जकात–१ : इस्लाममधील एक अनिवार्य धार्मिक कर किंवा दान. मदीनेत मुहंमद पैगंबरांचे राज्य स्थापन झाल्यानंतर हा कर सरकारतर्फे वसूल केला जाऊ लागला. मक्केहून मदीनेस आलेल्या निर्वासितांच्या पुनर्वसनासाठी सुरुवातीस ह्या जकातीचा विनियोग केला जात असे. नंतर गरीब व गरजू लोकांच्या मदतीसाठी तिचा उपयोग होऊ लागला. अबू बकर ह्या पहिल्या खलीफाने शेती, बागायती उत्पन्न, पशुधन, व्यापाराच्या वस्तू, इतर संपत्ती या सर्वांवर जकात बसविण्यास सुरुवात केली. पावसावर अवलंबून असलेल्या शेतीच्या उत्पन्नावर १० टक्के, कृत्रिम पाणी पुरवठ्यावर अवलंबून असलेल्या शेतमालावर ५ टक्के आणि इतर प्रकारच्या वार्षिक उत्पन्नावर २ ½ टक्के या दराने ही जकात आकारणी होत असे. जकातीचा एक अष्टमांश वाटा ती वसूल करणाऱ्यास मिळत असे.

‘जकात’ या शब्दाचा मूळ अर्थ शुद्धी असा होता. धर्माज्ञेप्रमाणे दान करून किंवा कर भरून उरलेल्या संपत्तीची शुद्धी होते, अशी यामागील कल्पना आहे. म्हणूनच मुस्लिम राजसत्ता नसली, तरी धार्मिक प्रवृत्तीचे मुसलमान स्वखुशीने जकातीच्या दराइतके दान गोरगरिबांना देतात. 

करंदीकर, म. अ.