बॅरी, चार्ल्स : (२३ मे १७९५–१२ मे १८६०). ब्रिटिश वास्तुशास्त्रज्ञ. लंडन येथे जन्म. पंधराव्या वर्षापासून तो लँबेथ येथील ‘मेसर्स मिडल्टन अँड बेली’ या वास्तुशास्त्रीय संस्थेत काम करू लागला. येथील कामाचा अनुभव त्याला पुढील आयुष्यात उपयोगी पडला. १८१७ ते २० या काळात त्याने ग्रीस, इटली, ईजिप्त व पॅलेस्टाइन येथे प्रवास करून तेथील वास्तुशैलींचा अभ्यास केला व १८२० मध्ये लंडन येथे स्वतंत्र व्यवसायास सुरुवात केली. त्याचा पहिल्या महत्त्वाचा वास्तुकल्प म्हणजे ब्राइटन येथील ‘सेंट पीटर्स चर्च’ (१८२४–२८). इंग्लिश गॉथिक शैलीच्या पुनरुज्जीवनाचे हे एक उल्लेखनीय उदाहरण होय. मँचेस्टर येथील ‘रॉयल इन्स्टिटयूट ऑफ फाइन आर्टस’ (१८२४), लंडनमधील ‘ट्रॅव्हलर्स क्लब’ (१८२९–३१) व इटालियन प्रासादाच्या धर्तीवर बांधलेला ‘रिफॉर्म क्लब’ (१८३७–४१) इ. वास्तुकल्पांद्वारे त्याने इटालियन प्रबोधनकालीन शैलीचे पुनरुज्जीवन केले.

त्याच्या सर्वात प्रसिद्ध ‘हाउसेस ऑफ पार्लमेंट’ या वास्तुकल्पाच्या बांधकामास १८३७ मध्ये सुरुवात झाली. ऑगस्टस वेल्बी पगीन या वास्तुशास्त्रज्ञाने त्यात गॉथिक शैलीतील तपशील प्रत्यक्षात आणण्यास मदत केली. या इमारतीचे मनोरे जगातील उत्कृष्ट मनोऱ्‍यामध्ये गणले जातात. हा वास्तुकल्प बॅरीच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा एडवर्ड बॅरी याने १८६५ मध्ये पूर्ण केला.

१८४१ मध्ये ‘रॉयल अकॅडमी ऑफ आर्ट्स’ या संस्थेचा सदस्य म्हणून त्याची निवड झाली. तसेच ‘रॉयल सोसायटी’चा अधिछात्र म्हणूनही त्याची नेमणूक झाली. हाउसेस ऑफ पार्लमेंटच्या वास्तुकल्पासाठी त्याला ‘नाइट’ हा किताब १८५२ साली बहाल करण्यात आला. लंडन येथे त्याचे निधन झाले. वेस्टमिन्स्टर ॲबेमध्ये त्याचे दफन करण्यात आले.

जगताप, नंदा