ्या पेशांच्या लोकांची वस्ती अलगअलग असे.

निरनिराळ्या प्रकारचे शास्त्रीय शोध लागण्यास सुरुवात झाल्यापासून लोकांच्या गरजा, राहणी, सुखसोयी यांत भराभर बदल होत गेले व पूर्वीची नगररचना त्यानंतर अपुरी व अनेकदृष्ट्या गैरसोयीची होऊ लागली. सामान्यतः बाष्पशक्तीच्या शोधानंतर हे जाणवू लागले. आगगाड्या, आगबोटी, मोटारगाड्या, दूरध्वनी इ. जलद दळणवळणाची व संपर्काची साधने, खनिज व सेंद्रिय द्रव्यांचे शोध, कारखान्यांची सुरुवात व विजेचा उपयोग यांनी जीवनाचे स्वरूप पालटले. रेडिओ, चित्रपट वगैरे साधनांद्वारा करमणुकीबरोबरच उद्‌बोधनाचेही कार्य होऊ लागले. एकत्र कुटुंबपद्धती हळूहळू अस्तंगत होत गेली. सामाजिक चालीरीतींत बदल होत गेले. जनसामान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षणाची आवड निर्माण झाली. दैवी शक्तीबद्दलच्या पूर्वापार कल्पना व तदानुषंगिक आचारविचार बदलले व त्याचबरोबर जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल झाला. या परिवर्तनाच्या अनुषंगाने होणारा नगररचनेचा विकास मात्र तितक्या जलद वेगाने होऊ शकला नाही. जलद वाहतुकीची साधने उपलब्ध झाली पण त्यांस रस्ते अपुरे व अयोग्य ठरू लागले. त्यामुळे गर्दी व असुरक्षितता वाढली. प्रवासाच्या व संरक्षणाच्या साधनांत सुधारणा होत गेल्यामुळे खेडी व शहरे यांमधील दळणवळण वाढले आणि शहरांत गर्दी होऊ लागली. अशा वाढत्या गर्दीस सामावून घेण्यास मोठे वाडे व ऐसपैस प्रशस्त घरे गैरसोयीची ठरली व नवी निवासस्थाने त्या मानाने कोंदट व अनारोग्यकारक बनली. आगीचे भय व इतर प्रकारची असुरक्षितता वाढली. व्यापारपेठा मागासलेल्या व बुरसटलेल्या ठरू लागल्या. शहराच्या विकासात व्यत्यय येईल, अशा परस्परविरोधी गोष्टींनी शहरातील मोकळा परिसर व्यापला गेला. शहराभोवतीही अस्ताव्यस्तपणे वस्ती पसरू लागली आणि त्यामुळे सामाजिक स्वास्थ्य व सुरक्षितता धोक्यात आली. सार्वजनिक आरोग्य टिकविण्याच्या दृष्टीने आवश्यक अशा सोयी व साधने पुरेशा प्रमाणात उपलब्ध होऊ शकली नाहीत. पुढे जरी शास्त्रीय शोधांमुळे सर्वसाधारण आरोग्यात सुधारणा होऊन मानवी आयुर्मानात वाढ झाली, तरी या वाढत्या लोकसंख्येचा भार शहरांवरच विशेषत्वाने पडला. ही लोकसंख्या सामावून घेण्याच्या दृष्टीनेही आधुनिक पद्धतीने नगररचना करण्याची आवश्यकता निर्माण झाली. शहरवासीयांना मुख्यत्वेकरून कच्च्या मालाचा, धान्याचा व खाद्यपदार्थांचा पुरवठा आसपासच्या खेड्यांतूनच होत असल्यामुळे, त्या प्रमाणात खेड्यांच्या राहणीमानातही फरक पडू लागला व त्यांच्या सुखसोयींत व एकूण ग्रामरचनेतच बदल करण्याची आवश्यकता भासू लागली. या व अशा स्वरूपाच्या गरजांतूनच आधुनिक नगररचनाशास्त्राचा उदय व विकास झाला.


नगराच्या पूर्वनियोजनाची आवश्यकता : आधुनिक काळात विज्ञान व कला यांत होत असलेल्या झपाट्याच्या प्रगतीचा आणि प्रसाराचा समाजव्यवस्थेवर भलाबुरा परिणाम होत असल्याचे दिसून येते. शास्त्रीय शोधांचे जसे फायदे लाभतात, तसेच त्यांतील धोक्यांचा जीवनक्रमावर परिणाम होतो. भयंकर संहारक शस्त्रास्त्रांचा तसेच दूरवरच्या घटनांचा व वातावरणाचा सर्वसामान्य माणसाच्या जीवनपद्धतीवर व कल्याणावर परिणाम होताना दिसतो. विद्युत् साधनांच्या वापरात वाढ, अणुशक्तीचे नवेनवे उपयोग, विमाने व अन्य आधुनिक वाहनांची उपलब्धता, झपाट्याने होत असलेले औद्योगिकीकरण इ. आधुनिकीकरणाच्या प्रक्रियांमुळे नवनव्या समस्याही निर्माण होत आहेत व त्यांचा परिणाम शहरांवर तसेच खेड्यांवर दिसू लागला आहे. ज्या देशांत लोकसंख्या सतत वाढते आहे, त्यांच्या अनुभवावरून असे आढळून येते, की मध्यम प्रतीच्या शहरांपेक्षा मोठ्या शहरांकडे गर्दी जास्त लोटते, तर शेतीप्रधान गावे ओस पडण्याच्या स्थितीत येतात. या समस्यांचे निराकरण व पुढील पिढीच्या समस्यांचे निवारण व्हावे म्हणून प्रदेशांची, शहरांची व खेड्यांची पूर्वनियोजित व समतोल आखणी करणे आवश्यक आहे.

प्रत्येक व्यक्तीस व त्याच्या कुटुंबियांस स्वास्थ्य व समाधान लाभावे, तसेच कुटुंबाचा योगक्षेम चालविण्याची योग्य संधी व सामर्थ्य उपलब्ध व्हावे आणि आरोग्यदायक व सुसंस्कृत सार्वजनिक वातावरण लाभावे, अशा दृष्टीने सामाजिक व आर्थिक घटकांच्या नियोजनावर नगररचनेत भर दिला जातो. शहरवासीयांचे जीवन काही प्रमाणात खेड्यांवर अवलंबून असल्यामुळे खेड्याच्या आखणीकडे लक्ष द्यावे लागते. त्याचप्रमाणे जुन्या शहरांचा कायापालट करावा लागतो अथवा संपूर्ण नवीन शहरे वसवावी लागतात. जुन्या व नव्या शहरांच्या परिसराची आखणी करावी लागते. जलद दळणवळण मार्ग आखावे लागतात. वसविलेल्या शहराच्या सभोवती निर्माण होणाऱ्या उपनगरांच्या वाढीवर नियंत्रण ठेवण्याच्या योजना आखाव्या लागतात. तसेच निरनिराळ्या गावांच्या वाढीचा किंवा एखाद्या प्रदेशाच्या अंगभूत गुणाचा लाभ मिळविण्याकरिता प्रादेशिक नियोजन (रीजनल प्लॅनिंग) करावे लागते. निरनिराळ्या प्रादेशिक योजनांची सांगड घालण्याकरिता राष्ट्रीय योजना आखल्या जातात. आधुनिक काळात नेदर्लंड्स (हॉलंड) व बेल्जियम येथील वाहतूक-कालव्याच्या योजनांसारख्या काही आंतरराष्ट्रीय योजनाही आखाव्या लागतात.

नगररचनेचे स्वरूप : कोणत्याही नगराची रचना करताना बरीच माहिती हाती असावी लागते. हवापाणी, पाऊसपाणी, ऋतुमान, जमिनीचा मगदूर, तळी, नद्या, नाले यांचे प्रवाह आणि पूर, दऱ्याखोरी, चढ-उतार, शेतीयोग्य जमीन, माळजमीन, पिके, भूपृष्ठाखालील पाणी, खनिजद्रव्ये, दगड इत्यादींसंबंधी सविस्तर टिपण, नकाशे व आसापासच्या गावांची, वनांची, उद्योगांची, रेल्वेमार्गांची, हमरस्त्यांची वगैरेंची अंतरे व इतर ढोबळ माहिती मिळवावी लागते. त्या भागात राहणारांचे आचारविचार, राहणी, शिक्षण, उद्योगधंदे, निवासस्थाने व मोकळा परिसर, अद्ययावत जनगणनेचा तपशील व त्यात काही वर्षांत झालेले फरक व त्यांची कारणे इ. माहिती संकलित करावी लागते. अशा प्रकारच्या माहितीवरून पुढील पन्नास वर्षांत जनसंख्येत होणाऱ्या संभाव्य वाढीचा व फरकाचा अंदाज घेता येतो. प्रदेशाच्या स्वाभाविक रचनेचा पुरेपूर फायदा घेता येईल, अशा तऱ्हेने जमिनीच्या उपयुक्ततेनुसार योग्य प्रकारे विभागणी करता येते. अशी सोपपत्तिक आखणी केली, तरी तिला राजकीय धोरण, आर्थिक सामर्थ्य व गरजा यांच्या अनुषंगाने मुरड घालावी लागते.

कोणत्याही नगररचनेचा आराखडा तयार करताना अर्थशास्त्र, समाजशास्त्र, भूविज्ञान, आरोग्यशास्त्र, सौंदर्यशास्त्र, वास्तुकला, स्थलशिल्प, मूर्तिकला, स्थापत्य अभियांत्रिकी इ. क्षेत्रांतील तज्ञांची नगररचनाकाराला मदत घ्यावी लागते. नगररचना हे काही अंशी शास्त्र आहे तर काही अंशी ती कला आहे. त्यामुळे ती सर्वस्वी नियमबद्ध राहू शकत नाही.

नगररचनेतील निरनिराळ्या घटकांचा विचार करताना त्यांच्या महत्त्वसापेक्षतेनुसार (१) दळणवळणाची साधने व रहदारी, (२) गलिच्छ वस्त्यांचे उच्चाटन व पर्यायी घरबांधणी, (३) करांचे ओझे व खर्चाचा अंदाज, (४) सार्वजनिक सुखसोयी व आरोग्य, (५) औद्योगिकीकरण, (६) शिक्षण व करमणूक, (७) जागांवर व जागेच्या उपभोगावर नियंत्रण, (८) पुढाऱ्यांचे सहकार्य व पाठपुरावा आणि (९) कार्यवाहीच्या सूचना व त्यांचे वेळापत्रक असा क्रम सर्वसामान्यपणे पाळला जातो. नगररचनेची कोणतीही बाब कायद्याचे व जनतेचे पाठबळ असल्याशिवाय पार पाडणे कठीण असते.

नगरनियोजाबाबतचे कायदे : सामाजिक हिताच्या दृष्टीने जमिनीचा बिनशेतीच्या कामासाठी वापर, इमारतींचे बांधकाम व वस्तीची एकंदर वाढ नियंत्रित करणे, हे नगरनियोजनविषयक कायद्यांचे प्रमुख उद्दिष्ट असते. अशा कायद्यांमुळे नागरी व ग्रामीण विभागांत भूविकास साधण्याच्या दृष्टीने योजना तयार करणे शक्य होते. नगरनियोजनाच्या कायद्यांमुळे सर्व प्रकारच्या स्थानिक शासनसंस्थांना जमिनीचा वापर नियंत्रित करणे, लहानलहान रस्त्यांची तसेच गलिच्छ रस्त्यांची अलग अलग व विस्कळित अशी वाढ होऊ न देणे, राहण्यास योग्य अशा चांगल्या प्रकारची वस्ती होऊ देणे इत्यादींबाबतचे अधिकार प्राप्त होतात. अशा तऱ्हेचे अधिकार काही अंशी त्या त्या स्थानिक स्वराज्यसंस्था स्थापन करणाऱ्या कायद्यामध्ये अनुस्यूत असले, तरी ते मर्यादित असल्याने केवळ नगरनियोजनाबाबतच सर्वंकष असा कायदा करून योग्य त्या स्थानिक शासनसंस्थांकडे (महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हापरिषदा, ग्रामपंचायती इ.) अधिकार देणे आवश्यक ठरते.


नगररचनेस उपयुक्त असे सुरुवातीचे कायदे १८६५ मध्ये इटलीत, १८७४ मध्ये स्वीडनमध्ये व १८७५ मध्ये इंग्लंड व प्रशिया येथे करण्यात आले. इंग्लंडमधील अशा कायद्यांची सुरुवात आरोग्यविषयक व स्थानिक स्वराज्यसंस्थांच्या कायद्यापासून झाली. नगररचना व तत्संबंधित संज्ञा १९०९ सालच्या कायद्यात प्रथम वापरलेल्या आढळतात. इंग्लंडमधील कायद्यांचा प्रभाव भारतातील कायद्यांवरही पडत आलेला आहे. अमेरिकेत १९०० पर्यंत अशा कायद्यांकडे विशेष लक्ष दिलेले आढळत नाही. त्या देशातील नगररचनेचे कार्य बहुतांशी लोकांच्या उत्साहावर व त्यांनी केलेल्या नगररचनेतील शोध-सुधारणांमुळे पार पडले.

भारतात नगरनियोजनाबाबतचा पहिला कायदा मुंबई प्रांताने १९१५ साली प्रथम अंमलात आणला. या कायद्यान्वये नगरपालिकांना नगररचनाविषयक योजना तयार करणे शक्य झाले. या प्रकारच्या योजनेमुळे वस्तीलगतच्या संकल्पित विकासाखाली येणाऱ्या सर्व क्षेत्रांसाठी योजनाबद्ध विकासाचा आराखडा आखता येऊ लागला. या आराखड्यात सर्व जमीन संपादित न करताही तिचे एकत्रीकरण करून, योग्य त्या सार्वजनिक उपयोगांसाठी व रस्त्यांसाठी जमिनी राखून ठेवल्यानंतर, उरलेल्या जमिनींचे मालकांना योग्य त्या प्रमाणात पुनर्वाटप करणे शक्य झाले. त्यामुळे सर्व जमीन संपादित करून तिचा विकास करण्यासाठी लागणाऱ्या प्रचंड खर्चाचे स्थानिक शासनसंस्थेवरील ओझे कमी झाले व मूळ मालकांनाही सर्व जमीन न गमावता सर्व सोयींनी युक्त असे जमिनीचे तुकडे मिळणे शक्य झाले. तसेच सर्व जमीनमालकांकडून, रस्ते व इतर सोयींची तरतूद केल्यामुळे त्यांच्या जमिनीच्या किंमतीत जी वाढ होते, त्याच्या पन्नास टक्क्यांपर्यंतची रक्कम सुधारणा-मूल्य म्हणून वसूल करण्याचे अधिकार, त्यासाठी खर्च करणाऱ्या स्थानिक शासनसंस्थेस प्राप्त झाले. त्यामुळे त्या संस्थांवरील खर्चाचा भारही काही अंशी कमी झाला.

या कायद्याखालील योजना तयार करणे, हे नगरशासनसंस्थांच्या इच्छेवर अवलंबून होते. सर्व नगरशासनसंस्थांवर त्याचे बंधन नव्हते. त्यामुळे मुंबई व काही मोठ्या शहरांनीच त्याचा फायदा घेतला. तसेच अगोदरच विकसित अशा वस्तीच्या विभागांना या कायद्याखालील योजना लागू करता येत नव्हत्या.

दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात आपापल्या क्षेत्रातील सर्व भागांसाठी नगरविकासयोजना काही नगरपालिकांनी तयार केल्या परंतु त्यांना कायद्याच्या अभावी निर्णायक स्वरूप लाभले नाही.

संपूर्ण नगरविकासाची दिशा दाखवून एकंदर विकास नियंत्रित करण्याचा अधिकार देणारा व वर उल्लेखिलेले दोष दूर करणारा असा कायदा १९५४ साली तत्कालीन मुंबई राज्याने तयार केला. या कायद्याखाली शहरांसाठी त्या त्या नगरपालिकांनी सर्वंकष विकासाचे आराखडे तयार करणे सक्तीचे ठरवण्यात आल्यामुळे नगरनियोजनाच्या क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा ओलांडला गेला.

या कायद्याच्या अंमलबजावणीमुळे नागरी विकासाच्या इतरही अनेक प्रश्नांना चालना मिळाली. सार्वजनिक सुखसोयींसाठी लागणाऱ्या जागांबाबत निश्चित प्रमाणेही ठरविण्यात आली. या नगरविकासयोजनांची अंमलबजावणी पुढील प्रकारांनी करता येत असे : (१) वर उल्लेखिलेल्या प्रकारच्या एक वा अनेक नगररचनाविषयक योजना हाती घेणे व (२) खाजगी रीत्या मालकांशी वाटाघाटी करून अगर भूमिसंपादन कायद्याखाली जमिनी ताब्यात घेणे.

या कायद्याच्या अंमलबजावणीत आणखी एक महत्त्वाचा मुद्दा पुढे आला तो म्हणजे नगरशासनसंस्थांच्या हद्दीबाहेरची वाढ कशी नियंत्रित करावयाची याबाबतचा. प्रादेशिक पातळीवरील नियोजन हाती घेण्याची आवश्यकता त्यामुळे निर्माण झाली. १९५४ च्या कायद्यातील इतरही तांत्रिक व अंमलबजावणीबाबतच्या दुरुस्त्या करणे आवश्यक होते. यासाठी महाराष्ट्र सरकारने १९६६ साली महाराष्ट्र प्रादेशिक व नगरनियोजन कायदा तयार केला व १९६७ पासून तो अंमलात आला.

या कायद्याखाली विशिष्ट क्षेत्रासाठी प्रादेशिक योजना तयार करण्यासाठी स्वतंत्र संस्था अस्तित्वात आणता येते. अशा प्रादेशिक योजनेतील तरतुदींचा विचार नगरविकास योजनेतही करणे आवश्यक ठरविण्यात आलेले आहे. त्यामुळे सर्व पातळीवरील नियोजनात एकसूत्रता आणता येते.  या नव्या कायद्यात लहान विभागांच्या तपशीलवार योजना तयार करण्यासाठी स्वतंत्र नियोजन संस्था निर्माण करण्याची तसेच नव्या शहराच्या आखणीसाठी व उभारणीसाठी स्वतंत्र यंत्रणा असलेली संस्था निर्माण करण्याची तरतूद आहे.

नगरनियोजनाविषयक कायदे भारतात तमिळनाडू, कर्नाटक, गुजरात, पश्चिम, बंगाल, पंजाब व इतर राज्यांत निरनिराळ्या स्वरूपांत तयार करण्यात आले असून त्यांची अंमलबजावणी चालू आहे. काही ठिकाणी जमिनीचे संपादन करणे, विकासाचे आराखडे तयार करणे व या संदर्भातील इतर व्यवहार करणे यांसाठी स्वतंत्र संस्था अस्तित्वात आहेत. नागपूर व अन्य शहरांतील सुधार महामंडळे व दिल्लीतील दिल्ली विकास प्राधिकरण यांचा या संदर्भात उल्लेख करता येईल.


नियंत्रक नकाशा : कोणत्याही प्रदेशाची वा शहराची रचना करण्यापूर्वी त्या भागाच्या व त्या भागाशी संबंध येऊ शकेल अशा त्याच्या आजूबाजूच्या भागाच्या परिस्थितीचे सद्यचित्र व त्यावर पुढील काळात साधावयाच्या उद्दिष्टाचे चित्र दर्शविणारा नियंत्रक नकाशा (मास्टर प्लॅन) तयार करतात. जमिनीची खाजगी मालकी तात्पुरती दृष्टीआड करून व सर्व भागाचा नियंता शासन आहे, असे कल्पून कोणत्या जमिनीचा वापर कसा करावयाचा, ते या नकाशात दर्शवितात. त्याचप्रमाणे रस्ते, हमरस्ते, दळणवळणाच्या इतर साधनांच्या सोयी, सार्वजनिक सुखसोयीच्या जागा वगैरे मुक्रर करून त्या याच नकाशावर दाखवितात. हा नकाशा धोरण ठरवितो मात्र तो तपशील दाखवीत नाही. भविष्यकाळात लोकसंख्येत तसेच लोकांच्या आचारविचारांत व राहणीमानात कशा प्रकारचे बदल होतील, उद्योगधंद्यांची व विज्ञानाची वाढ कशी होईल, याचे साधार अंदाज करून त्या दृष्टीने आखणी करतात. आजूबाजूची शहरे, गावे व योजनेखाली येणारा प्रदेश यांचे एकमेकांवर होणारे परिणाम व परस्परावलंबित्व यांचाही विचार करून आखणी करावी लागते. हे अंदाज सत्यसृष्टीत कितपत उतरतील, यावर योजनेचे यश अवलंबून असते. सविस्तर तपशील ठरविताना आखणी ठाकठीक करता येईल, अशी सवड योजनेत ठेवणे अवश्य असते. विमानातून घेतलेल्या छायाचित्रात त्या प्रदेशाचे सर्वंकष असे एकत्रित चित्र उमटते व योजना आखताना त्याचा फार उपयोग होतो. नकाशातील धोरणाची संयुक्तिकता संबंधित लोकांना पटवून देऊन व त्यांच्या सूचनांचा विचार करून योजनेबद्दल लोकांमध्ये आपलेपणा निर्माण केला, तर योजना सफल होण्यास मदत होते. या योजनादर्शक नकाशास शासनाची मान्यता मिळविणे आवश्यक असते. या नकाशात दाखविल्याप्रमाणे जमिनीच्या उपभोगावर शासनाचे नियंत्रण निश्चित होते, म्हणून त्या नकाशास ‘नियंत्रक नकाशा’ म्हणतात.

निर्बंधित विभाग : नियंत्रक नकाशावर जमिनीचा उपयोग दाखविलेला असतो, त्यातील काही जमिनी शासनाच्या व सार्वजनिक उपयोगाकरिता राखून ठेविलेल्या असतात. त्या जमिनींबद्दलची नुकसानभरपाई मालकास दिली जाते. इतर जमिनी खाजगी उपभोगाकरिता असतात पण त्याचे नियोजित उपयोग ठरवून त्याप्रमाणे त्याचे विभाग करून नियंत्रक नकाशावर दाखवितात. या विभागांपैकी काही विभागांचे सोयीच्या व स्वास्थ्याच्या दृष्टीने परस्परसंबंध राहतील तर काहींचा उपसर्ग दुसऱ्या विभागास पोहोचणार नाही, अशी आखणी करावी लागते. शहराच्या उत्कर्षास व सौंदर्यास पोषक म्हणून खाजगी जागांचे आकार व आकारमान, जमिनीचे आकार व प्रकार, उपयोग, दाटी, मोकळे अंगण, माणसांची गर्दी, जाण्यायेण्याचे मार्ग यांवर निर्बंध घालतात. नियंत्रक नकाशावर असे निर्बंधित विभाग स्पष्ट दाखविलेले असतात. वरील सर्व सुधारणा अंमलात आणण्याकरिता आराखड्याबरोबरच योग्य असे नियम तयार करावे लागतात आणि तसे नियम करण्याचे अधिकार कायद्याने त्या त्या संस्थांकडे सोपविलेले असतात.

नगराचे स्वयंपूर्ण उपविभाग व त्यांचे नियोजन : शहराची वाढ करताना अथवा नवीन शहर वसवताना, त्या शहरातील निवासाचे क्षेत्र दैनंदिन गरजांच्या व सोयींच्या बाबतीत स्वयंपूर्ण अशा उपविभागांमध्ये विभागण्याची कल्पना आधुनिक काळातीलच आहे. अशा उपविभागांमुळे एकजिनसी आणि सामाजिक दृष्ट्या परिपूर्ण अशा एका नागरी समाजगटाची निर्मिती होईल, अशीही कल्पना आहे. असे उपविभाग अद्याप सर्वत्र पूर्णतया अंमलात आलेले नसल्यामुळे, नगररचनातज्ञांच्या कल्पना पूर्णपणे प्रत्यक्षात आलेल्या नाहीत. असे असले तरी, शहराच्या नियोजित विकासाचे आराखडे तयार करताना निवासाचे क्षेत्र अशा रीतीने विभागून त्या त्या उपविभागांत जरूर त्या सर्व सुखसोयींची तरतूद करणे, हे आवश्यक मात्र ठरते. असे उपविभाग हे सामान्यतः प्राकृतिक आणि सामाजिक दृष्ट्या एकरूप व सर्व सोयींनी परिपूर्ण असतात. त्यांच्या कक्षा निश्चित केलेल्या असून त्यांच्या क्षेत्रात मध्येच सोयीच्या जागी (सामान्यतः मध्यभागात) प्राथमिक शाळा, दैनंदिन गरजा भागविणारी दुकाने, आरोग्यकेंद्रे, बागा, क्रीडांगणे इ. सार्वजनिक सुखसोयी केल्या जातात. सामान्यतः असे उपविभाग २,५०० ते १०,००० लोकसंख्येसाठी योजण्यात येतात. अशा उपविभागांमुळे कोणतेही मोठे, वाहनांचे व गर्दीचे रस्ते न ओलांडता मुलांना शाळेत जाता येईल, गृहिणींना त्यांच्या दैनंदिन खरेदीची सोय होईल व आबालवृद्धांना फिरायला शांत व सुरक्षित अशी मोकळी जागा मिळेल, तसेच एक एकजिनसी समाज या चांगल्या परिसरात निर्माण होऊ शकेल, अशा कल्पना उपविभागांच्या रचनेमागे अनुस्यूत आहेत.

आ. १. खेड्याची रचना : (१) हमरस्ता, (२) गावातील रस्ते, (३) वस्तीतील रस्ते, (४) पटांगण, (५) चावडी, (६) सहकारी शेतकी संस्था, (७) कोठारे, (८) दुकाने, (९) गाडीतळ व गुरांचा बाजार, (१०) गुरांचा दवाखाना, (११) आरोग्य केंद्र, (१२) शाळा, (१३) लोकवस्ती, (१४) सार्वजनिक स्वच्छतागृह, (१५) खतांसाठी खड्डे, (१६) खळी.


ग्रामरचना : शेती, पशुपक्षीपालन, लहानसहान उद्योगधंदे या व अशा प्रकाराच्या उत्पादनाच्या बाबींवर भर देऊन त्यांच्या वाढीस पोषक होईल अशी ग्रामरचना असली पाहिजे. यावरच खेड्याचे जीवनमान सुधारणे अवलंबून असते. लोकांचे स्वास्थ्य आणि प्रगती यांचाही अंतर्भाव वरील धोरणात होतो. खेड्याचे गावठाण गैरसोयीचे असल्यास नव्या जागी ते वसविणे आवश्यक असते. खेड्यातील काही लोक आसपासच्या वस्त्यांवरही राहतात. गावठाण, वस्त्या व शेतजमीन मिळून खेडे होते. हमरस्त्यापासून गावठाणाच्या चावडीपर्यंत पोहोचण्यास बारमाही तसेच अवजड व जलद वाहनांनासुद्धा वापरता येईल असा एकतरी रस्ता असला, म्हणजे शहराशी दळणवळण सुलभ होते. आजूबाजूच्या वस्त्या, गावठाणास जोडणारे दुय्यम रस्ते व गावठाणात जाण्यायेण्याचे इतर मार्ग प्रशस्त असावेत. खेडे हमरस्त्यालगत असल्यास खेड्याच्या व्यवहारासाठी एक स्वतंत्र रस्ता असणे सोयीचे असते. खेड्याच्या तोंडाशी मोकळ्या जागेभोवती चावडी व ग्रामविकासाच्या इतर कचेऱ्यांसाठी जागा ठेवावी लागते. चावडीच्या एका अंगास देवघेवीची जागा, लहानसा बाजार, गाडीतळ, कोठारे, गुरांचा दवाखाना वगैरे सोयी खेड्याच्या उत्पादनक्षमतेच्या प्रमाणात असाव्यात. चावडीपासून नजीकच दवाखाना, समाजकल्याण केंद्र, टपाल कचेरी वगैरे घटक असावेत. इतर भागात निवासस्थाने, देवस्थाने, शाळा, तालीम इ. घटकांची योजना असावी. गावात उकिरड्यांना थारा मिळू नये, म्हणून गावाबाहेर एका अंगास खताच्या खड्ड्याकरिता जागा मुक्रर करणे आवश्यक असते. शेतीमालाच्या खळ्याकरिता मोकळ्या जागा राखून ठेवणे सोयीचे असते. पेवाचे संडास अगर ओल्या पेवाचे संडास बाजारपेठेजवळ तसेच निवासस्थानांनजीक स्वतंत्र असावेत. घरांना जोते असणे आवश्यक आहे. गवतादिकांची ज्वालाग्राही छप्परे राखण्यावर बंधन ठेवणे आवश्यक असते. गुरे व शेतीचा माल निवासस्थानानजीक प्रत्येकास ठेवता येईल, तसेच धूर व दुर्गंधी कोंडणार नाही, इतकी मुबलक जागा घरागणिक राखणे आरोग्यप्रद असते.

जुन्या शहरांचा कायापालट : जुन्या शहरांतील मध्यवर्ती ठिकाणाची गर्दी कमी करण्यात शहरात एखादा नवा रस्ता काढणे आणि शहराबाहेरून जाईल असा हमरस्ता आखणे, यांपासून सुरुवात करतात. शहरातील नवा रस्ता काढताना रस्त्यास आवश्यक त्यापेक्षा जास्त रुंदीची जागा ताब्यात घेऊन रस्त्याच्या दोन्ही बाजूंची जागा विकतात. नव्या रस्त्याच्या दोन्ही अंगांच्या जागांना नव्या रस्त्यामुळे फायदा मिळतो. त्याबद्दल त्या मालकांकडून सुधारणा खर्च वसूल करता येतो. नव्या रस्त्यावर नवीन वस्तीचे इष्ट ते नियमन करणे शक्य असते. शहराबाहेरील रस्त्यामुळे गावातील रस्त्यावरील वाहनांची गर्दी कमी करता येते. शहराबाहेरील रस्त्याच्या कडेस दुकाने, व्यापार व इतर वस्ती इ. आकृष्ट होतात पण जलद वाहनांस अडथळा होऊ नये, म्हणून रस्त्याच्या कडेपासून मोकळी जागा सोडून घरे बांधण्याची बंधने घालतात. शहरातील इतर रस्ते रुंद आणि सरळ करण्याकरिता त्यांच्या रेषा मुक्रर करून यथावकाश ती सुधारणा घडवून आणता येते. शहराच्या आसपासच्या भागात रहदारी, पाणी व वीजपुरवठा, आरोग्याच्या सोयी इ. पोहोचवून व वस्ती करण्यास ती जागा अनुकूल करून तसेच घरबांधणीस मदत करून शहरातील गर्दी कमी करता येते. शहराबाहेरील जागांची विभागणी निवासस्थाने, उद्योगधंद्यांचा विभाग आणि मोकळा परिसर अशा घटकांत करतात तसेच शहराचे विभाग पाडून त्यातील वस्तीवर व त्यापुढे होणाऱ्या घरबांधणीवर निर्बंध घातले जातात. काही अपायकारक व त्रासदायक धंदे गर्दीच्या जागेपासून हलवितात. कमी उत्पन्नाच्या अथवा नोकरीत बदली होण्याचा संभव असलेल्या लोकांकरिता शासनाने भाड्याचे गाळे बांधणे, हे शहरसुधारणेचे एक आवश्यक अंग झाले आहे. पडीक घरांच्या डागडुजीऐवजी ती पाडून नव्या धर्तीची घरे बांधण्यास भाग पाडतात. अनारोग्यकारक घरे वापरास अयोग्य ठरवितात. बसस्थानके, फौजदारी आणि दिवाणी न्यायालये, महाविद्यालये वगैरेंची स्थापना शहराबाहेर केल्याने लोकवस्ती, दुकाने इ. आपोआप गर्दीबाहेर येतात.

नवी शहरे : नवीन शहरांच्या रचनेचे आराखडे ठरविताना रचनाकौशल्याचा मुक्तपणे उपयोग करण्यास वाव म्हणून हे काम सोपे पण वाढत्या गरजांनुरूप सर्व सोयी उपलब्ध करण्याची महत्त्वाची जबाबदारी म्हणून कठीणही असते. सामान्यतः अशा शहरांकरिता संपूर्ण जमिनी संपादन करून नगररचनेचे आराखडे काढून शहरांची उभारणी केली जाते. याकरिता निरनिराळे शास्त्रज्ञ, अधिकारी वगैरेंची एक यंत्रणा उभारून आणि त्यास भूमिसंपादन, भूविकास, बांधकाम वगैरेंचे अधिकार दिलेले असतात. भारतात विसाव्या शतकापूर्वी कित्येक शहरे वसविली गेली. आधुनिक काळात नवी दिल्ली, चंडीगढ, भुवनेश्वर वगैरेंसारखी राजधानीची शहरे बंदराकरिता कांडला कारखान्यांसाठी जमशेटपूर, राउरकेला, भिलाई, दुर्गापूर निर्वासितांसाठी राजपुरा, निलोखेरी इ. गावे उभारण्यात आली. पाकिस्तानमध्ये राजधानीसाठी इस्लामाबाद या अत्याधुनिक शहराची उभारणी हाती घेण्यात आली. नवीन शहराच्या मुख्य हेतूप्रमाणे रचनेत थोडेफार फरक असले, तरी सामाजिक जीवनाच्या सुखसोयी व नागरी जीवनाचा उत्कर्ष या मूलभूत गोष्टींभोवतीच सर्व रचना केंद्रित असते. चंडीगढ, इस्लामाबाद यांसारख्या राजधानीच्या आधुनिक शहरांत शासकीय इमारती, शैक्षणिक संस्था, औद्योगिक वसाहती असे स्वतंत्र विभाग केलेले दिसून येतात. त्याचप्रमाणे सामाजिक जीवनाकरिता दैनंदिन गरजांपुरत्या स्वयंपूर्ण विभागांची आखणी केली जाते. पूर्वनियोजित स्वयंपूर्ण विभागांची बांधणी आवश्यकतेनुरूप पूर्ण करून भावी शहरवाढ सामावून घेता येते. विभागांचे एकमेकांशी दळणवळण राहील असे हमरस्ते, मोठे रस्ते, मोकळ्या जागांचे पट्टे, नहरे वगैरे साधनांनी विभागांच्या सीमा मुक्रर करतात. प्रत्येक विभागात आडवे-उभे दोन दुय्यम रस्ते व इतरत्र पोहोचण्याकरिता लहानलहान एकतोंडी किंवा फेर घेणारे रस्ते आखलेले असतात. सारीपाटाच्या पटासारखे एकमेकांस काटकोनात छेदणारे रस्ते पुष्कळ पुरातन कालीन शहरांच्या भागांत (उदा., धुळे, पुणे, जयपूर) आखलेले आढळतात. यात मागीलदारचे बोळ म्हणून पूर्वी आखलेले रस्ते हल्लीच्या काळात रहदारीचे होत आहेत व जवळजवळ बनणाऱ्या चव्हाट्यांमुळे रहदारीचा धोका निर्माण होत आहे. कित्येक शहरांत शासकीय इमारती, देवस्थाने इ. त्या शहरांचे महत्त्वाचे केंद्रस्थान धरून मुख्य रस्त्याची आखणी करून बाजारपेठा, निवासस्थाने, रेल्वे, बसस्थानके इ. एकमेकांस जोडण्यात आली आहेत. बाजाराच्या विभागात पादचाऱ्यांकरिता आच्छादित मार्ग व वाहने उभी करण्याच्या जागा ठेवतात. वाहने उभी करण्याच्या जागांचा प्रश्न कठीण बनतो, हे लक्षात घेऊन त्याची पूर्वनियोजित आखणी करावी लागते. चंडीगढमध्ये मुख्य रस्त्यांचे चव्हाटे भविष्यकाळातील वाहनव्यवहारायोग्य बनविता येतील, शक्य तेथे भुयारी रस्ते वा पुलावरून रस्ते नेता येतील, अशी आखणी प्रथमपासूनच केलेली आहे. शहराच्या आखणीमध्ये सौंदर्यपूर्ण रचना करण्याकडे बराच कल आहे. जमिनीचे चढउतार, पाण्याचे प्रवाह, डोंगर, टेकड्या वगैरेंचा विचार करून बागा, मोकळ्या जागा, रस्ते इ. बाबतींत स्थलशिल्पज्ञांचे आणि इमारतींचे रूप, आकार, ठेवण वगैरे बाबतींत वास्तुशिल्पज्ञांचे साहाय्य घेण्यात येते.


शहरपरिसर : शहरात दाटी वाढू लागली, म्हणजे शहरालगत व शहराच्या बाहेरही वस्ती वाढू लागते. याचा अंदाज घेऊन परिसराची पूर्वनियोजित रचना करून त्याचा नियंत्रक नकाशा तयार करावा लागतो. तसेच पाणी, रस्ते, वीज वगैरेंची सोय करून विकासही साधावा लागतो. विकासाच्या अभावी शहरात येणाऱ्या मुख्य रस्त्याच्या कडेला वस्ती वाढून उपद्रव होतो व आतल्या जागा ओस राहतात. परिसरात उद्योगधंद्यांना जागा नियुक्त करून धंदेवाल्यांच्या निवासस्थानांखेरीज इतर निवासांना त्या प्रदेशात बंदी घालावी लागते. अन्यथा उद्योगधंद्यांचा परिसर भविष्यकाळी वाढविण्यास खाजगी निवासांचा अडथळा होतो. शहराचा परिसर व शहराचा मध्यभाग यांमध्ये सुलभ व त्वरित दळणवळणाकरिता रुंद रस्ते, वाहनव्यवस्था, आगगाड्यांची सोय इ. घटकांची आखणी करावी लागते. परिसर सुधारण्याकरिता विकासमंडळे, सुधारमंडळे स्थापली जातात. दलदलीचे प्रदेश, सामुद्रधुन्यांचा भाग भरून काढून परिसरवासास जागा उपलब्ध करून देण्याची प्रसंगविशेषी आवश्यकता असते. परिसरातील कामकाजाचे विभाग व निवासविभाग एकमेकांस लागून ठेवले, तर दळणवळणाच्या साधनांवरचा भार कमी होतो. भारतात ब्रिटिश अमदनीत लष्कर विभाग किंवा छावणी या नावाखाली शहरपरिसराच्या काही भागांचे नियंत्रण केलेले असे.

उपनगरे : कोणत्याही शहराची व त्याच्या परिसराची वाढ काही मर्यादेपर्यंतच होऊ देणे, कारभाराच्या दृष्टीने सोयीस्कर असते. त्यापेक्षा जास्त वाढीचा समावेश उपनगरांमध्ये करतात. उपनगरांचे आर्थिक जीवन मुख्य शहराशी निगडित असते. सामाजिक जीवनाच्या सुखसोयींची तरतूद उपनगरात करतात. त्याच्या रचनेचा नियंत्रक नकाशा काढून त्यात निर्बंधित विभाग तसेच स्वयंपूर्ण विभाग आखून त्यांची रचना नव्या शहराच्या धर्तीवर करतात, अथवा त्याजागी असलेल्या पूर्वापार गावाचा कायापालट करतात. उपनगरापासून मुख्य शहराशी दळणवळण सुलभ व सोयीस्कर होईल, अशा सोयी कराव्या लागतात. शहरातील खुराडेवजा निवासस्थानांपेक्षा प्रशस्त व मोकळ्या निवासस्थानांची गरज उपनगरात भागू शकेल, अशी रचना करतात. नैसर्गिक परिसर, शेती, बागा यांनी उपनगरे शहरापासून अलग झालेली असतात पण ती शहरापासून ५० ते ६० किमी. अंतरातच सर्वसामान्यपणे विखुरलेली असावी लागतात. उपजीविकेच्या साधनांसाठी शहराकडे घालावयास लागणाऱ्या खेपांत फुकट जाणारा वेळ आणि पैसा यांची पुरेपूर भरपाई उपनगरातील सुखसोयींनी व्हावी असे धोरण उपनगर आखणीत ठेवतात. मोठमोठ्या कारखान्यांच्या जवळपास कारखानदारांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांकरिता उभारलेल्या वसाहतींना उपनगरांचे स्वरूप प्राप्त होते. स्थानिक कारभारावर उपनगरवासीयांचे नियंत्रण असेल, तर त्यांच्यात उपनगरांविषयी आत्मीयता निर्माण होऊन, उपनगरांचा विकास साधला जातो. इंग्लंडमध्ये ‘गार्डन सिटी’ नामक उपनगरांची आखणी लोकप्रिय आहे.

प्रादेशिक रचना : एखादी योजना जरी विशिष्ट ध्येय साधण्याकरिता राबवण्यात आली तरी तिचे अन्य फायदेही मिळतात. नैसर्गिक साधनांचा किंवा प्राकृतिक ठेवणीचा फायदा घेण्याकरिता किंवा नैसर्गिक व प्राकृतिक धोक्यांचे निवारण करण्याकरिता फार मोठ्या प्रदेशांच्या योजना आखतात. त्यात निरनिराळ्या शहरांचा एकमेकांस फायदा मिळेल वा एखाद्या विशिष्ट प्रदेशनिवासाचा फायदा अनेकांना मिळेल, अशा रचनेचाही समावेश होतो. नद्यांना येणाऱ्या पुरावर नियंत्रण ठेवण्याची यंत्रणा व जलशक्तीचा उपयोग, भूभागाचे रक्षण व विकास, उद्ध्वस्त गावांना व आर्थिकदृष्ट्या मोडकळीस आलेल्या गावांना पुनरुज्जीवन मिळण्याच्या योजना, खनिजद्रव्याची उपलब्धता इ. बाबींचा फायदा जास्तीत जास्त प्रदेशांस मिळवून देण्याकरिता ज्या योजना आखतात, त्यांस ‘प्रादेशिक रचना’ म्हणतात. या रचनेस धरून नव्या शहरोपशहरांची आखणी, पाटबंधारे, हमरस्ते व दळणवळणाची साधने यांची योजना करतात. मुंबईतील समुद्रास हटवून मिळविलेली जमीन वा समुद्रास बांध घालून सामुद्रधुनीखालील जमीन उपयोगात आणण्याचे नेदर्लंड्सचे प्रयत्न ही भूविकासाची मोठी उदाहरणे आहेत. नाईल नदीचा उपयोग, टेनेसी नदीच्या खोऱ्याचा अमेरिकेने केलेला विकास, भारतातील दामोदर नदीच्या खोऱ्याचा उपयोग, इतर नद्यांवरील पूरनियंत्रणाच्या आणि नदी-नियंत्रणाच्या योजना, पाटबंधारे, वीजनिर्मिती इ. प्रादेशिक रचनेची उदाहरणे आहेत.

ओक, शा. चिं. तालीम, भा. त्रिं.

नगररचनेची जागतिक परंपरा : नगररचनेचा इतिहास नद्यांच्या खोऱ्यात सुरू झाला. अतिशय प्राचीन नगरे नाईल, टायग्रिस, युफ्रेटीस, ह्‌वांग, सिंधू या नद्यांच्या खोऱ्यांत वसली व ती खूपच भरभराटीस आली. प्राचीन काळी सामान्यतः पाण्याचे सान्निध्य पाहून गावे वसवली जात. नद्यांचे जलमार्ग व्यापार व वसाहत यांच्या उत्कर्षास सोयीचे होते. वसाहतीमुळे साम्राज्यविस्तार झाला व नगररचनेस चालना मिळाली. प्रसिद्ध प्राचीन नगरांच्या विस्तारक्षेत्रावरून (उदा., कारकेमिश – ९७·१२५ हे. मोहें-जो-दडो – २४२·८१ हे.) तेथील नागरी जीवनासंबंधीची साधारण कल्पना येते. इ. स. पू. २००० मधील अर, एशनुन्ना, काफये इ. शहरांमध्ये दर हेक्टरी सु. ५० घरे हे प्रमाण होते. सर्वसाधारण घरांचे क्षेत्रफळ २५·९० मी. X १७·०६ मी. पासून २९·५६ मी. X २१·९४ मी. या मर्यादेपर्यंत होते. शहरविस्तार ढोलक्याच्या नादलहरींच्या किंवा घंटानादाच्या कक्षेत असे. संकटसमयी नागरिक त्वरित संघटित व्हावेत, म्हणून ही योजना होती. इ. स. पू. चौथे सहस्रक ते इ. स. पू. चौथे शतक या काळातील मेसोपोटेमियातील अर या प्राचीन नगराच्या (विस्तारक्षेत्र सु. ८९ हे.) उत्खननावरून या नगराच्या आलेखात अनेकमजली घरे, मातीचे मनोरे, देवळे, शाळा, कालवे, बंदरे इत्यादींची योजना असल्याचे आढळून येते. मेसोपोटेमियाची नगररचनाशैली पूर्वेस इराणकडे, उत्तरेस मॅसिडोनियाकडे व पश्चिमेस रोमकडे पसरत गेली. प्राचीन नगरांमध्ये इ. स. पू. ३००० च्या सुमारास अस्तित्वात असलेले बॅबिलन खास उल्लेखनीय आहे. ह्या नगराची रचना साधारणतः चौरसाकृती असून, प्रत्येक बाजूचा क्षेत्रविस्तार सु. २४ किमी. होता. शहराभोवती संरक्षणासाठी उंच तटबंदी व पाण्याचे खंदक होते. साधारणतः शहराच्या मध्यभागातून युफ्रेटीस नदी वाहत असल्याने शहराचे दोन भाग पडले होते. नदीच्या पुराच्या सर्वसाधारण मर्यादा अभ्यासून त्यानुसार नदीकाठापासून अंतर ठेवून उंच चबुतऱ्यावर इमारती योजल्या होत्या. घरे सामान्यपणे तीन ते चार मजली होती. रस्ते विस्तीर्ण व सरळ होते. शहराच्या मध्यभागी आठ टप्प्यांचा ‘झिगुरात’ नामक मंदिर-मनोरा योजलेला असून, त्याठिकाणी सामुदायिक उत्सव साजरे केले जात.


प्राचीन ईजिप्तच्या वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतीचा, विशेषतः धर्मकल्पनांचा प्रभाव तेथील नगररचनेवर दिसून येतो. अनेक देवदेवता व ग्रामदेवता, राजाला देव मानण्याची श्रद्धा, आत्म्याच्या अमरत्वावर व मरणोत्तर जीवनावर विश्वास, आत्म्याच्या पुनरागमनासाठी ममीकरणाद्वारे मृतदेहाचे जतन व त्याच्या निवासासाठी पिरॅमिडनिर्मिती इ. घटकांचा प्रभाव ईजिप्शियन नगररचनेवर पडला. मृतांची थडगी व पिरॅमिड यांच्या बांधकामाला प्राचीन ईजिप्तमध्ये अन्यनसाधारण महत्त्व होते. गीझा (इ. स. पू. सु. २६००) या नगराच्या पिरॅमिडभोवती मृतांची अनेक थडगी ओळीने रचली होती. ही ‘मृतांची नगरे’ हे प्राचीन ईजिप्तचे खास वैशिष्ट्य होय. ही नगरे भव्य प्रमाणात व चिरस्थायी स्वरूपात वसवलेली असत. त्या तुलनेत तत्कालीन नागरिकांची नगरे सामान्य प्रतीची व अल्पकाळ टिकाऊ अशी होती. ईजिप्तमधील मातीची अनेक खेडी काळाच्या ओघात नष्ट झाली. प्राचीन ईजिप्तच्या जीवनात नागरी व ग्रामीण असे दोन भाग होते. मध्यभागी सामुदायिक धान्यकोठारे व भोवती गोलाकार झोपड्या अशी खेड्यांची सामान्यपणे रचना होती. इ. स. पू. तिसऱ्या सहस्रकातील नगरे राजाज्ञेवरून वसवण्यात आली. पिरॅमिडच्या बांधकामासाठी जे कारागीर व गुलाम असत, त्यांच्यासाठी ही नगरे वसवली जात. त्यांत लहानमोठे पण आखीव रस्ते आढळतात. गुलामांच्या खोल्या एका बाजूस, तर जास्त प्रशस्त घरांची योजना दुसऱ्या स्वतंत्र भागात केलेली आढळते. काहून (इ. स. पू. सु. २०००) या नगराच्या अवशेषांवरून तत्कालीन नगरनियोजन कौशल्याची कल्पना येते. पश्चिम भागात कामगारांसाठी छोट्या घरांचा विभाग, उत्तरेला प्रतिष्ठित नागरिकांची अनेक खोल्यांची घरे असलेला विभाग, पूर्व भागात बाजार व मध्यवर्ती मंदिरवास्तूंचा विभाग अशी नगराची सर्वसाधारण रचना होती. ईजिप्तमधील बहुतेक मोठी नगरे नदीकाठी वसलेली होती व ती भव्य मंदिरांसाठी, मृतांच्या थडग्यांसाठी किंवा राजधान्यांसाठी प्रसिद्ध होती. प्रत्येक ईजिप्शियन सम्राटाने आपली स्वतंत्र राजधानी वसवली. थीब्झ, मेंफिस, कारनॅक, लक्सॉर, एल्-अमार्ना इ. प्राचीन ईजिप्शियन नगरे प्रसिद्ध आहेत. लक्सॉर, कारनॅक इ. ठिकाणी भव्य मंदिरे व त्याभोवती विस्तारलेली नगरे आढळून येतात. मंदिरपरिसरातील एकसंध ग्रॅनाइटचे ‘ऑबेलिस्क’ हे उंच ध्वजस्तंभ, मिरवणुकीचे भव्य मार्ग, स्तंभावल्या, ग्रॅनाइट व डायोराइट पाषाणांतील भव्य शिल्पाकृती इ. अवशेषांवरून तत्कालीन संपन्न नागरी जीवनाची कल्पना येते. ईजिप्शियन ‘हायरोग्लिफिक’ चित्रलिपीत नगररचनादर्शक आकृत्या (उदा., फुलीद्वारे चार भागांत छेदलेले वर्तुळ किंवा लंबवर्तुळ) आढळतात.

प्राचीन ग्रीकांची ‘पोलिस’ (पलिस) म्हणजे नगरराज्ये वैशिष्ट्यपूर्ण होती. या नगरराज्यांमध्ये लोकशाही जीवनपद्घती होती व तिचा ठसा नगररचनेवर उमटला. ग्रीकांनी नदीकाठी (स्पार्टा), खाडीमुखावर (कॉरिंथ) वा सुरक्षित डोंगरकपारीच्या आश्रयाने (अथेन्स) लहानमोठी खेडी वसवली होती. अर्थोत्पादन व संरक्षण या हेतूंनी बडे जमीनदार, जहागीरदार व व्यापारी वर्ग एकत्रित आले आणि खेड्यांचे शहरांत रूपांतर झाले. काही खेडी आकाराने वाढत गेली, तर पुष्कळदा जवळजवळची खेडी एकत्र येऊन नगरराज्ये निर्माण झाली. त्यांची रचना सामान्यतः एकसारखीच असे. एका भागात नेहमीची लोकवस्ती, तर दुसऱ्या भागात ‘अक्रॉपलिस’ हा उंचावरील संरक्षक किल्ला असे. त्यात नगरदेवतांची मंदिरे असत. ग्रीक नगररचनेत राजप्रासादांऐवजी मंदिरवास्तूंना महत्त्व आले. लोकशाहीच्या स्थैर्याबरोबरच काही नवे घटकही नगररचनेत प्रविष्ट झाले. नगराच्या मध्यवर्ती चौकामध्ये ‘ॲगोरा’ नामक सार्वजनिक वास्तू असे. चौरस वा आयताकृती मोकळी जागा व त्याभोवती स्तंभावलीयुक्त ढेलज, अशी ॲगोराची सर्वसामान्य रचना होती. प्रशासनकेंद्र, बाजारपेठ, सार्वजनिक सभागृह अशा अनेक दृष्टींनी त्यास नागरी जीवनात महत्त्व होते. प्रशासकाचे निवासस्थान, विधिमंडळाचे सभागृह व शासकीय नोकरवर्गाची घरे या चौकाभोवतीच असत. समोरच्या बाजूला व्यापारी पेठा व गुदामे असत. कारखाने वगैरे असल्यास ते नगराच्या बाह्य परिसरात असत. अनेक ग्रीक नगरे आकारदृष्ट्या लहानच होती. त्यांची लोकसंख्या साधारणतः १०,००० पेक्षा कमीच असे. अथेन्समध्ये मात्र ४०,००० नागरिक होते आणि गुलाम व परकी लोक मिळून एकून लोकसंख्या १,००,००० ते १,५०,००० च्या दरम्यान होती. अनेक ग्रीक नगरांना संरक्षक तटबंद्या होत्या. गृहरचना साधीसुधी व सामान्य प्रतीची होती. घरे सामान्यतः एकमजली व त्यांवर उतरती छप्परे असत. अथेन्समध्ये धनिक आणि गरीब लोकांच्या वस्त्या शेजारीशेजारी होत्या. रस्ते अत्यंत अरुंद असून, त्यांची संरक्षणदृष्ट्या चक्रव्यूहासारखी गुंफण केलेली असे. ग्रीक नाट्यगृहे, व्यायामशाळा, स्नानगृहे, रंजनकेंद्रे ही नागरी जीवनातील सांस्कृतिक महत्त्वाची केंद्रे होती. ग्रीकांच्या संपन्न सामाजिक-सांस्कृतिक, धार्मिक व क्रीडासक्त जीवनाचे प्रतिबिंब त्यांच्या प्रख्यात ऑलिंपिया, डेल्फॉय, कॉस इ. नगरांमध्येही उमटले आहे. अभिजात वास्तू व नग्न सुडौल मूर्तिशिल्पे यांनी ग्रीक नगरांना सौंदर्य प्राप्त करून दिले. इ. स. पू. पाचव्या शतकात ग्रीक नगररचनेचा बराच विकास झाला होता. मायलीटसचा वास्तुकार हिपॉडामस याने नगररचनेची काही तत्त्वे विशद केली व पायरीअस, थुरीई, रोड्झ या नगरांचे नियोजन केले. प्लेटो व ॲरिस्टॉटल यांनीही आदर्श नगरनियोजनाचे आणि व्यवस्थापनाचे काही नियम घालून दिले होते.


रोमन साम्राज्य म्हणजे जणू नगरे उभारण्याचा एक प्रचंड उद्योगच होता. मुळात रोमन साम्राज्य हेच एका विस्तारवादी शहरी केंद्रामुळे निर्माण झाले, असे म्हटले जाते. रोमन नगररचनेचा दाट ठसा तत्कालीन यूरोप, उत्तर आफ्रिका, आशिया मायनर इ. प्रदेशांतील नगरांवर पडला. रोमन शहराभोवतीची तटबंदी प्रथम बांधली जाई आणि नंतर तिच्या आतील परिसरात ठरीव साच्याचे नगर उभारले जात असे. त्यावर इट्रुस्कन आणि ग्रीक संस्कृतींचा प्रभाव होता. रोमन नगराचा आराखडा सर्वसामान्यपणे लंबचौरसाकार असे. ‘कार्डो’ हा उत्तर–दक्षिण रस्ता व ‘डीक्युमेनस’ हा पूर्व–पश्चिम रस्ता अशी सामान्यपणे पथरचना होती. हे मार्ग परस्परांना नगराच्या मध्यभागी छेदत, त्या ठिकाणी ‘फोरम’ हा सार्वजनिक सभाचौक असे. त्याचा व्यापारपेठ म्हणून उपयोग होत असे. तो एक गुंतागुंतीची रचना असलेला वास्तुसमूहच होता आणि त्यात मंदिरे, गर्भगृहे, न्यायालये, परिषदगृहे, स्तंभावलीयुक्त दालने इत्यादींचा अंतर्भाव होता. ‘बॅसिलिका’ ही भव्य आकाराची बंदिस्त दालनेही अशीच बहूद्देशीय होती. विशेषतः न्यायालयीन कामकाज व औद्योगिक उलाढाली यांसाठी त्यांचा वापर होत असे. मोठमोठ्या भव्य सार्वजनिक वास्तूंनी रोमन नगरांनाही वैभव प्राप्त करून दिले. अनेक रोमन सम्राटांनी भव्य सार्वजनिक सभाचौक उभारले, त्यांत ‘फोरम ऑफ ट्रॅजन’ विख्यात आहे. ‘फोरम रोमॅनम’ हे रोमच्या राजकीय जीवनाचे व औद्योगिक उलाढालींचे केंद्र होते. त्याची रचना मानवी प्रमाणाशी सुसंवादित्व राखून करण्यात आली होती. त्यात विजयी सेनानींनी आपल्या यशस्वी लष्करी मोहिमांची विजयस्मारके उभारली होती. आखाडे, नाट्यगृहे, स्नानगृहे, प्रेक्षागारयुक्त क्रीडांगणे, सार्वजनिक शौचकूप ह्या रोमन नगरांतील महत्त्वपूर्ण सार्वजनिक वास्तू होत. रोमचे ‘कॉलॉसिअम’ किंवा ‘फ्लेव्हिअन अँफिथिएटर’ (इ. स. ७०–८०) हे भव्य रंगमंडल जगप्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे ‘सर्कस मॅक्झिमस’ या भव्य रंजनकेंद्रामध्ये एकाच वेळी १,५०,००० व्यक्ती एकत्र येऊ शकत. ‘पँथिऑन’ (दुसरे शतक) ही मंदिरवास्तूही प्रख्यात होती. रोमन लोकांना वैभवप्रदर्शनाची हौस होती व त्यानुसार त्यांनी नगरांतील पुतळे वस्त्रालंकारांनी सुशोभित केले. घुमट, मेघडंबरी इत्यादींना सोनेरी मुलामे दिले. रोमन नगरांची अर्धीअधिक लोकसंख्या सर्कस व नाट्यगृहे यांतच सामावली जात असे. रोमनांच्या सार्वजनिक वास्तू भव्य व प्रचंड असल्या, तरी रोमन नगररचना मात्र त्यामानाने विकसित होऊ शकली नाही अगर तिला नवे परिमाणही लाभले नाही. लष्करी छावण्यांप्रमाणे वसाहतींची नगरे उभारली जात. त्यांत एक साचेबंद काटेकोरपणा होता. रोमन नगरे दाटीवाटीच्या लोकवस्त्यांमुळे कोंदट व गजबजलेली दिसत. त्यातून गलिच्छि वस्त्यांची वाढ झाली. इमारती सात-आठ मजली असत. इमारतींची उंची फार वाढू नये, म्हणून ऑगस्टसला त्यांवर ७० फूट (२१·३३ मी.) उंचीची मर्यादा घालावी लागली. गर्दीने गजबजलेल्या व मोठमोठ्या चाळींना ‘इन्सुले’ अशी संज्ञा होती. त्यामानाने स्वतंत्र खाजगी निवासगृहे कमी असत. रोममध्ये चौथ्या शतकात ४६,६०२ वेश्मगृहांचे गाळे व केवळ १,७९७ खाजगी निवास होते, असा उल्लेख काँन्स्टंटिन रीजनरी कॅटलॉगमध्ये आढळतो. आद्य रोमन गृहांच्या मध्यदालनांमध्ये ग्रीक गृहांमधील खुल्या चौकाची (एट्रिअम) कल्पना आढळते. गरीब लोक गलिच्छ चाळींतून राहत. श्रीमंत आणि प्रतिष्ठित व्यक्तींची घरे मात्र प्रशस्त, मोकळी व हवेशीर होती. ‘स्तंभवलय’ हा घटक त्यांत नव्याने अंतर्भूत झाला व त्याला उद्यानाची जोड देण्यात आली. रोमन लोक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अत्यंत प्रगत होते. वाढत्या लोकसंख्येतून निर्माण होणाऱ्या तांत्रिक समस्यांची त्यांनी अत्यंत कौशल्याने उकल केली. त्यांनी पाणीपुरवठा, पाणीवाटप, जलनिकासपद्धती इत्यादींबाबतच्या तरतुदी नगररचनेत अंतर्भूत केल्या. खूप अंतरावर पाणी वाहून नेण्यासाठी निर्माण केलेल्या जलवाहिन्या (ॲक्विडक्ट्स) व भूमिगत मलवाहिन्या (उदा., क्लोआका मॅक्झिमा) ही रोमनांच्या स्थापत्यकौशल्याची उदाहरणे होत. मोठमोठे फसरबंदी राजमार्ग हेही रोमन नगररचनेचे लक्षणीय वैशिष्ट्य होते. पाँपेई, हर्क्युलेनियम, रोम, ऑस्टिया इ. नगरांवरून प्राचीन रोमन साम्राज्याच्या वैभवाची कल्पना येते. थोडक्यात, रोमन नगररचना म्हणजे प्रचंड प्रमाणावरील शहरीकरणाच्या प्रक्रियेतील एक महत्त्वाचा टप्पा मानता येईल.


रोमन सत्तेचा ऱ्हास झाल्यानंतर पाचव्या शतकापासून ते पुढे एक हजार वर्षांपर्यंत ख्रिस्ती चर्चने यूरोपीय सामाजिक व राजकीय जीवनावर सत्ता गाजवली. मध्ययुगीन नगरांना ‘ख्रिस्ती नगरे’ असे सार्थपणे म्हटले जाते. ख्रिस्ती जीवन जगण्याच्या उद्देशातून साकार झालेली एक सामूहिक रचना, असे मध्ययुगीन यूरोपीय नगरांचे वर्णन करता येईल. मध्ययुगीन नगररचनेवर चर्चप्रमाणेच धार्मिक मठ, अमीर-उमरावांचे किल्ले आणि उत्तरकालीन व्यापारी-कारागीर यांची संघगृहे (गिल्ड हॉल्स) यांचा ठसा दिसून येतो. रोमन काळातील लंबचौरसाकार नगरांच्या मध्यभागी ख्रिस्ती चर्च वा मठ यांची स्थापना करण्यात आली. नवी शहरे बुद्धिबळाच्या पटासारखी आखली गेली. मध्ययुगाच्या उत्तरार्धातील नगररचनेतील सौंदर्यदृष्टी सफाईदार गोलाकृती रचनेतून जाणवते. नगरवेशीजवळ जकात घर, परवाना कचेरी, सार्वजनिक खानावळी, विश्रामधाम व त्याला संलग्न बाजारपेठा होत्या. राजमार्ग विजयकमानींनी युक्त असून तो शहराच्या मध्यभागी असलेले मठ, चर्च व त्यांची प्रांगणे यांतून जात असे. रस्त्याच्या बाजूस पादचाऱ्यांचा फरसबंदी मार्ग असून तो कमानीच्या छतांनी इमारतींस संलग्न केलेला असल्याने पादचाऱ्यांना ऊन, पाऊस, थंडी यांपासून निवारा मिळत असे. पॅरिस, फ्लॉरेन्स तसेच इंग्लंडमधील शहरे अशा मार्गांबद्दल ख्यातनाम आहेत. मध्ययुगामध्ये शहरांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली. नवनवी नगरे उभारण्याला प्रत्यक्षाप्रत्यक्ष उत्तेजन मिळत गेले. नव्या नगरात येऊन राहणाऱ्याला करमाफीची सवलतही मिळे. मात्र प्रत्येक शहराची लोकसंख्या सुरुवातीला अत्यंत मर्यादित होती. मोठमोठ्या शहरांची लोकसंख्याही सु. ५०,००० च्या वर नसे. नगराचा आकार तटबंदीच्या परिघाने मर्यादित केलेला असे. नगरे अगदी जवळजवळ असत. नगरानगरांतील दळणवळण मंदगतीचे असे. वाहतूकव्यवस्थाही अपुरी व गैरसोयीची होती. पाणीपुरवठा, जलनिकासव्यवस्था यांबाबत पुरेशा आणि समाधानकारक तरतुदी नव्हत्या. सुरुवातीला लोकसंख्या कमी असल्याने या समस्या फारशा गंभीरपणे जाणवल्या नाहीत परंतु पुढे जागतिक दळणवळण व व्यापारवृद्धी यांमुळे महत्त्वाच्या व केंद्रवर्ती शहरांच्या लोकसंख्येत झपाट्याने वाढ झाली, तरीही पाणीपुरवठा आणि आरोग्यविषयक सोयी मात्र तुटपुंज्या व मर्यादितच राहिल्या. परिणामतः दाट लोकवस्तीमुळे कोंदटपणा व अनारोग्यकारक वातावरण निर्माण झाले. वाढत्या लोकसंख्येमुळे शहरांचे विभाजन दोन, चार, सहा अशा भागांत झाले. प्रत्येक भागास स्वतंत्र असे चर्च, नगरसभागृह, बाजारचौक, पाणीपुरवठाकेंद्र, सार्वजनिक पुष्करणी व स्नानगृहे यांची योजना केलेली होती. या नगररचनेचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे व्हेनिस हे ख्यातनाम शहर होय. मध्ययुगीन नगरांच्या चर्चपरिसरात कालांतराने रुग्णालये, विद्यापीठे, अन्नछत्रे, वृद्धाश्रम अशा वास्तू उभारण्यात आल्या. त्याचप्रमाणे व्यापारी आणि कारागीर यांचे संघ (गिल्ड) स्थापन झाले. चर्च, बाजारचौक, संघगृहे ही लोकांची एकत्र जमण्याची ठिकाणे होती. शहराच्या सभागृहात नगरपालिकेचे कार्यालय असे. मध्ययुगाच्या अखेरीस नगर-सभागृहांत धनिक वर्गांचे विवाहसमारंभ, नृत्ये असे सामुदायिक कार्यक्रमही होऊ लागले. चर्च वा कॅथीड्रल यांच्या नगररचनेतील मध्यवर्ती स्थानामुळे आणि नगराभोवतालच्या तटबंदीमुळे मध्ययुगीन नगररचनेला एकात्म असे रूप लाभले होते. वास्तू उभारताना त्यांचे आकार व बांधकाम-साहित्य यांविषयी योग्य ती दक्षता घेतली जात असे. तद्वतच नगररचनेच्या संदर्भातील त्यांचे स्थान व सुसंवादित्व यांचाही विचार केला जात असे. मध्ययुगीन नगरांच्या मर्यादित क्षेत्रांमुळे नगरांतील घरे एका सलग रांगेमध्ये व अरुंद रस्त्यांच्या कडेने बांधण्यात आली. ही घरे सामान्यतः दुमजली व सारख्या उंचीची असत. घरे दर्शनी अरुंद व अंतर्भागात जास्त खोली असलेली अशी होती. या घरांच्या रांगांच्या मागील बाजूस थोडी मोकळी जागा असून तिथे घरगुती प्राणी पाळले जात वा बागा केल्या जात. घराच्या तळमजल्यावर कार्यगृह (वर्कशॉप), कोठी, स्वयंपाकघर असे. तिथे व्यापारी आपले व्यवहार आणि कारागीर वस्तुनिर्मिती करीत. आद्य मध्ययुगीन नगरांमध्ये सामाजिक वर्गभेदांचे प्रमाण कमी होते. कामगार आपल्या धन्याच्या घरी व्यवसाय-व्यापारातील शिकाऊ उमेदवार म्हणून राहत. घराच्या पहिल्या मजल्यावर राहण्याजेवण्याची आणि झोपण्याची जागा असे. घरांना खाजगीपणा असा फारसा नव्हता व फारच थोड्या नगरवासीयांना स्वतंत्र शयनगृहे होती. प्राचीन घरांतील उघड्या चुलीची (हार्थ) जागा आता बंदिस्त शेकोट्या व धुराड्यांनी घेतली. काही घरांच्या अंतर्भागात शौचकूप असत. तथापि मैला वाहून नेण्याची आणि केरकचऱ्याची विल्हेवाट लावण्याची योग्य तरतूद नसल्याने गलिच्छपणा व अनारोग्य यांत उत्तरोत्तर भर पडत गेली. मध्ययुगाच्या अखेरीस लोकसंख्येच्या वाढीमुळे व मर्यादित जमीनक्षेत्रामुळे घरांवर मजले वाढू लागले. घरे पाचमजलीही बांधली गेली (उदा., एडिंबरो शहर). मध्ययुगीन नगररचनेत लोकांच्या वाढत्या क्रीडाप्रेमामुळे मैदाने आणि प्रांगणे यांची तरतूद करण्यात आली. नगरातील वास्तू, पाने, फुले, पक्षी आदी आकृतिबंधांच्या शिल्पांनी सजविल्या जात, त्यामुळे नगरांना दर्शनी आकर्षक रूप प्राप्त झाले. भावी काळातील बरोक, गॉथिक, रोकोको या वास्तुशैलींची ही एका अर्थाने नांदीच म्हणता येईल.

चौदाव्या शतकातील नगरांची स्थिती अत्यंत खालावलेली व निकृष्ट दर्जाची होती. नगरांच्या लोकवस्तीमध्ये अफाट वाढ व राहत्या जागेची टंचाई यांतून कोंदटपणा व अनारोग्य यांचे प्रमाण वाढत गेले. मात्र त्या मानाने आरोग्यविषयक सुविधा लगोलग निर्माण झाल्या नाहीत. चौदाव्या शतकातील ‘ब्लॅक डेथ’ नंतर लंडनमध्ये पहिली मलवाहिनी खोदण्यात आली. सोळाव्या शतकापर्यंत स्पेन, फ्रान्स, इंग्लंड येथे शौचकुपांची व्यवस्था नव्हती. सतराव्या शतकाच्या प्रारंभी लंडनमधील घरांना पाणीपुरवठ्याची जोड देण्यात आली. सारांश, आरोग्यप्रद व स्वास्थ्यकारक नागरी जीवनाच्या दृष्टीने आवश्यक अशा सोयी व सुधारणा नगररचनेत कालांतराने व हळूहळू निर्माण होत गेल्या.


पंधराव्या शतकात बंदुकीची दारू, तोफा अशा आधुनिक युद्धसाहित्याच्या शोधामुळे युद्धतंत्रांमध्ये आमूलाग्र बदल होत गेले. सैनिकी अभियांत्रिकीचे शास्त्र प्रगत झाले. परिणामतः नगरांची संरक्षणव्यवस्था अधिक मजबूत व टिकाऊ करण्यात आली. नगराभोवतीच्या तटबंद्या विस्तृत व भरभक्कम करण्यात आल्या. नगरांना मोठमोठे बुरूज, खंदक व लष्करी ठाणी (आउटपोस्ट) यांची जोड देण्यात आली.

पंधराव्या शतकातील नगरांचे स्वरूप ड्यूकच्या नियंत्रणाखालील प्रदेशांचे (ड्यूकडम) होते. नगरांवर सधन व्यापारी घराण्यांची सत्ता होती. आपली सत्ता व वैभव यांचे प्रदर्शन करण्याच्या उद्देशातून त्यांनी नगरांमध्ये सुधारणा घडवून आणल्या. फ्लॉरेन्स, व्हेनिस, रोम, लाँबर्डी येथील सरदार घराण्यांनी आपापली नगरे सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध व संपन्न करण्यात हातभार लावला. मेदीची, बॉर्जा, स्फोर्त्सा या घराण्यांनी नवनवे प्रासाद उभारले व अभिजात शिल्पांची जोड देऊन ते सुशोभित केले. प्रबोधनकाळात मध्ययुगीन नगरांचा मूलाकार बदलला नाही मात्र नगरवास्तूंचे दर्शनी भाग अभिजाततावादी शिल्परचनांनी अलंकृत करण्यात आले व त्या योगे नगरांना सौंदर्याची जोड लाभली. डोमेनिको फोंटाना याने रोममध्ये अनेक नवनवीन भव्य वास्तूंची रचना करून रोमचे वैभव वाढवले. बेर्नीनीने सार्वजनिक स्थळांची सौंदर्यपूर्ण रचना केली. नगररचनेचा आणि शिल्पकलेचा प्रथमच सौंदर्यदृष्ट्या नियोजनपूर्वक व सुयोग्य मेळ घालण्यात आला. बेर्नीनीच्या नगररचनेत कारंजे, शिल्पाकृती अशा घटकांना विशेष प्राधान्य मिळाले. सेंट पीटर्सच्या परिसरातील अतिभव्य वर्तुळाकार प्रांगणाची (प्याझा) रचना हे त्याचे जगप्रसिद्ध उदाहरण होय. मायकेलअँजेलोने रोममधील कॅपिटॉल टेकडीवरील ‘कँपोदिग्लिओ’ ची निर्मिती केली. मध्ययुगाच्या अखेरीस यूरोपमध्ये व्हेनिस हे मध्ययुगीन नगररचनातंत्राचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून प्रसिद्ध होते. व्हेनिसचा गाभा म्हणजे प्रशस्त खुला सेंट मार्क चौक होय. त्याभोवतीच्या वास्तुसमूहामध्ये सतत परिवर्तने होत गेली. व्हेनिस या नगरात आधुनिक शहारातील हरित पट्ट्याप्रमाणे कालवेमार्ग योजले होते. नगराचे सहा संलग्न विभाग केले असून, त्यांत सेंट मार्क चौकाच्या धर्तीचीच मध्यवर्ती रचना आढळते. प्रत्येक विभागात एक चौक, कारंजे, चर्च, शाळा, संघगृह यांचा अंतर्भाव होता. कालव्यांची योजना प्रत्येक विभागाच्या सीमारेषा दर्शवणारी व त्यांना परस्परांशी जोडणारी, अशा दुहेरी हेतूंनी साधलेली होती.

मध्ययुगीन सरंजामशाहीमध्ये चर्चसंस्थेचे नगरांवरील वर्चस्व हळूहळू कमी होत जाऊन त्या जागी राजे व अमीर-उमराव या वर्गाची सत्ता निर्माण होत गेली. विखुरलेल्या सरंजामी सत्ता एकत्रित करून मध्यवर्ती राजकीय सत्ताकेंद्र निर्माण करण्याच्या गरजेपोटी ‘कॅपिटल सिटी’ (राजधानी) या नव्या नगरप्रकाराचा उदय झाला. नगररचनेत चिरस्थायी स्वरूपाच्या लष्करी वसाहती व सैनिकांच्या बराकी आल्या. लष्करी कवायती व संचलने तसेच सैन्याच्या विजयाप्रीत्यर्थ मिरवणुका यांसाठी रुंद व प्रशस्त महामार्ग आणि मैदाने, विजयकमानी, शस्त्रागार यांची भव्य प्रमाणात योजना करण्यात आली. राजदरबारी रीतिरिवाजांचे आणि वैभवाचे प्रदर्शन भव्य आलंकारिक वास्तू व प्रासाद उभारून करण्यात आले.

बरोक काळामध्ये नगररचनेवरील राजसत्तेचा प्रभाव विशेषेकरून जाणवतो. चौदाव्या लुईने पॅरिसच्या गजबलेल्या वस्तीतून व्हर्सायच्या खुल्या परिसरात आपल्या राजप्रासादाचे स्थलांतर केले. त्याच्या आदेशावरून लनोत्र या विख्यात स्थलशिल्पज्ञाने त्या ठिकाणी भव्य प्रमाणात उद्याननिर्मिती केली. राजप्रासादाच्या मध्यवर्ती केंद्रापासून नगरातील सर्व मार्ग वेगवेगळ्या दिशांना पसरले होते. सोळाव्या ते एकोणिसाव्या शतकांच्या दरम्यान जी प्रमुख नवी नगरे वसवण्यात आली, त्यांचे स्वरूप प्रायः राजे व सम्राट यांची निवासी नगरे असेच होते. व्हर्साय, कार्लझ्रूए, पॉट्सडॅम ही याची ठळक उदाहरणे होत. बरोक काळात नगररचनेतील खुल्या परिसराच्या कल्पनेला फार मोठा वाव मिळाला. सतराव्या शतकातील बरोक नगरांच्या रचनेत गणित, तर्कशास्त्र आदी शास्त्रांतील तत्त्वांचा व भौमितिक आकारांचा प्रादुर्भाव राजमार्ग, उद्याने, स्थलशिल्पे यांच्या निर्मितीमध्ये दिसून येतो. कोंदट व दाट वस्तीच्या जुन्या शहरांमध्ये खुलेपणा निर्माण करण्यासाठी बोळ व घरे पाडून प्रचंड सरळमार्ग आखण्यात आले. बरोक नगरांतील मुख्य मार्ग हे रुंद व प्रशस्त असून ते लष्करी हालचाली, गतिमान वाहने व पादचारी यांच्या सोयीच्या दृष्टीने आखण्यात आले होते. रस्त्याच्या दुतर्फा झाडी होती. नगरांमध्ये मोठमोठे भव्य प्रासाद आणि वास्तू उभारण्यात आल्या. लोकरंजनासाठी रंजनकेंद्रे व उद्याने योजण्यात आली. युद्धात जिंकलेली संपत्ती व वैभव, राज्यकर्त्यांनी कलेला दिलेले उत्तेजन, धार्मिक वस्तू व अवशेष यांचे संकलन व जतन तसेच तत्कालीन साम्राज्यशाहीचे प्रदर्शन या व अशांसारख्या प्रेरणांतून प्रायः संग्रहालये स्थापन करण्यात आली. याच अनुसंधानाने शाही बागा व प्राणिसंग्रहालये यांचाही नगररचनेत अंतर्भाव झाला.


फ्रान्समध्ये सोळाव्या व सतराव्या शतकांत ज्या अनेक नगररचना करण्यात आल्या, त्यांपैकी व्हीत्री-ला-फ्रांस्वा, शार्ल्‌व्हील, रीश्‌ल्य ही सर्वांत वैशिष्ट्यपूर्ण उदाहरणे होत. याच काळात चौथ्या हेन्‍रीच्या आधिपत्याखाली पॅरिस शहराची पुनर्रचना करण्यात आली. त्यानंतर तेरावा लुई व चौदावा लुई ह्यांनीदेखील त्यात राजशाही स्वरूपाचे बदल घडवून आणले. १६६६ च्या प्रचंड आगीने भस्मसात झालेल्या लंडन शहराची पुनर्रचना करण्यात आली. सर क्रिस्टोफर रेनने नगरनियोजनाचा भव्य आराखडा केला, परंतु तो संपूर्णपणे प्रत्यक्षात कधीच उतरला नाही. अठराव्या शतकातील यूरोपीय नगररचना अतिभव्य स्वरूपाच्या होत्या. कार्लझ्रूए, मॅनहाइम ही जर्मनीतील शहरे व याच शतकाच्या शेवटी वॉशिंग्टन या अमेरिकेच्या राजधानीची रचना ही या शतकातील नगररचनेची काही महत्त्वाची उदाहरण होत. नगरांतील सर्व घटकांचा भव्यपणा व मध्यातून विस्तारत जाणारी रचना, हे या काळातील नगररचनेचे प्रमुख वैशिष्ट्य होय.

दरम्यानच्या काळात इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीचा उगम झाला. परिणामतः नगररचनेतील कलाघटकांचा लोप होत जाऊन उद्योगधंद्यांच्या वाढीमुळे दळणवळण, औद्योगिक वसाहती व नगररचनाशास्त्र यांत क्रांती झाली. त्यामुळे नगररचना संकल्पनाच्या मूलभूत घटकांचे स्वरूप आमूलाग्र बदलले. १८०० नंतर नगररचनातंत्र झपाट्याने बदलत गेले. गावाच्या सभोवतालच्या तटबंदी लोप पावल्या. पूर्वीच्या प्रमाणाबाहेर शहरांचा विस्तार वाढू लागला. उद्योगधंदे वाढू लागले. नियोजनाचा वेग त्यामानाने कमी पडला. त्यामुळे जगातील अनेक प्रमुख शहरांत गर्दी झाली. दळणवळणाच्या, गृहनिर्मितीच्या समस्यांबरोबरच तदानुषंगाने अनेक सामाजिक समस्याही उद्‌भवत गेल्या. त्याचे पर्यवसान गलिच्छ वस्त्या वाढण्यात झाले. तसेच उद्योगधंद्यांच्या वाढीमुळे व दळणवळणातील गर्दीमुळे प्रदूषणाची समस्या अनेक शहरांत उग्र स्वरूप धारण करू लागली. १९०० च्या सुमारास या समस्यांचा गंभीरपणे विचार होण्यास सुरुवात झाली. नगररचनातंत्र सुधारत गेले व तत्संबंधी अनेक नवीन कायदे करण्यात आले. नगररचना व राष्ट्रनियोजन हे एकमेकांना पूरक असावे, हे तत्त्व प्रतिपादन करण्यात आले. त्यामुळे नगरविकासाच्या योजना देशाच्या आर्थिक क्षमतेचा विचार करूनच हाती घेण्यात येऊ लागल्या. या काळातील नगररचनेत दळणवळणाचा सर्वप्रथम विचार होऊ लागला. त्यानंतर आर्थिक क्षमता विचारात घेण्यात येत असे. नंतर नगराची जीवनमूल्ये व सांस्कृतिक अंगे लक्षात घेऊन त्यानुसार त्यांची योग्य पूर्तता करण्यात येई व सर्वांत शेवटी नगररचनेत हिरवीगार मैदाने व भूरचना यांचा समावेश करण्यात येई. नगररचनेचे हे स्वरूप पुढे अनेक वर्षे जगभर अवलंबिले गेले. या कामी अनेक क्षेत्रांतील तज्ञ लोकांची समिती आपापले अहवाल सादर करीत असे व त्यांच्या विश्लेषणांवरून अंतिम नियोजनाचे स्वरूप तयार केले जात असे. त्यात सर्वेक्षक, स्थापत्य अभियंता, वास्तुतज्ञ, नगर-रचनातज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, स्थलशिल्पज्ञ, भूस्वरूपवर्णनकार, जनगणनाकार अशा अनेक क्षेत्रांतील तज्ञांचा समावेश करण्यात आला. त्यामुळे शहरांचा सर्वांगीण अभ्यास करणे सुलभ झाले. नगररचनेतील भावी गुंतागुंती टाळण्यासाठी अनेक कायदे अंमलात आले. त्यांत मुख्यत्वेकरून मानवी जीवनाला आवश्यक असणाऱ्या नैसर्गिक गोष्टींचा – उदा., सूर्यप्रकाश, दळणवळणासाठी अवकाश, वायुवीजन इ. – विचार केला गेला. थोडक्यात, औद्योगिक क्रांतीमुळे आधुनिक नगररचनाविचाराला शास्त्रीय बैठक व व्यापक स्वरूप प्राप्त झाले.

पूर्व आशियातील नगररचनेचा प्रारंभ चीनमधील ह्वांग हो नदीच्या खोऱ्यात इ. स. पू. सु. बाराव्या शतकात झाला. प्राचीन शांग (वा यीन) घराण्यातील नगरांवरून तत्कालीन नगररचनेची सर्वसाधारण कल्पना येते. या नगरांमध्ये नद्यांच्या पुरांपासून रक्षण होण्यासाठी बांध व कालवे योजले होते. नगरांची तटबंदी सामान्यतः १९ फूट (५·७९ मी.) ते ५५ फूट (१६·७६ मी.) रुंद असे. नगरांच्या मध्यभागी कोट आणि त्याच्या आतील बंदिस्त भागात राजप्रसाद असून, त्याभोवती मातीच्या जोत्यावर लाकडी बांधकामामध्ये घरे बांधली होती. राजाच्या कबरीमध्ये त्याच्या गुलामांनाही पुरण्याची प्रथा होती. तत्कालीन नगररचनेत धार्मिक वास्तू आढळत नाहीत.

आ. २. मोहें-जो-दडो : (१) हमरस्ते, (२) वस्तीतील रस्ते.


पौर्वात्य नगररचनेचे दुसरे केंद्र म्हणजे सिंधू नदीचे खोरे होय. त्या काळातील (इ. स. पू. सु. २७५०–२२५०) नगररचनेची उदाहरणे म्हणजे हडप्पा व मोहें-जो-दडो ही प्रमुख शहरे होत. प्राचीन भारतातील नगररचनेचा इतिहास सामान्यतः या शहरांपासूनच सुरू झाला. त्यांत नगररचनेचे सामान्यतः दोन प्रकारचे आलेख आढळून येतात. एक वर्तुळाकार व दुसरा लंबचौकोनी. ही नगरे नद्यांच्या काठी वसलेली होती व नद्यांच्या पुरांपासून संरक्षण होण्यासाठी नगरांभोवती मजबूत तटबंदी होती व त्याभोवती खंदक होते. तटबंदीला वक्र रचनेची, बाहेरून सहजासहजी ओळखू न यावीत अशी प्रवेशद्वारे होती. वर्तुळाकार नगररचनेत मध्यभागी बालेकिल्ला असे. नगराच्या पश्चिमेस सार्वजनिक करमणुकीसाठी वास्तू होत्या. मोहें-जो-दडोच्या उत्खननावरून शहरात आडवे-उभे असे हमरस्ते व त्यांच्या आजूबाजूस सर्वत्र शिरकाव करणारे लहानमोठे रस्ते, पाणीपुरवठ्याचे खापरी नळ, मलवाहिन्या, तसेच अन्य सार्वजनिक सुखसोयी इत्यादींची योजना केलेली आढळते. नगरातील मुख्य रस्ते सु. ३० फूट (९·१४ मी.) रुंद होते. घरांच्या रचना चौक व परस यांनी युक्त होत्या. विहिरी परसात असून, मागील परसातून सांडपाणी वाहून नेण्यासाठी प्रत्येक घरातून विटांच्या नाल्या होत्या. त्यांपैकी काही पाणी जिरवणाऱ्या मोठ्या मडक्यात सोडलेल्या, तर काही सार्वजनिक गटारांना जोडलेल्या होत्या. गटारे बंदिस्त होती. प्रत्येक घराच्या बाहेरच्या बाजूला कचऱ्याचे कुंड असावे. जमिनीखालून जाणाऱ्या लहानमोठ्या नळांचे जाळेही उत्खननात दिसते. घरे सामान्यतः तीनमजली असून रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वसवली होती. नगररचनेत मोठे धान्यकोठार असावे, असे दिसते. उत्खननात सार्वजनिक सभागृहे, स्नानगृहे इ. आढळली. देवळांचे अवशेष मात्र आढळले नाहीत.

प्राचीन भारतीय वाङ्‌मयातून नगरनिर्मिती व नगरनियोजन यांसंबंधी विविध व विपुल माहिती मिळते. कौटिलीय अर्थशास्त्र, मानसार, शुक्रनीतिसार, अपराजित पृच्छा, समरांगण सूत्रधार इ. ग्रंथांतून नगररचनातंत्राचे वर्णन आढळते तर वेद आणि पुराणे, रामायण, महाभारत  आदी ग्रंथांतून प्राचीन नगरांची सुंदर वर्णने आढळतात. प्राचीन नगरांचे जे प्रमुख नऊ घटक मानले गेले आहेत–पाणीपुरवठा, मंडपरचना, बाजारपेठ, संरक्षणव्यवस्था, शासनव्यवस्था, निवासस्थाने, सांडपाण्याची व्यवस्था, शिक्षणसंस्था आणि उद्याने-देवालये–त्यांवरून प्राचीन काळी नगरनियोजनाचा सर्वांगीण दृष्ट्या विचार झाला असल्याचे दिसून येते. नगरांची निर्मिती व विस्तार प्रायः दोन दिशांनी झाला : देवस्थान, शिक्षणकेंद्र अशा स्थानमाहात्म्यामुळे ग्रामांचा विस्तार होऊन नगरे बनली व काही नगरे विशिष्ट हेतूने नव्याने वसवली गेली, उदा., राजधानी. प्राचीन ग्रंथांतून नगरांचे पुढील प्रकार वर्णिलेले आढळून येतात : ‘राजधानी’ म्हणजे उत्तुंग तट आणि द्वारे, राजमार्ग, उपवने, सरोवरे, देवालये, भवने, सैनिकांची शिबिरे आदींनी युक्त असे महानगर ‘पत्तन’ म्हणजे समुद्रकिनाऱ्यावरील नगर व व्यापारी केंद्र ‘द्रोणीमुख’ म्हणजे जिथे नदी समुद्राला मिळते, तिथे असलेले व्यापारी केंद्र ‘पुटभेदन’ हे मोठे व्यापारी केंद्र असलेले नगर होय ‘निगम’ ही कारागिरांची वस्ती ‘स्थानीय’ म्हणजे आठशे ग्रामांच्या केंद्रस्थानी असलेले नगर ‘खर्वट’ हे दोनशे ग्रामांच्या केंद्रस्थानी असलेले नगर व ‘खेट’ हे खेड्याप्रमाणे सामान्य वस्तीचे नगर होय. प्राचीन साहित्यातून नगरांचे त्रिकोणी, चौकोनी, आयताकृती, गोलाकार, अर्धचंद्राकृती, भुजंगाकृती इ. विविध आकार वर्णिलेले आढळतात. दीर्घ व चौकोनी नगररचना श्रेष्ठ मानत. रामायणमहाभारत यांतील वर्णनांवरून अयोध्या आणि द्वारका ही आयताकृती नगरे होती. मयमत ग्रंथात वृत्ताकार नगर हे श्रेष्ठ मानले आहे. अर्धचंद्राकृती नगर म्हणून मथुरेचे वर्णन आढळते. नगरनिर्मितीचा शुभ मुहूर्त, भूपरीक्षा, भूमिशुद्धीचे विधी इत्यादींचे संकेत प्राचीन काळी होते. स्थपती हा नगररचनाकारांचा प्रमुख असे व बागा, किल्ले, पथरचना आणि मोजणीशास्त्र यांतील तज्ञ त्याला नगररचनेच्या कामी साहाय्य करीत. नगराभोवती संरक्षणासाठी खंदक म्हणून, त्याला लागूनच मातीची, विटांची वा दगडांची तटबंदी बांधत. त्यात मोठे दरवाजे व बुरुज असत. प्राचीन नगरांमध्ये विविध प्रकारच्या गृहरचनांचे उल्लेख सापडतात. उदा., ‘आयतन’ (निवासस्थान), ‘हर्म्य’ किंवा ‘सौध’ (भव्य प्रासाद), ‘दुरोण’ (यज्ञगृह), ‘शाला’ (आरामगृह), ‘वर्म’ (किल्लेवजा संरक्षक घर), ‘गर्त’ (तळघर) इत्यादी. घरांची रचना मध्यभागी अग्निकुंड ठेवण्यासाठी चौक व त्याभोवती खोल्या, अशा स्वरूपाची होती. पथरचनेसंबंधीचे अनेक उल्लेख वेदांमध्ये आढळतात. रस्ते सरळ व स्वच्छ असावेत व त्यांच्या कडेने शीतल छाया देणारे वृक्ष असावेत रथ वा हत्ती यांना येण्याजाण्यास सुलभ ठरेल इतकी रस्त्यांची रुंदी असावी अशी वर्णने आढळतात. नद्यांवरील पुलांचेही उल्लेख वेदांत आढळतात. भोजराजकृत युक्तिकल्पतरू ग्रंथात नगराची रचना करताना मध्यभागी विस्तीर्ण जागा ठेवावी व मधोमध चतुष्पथ असावेत पाणपोई, लतामंडप, उद्याने इत्यादींनी नगरास शोभा आणावी सरोवरे व बाजार असावेत हत्तींची वस्ती नगराच्या मध्यभागी नसावी व अश्वांची प्रांतभागी नसावी इ. प्रकारचे निर्देश आहेत. अग्निपुराणात नगरविभागांचा दिक्‌विन्यास वर्णिला आहे : आग्नेय भागात सोनार दक्षिण भागात वारांगना व नर्तकी नैर्ऋत्य भागात कुंभार, नट, कोळी वगैरे पश्चिम भागात आयुधकार उत्तरेस ब्राह्मण, यती व संन्यासी ईशान्येस फळवाले, भाजीवाले, व्यापारी इ. पूर्वेस सेनापती व क्षत्रिय, अशा प्रकारे नगररचनेतील वस्त्यांचे वर्गीकरण व्यवसायाधिष्ठित असल्याचे आढळून येते. कौटिलीय अर्थशास्त्रात नगररचनेत देवमंदिरे कोठे असावीत, याचा तपशील दिलेला आहे. वैदिक वाङ्‌मयात वर्णिलेली नगरे व सिंधू खोऱ्याच्या उत्खननात आढळलेली नगरे यांत साधर्म्य आढळून येते. वेदातील दुर्योण या शहराचे वर्णन मोहें-जो दडोशी व हरियूपीयाचे वर्णन हडप्पाशी जुळते. त्यांवरून ऋग्वेदात वर्णिलेली आर्यांनी जिंकून घेतलेली त्यांच्या शत्रूंची पुरे व सिंधू उत्खननात उपलब्ध झालेली नगरे ही एकच असावीत, असे काही तज्ञांचे अनुमान आहे. हडप्पा व मोहें-जो-दडो यांखेरीज प्राचीन लोथल, अयोध्या, इंद्रप्रस्थ, नालंदा, तक्षशिला, मदुरा, द्वारका, पाटलिपुत्र इ. प्राचीन नगर-नियोजनतंत्रावर आधारित नगरांची प्रसिद्ध उदाहरण होत. नालंदा व तक्षशिला येथील विद्यापीठांची रचना नगरनियोजनाच्या संदर्भात महत्त्वाची आहे. अयोध्या, पाटलिपुत्र, हस्तिनापूर या प्राचीन शहरांच्या रचना तत्कालीन नगररचनेची वैशिष्ट्ये दर्शवितात. पाटलीपुत्र व तत्सम तत्कालीन नगररचनांमध्ये तटबंदी व बुरुज तसेच ‘गोपुरे’ म्हणजे ग्रामद्वारे यांची योजना होती. या रचनाशैलीचा प्रभाव बौद्ध स्तूपांमध्येही आढळतो. राजमार्ग व वामनमार्ग हे नगररचनेतील प्रमुख रस्ते होते. त्यांचा छेद शहराच्या मध्यभागी होऊन तेथे चौक आखलेला होता. शहराचे प्रामुख्याने चार विभाग होते व या विभागांत व्यवसायानुरूप वसाहती होत्या. क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य व शूद्र अशा वर्णभेदांनुसार वेगवेगळ्या वस्त्या आखल्या होत्या. प्रत्येक भागात जलाशय असे. मार्गांची रुंदी वाहनांच्या आकारांवर अधिष्ठित होती व मार्गरुंदीचे घरांच्या उंचीवर नियंत्रक होते. मार्गांच्या आलेखांनुसार ग्रामरचनेचे ‘दंडक’, ‘स्वस्तिक’, ‘पद्माकार’, ‘नित्यानंद’ असे प्रकार होते. घरांचे आलेख एकशाळापासून चारशाळा (अपार्टमेंट) पर्यंत होते. नदीकाठचे घाट फरसबंदी असून नगरवासीयांना जलक्रीडा करण्यासाठी उपयुक्त होते. देवालये व तेथील परिसरात धार्मिक कार्ये, शिक्षण, न्यायदान, पंडितांचे वादविवाद होत असत. त्यावरून नगररचनेचे संस्कृतिवर्धनाचे अंग विशेषेकरून जोपासले होते, हे दिसून येते. प्राचीन नगररचनेतील वृक्षांचे महत्त्व घरांच्या परिसरात तसेच रस्त्याकडेने वृक्षांची योजना करीत, त्यावरून दिसून येते.


भारतासारख्या खंडप्राय देशात अनेक साम्राज्ये उगम पावली व अस्ताला गेली. वेळीवेळी झालेल्या परकीय आक्रमणांमुळे आक्रमकांच्या संस्कृतींचा, जीवनमूल्यांचा, भाषांचा, कलागुणांचा प्रभाव भारतीयांवर पडत गेला व त्यानुसार त्यांची सौंदर्यदृष्टी व रचनातंत्रेही बदलत गेली.

इ. स. सु. ७११ पासून मुस्लिम राज्यकर्त्यांची भारतावर आक्रमणे सुरू झाली, पुढे त्यांच्या भारतातील वसाहतीही वाढू लागल्या व पुढील दोन-तीन शतकांत या वसाहतींनी मुस्लिम साम्राज्याचे स्वरूप धारण केले. भारतीय वास्तुकलेच्या इतिहासात इस्लामी प्रभावाला फार मोठे स्थान आहे. त्यामुळे इस्लामी नगररचनातंत्रे भारतात आणली गेली. इस्लाम धर्म व सत्ता यांच्या विस्ताराबरोबरच इस्लामी वास्तुकलेला स्वतःचे असे विशिष्ट वळण लाभले. जेरूसलेम व दमास्कस येथील ज्यू व ख्रिस्ती पंथांच्या शैलींचा संमिश्र प्रभाव इस्लामी वास्तू व नगरे यांवर पडला. नगराच्या मध्यवर्ती मशीद आली. नगराच्या तटबंदीवर रोमन व नॉर्मंडी किल्ले यांचा प्रभाव होता. रोमन जलवाहिन्यांच्या धर्तीवर पाणीपुरवठ्याच्या योजना होत्या. घरांभोवती उंच भिंत व आतील अंगणात बगिचे होते. हवेशीरपणा हे घरांचे वैशिष्ट्य होते. खलीफांच्या राजवाड्यांसमोर लष्करी कवायतीचे पटांगण व प्रशासकीय कचेरी असे. मशिदींच्या परिसरात मनोरे होते. नगराच्या सर्वसाधारण रूपात घुमट व मनोरे यांना उठाव लाभला होता. इस्लामी नगररचनेच्या या प्रमुख वैशिष्ट्यांचा प्रभाव इस्लामकालीन भारतीय नगररचनेवर पडला. इस्लामी नगररचनातंत्रातील बगिचे व तटबंदी यांना असलेले महत्त्वाचे स्थान पुढेही सोळाव्या शतकात अकबर, शाहजहान ह्यांच्या कारकिर्दीत दिसून येते. या क्षेत्रात अकबराने अद्वितीय कामगिरी केली. त्याने १५७१ च्या सुमारास आपली दिल्ली येथील राजधानी हलवून आग्र्याजवळील फतेपुर सीक्री येथे वसवली व तिची नव्याने नगररचना केली. फतेपुर सीक्रीच्या नगररचनेवर भारतीय शिल्पशास्त्राचा प्रभाव जाणवतो. धार्मिक वास्तुविभाग, राजवाडे, रंजनकेंद्रविभाग, शासकीय वास्तुविभाग, यांचे संकलन अप्रतिम साधले आहे. पूर्व–पश्चिम ह्या मार्गांवर हे विभाग दिक्‌विन्यास पद्धतीचा अवलंब करून बांधले आहेत. बुलंद दरवाजा व त्या परिसरातील मशीद, कबरस्थाने या भागांतून जोधाबाई राजवाडा, दिवाणी-ई-खास, दिवाण-ई-आम यांची सांगड घातली आहे. अशाच धर्तीवर आग्रा, लाहोर, दिल्ली येथील किल्ल्यांची मांडणी झाली असल्याचे दिसून येते. मोगल काळातील भारतीय प्रमुख नगरांमध्ये तटबंदीयुक्त शहर आणि त्याच्या पूर्वेस जामी मशीद अशा रचना असून या मशीदीसमोर मोठे प्रांगण व प्रांगणाच्या एका बाजूस किल्ला असे. किल्ल्यातील अंतर्रचना ही छोट्या प्रमाणात नगररचनेप्रमाणे असून आत बाजार, मशीद, दिवाण-ई-खास, दिवाण-ई-आम, बागा, प्रांगणे इ. होती.

अठराव्या शतकात जयपूर शहराची रचना करण्यात आली. महाराजा सवाई जयसिंग दुसरा या राजपूत राजाने गादीवर आल्यावर १७२८ मध्ये ही नगरी वसवली व आपली राजधानी अंबरहून जयपूरला हलविली. ह्या नव्या शहराची रचना प्राचीन हिंदू नगररचनातंत्रास अनुसरून केलेली आढळते. यातील सर्व वास्तूंचा रंग गुलाबी असल्याने, ती गुलाबी नगरी म्हणून ख्यातनाम ठरली आहे. या शहराभोवती भक्कम तटबंदी आहे व त्यात आठ प्रवेशद्वारे आहेत. त्याचा आकार आयताकृती असून, याच आकारात चारही दिशांना रस्ते आहेत. त्यात पुन्हा अरुंद उपरस्ते आहेत. मुख्य रस्ते ३३·५२ मी. (११० फूट) रुंद आहेत. घरे एकमेकांना खेटून आहेत. सर्वत्र गुलाबी रंग असल्याने सूर्यास्ताच्या वेळी नगरीची अवर्णनीय शोभा दिसते. अशा प्रकारच्या नगररचनेस हिंदू शिल्पशास्त्रात ‘प्रस्तर’ अशी संज्ञा आहे. उदयपूरच्या नगररचनेत सरोवरांना कलात्मक स्थान लाभले आहे. यानंतरच्या काळात विशेष महत्त्वाच्या अशा नगररचना झाल्या नाहीत.

भारतातील इंग्रजी अंमलाबरोबरच नगररचनेला एक वेगळे वळण लाभले. एकोणिसाव्या शतकापर्यंत त्यांनी आपली सत्ता स्थिर केली व त्यानंतर आपल्या नव्या राजधानीची रचना केली, ती म्हणजे नवी दिल्ली होय. ही नगररचना सम-अक्षांवर करण्यात आली आहे. सर एडविन लट्येन्झ या नामवंत इंग्रज वास्तुविशारदाने तिची नगररचना केली व १९३१ मध्ये तिचे बांधकाम पूर्ण केले. जुन्या दिल्लीपासून ११·२६ किमी. वर मुख्य सरकारी वास्तू आहे. त्यापासून पूर्व-पश्चिम अक्षांवर ३·२१ किमी.वर ‘इंडिया गेट’ आहे. त्याच्या आजूबाजूस झरे, हिरवळ, फुलझाडी यांची योजना करण्यात आली आहे. मुख्य सरकारी वास्तूच्या उत्तरेला वर्तुळाकार वास्तू आहे व ती म्हणजे आजचे संसदभवन होय. सर हर्बर्ट बेकर हे तिचे वास्तुकार होत. मुख्य अक्षांच्या दोन्ही बाजूंना असलेल्या सचिवालयाची रचनादेखील त्यांनीच केली आहे व हाच मार्ग पुढे राष्ट्रपतिभवनाकडे जातो. या नगररचनेतील वास्तू अतिभव्य अशा आहेत. त्यांच्या रचनेतील भारतीय आकारांचे वैशिष्ट्य नजरेत भरते. नव्या दिल्लीची रचना म्हणजे ब्रिटिश वास्तुरचनाकाराकरवी भारतीय भूमीवर साकार झालेले एक अतिभव्य स्मारकच आहे. त्यानंतरची भारतातील महत्त्वाची आधुनिक जगप्रसिद्ध नगररचना म्हणजे स्वातंत्र्यानंतर १९५० साली बांधण्यात आलेल्या चंडीगढ शहराची होय. ल कॉर्ब्यूझ्ये या फ्रेंच वास्तुशिल्पज्ञाने येथे नगररचनेचा अत्यंत कल्पकतापूर्ण आणि कलात्मक आविष्कार घडविला आहे. या शहराची रचनाकल्प मानवी देहाकृतीवर आधारलेला आहे. उदा., शिरोभाग म्हणजे जिथून राज्यकारभार चालतो त्या सरकारी कचेऱ्या हृदय म्हणजे व्यापारी बाजारपेठ व लोकवस्तीचा भाग, दोन हातांपैकी


आ. ३. जयपूर : 'प्रस्तर' पद्धतीची नगररचना, अठरावे शतक : (१) झोरावर-सिंग द्वार, (२) गंगा द्वार, (३) नाहगढ किल्ला, (४) राजामल-तलाव, (५) ताल कटोरा, (६) राजवाड्याचे आवार, (७) मोती कटरा-दवाखाना, (८) पुराणा-दवाखाना, (९) सुरज पोळ, (१०) अजमेर द्वार, (११) संगमनेर द्वार, (१२) घाटद्वार.

आ. ४. नवी दिल्ली-अरीय रस्ते : (१) राष्ट्रपतिभवन, (२) लोकसभा, (३) सचिवालय, (४) इंडिया गेट, (५) कॅनॉट सर्कल बाजार, (६) नवी दिल्ली रेल्वे स्थानक, (७) सफदरजंग विमानतळाकडे, (८) पालम विमानतळाकडे, (९) मथुरा रस्ता, (१०) लक्ष्मी नारायण मंदिर, (११) सफदरजंग कबर, (१२) लोदी कबर, (१३) हुमायून कबर, (१४) पुराना किल्ला, (१५) फिरोजशहा कोटला, (१६) राजघाट, (१७) जामा मशीद.


एक हात रेल्वे स्थानकाकडे तर दुसरा रमणीय अशा बगिच्यांकडे जाणारा, पोट म्हणजे वाहतूककेंद्र, तर शहरातील असंख्य रस्ते म्हणजे रक्तवाहिन्या आणि शहराच्या दक्षिणोत्तर जाणारे हिरवेगार भूभागीय पट्टे म्हणजे फुफ्फुसे होत. या नगररचनेचे वैशिष्ट्य म्हणजे आयताकृती पडलेले भाग. प्रत्येक भागात सर्व सुखसोयींची सांगड घातलेली आहे. दळणवळणाची समस्या येथे विविध वाहनांसाठी तसेच पादचाऱ्यांच्या रहदारीसाठी वेगवेगळे असे मार्ग रचून सोडविण्यात आलेली आहे. त्यामुळे सर्व नगररचना म्हणजे चौकड्यांचे एक जाळेच बनले आहे. त्यात हिरवळ असलेली मैदाने, बगिचे, अतिभव्य बांधीव तलाव यांची रचना त्यांच्या महत्त्वसापेक्षतेनुसार करण्यात आली आहे. यातील प्रत्येक वास्तू स्थानिक हवामानास अनुकूल बनविण्यात आली आहे. काँक्रीट हे सर्व वास्तुनिर्मितीतील मुख्य माध्यम आहे. शासकीय वास्तुनिर्मितीतील भव्यपणा व सौंदर्य ह्यांमुळे तिला आंतरराष्ट्रीय ख्याती लाभली आहे. ल कॉर्ब्यूझ्येच्या असामान्य प्रतिमेचे चंडीगढ हे मूर्तिमंत प्रतीक मानता येईल.

आ. ५. चंडीगढ : (१) उद्यान, (२) शासकीय विभाग, (३) तलाव, (४) विद्यापीठ विभाग, (५) मध्यवर्ती व्यापारी व नागरिकसंस्था विभाग, (६) औद्योगिक विभाग, (७) हमरस्ते, (८) विभागी रस्ता, (९) विभागातील फेररस्ता, (१०) वस्तीतील रस्ते, (११) शाळा, (१२) बाजार, (१३) आरोग्य केंद्र, (१४) नागरी वस्ती, (१५) शासकीय विभाग [यातील ७ ते १५ हे आकडे उजव्या बाजूच्या कोपऱ्यात मोठ्या करून दाखविलेल्या २२ क्रमांकाच्या विभागात दाखविले आहेत.]

चंडीगढच्या नगररचनेतील अनेक वैशिष्ट्यांचा प्रभाव उत्तरकालीन अनेक जागतिक वास्तूंमध्ये दिसून येतो. याच सुमारास म्हणजे १९५० मध्ये ब्राझील देशाची ब्राझिलीया ही नवी राजधानी बांधण्यात आली. त्यात दळणवळणाच्या समस्या अत्यंत प्रभावीपणे सोडविण्यात आल्या आहेत. त्यात दोन रस्ते एकमेकांना कधीच ओलांडत नाहीत, तर ते वेगवेगळ्या उंचींवरून एकमेकांना छेदून जातात. त्यामुळे तत्संबंधी अनेक समस्या आपोआप सोडविल्या जातात व अपघात टळतात. याचा रचनाकल्प विमानाच्या आकारावर आधारलेला आहे. ल्युसीओ कॉस्टा आणि ओस्कार निमाइअर ह्या वास्तुविशारदांनी ही नगररचना निर्मिली आहे. यातील वास्तुनिर्मितीदेखील चंडीगढप्रमाणेच भव्य आहे. आकारनिर्मितीत नाविन्य आहे. तथापि या नगररचनेत अनेक नामवंतांच्या मते मानवी मूल्यांचा अभाव आहे. विसाव्या शतकातील या दोन फार महत्त्वाच्या नगररचना होत.

दळणवळण तंत्रातील प्रगती हे आधुनिक नगररचनाशास्त्राचे फार महत्त्वपूर्ण अंग आहे. अमेरिका व जपान येथे मुक्तमार्ग रचनापद्धती अवलंबिण्यात येते व त्यायोगे दळणवळणाच्या समस्या सोडविण्यात येतात. आजच्या नगररचनेत लोकवस्ती व औद्योगिक वसाहती यांचा योग्य संबंध कसा लावता येईल, हा प्रमुख मूलभूत विचार नगररचनाकाराला करावा लागतो आणि त्यानंतर आर्थिक, सामाजिक स्थिती विचारात घ्यावी लागते. कारण त्यामुळे दळणवळणाच्या प्रमुख समस्या उपस्थित होत असतात. जर व्यक्तीच्या सर्व जीवनावश्यक सोयी तिच्या निवासानजीकच पुरविल्या गेल्या, तर अनेक समस्यांचे आपोआपच निराकरण होते, हे तत्त्व आज रूढ झाले आहे व त्यानुसार आजचा प्रत्येक नगररचनाकार त्याचा विचार करतो.


आधुनिक काळात अमेरिका, इंग्लंड व जपान ह्या देशांत अभिनव अशा प्रायोगिक स्वरूपाच्या नगररचना निर्मिल्या जात आहेत. टोकिओ शहराजवळ पाण्यावर एक नगरी वसविण्याचे, तर अमेरिकेत डोंगरावर अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या साहाय्याने एक अद्ययावत नगर उभे करण्याचे प्रयोग चालू आहेत. वैज्ञानिक व तांत्रिक प्रगतीमुळे आधुनिक काळात नगररचनेच्या संकल्पना झपाट्याने बदलत आहेत.

देवभक्त, मा. ग. गटणे, कृ. ब.  इनामदार, श्री. दे.

पहा:  इमारती व घरे उद्याने व उपवने गगनचुंबी इमारती गलिच्छ वस्त्या गृह गृहनिवसन, कामगारांचे जमीन सुधारणा नगरे व महानगरे नागरीकरण नागरी वाहतूक नागरी समाज प्रदूषण रस्ते लोकसंख्या स्थलशिल्प.

संदर्भ : 1. Blumenfeld, Hans, The Modern Metropolis, London, 1968.

            2. Evenson, Norma, Chandigarh, California, 1966.

            3. Gallion, Arthur B. The Urban Pattern, New York, 1962.

            4. Gibberd, Frederick, Town Design, London, 1962.

            5. Gordon, Mitchell, Sick Cities, New York, 1963.

            6. Hall, Peter, The World Cities, London, 1967.

            7. Halprin, Lawrence, Cities, New York, 1963.

            8. Jahne, Johannes Trans. Liebscher, Herbert. Principles and Practice of Planning Villages, Bombay, 1964.

            9. Johnson-Marshall, Percy, Rebuilding Cities, Edinburgh, 1966.

           10. Keeble, Lewis, Principles and Practice of Town and Country Planning, London, 1967.

           11. Lynch, Kevin, The Image of the City, Cambridge, 1962.

           12. Mumford, Lewis, The City in History, London, 1961.

           13. Osborn, F. J. Whittick, Arnold, The New Towns, London, 1963.

           14. Rosenau, Helen, The Ideal City, London, 1959.

           15. Saarinen, Eliel, The City, Cambridge, 1966.

           16. Sastri, K. Vasudeva Gadre, N. B. Viswakarma Vastusastram, Tanjore, 1958.

           17. Sharp, Thomas, Town and Townscape, London, 1968.

           18. Spreiregen, Paul D. Urban Design : The Architecture of Towns and Cities, New York, 1965.

           19. Toy, Sidney, The Fortified Cities of India, London, 1965.

           २०. कोपडेंकर, हे. द. तुमची नगरे, पुणे, १९७६.

           २१. देशमुख, प्र. रा. सिंधु संस्कृति, ऋग्वेद व हिंदु संस्कृति, वाई, १९६६.