समुद्रमंथन : एक भारतीय पुराणकथा. देवांनी आणि दानवांनी अमृताच्या प्राप्तीसाठी एकत्र येऊन हे समुद्रमंथन केल्यामुळे, त्यास अमृतमंथन असेही म्हणतात. ही कथा रामायण, महाभारत आणि पुराणे या गंथांत भिन्न भिन्न प्रकारे सांगितली आहे. ही कथा थोडक्यात अशी : देवांचा राजा इंद्र ह्याच्यावर प्रसन्न होऊन दुर्वास मुनींनी त्याला आपल्या गळ्यातली दिव्य फुलांची माला दिली. ह्या वेळी हत्तीवर आरूढ झालेल्या इंद्राने ती सुंदर माला हत्तीच्या माथ्यावर ठेवली, पण ती खाली पडून हत्तीच्या पायांखाली तुडविली गेल्यामुळे संतापलेल्या दुर्वासांनी इंद्राला शाप दिला की, तुझे सामर्थ्य नाहीसे होईल आणि तुझे वैभवशाली राज्यही नाहीसे होईल. ह्या शापाच्या प्रभावामुळे शक्तिहीन झालेले देव दैत्यांबरोबरच्या लढाईत सतत निःष्प्रभ होऊ लागले. शिवाय दानवांचे गुरू शुकाचार्य ह्यांच्यापाशी संजीवनी विदया होती. त्यामुळे युद्धात मरणाऱ्या दानवांना ते पुन्हा जिवंत करीत. देवांकडे मात्र अशा प्रकारची विदया नव्हती. अखेरीस ते विष्णूला शरण गेले, तेव्हा विष्णूने समुद्रमंथन करून अमृत मिळविण्याची योजना देवांना सांगितली. त्यासाठी तह करून दानवांचे साहाय्य घेण्याचा सल्लाही विष्णूने दिला. त्यानुसार देव-दानवांनी मंदार पर्वताची रवी व वासुकी सर्पाची दोरी करून समुद्रमंथन केले. विष्णूने कासवाच्या रूपाने मंदार पर्वताला सागराच्या तळाशी आधार दिला.

समुद्रमंथन प्रकिया चालू असताना पर्वतावरील वनस्पती व पशुपक्षी समुद्रात पडले. त्यापासून वारूणी (मदयसदृश पेय) उत्पन्न झाली. तिचे प्राशन केल्यामुळे देव-दैत्यांना उत्साह लाभला मात्र वासुकीच्या मुखातून विषारी वायू बाहेर पडल्यामुळे दानव होरपळू लागले. विष्णूने त्या वायूचे मेघात रूपांतर केले व देवांवर पर्जन्यवृष्टी केली. समुद्रमंथनामुळे समुद्रातील सर्व प्राणी खवळल्याने उत्पन्न झालेल्या विषाने (हलाहल) देव-दैत्य होरपळू लागले त्यांच्या विनंतीनुसार शंकराने प्रसन्न होऊन विष प्राशन केले. त्यामुळे तो नीलकंठ झाला.

ह्या समुद्रमंथनातून चौदा रत्ने वर आली. त्यांपैकी एक अमृत होते. मात्र अमृताचा कुंभ दिसताच तो दैत्यांनी पळविला तथापि विष्णूने एका सुंदर स्त्रीचे रूप घेऊन अमृताची योग्य वाटणी करण्याच्या मिषाने दैत्यांकडून तो कुंभ घेतला आणि तो देवांना दिला. त्यानंतर संतापलेल्या दैत्यांनी देवांशी युद्ध सुरू केले पण त्यातही विष्णुकृपेने देव विजयी झाले.

समुद्रमंथनातून प्राप्त झालेल्या चौदा रत्नांचा निर्देश पुढील श्र्लोकात आढळतो. हा श्र्लोक हिंदू विवाहविधीत म्हटल्या जाणाऱ्या मंगलाष्टकात समाविष्ट आहे.

लक्ष्मी: कौस्तुभपारिजातकसुराधन्वंतरिश्चंद्रमा: । 

गाव: कामदुधा: सुरेश्वरगजो रंभादिदेवाङ्गना: ॥ 

अश्व: सप्तमुखो विषं हरिधनु: शङ्खोऽमृतं चांबुधे: । 

रत्नानीह चतुर्दश प्रतिदिनं कुर्वन्तु वो मङ्गलम् ॥

(१) लक्ष्मी, (२) कौस्तुभ मणी, (३) पारिजातक वृक्ष, (४) सुरा, (५) धन्वंतरी (एकदिव्यपुरूष. तो हातात अमृतकुंभ घेऊन वर आला), (६) चंद्र, (७) कामधेनू-गाय, (८) ऐरावत-हत्ती, (९) रंभा व इतर अप्सरा, (१०) उच्चे:श्रवा हा सात मुखे असलेला शुभ घोडा, (११) हलाहल-विष, (१२) शार्ङ्ग-धनुष्य, (१३) पांचजन्य शंख आणि (१४) अमृत ही ह्या श्र्लोकात निर्देशिलेली चौदा रत्ने. ह्या श्र्लोकाचा कर्ता अज्ञात आहे. समुद्रमंथनातून चौदा रत्ने वर आली असे सामान्यतः मानले जात असले, तरी रत्नांची संख्या व नावे निरनिराळ्या गंथांत निरनिराळी दिल्याचे आढळते. उदा., रामायणात सहाच रत्नांचा (धन्वंतरी, अप्सरा, सुरा, उच्चे:श्रवा, कौस्तुभ व अमृत) निर्देश आहे, तर महाभारतात सात रत्नांचा (चंद्र, श्री, सुरा, उच्चे:श्रवा, कौस्तुभ, धन्वंतरी, अमृत) उल्लेख आढळतो. [→ चौदा रत्ने].

ह्या कथेत विष्णू व शिव ह्यांचे महत्त्व दर्शविले आहे.

संदर्भ : १. अकोलकर, ग. वि. श्रीमद् भागवत : कथाभाग आणि शिकवण, पुणे, १९६५.

     २. बेडेकर, वि. म. पुराणम् , पुणे, १९६७.

कुलकर्णी, अ. र.