ताओ मत : (दाव् मत). ‘दाव्–ज्याव्’ या चिनी भाषेतील शब्दांचा मूळ अर्थ ‘दाव् धर्म’ असा आहे. ‘ताओइझम’ हा इंग्रजीत रूढ झालेला शब्द दिशाभूल करणारा आहे. त्याच्यामुळे मुख्यतः पाश्चात्त्य अभ्यासकांच्या मनात दाव् तत्त्वज्ञान आणि दाव् धर्म या दोहोंमध्ये अर्थाचा घोटाळा निर्माण होतो. दाव् तत्त्वज्ञानाचा संस्थापक ⇨ लाव् ज  (आचार्य लाव्‌, इ. स. पू. सु. ६०४–सु. ५३१) यालाच ते दाव् धर्माचाही प्रवर्तक समजतात. ही चूक गंभीर आहे.

वास्तविक पाहता, दाव् धर्म आणि दाव् तत्त्वसंप्रदाय हे निरनिराळे आहेत, एवढेच नव्हे, तर ते एकमेकांच्या विरोधीही आहेत. उदा., दाव् धर्मात स्वर्गात व पृथ्वीवर राहणाऱ्या अनेक छोट्यामोठ्या देवांची व अद्‌भुत शक्तींची पूजा करतात तर दाव् तत्त्वसंप्रदायाचा प्रवर्तक लाव् ज अशा उपासनेच्या अगदी विरुद्ध होता. तो म्हणतो, ‘वास्तविक स्वर्ग किंवा पृथ्वी कोणीच दयाळू नाही. कारण ते प्राणिमात्रांना मूर्ख बनवितात व आपसांत झगडा करावयास लावून त्यांचा नाश होऊ देतात’. दाव् धर्मात दीर्घायुष्य व अमरत्व यांच्या इच्छेची जोपासना केली जाते, पण दाव् तत्त्वज्ञानाचा प्रसिद्ध गूढवादी तत्त्वचिंतक ज्वांग् ज (आचार्य ज्वांग्, इ. स. पू. सु. ३९९–सु. २९५) म्हणतो, ‘पुराणकाळाच्या सिद्ध मानवाला आयुष्यावर प्रेम करणे किंवा मृत्यूचा द्वेष करणे, हे काहीच माहीत नव्हते. जिवंत असण्यात त्याला फार आनंद वाटत नसे किंवा मृत्यूचा त्याने प्रतिकारही करण्याचा प्रयत्न केला नाही. अजाणताच ताे आला आणि अजाणताच तो गेला एवढेच.’

ताओ मताची धर्म म्हणून स्थापना प्रत्यक्षात जांग् लिंगने केली. त्यालाच पुढे जांग् दाव्–लिंग (इ. स. सु. पहिले शतक) म्हणू लागले त्याचा जन्म उत्तर हान घराण्यातील सम्राट ह्‌वान याच्या कारकीर्दीत (इ. स. १४७–१६७) झाला. त्या काळात चीनमध्ये एक विशिष्ट धर्मपंथ आणि आचार लोकप्रिय होऊन प्रसार पावला होता. त्याला ‘फांग्–शू’ म्हणत. फांग्–शू म्हणजे गूढ विद्या. प्रत्यक्षात ती एक प्रकारची यातुविद्याच होती. तिचे मुख्य विषय फलज्योतिष, कौल लावणे, किमया (अल्केमी), चेटूक आणि तंत्रमंत्र हे असत. या गूढ विद्येच्या उपासकांना फांग–षृ म्हणजे देवऋषी वा गुरू म्हणत. जांग् दाव्–लिंग हा त्यांच्यापैकीच एक, त्यांचा मोठा आचार्य व नेता होता. तो त्याच्या काळातील एक मोठा विद्वानही होता. असे म्हणत, की त्याने सर्व जुन्या चिनी धार्मिक ग्रंथांचा संपूर्ण अभ्यास केला होता. ई जिंग् (परिवर्तन सूत्रे) ह्या ग्रंथाचे त्याने विशेष अध्ययन केले होते. प्राचीन चिनी तत्त्वज्ञानाच्या सर्व शाखांत, विशेषतः दाव् ह्या विश्ववादी संप्रदायात, तो पारंगत होता.

सरकारी नोकरी सोडून जांग् दाव्–लिंगने स्वतःला किमयाविद्येस वाहून घेतले होते. मानवाला अमरत्व मिळवून देणारे एक अमृत रसायन (‘जिन् दान्’ अथवा सुवर्णगुटिका नावाचे) त्याने बनविले होते, असे म्हणतात. त्यानंतर सबंध देशात तो खूपच लोकप्रिय झाला व त्याचे अनुयायी वाढले. त्याने दाव् ज्याव् किंवा ताओ धर्म नावाचा एक धर्मपंथच संघटित केला. वास्तविक हा धर्मपंथ म्हणजे प्राचीन चिनी उपासनापद्धती, भक्ती, धर्म, तत्त्वज्ञान असे अनेक गोष्टींचे मिश्रणच होते. पुढे पुढे बौद्ध धर्मातून त्यात अनेक गोष्टींची उसनवारी केली गेली व अनुकरणही झाले. बौद्ध धर्मातील अनेक गोष्टी आत्मसात करण्यात आल्या आणि भारतातील तंत्रमार्गाशी ताओ धर्माचे खूपच साम्य निर्माण झाले.

ताओ धर्माच्या धार्मिक संघटनेतील मुख्य आचार्याला ‘थ्यन्–षृ’ म्हणतात. त्याचा अर्थ ‘स्वर्गीय गुरू’ असा होतो. रोमन कॅथलिकांचा जसा पोप तसे दाव् धर्मीयांचे थ्यन्–षृ. स्वर्गीय गुरूच्या दीर्घ परंपरेतील पहिले आचार्य स्वतः जांग् दाव्–लिंग हेच होत. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा जांग् हंग् हा मुख्य धर्मगुरू झाला. त्याच्यानंतर जांग् लिंगचा नातू जांग् लू हा पीठप्रमुख झाला आणि अशाच रीतीने चालू शतकापर्यंत वारसाहक्काने या घराण्याकडे हे धर्मगुरुपद राहिले.

दाव् या शब्दाचा अर्थ ‘मार्ग’ असा आहे. सर्व विश्व ज्या मार्गाने चालते तो हा मार्ग. मराठीत याला ‘विश्वचक्र’ म्हणता येईल. मनुष्य–प्राण्याने निसर्गामध्ये ढवळाढवळ न करणे, हे दाव् मतप्रणालीचे मुख्य तत्त्व आहे. त्याला ‘वू वै’ म्हणजे अकार्य (मानवबुद्धीप्रमाणे कार्य न करणे) असे म्हणतात.


दाव् मतप्रणालीचा मूळपुरुष लाव् ज मानला जातो तथापि अशी कोणी व्यक्ती खरोखरच अस्तित्वात होती, असे मानायला अजिबात आधार नाही. ‘लाव्’ म्हणजे म्हातारा किंवा वयोवृद्ध व्यक्ती. ‘लाव्’ हे आदरार्थी संबोधन आहे.

दाव् मतप्रणालीचा मुख्य ग्रंथ दाव् द जिंग्  म्हणजे ‘मार्ग सूत्र’ हा आहे. हा लाव् ज याने रचिला असे मानतात. यावर आजपर्यंत असंख्य टीका लिहिल्या गेल्या आहेत आणि आणखीही लिहिल्या जातील, इतका हा ग्रंथ गूढ आहे.

दाव् मतप्रणाली आणि दाव् धर्म यांचा संबंध वरवर जरी दिसत नसला, तरी विश्वचक्राचे ज्ञान या दोन्हीच्या मुळाशी आहे, यात शंका नाही.

संदर्भ : 1. Huai–nan Tzu Trans. Morgan, Evan. Tuo the Great Luminant, Shanghai, 1934.

           2. Lieh–Tzu Trans. Graham, A. C. The Book of Lieh Tzu, London, 1962.

           3. Weber, M. The Religion of China : Confucianism and Tuoism, Chicago, 1952.

थान, युन–शान (इं.) दीक्षित, मीनाक्षी (म.)