संस्कार : एक मूल्यवर्धक प्रक्रिया. ‘संस्कार’ व ‘संस्कृती’ हे शब्द सम्यक्त्वदर्शक ‘सम्’ हा उपसर्ग आणि ‘कृ’ हा धातू यांच्यापासून बनले आहेत. ‘सम् +कृ’ चा व्युत्पत्त्यर्थ ‘चांगले रूप देणे’, ‘शुद्ध करणे’, ‘सुंदर करणे’, ‘पवित्र करणे’ असा बहुविध आहे. मनुष्य, मनुष्येतर प्राणी, वनस्पती आणि निर्जीव वस्तू यांचा मूळ स्वभाव म्हणजे प्रकृती. तिच्यात होणारा बिघाड म्हणजे विकृती आणि ज्या क्रिया-प्रक्रियांद्वारा मूळ स्वभावात बिघाड होऊ न देता, उलट चांगले रूप दिले जाते, त्यांना ‘संस्कार’ म्हणतात व त्या वस्तूला ‘सुसंस्कृत’ किंवा ‘सुसंस्कारित’ म्हणतात. लाकूड, पाषाण, धातू इ. संस्कार्य वस्तू कापणे, ठोकणे, तापविणे, घासणे, कोरणे इ. स्थूल भौतिक क्रिया-प्रक्रिया-संस्कार करून, त्यांना सुबक आकार देऊन त्यातून शिल्प, अलंकार, उपयुक्त वस्तू व उपकरणे, शोभेच्या वस्तू बनविल्या जातात. अशा वस्तू आता केवळ प्राकृतिक न राहता, त्या सांस्कृतिक विश्वाचा भाग बनतात ती संस्कृतीची प्रतीके बनतात. उदा., भगवा, पांढरा व हिरवा या तीन रंगांच्या समांतर पट्ट्या आणि त्यांमध्ये अशोकचक्र असा रंगवलेला कापडाचा तुकडा आता केवळ कापडाचा तुकडा न राहता भारताचा पवित्र राष्ट्रध्वज बनतो. वनस्पती, प्राणी यांच्यावर जैविक पातळीवर सूक्ष्म संस्कार करून त्यांच्यावर सांस्कृतिक लेणे चढविले जाते. उदा., झाडांचे बोन्साय, गुन्हे-अन्वेषण खात्यातील श्वानपथक किंवा सर्कशीत काम करणारे वन्यप्राणी. माणसावरील संस्कारांना सूक्ष्म मानसिक परिमाण लाभते. शारीरिक व्यायाम, कसरत इत्यादींद्वारा शरीरसौष्ठव, वस्त्र व अलंकारांनी सभ्यता आणि सौंदर्य जोपासले जाते. वासना, प्रवृत्ती, नैसर्गिक आवड-निवड यांना भाषा-साहित्य, कला, कायदा, नीती, धर्म इ. संस्कारांद्वारा ‘ चांगले वळण ’ लावले जाते माणसात सद्भिरूची निर्माण केली जाते विवेकजागृती केली जाते. अशा तऱ्हेने संस्कृती व सभ्यतेच्या विविध अंगांशी निगडित विविध प्रकारचे संस्कार असतात. संस्कार आणि संस्कृती या दोन संकल्पना समकक्ष आहेत. संस्कारांमध्ये धार्मिक संस्कारांना अनन्यसाधारण महत्त्व दिले जात असले, तरी संस्कार ही संकल्पना धार्मिक संस्कारांपुरतीच मर्यादित केल्यास ‘ संस्कार ’ शब्दाचा अर्थसंकोच होतो.

माणूस हा बुद्धीशाली प्राणी असल्यामुळे ज्ञानार्जन ही बौद्धीक गरज आहे. परंतु विचारसंक्रमण किंवा ज्ञानदान ही बौद्धीक-वैचारिक प्रक्रिया आणि संस्कारप्रक्रिया यांत गुणात्मक भेद आहे. शास्त्रज्ञान प्राप्त झालेली व्यक्ती ज्ञानी, विद्वान किंवा पंडित होते. तंत्रज्ञान व विविध कौशल्ये आत्मसात केलेली व्यक्ती निष्णात, कुशल तंत्रविशारद होते. परंतु धार्मिक, नैतिक, साहित्यिक, सौंदर्यात्मक किंवा कलात्मक संस्कारांतून माणसाच्या वृत्तीला वळण लागते. व्यक्ती सत्प्रवृत्त, सुसंस्कृत, सूज्ञ होते. तिच्यात सद्‌भिरूची निर्माण होते. ती सुजाण नागरिक होते.

मानवी बालक एक प्राणी म्हणून जन्मते आणि त्याच्यावर होणाऱ्या अनेकविध संस्कारांतून त्याचा ‘सांस्कृतिक जन्म ’ होतो. या अर्थाने सर्व मानव ‘ द्विज ’ आहेत. त्यांना एक जैविक आणि दुसरा सांस्कृतिक असे दोन जन्म असतात. “जन्मना जायते शूद्र: संस्कारात् द्विज उच्यते “ या वचनाचा असा व्यापक, सर्वसमावेशक अर्थ लावल्यास मानवी जीवनात संस्कारांचे स्थान किती अद्वितीय आहे हे ध्यानात येते. संस्कारहीन, संस्कारशून्य व्यक्ती हा द्विपाद मानव प्राणी राहतो. तिचे व्यक्तित्व संस्कारजन्य असते. परंतु विशिष्ट सांप्रदायिक, पंथीय बाह्य विधींना अवाजवी महत्त्व दिल्यास, त्यातून व्यक्तीचा सांस्कृतिक विकास न होता, उलट तिच्या व्यक्तित्वाचा संकोच होतो. ती ‘ संस्कारबद्ध ’, ‘ संस्कारबंदिस्त ’ होते. व्यक्तित्व संकुचित, बंदिस्त व असहिष्णू होणे हा सांस्कृतिक विविधतेला धोका ठरतो. प्रत्येक संस्थात्मक धर्माने किंवा सर्व संस्थात्मक धर्मांनी बाह्य धार्मिक विधींचे पालन करीत असताना त्यांच्या मागची पावित्र्य, संयम, त्याग, निरहंकारता, शांती इ. आध्यात्मिक सद्‌गुण किंवा दैवी संपत्ती यांच्या आंतरिक विकासाविषयी अत्यंत जागरूक राहण्याची आवश्यकता आहे.

अंतरकर, शि. स.

संस्कार हे वर म्हटल्याप्रमाणे अनेकविध असले, तरी संस्कारांचे महत्त्व त्या त्या धार्मिक समाजांत विशेष मानले जाते आणि त्या दृष्टीने धर्माचे म्हणून काही विशिष्ट संस्कार परंपरेने मानलेले असतात. एखादया विशिष्ट धर्मात जन्मलेल्या व्यक्तीवर त्या धर्मातील विहित संस्कार झाल्यास, आपण त्या धर्माचे असल्याच्या त्या व्यक्तीच्या भावनेचे दृढीकरण होते. त्याचप्रमाणे ते संस्कार झालेली व्यक्ती म्हणून तिला त्या धर्माचे सुपात्र सदस्य मानले जाते. प्रत्येक धर्मातील संस्कार हे त्या धर्माच्या ऐहिक-पारलौकिक कल्याणाच्या कल्पनांशी निगडित असतात आणि या दृष्टीनेही त्या धर्माच्या व्यक्तींवर ते ते संस्कार होणे आवश्यक मानले जाते. शुभ आणि अशुभ अशा शक्तींचा जगात संचार असतो, अशी समजूत अनेक समाजांत असते. धार्मिक संस्कारांमुळे अशुभ शक्तींना प्रतिकार होतो आणि शुभ शक्ती आकर्षित केल्या जातात, अशी श्रद्धा असते. प्रत्येक संस्काराचे काही कर्मकांडही असते. हिंदू धर्मातील संस्कार तिथी, नक्षत्र, ग्रहांची अनुकूलता पाहून केले जातात अग्नी, प्रार्थना, अभिषेक, गुरूजनांचा आशीर्वाद, दिशांचे शुभाशुभत्व ह्यांनाही महत्त्व दिले जाते. हिंदू धर्मातील संस्कारांची संख्या निरनिराळ्या ग्रंथांत निरनिराळी दिलेली आहे. उदा., गौतम धर्मसूत्रा त ४० संस्कार आणि ८ आत्मगुण सांगितले आहेत (दया, क्षमा, निर्मत्सर वृत्ती, अंतर्बाह्य शुचिर्भूत असणे, क्षुद्र कामासाठी शरीर न कष्टवणे, सदैव उत्साही व आनंदी असणे, कृपणपणा नसणे आणि दुसऱ्याच्या वस्तूची अभिलाषा न करणे, हे ते आत्मगुण होत) आणि गृह्यसूत्रा त व वेदन्यास स्मृती त नामकरण, उपनयन, विवाह आदी १६ संस्कार सांगितले आहेत. गृह्यसूत्रातील विधी वेदकाळात संस्कृतीचीच चालत आलेली परंपरा दर्शित करतात. उपनयन, विवाह, गर्भाधान, जातकर्म, नामकर्म, अन्नप्राशन इ. संस्कार जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगांशी किंवा परिवर्तनाशी संबद्ध आहेत.

हिंदू धर्मातील काही महत्त्वाच्या संस्कारांत विवाह, ⇨ गर्भाधान संस्कार,बारसे,उपनयन ह्यांचा अंतर्भाव होतो. तद्वतच क्रिस्ती धर्मीयांत ⇨ बाप्तिस्मा हा अत्यंत महत्त्वाचा विधी असून तो झाल्यावरच व्यक्ती खऱ्या अर्थाने क्रिस्ती धर्माची अनुयायी होते. ⇨ नवजोत हा पारशांमधील महत्त्वाचा उपनयन संस्कार आहे. तो मुलांप्रमाणे मुलींवरही केला जातो. ह्या संस्कारानंतरच अवेस्ताप्रणीत सर्व धर्मविधींचे आचरण करण्यास पारशी व्यक्ती पात्र होते. इस्लामच्या धार्मिक आचारांतून सुपात्र मुसलमान व्यक्ती घडविणे, हाच हेतू प्रकट होतो. उदा., रोज पाच वेळा नमाज पढणे, दर शुक्रवारी मशिदीतील सार्वजनिक प्रार्थनेच्या वेळी उपस्थित राहणे, ६ ते ८ वर्षांपर्यंतच्या मुलांची सुंता करणे, रमझान महिन्यातले उपास (रोझे) करणे इत्यादी.

कुलकर्णी, अ. र.