ब्रह्मविहार : एक बौद्ध संकल्पना. ब्रह्मविहार ही संज्ञा बौद्धांनी काही विशिष्ट प्रकारच्या समाधि भावनांना दिली आहे. ज्या समाधि भावनेत योगाचाऱ्यांच्या अंतःकरणांत सर्व सत्त्वांच्या बद्दल मैत्री, करुणा, मुदिता व उपेक्षा ह्या संवेदना क्रमाक्रमाने उत्पन्न होतात त्या समाधि भावनेला ही संज्ञा त्यांनी दिली आहे. उदा., एखाद्या योगाचाऱ्याने आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबद्दल कोणत्याही प्रकारचा वैरभाव न धरता मैत्रीची भावना बाळगावी. त्याचे कल्याण व्हावे हाच विचार सदोदित बाळगावा. पुढे तो आजारी पडला किंवा त्याला विपत्काल आला, तर त्याच्याबद्दल मनात करुणा उत्पन्न होऊन त्याला मदतीचा हात पुढे करावा. पुढे त्याची परिस्थिती सुधारून त्याला चांगले दिवस आले असताना त्यात आनंद मानावा व त्याच्याही पुढे तो उत्कर्षाप्रत पोहोचला असताना आता तो स्वावलंबी व कोणाच्याही मदतीची अपेक्षा न करणारा हे जाणून, त्याच्याबद्दल विशेष आपंगिता न दाखविता आता त्याचे ठीक चालले आहे हे जाणून त्याबद्दल उपेक्षा वृत्ती बाळगावी. ह्या भावना जशा एका व्यक्तीबद्दल, तशा सर्व व्यक्तींबद्दल, गाव, राष्ट्र, एक दिशा, अनेक दिशांतील सर्व प्राण्यांबद्दल असू शकतात आणि असे झाले म्हणजे त्याला ब्रह्मविहार प्राप्त झाला, असे म्हणतात. अशी स्थिती प्राप्त झाली म्हणजे ब्रह्मदेवाशी सहव्यता प्राप्त झाली, असे दीघनिकायातील तेराव्या ‘तेविज्य सुत्ता’त सांगितले आहे.

  

पहा : बौद्ध धर्म

बापट, पु. वि.