सुन्नी पंथ : एक प्राचीन व प्रमुख इस्लामी धर्मपंथ. जगातील बहुसंख्य मुसलमान ह्या पंथाचे आहेत. ‘ सुन्नी ’हा शब्द फार्सी (पर्शियन) भाषेतून आलेला आहे. अरबी भाषेतील ‘अहलेसुन्ना’– म्हणजे योग्य मार्गाचे पालन करणारे लोक–ह्या शब्दाचा समानार्थी शब्द म्हणून फार्सी भाषेत सुन्नी व त्याचे अनेकवचन सुन्नीयान हे शब्द रुढ झाले आहेत. त्यामुळे योग्य मार्गाचा अवलंब करणारे इस्लामचे अनुयायी असा सुन्नी ह्या शब्दाचा अर्थ होतो. इस्लामचे प्रेषित ⇨मुहंमद पैगंबर  ह्यांच्या परंपरा, कुराणा तील तत्त्वे व पैगंबरांची वचने किंवा सुन्नाह पाळणारे ते सुन्नी, असाही अर्थ सांगितला जातो.

प्रेषित मुहंमदांच्या महानिर्वाणानंतर त्यांच्या उत्तराधिकाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळी प्रेषितांचा उत्तराधिकारी (खलीफा) हा वंश-परंपरेने नव्हे, तर योग्यता आणि कार्यक्षमता ह्या निकषांवर मुस्लिम जमातीने निवडावा, असा आग्रह ज्यांनी धरला ते सर्वसाधारणपणे सुन्नी मुसलमान म्हणून ओळखले जातात. प्रेषितांचे पहिले चार उत्तराधिकारी ⇨अबू बकर,   ⇨उमर, ⇨उस्मान आणि ⇨अली   हे योग्यता आणि कर्तृत्व ह्या निकषांवर निवडले गेले. सुन्नी मुसलमान ह्या चारही उत्तराधिकाऱ्यांना वैध मानतात. खलीफापद हे ईश्वरदत्त वंशपरंपरेने प्रेषितांच्या कुटुंबियांत आणि प्रेषित इब्राहम यांच्या वंशजांतच असू शकते, असा ज्यांनी दावा केला ते शिया पंथीय होत. शिया व सुन्नी हे भेद प्रेषितांच्या उत्तराधिकाऱ्याच्या प्रश्नाशी जोडले गेल्याचे बहुसंख्य यूरोपीय प्राच्यविद्यापंडितांनी मानले असले, तरी सईद हुसेन नासर यांच्यासारख्या इस्लामी पंडिताच्या मते शिया आणि सुन्नी ह्यांच्यातील वादाचे स्वरूप धार्मिक आणि ईश्वरविद्येच्या शास्त्रातील मतभेदांच्या स्वरूपाचे आहे. सुन्नी मुसलमान असे मानतात, की खलीफा हा फक्त ⇨शरीयत प्रणीत इस्लामी जीवनपद्घतीचा संरक्षक असतो. शरीयतप्रणीत कायद्याची अंमलबजावणी करणारा तो अधिकारी असतो. कालांतराने खिलाफतीची सत्ता आणि महत्त्व कमी झाले आणि शरीयतच्या अंमलबजावणीच्या यंत्रणेत खलीफा, सुलतान, ईश्वरी कायदा आणि नंतर उलेमा ह्यांचा समावेश झालेला दिसून येतो. शिया मुसलमान मात्र खलीफाला धार्मिक बाबतींतही उत्तराधिकारी मानतात. प्रेषित मुहंमद हे शेवटचे प्रेषित असून त्यांच्यानंतर कोणताही प्रेषित येणार नाही असे सुन्नी पंथीय मानतात मात्र शिया ते नाकारतात. सुन्नी मुसलमान असे मानतात, की जगातील सर्व मुसलमान एका उम्माचे (जागतिक-धार्मिक समाज) सभासद असतात. मात्र सुन्नी व शिया हे इस्लामच्या सर्व पायाभूत तत्त्वांना मानणारे आहेत. ते सनातन इस्लामचे प्रतिपादक आहेत. नमाज, उपवास, हाज यात्रा, जकात इत्यादींबाबत त्यांच्यात मतभेद नाहीत.

पहा : इस्लाम धर्म इस्लामी धर्मपंथ शिया पंथ.

संदर्भ : 1. Gibbs , H. A. R. Studies on the Civilisation of Islam, 1962 .

    2. Hughes, Tomas Patric, Dictionary of Islam, New Delhi, 1992.

 

 

    3. Inayat, Hamid, Modern Islamic Political Thought, London, 1982.

    4. Nasser, Said Hussein, Ideals and Realities of Islam, 1966.

 

बेन्नूर, फकरुद्दीन