वास्तुपूजा : वास्तूची पूजा ही वेगवेगळ्या कारणांसाठी केली जाते. उदा., नवीन बांधलेल्या घरात प्रवेश करताना करावयाची वास्तुशांती अग्निहोत्र्याने दुसऱ्या घरात जाण्यापूर्वी पहिले घर सोडताना करावयाचे वास्तुशमनकर्म आणि घरात समृद्धी नांदावी, म्हणून करावयाचा गृहशांती नावाचा विधी. नवीन घर बांधण्याच्या संदर्भांतले अनेक नियम वेगवेगळ्या गृह्यसूत्रांत आढळतात. घर जिच्यावर बांधावयाचे, ती भूमी कशी असावी घरासाठी माती कोणत्या रंगाची वापरवी यांसारखे तपशीलही गृह्यसूत्रांत आढळतात. घराच्या संदर्भात वेगवेगळ्या पाच प्रसंगी वास्तुयज्ञ करावा लागतो, असे मत्स्यपुराणात सांगितले आहे (२५६.१०/११). हे पाच प्रसंग असेः (१) घराची पायाभरणी किंवा आखणी करताना, (२) घराचा पहिला खांब उभारताना, (३) घराचा पहिला दरवाजा उभा करताना, (४) घरात प्रवेश करताना, (५) घराबाबत काही अरिष्ट किंवा अशुभ लक्षणे दिसून आल्यास त्यांचे निरसन करण्यासाठी.

एखादा शुभ दिवस आणि शुभ मुहूर्त पाहून विविध रत्नांच्या आणि सर्व प्रकारच्या बीजांच्या वर घराच्या पायाची शिला बसवावी. घराच्या पहिल्या खांबाची ब्राह्मणांकडून पूजा करवावी. तसेच त्या खांबाला स्नान घालून वस्त्रे व अलंकार यांनी भूषित केल्यानंतर तो उभा करावा. या प्रसंगी मध आणि तूप होमावे आणि ब्राह्मणांना दूध-भाताचे जेवण द्यावे. पायाची शिला ईशान्य कोपऱ्यावर असावी आणि घराचा खांब आग्नेय दिशेला उभा करावा, असेही सांगितले आहे.

नवीन बांधलेल्या घरात प्रवेश करताना गृहप्रवेशविधी नावाचा एक विधी सुमुहूर्त पाहून केला जातो. घरात प्रवेश करण्याच्या दिवशी किंवा आदल्या दिवशी वास्तुशांतीचा विधी केला जातो. वास्तुशांतीत ग्रहांना आवाहन केले जाते. तसेच त्यांचे पूजन केले जाते. ह्या विधीस ‘ग्रहमख’ म्हणतात. वास्तुशांतीच्या विधीत संकल्प, पुण्याहवाचन वगैरे झाल्यानंतर आचार्यवरण करून त्याच्या द्वारे विधीशी संबंधित अशी कृत्ये केली जातात. ती अशी :  विधीसाठी दोन चौकोनी वेदी तयार केल्या जातात. उत्तरवेदीच्या चार कोपऱ्यांवर लोखंडी खिळे ठोकतात व त्यांच्या जवळ भाताचा बळी ठेवतात. ह्या सर्व रचनेस वास्तुमंडल म्हटले जाते. त्यानंतर अग्नीची विधियुक्त स्थापना केली जाते. वेदीवर ४५ देवतांचे आवाहन केले जाते. त्यांत पर्जन्य, जयंत, शिखी ह्यांसारख्या देवतांचा अंतर्भाव असतो. वास्तुमंडलाच्या मध्यभागी वास्तुपुरुषाची सोन्याने घडविलेली प्रतिमा ठेवली जाते. वास्तुदेवता हा एक पुरुष समजून त्याच्या विविध अवयवांच्या जागी देवतांची स्थापना करतात. त्यांतील वास्तोष्पती ह्या प्रमुख देवतेस १०८ आहुती देतात. या आहुतींमध्ये उंबराच्या समिधा, तीळ, पायस आणि आज्य ह्यांचा समावेश असतो. तसेच वास्तोष्पतिसूक्त म्हणून ह्या देवतेला बिल्वफळांच्या किंवा बिल्वबीजांच्या आहुतीही देतात.

होमविधी झाल्यानंतर सर्व देवतांना चरूचा (भाताचा) बळी अर्पण करतात. घराचे मालक सपत्नीक स्नान करून नवीन वस्त्रे परिधान करतात. ऋत्विज व इतर कुटुंबीय त्यांच्यावर अभिषेक करतात. नंतर ‘राक्षोघ्न’ व ‘पवमान’ ही सूक्ते म्हणून तिहेरी सुताचे फेरे नवीन घराभोवती गुंडाळत असताना घराचे मालक आपल्या पत्नीसह दूध व पाणी यांची अखंड धार धरून घराभोवती प्रदक्षिणा घालतात. घराच्या आग्नेय कोपऱ्यात एक खड्डा खणतात. भाजलेल्या मातीच्या पेटीत सात प्रकारची धान्ये, फुले, शेवाळ इ. वस्तू घालून तिच्यात वास्तुपुरुषाची प्रतिमा ठेवतात. ती पेटी त्या खड्ड्यात ठेवून घराचे मालक नवीन घरामध्ये सुख-समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून वास्तुपुरुषाची पूजा करतात. खड्डा मातीने भरून टाकतात. त्यानंतर निश्चित शुभमुहूर्तावर घराचा मालक आपले कुटुंब व ब्राह्मण यांच्यासह नव्या घरात प्रवेश करतो. ह्या वेळी मंगलवाद्ये वाजविली जातात. घराच्या मालकाच्या हातात पाण्याने भरलेला एक कलश असतो. तो कलश धान्याच्या राशीवर ठेवल्यानंतर गणपतीची पूजा व पुण्याहवाचन केले जाते. ब्राह्मणांनी आशीर्वाद दिल्यानंतर ब्राह्मणांना व इष्टमित्रांना भोजन दिले जाते.

आपल्या घरात समृद्धी नांदावी म्हणून गृहशांती नावाचा अन्य एक विधी तर प्रत्येक महिन्यात, प्रत्येक ऋतूत किंवा प्रतिवर्षी शुक्ल पक्षात एखाद्या शुभ नक्षत्रावर करावा असे बौधायन गृह्यशेषसूत्रात सांगितले आहे (१.१८). आश्वालायन गृह्यसूत्रात ह्या विधीचे वर्णन आले आहे. ह्या विधीचे प्रमुख तपशील असेः  तांदूळ आणि यव ह्यांचे उदकात मिश्रण करून नंतर त्या उदकात सुवर्ण टाकावे. त्यानंतर ते उदक घरावर शिंपडावे. त्या उदकाची अखंड धार धरून घराभोवती तीन प्रदक्षिणा घालाव्यात. घरात शिजविलेल्या भाताच्या आहुती अग्नीस अर्पण कराव्यात. भाताचे भोजन ब्राह्मणांना द्यावे आणि ही वास्तू शुभ आहे असे त्यांच्याकडून वदवून घ्यावे.

संदर्भ :  काणे, पां. वा. अनु., भट, य. आ. धर्मशास्त्राचा इतिहास – पूर्वार्ध, मुंबई, १९६७ उत्तरार्ध, मुंबई, १९७०.

पोळ, मनीषा