वैद्य, गजानन भास्कर : (२ जून १८६७–२३ मार्च १९२१). मुंबई येथील हिंदू मिशनरी सोसायटीचे संस्थापक व आद्य हिंदू मिशनरी. जन्म कनकेश्वर डोंगराच्या पूर्वेस असलेल्या नारंगी (जिल्हा रायगड) या गावी. शिक्षण मुंबईस. १८९३ साली ते बी. ए. झाले. १८९८ पासून ते थिऑसफीचा प्रचार करू लागले. त्यांचे वक्तृत्व उत्तम होते. दादाभाई नवरोजी ह्यांनी स्थापन केलेल्या स्ट्यूडंट्‌स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी ह्या संस्थेच्या विद्यालयात ते काही काळ अध्यापन करीत होते. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे ते बरीच वर्षे अध्यक्ष होते (१८९९-१९२०).

वैद्य ह्यांचा लौकिक, परधर्मांत गेलेल्या हिंदूंना पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश देण्यासाठी त्यांनी केलेल्या सततच्या प्रयत्नांवर तसेच त्यांनी प्रचारात आणलेल्या वैदिक विवाहविधीवर मुख्यत: अधिष्ठित आहे. बाटलेल्या हिंदूंना पुन्हा हिंदू करण्यासाठी १९१८ सालच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी मुंबई येथील कावसजी पटेल टॅंक रोडवरील हिराबागेत त्यांनी सभा घेऊन हिंदू मिशनरी सोसायटीची स्थापना केली. परधर्मांत गेलेल्या हिंदूंना हिंदू धर्मात पुन्हा प्रवेश देणे म्हणजे त्यांची ‘शुद्धी’ करणे, हे त्यांना मान्य नव्हते. जे आपण होऊन हिंदू धर्मात परत येत आहेत, त्यांना फक्त आपण जवळ करावे, अशी त्यांची भूमिका होती. त्यासाठी ते करीत असलेल्या विधीला ते उपनयन विधी म्हणत. ह्या कामासाठी आरंभी त्यांनी शंकराचार्यांना पुढाकार घेण्याची विनंती केली होती. ती मान्य झाली नाही. मात्र अन्य धर्मांत गेलेल्या हिंदू बांधवांना पुन्हा हिंदू करण्याचा अधिकार आपल्याला देवाने दिला आहे, असे म्हणून ते हे कार्य करू लागले. अनेकांना त्यांनी पुन्हा हिंदू करून घेतले. आपल्या कार्याचा प्रसार करण्यासाठी त्यांनी अनेक व्याख्याने दिली आणि हिंदू मिशनरी ह्या नावाचे साप्ताहिकही काढले. त्यांच्या ह्या कार्याला महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळाला.

हिंदूंच्या शेकडो जातींत विवाहविधींच्या पद्धती वेगवेगळ्या असून वैदिक विधींत अनेक सामाजिक रूढींची सरमिसळ झालेली आहे, हे पाहिल्यामुळे वैदिक विवाहविधीचे नीट संशोधन करण्याचे काम लोकमान्य टिळकांच्या सूचनेवरून त्यांनी हाती घेतले आणि ते पूर्ण करून अवघ्या एका तासात आटोपता येईल असा वैदिक विवाहविधी तयार केला. नंतर हा विधी मोठ्या प्रमाणात प्रचारात आला.

वैद्य ह्यांच्या ग्रंथांत आश्रम आणि आश्रमधर्म (१९०६), विष्णूचे अवतार (१९०६,ॲनी बेझंट ह्यांच्या काही व्याख्यानांचे भाषांतर), प्रश्नोपनिषद आणि ऐतरेयोपनिषद ह्यांची त्यांनी केलेली सटीप भाषांतरे (१९०८, १९१३), थिऑसफीचे धर्मकार्य (१९११), सनातन धर्मविचार (१९२४), गजानन स्मृति, भाग १ (धर्मविषयक लेख– १९२८), वैदिक विवाहविधी (१९३१, मराठी स्पष्टीकरणांसह) ह्या ग्रंथांचा समावेश होतो.

वैद्यांचे बंधू सुंदरराव वैद्य ह्यांनी त्यांचे चरित्र लिहिले आहे (श्रीगजानन महर्षी-गजानन भास्कर वैद्य, १९४७). मुंबई येथे ते निधन पावले.

कुलकर्णी, अ. र.