मरणोत्तरस्थितिविज्ञान : (एस्कटॉलॉजी). प्राण्यांच्या व विशेषत: माणसांच्या मृत्यूनंतर त्यांना प्राप्त होणार्‍या तथाकथित स्थितीचे धार्मिक श्रद्धेतून विवेचन करणारी एक ज्ञानशाखा. मृत्यूनंतर नेमके काय घडते याचा प्रत्यक्ष अनुभव तर जिवंत व्यक्तींना मिळत नाही आणि काय घडते ते जाणण्याचे विलक्षण कुतूहल तर असते. शिवाय, मानवाचे आपल्या जीवनावर आत्यंतिक प्रेम असते आणि त्यामुळे मृत्यूबरोबर आपले अस्तित्व पुर्णपणे नष्ट होण्याची कल्पना त्याला असह्या वाटते. स्वाभाविकच, अस्तित्व मृत्यूनंतरही कोणत्या ना कोणत्या स्वरूपात टिकून राहते, अशा भावनामूलक कल्पना तो करत असतो. अशा रीतीने कुतूहल, स्वप्नाळू वृत्ती वगैरेंमधून मरणोत्तरस्थितीविषयीच्या धार्मिक संकल्पना, पुराणकथा तत्वज्ञाने इत्यादींची निर्मिती होते. चार्वाकांसारख्या काही भौतिकवाद्यांचा अपवाद वगळता प्राचीन काळातील सर्व संस्कृतींमधील लोकांचा कोणत्या ना कोणत्या स्वरूपातील मरणोत्तरजीवनावर विश्वास होता व अजूनही असंख्य लोकांचा आहे असे दिसून येते. भौतिकवाद्यांच्या मते मृत्यूनंतर जीवनाची स्थिती अमावात्मक असते. असे असले, तरी त्यांच्या या विषयावरील विचारांचा लक्षणेने का होईना या ज्ञानशाखेमध्ये अंतर्भाव होतोच. हे विज्ञान वैयक्तिक व सामुदायिक अशा दोन्ही द्दष्टीकोणांतून विचार करीत असते. व्यक्तीच्या मृत्यूनंतर तिला कोणती गती प्राप्त होते, या विचाराबरोबरच ⇨प्रलय वगैरे मार्गानी प्राण्यांसह सर्व विश्वाचा नाश झाल्यावर त्या प्राण्यांना कोणती गती प्राप्त होते, वगैरेंसारखा विचारही या विज्ञानात आढळतो.

चांगले कर्म केले असता चांगले फळ मिळते आणि वाईट कर्म केले असता वाईट फळ मिळते, असे माणसाला वाटत असते. कारण, तसे होणे हे त्याच्या नैतिक जाणिवेशी सुसंगत असते. कित्येकदा वर्तमान जीवनामध्ये केलेले कर्म आणि मिळालेले फळ यांचा मेळ बसतनाही असे दिसते. मग अशा विसंगतीचे स्पष्टीकरण करावे लागते आणि त्यासाठी मरणोत्तरजीवनाची कल्पना केली जाते. या जन्मात कर्मांचे फळ मिळाले नसले तरी नंतरच्या जीवनात योग्य ते फळ मिळते, असे मानून कर्म व फळ यांचा मेळ घातला जातो.अशा रीतीने सामान्यत: मरणोत्तरजीवनाची कल्पना नैतिक जाणिवेशी जोडलेली आढळते. काही लोकांना मात्र ती तशी न जोडता काही वेगळ मांडणी केल्याचेही आढळते.

मरणोत्तरस्थितिविज्ञानाचा धर्मशास्त्र, तत्वज्ञान वगैरे क्षेत्रांतील विविध संकल्पनांशी अत्यंत निकटचा संबंध आहे. ⇨पाप –पुण्य, कर्मसिद्धांत, ⇨स्वर्ग व नरक, पितृलोक व अशाच प्रकारचे इतर परलोक, ⇨पुनर्जन्म, ⇨ मोक्ष, अंतिम निवाडा, अंत्यसंस्कार [ अंत्यविधि व अंत्यसंस्कार], श्राद्धादी कर्मकांडे, ⇨पितृपूजा,

मृतांबरोबर विविध वस्तू पुरण्याच्या आणि तशाच प्रकारच्या अन्य रूढी, ⇨भृतपिशाचादींची योनी इ. संकल्पना ह्या त्यांपैकीच होत [“कर्मकांड श्राद्धविधि]. धार्मिक वृत्तीची माणसे इहलोकीच्या जीवनापेक्षा मरणोत्तरजीवनाचाच अधिक विचार करीत असतात, असे दिसते.

हिंदू धर्मामध्ये मरणोत्तरजीवनाच्या संकल्पना एकजिन्सी नाहीत. ⇨हिंदू धर्मामद्ये विविध आणि प्रसंगी परस्परविरूद्ध असे सांस्कृतिक घटक एकमेकांत मिसळले, मरणोत्तरजीवनाविषयी अनेक कलप्ना आढळतात. उदा., मृताला पुनर्जन्म आहे असेही मानले जाते आणि मृत व्यक्ती पितर बनून पितृलोकात रहात असल्यामुळे श्राद्धादी मार्गानी तिला तुप्त आवश्यक आहे, असेही मानले जाते. कर्म सिद्धांत हे हिंदू धर्माचे एक महत्वाचे वैशिष्टय होय. मनुष्य जे कर्म करतो, त्या कर्माचे फळ त्याला केव्हा ना केव्हा भोगावे लागतेच. ते फळ भोगण्यासाठी तो संसाराच्या म्हणजेच जन्ममरणाच्या फेर्‍यात फिरत राहतो. प्राणिमात्रांच्या ८४ लक्ष योनी असून कर्माला अनुसरून प्राणी विविध योनींतून जन्म घेतात. कर्माला अनुसरून विविध फळे भोगण्यासाठी स्वर्ग, नरक, पितृलोक वगैरे ठिकाणीही जातात. मृत्यूनंतर देवयान व पितृयाण किंवा अधोगमन (नरक तसेच मनुष्यपेक्षा खालच्या प्राणिजातीत व वनस्पतिसृष्टीत जन्म पावणे) या मार्गापैकी कोणत्या तरी एका मार्गाने जावे लागते. मृत्यूनंतर भूतपिशाच वगैरेंची योनीही प्राप्त होऊ शकते. ज्ञान, कर्म, भक्ती वगैरे मार्गानी ब्रह्या, ईश्वर वगैरेंची प्राप्ती झाली असता मोक्ष मिळतो व पुन्हा जन्ममरणाच्या फेर्‍यात कधीही जावे लागत नाही. मोक्ष हेच मानवाचे सर्वश्रेष्ठ ध्येय होय. हिंदू धर्मातील मरणोत्तरस्थितीविषयांचे विचार स्थूलमानाने हे असे आहेत. तपशिलातील भेद मात्र अक्षरश: अगणित  अ हेत. बौद्ध आणि जैन धर्मानीही कर्मसिद्धांत मानलेला असून निर्वाणाची प्राप्ती झाली असता, जन्ममरणाच्या फेर्‍यातून सुटका होते. असे मानले आहे. अर्थात ही सर्व प्रक्रिया दर्शविणारे बौद्धांचे आणि जैनाचे सिद्धांत वेगवेगळे आहेत.[⟶ कर्मयाग, कर्मवाद, जैन धर्म, बौद्ध धर्म].

हिंदू बौद्ध व जैन धर्मात ज्याप्रमाणे कर्मसिद्धांत व त्या अनुषंगाने पुनर्जन्म, मोक्ष  वगैरे संकल्पना आल्या आहेत, त्याप्रमाणे ⇨ज्यू, ⇨ख्रिस्ती व ⇨इस्लाम धर्मात अंतिम ⇨निवाड्याच्या दिवसाची संकल्पना आढळते. ही संकल्पना मूळची ⇨पारशी धर्मातील असावी, असे अभ्यासकांचे मत आहे. पारशी धर्मानुसार चांगले कर्म करणारास मृत्यूनंतर स्वर्ग व वाईट कर्म करणारास नरक, अशी फळे ईश्वराकडून मिळतात, ज्यू धर्मानुसार ⇨येहोवा हा परमेश्वर जगाच्या अंतसमयी भल्याबुर्‍याचा निवाडा करून लोकांना पुढची गती देणार आहे अशी कल्पना आढळते पण ती नंतरची (इ. स. पू. ५३८ नंतरची) आहे. ख्रिस्ती धर्मानुसार ख्रिस्ती वा ईश्वर अशा प्रकारचा निवाडा करेल. इस्लाम धर्मानुसारही जगाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे कियामतीच्या दिवशी सर्व मृतांच्या आत्म्यांचा निवाडा होऊन त्यांना त्यांच्या पाप-पुन्यानुसार गती दिली जाणार आहे.

जगाच्या कानाकोपर्‍यातील आदिवासी लोकांनीही मरणोत्तरस्थितीविषयी विविध संकल्पना मांडल्या आहेत. मानवी जीवनात एके काळी मृत्यू  नव्हता, या विचारापासून मनुष्य मृत्यूला जिंकू शकतो, या विचारापर्यतच्या विविध कल्पना जगभर आढळतात.

मृत्यू कसा आला, यावरूनही अनेकदा पुडची गती ठरविली जाते. उदा., अपघाती मृत्यू असल्यास विशिष्ट प्रकारची भूतयोनी प्राप्त होते, युद्धांत लढत असताना मृत्यू आल्यास स्वर्ग मिळतो. इत्यादी. मरणसमयी मनात कोणते विचार येतात, त्यावरूनही गती ठरविली जाते. पुत्र आहे की नाही, वंशज श्राद्ध वगैरे करतात की नाही, यांसारख्या गोष्टींवरूनही मृत्यूनंतरची गती ठरत असते. मृत्यूनंतर माणूस आकाशातील तारा बनतो, अशी श्रद्धा अनेक समाजांतून आढळते.

एकंदरीत वर्तमान जीवन हे परिपुर्ण आहे, असे माणसाला वाटतनाही तसेच मॉत्यूने होणारा नाश हा समग्र व अंतिम आहे, असे मान। वयासही त्याचे मन तयार नसते. त्यामुळे तो मरणोत्तरस्थितीविषयीच्या विविध धारणा मनातबाळगत असतो.

संदर्भ : 1. Brandon, S. G. F. The Judgement of the Dead London, 1967

            2. Bultmann, Rudolf, History and Eschotology. New York, 1962.

            3. Charles, R. H. A. Critical Hisstory of the Doctrine of a Future Life in brael. In Judasm and in Chrlstianlty, 1913.

            4. Davies, W. D. The Background of the new Testament and Its Eschatology, Cambridge 1953.

            5. Moltmann, J. Trans. Theology of Hope, New York, 1967.

साळुंखे, आ. ह.