देवालय : मूर्ती किंवा लिंग यासारख्या प्रतिमेच्या रूपाने असणाऱ्या देवाचे निवासस्थान म्हणजे देवालय. देऊळ हा मराठी शब्द देवालय या शब्दापासूनच साधलेला आहे. मंदिर म्हणजेही देवालयच होय. महापुरुषांच्या समाधिस्थानांनाही लक्षणेने देवालय म्हणतात. देवालय हे देवाचे शरीर असते, अशीही समजूत आहे. कुटुंबात जसे देवघर, तसेच समाजात देवालय होय कारण बहुसंख्य देवालये सार्वजनिक स्वरूपाचीच असतात किंवा त्या त्या धर्माच्या सर्वजनांकरिता असतात.

भटक्या जमातींमध्ये देवालये नव्हती. त्या जमाती देवांसाठी असलेले पवित्र मांडव व तंबू जागोजागी नेत असत. जेव्हा त्या जमाती एका ठिकाणी स्थिरावल्या, तेव्हा तंबू वा मांडव जाऊन त्यांच्या जागी देवालये आली. प्रत्यक्ष देवालये बनू लागण्यापूर्वी पूजाविधी उघड्यावर मांडवात किंवा तंबूत केले जात परंतु अधिक भव्य व मौल्यवान मूर्तीबरोबर बंदिस्त देवालयांची गरज निर्माण झाली. आफ्रिका, मेक्सिको, मध्य अमेरिका, पॉलिनीशिया इ. प्रदेशांतील आदिवासी जमातींमध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरूपात देवालये आढळतात. ग्रीक, रोमन, बॅबिलोनियन, ईजिप्शियन इ. प्रगत संस्कृतींतही देवालयांना महत्त्वाचे स्थान होते. ⇨ मशीद, काही ख्रिस्ती पंथाचे ⇨ चर्च  व  ⇨ सिनॅगॉग  ही मात्र या विशिष्ट अर्थाने देवालये नव्हेत कारण तेथे देवांच्या मूर्ती नसतात.

वेदपूर्वकालीन सिंधुसंस्कृतीत देव व देवी यांच्या मूर्तींची पूजा होती. देवालयेही असावीत, असे अनुमान करता येते. हिंदूंच्या देवालयांचा प्रारंभ अग्निचयनापासून झाला यज्ञसंस्थेचेच देवालयसंस्थेत रूपांतर झाले यज्ञकल्पना मागे पडल्यानंतर बौद्ध, जैन व पौराणिक यांनी यज्ञमंडपापेक्षा अधिक सुंदर अशी मंदिरसंस्था निर्माण केली कोणातरी योग्याला समाधीच्या क्षणी देवाच्या प्रतिमेचा साक्षात्कार झाल्यावर त्याने त्या प्रतिमेला स्थिर स्वरूपात साकार करण्यासाठी मूर्ती आणि मंदिर निर्माण केले इ. मते याबाबत आढळतात. बुद्धपूर्वकालात हिंदूंची मंदिरे होती की नव्हती आणि मंदिरकल्पना हिंदूंनी बौद्धांकडून घेतली की बौद्धांनी हिंदूंकडून घेतली, यांविषयी परस्परविरुद्ध मते आढळतात.

गावातील निवडक स्थाने किंवा गावाबाहेरील जलाशय, पर्वत, गुहा, वृक्ष, कुंज, शिळा इ. स्थाने पवित्र मानून तेथे देवालये बांधली जातात. क्वचित एखाद्या व्यक्तीला विशिष्ट ठिकाणी देवालय बांधण्याचा दृष्टांत झाला, असे मानतात. मंत्रपूर्वक स्थलशुद्धी केल्यावर ⇨ मंदिरवास्तुकलेच्या नियमांना अनुसरुन त्या स्थानावर वास्तू बांधतात. तेथे गाभाऱ्यातील पीठिकेवर मूर्तीची स्थापना केली जाते. ती मूर्तिकलेच्या नियमांना अनुसरुन माती, लाकूड, पाषाण आणि धातू यांपैकी एका माध्यमात केलेली असते. मूर्तीची विधिपूर्वक प्राणप्रतिष्ठा करणे, हे अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ट्य होय. देवदेवीचे प्रतीक स्वयंभू असेल, तर ते चेतनच असल्यामुळे तिची पुन्हा प्राणप्रतिष्ठा नसते. प्राणप्रतिष्ठेनंतर मूर्ती चेतन देवता बनते व मग “जे मानवी देहाला ते देवाला” या न्यायाने तिचे सर्व उपचार करावे लागतात. पहाटे भूपाळ्या व काकड आरती म्हणून त्याला झोपेतून उठविले जाते, तर रात्री शेजारती म्हणून त्याला झोपविले जाते. त्याला वस्त्रालंकारासारखे अंगभोग, कीर्तनभजनासारखे रंगभोग, देवदासींच्या रुपाने शयनभोग व पंचामृतस्नान, नैवेद्य, छत्र, चामर, तांबूल इ. गोष्टींची आवश्यकता असते. प्रातःकाली, मध्यान्ही आणि सायंकाळी शुचिर्भूत होऊन त्याची पूजा केली जाते. षोडशोपचारांनी केली जाणारी पूजा ही महापूजा असते परंतु ती शक्य नसल्यास केवळ पंचोपचारांनीही पूजा केली जाते. पाने, फुले, हळद, कुंकू इ. पूजाद्रव्ये वापरली जातात. देवापुढे तेलाचा अथवा तुपाचा नंदादीप लावतात. काही मंदिरांवर ध्वज फडकत असतात. देवीची खणानारळाने ओटी भरली जाते. काही देवतांपुढे बकरा, कोंबडा इत्यादींचा बळी दिला जातो. मंदिरांतून पूजा करण्यासाठी पुजारी, पंड्ये, बडवे, उत्पात, सेवेकरी, गुरव, अभिषेकी, भराडी, आराधी, गोंधळी, गोसावी, भुत्ये, जंगम इत्यादींची नेमणूक केलेली असते. यांपैकी कोणी कोणत्या देवतेच्या मंदिरात पूजा करावी हे ठरलेले असते. सर्व देवतांच्या पूजेचे उपचार बऱ्याच प्रमाणात समान असले तरी पूजासाहित्य, मंत्र इ. बाबतींत फरक असतो. तसेच ज्या त्या मंदिराच्या ऐपतीप्रमाणे पूजा केली जाते.

देवदर्शनासाठी देवालयात जाणाऱ्यांनी पुढीलप्रमाणे काही संकेतही पाळावयाचे असतात : एखाद्या महत्त्वाच्या कार्याला निघण्यापूर्वी व कार्याच्या सफलतेनंतर देवालयात जाऊन देवदर्शन घ्यावे. विवाहानंतर वधूवरांनी देवदर्शनास जावे. देवदर्शनासाठी मंदिरात जाण्यापूर्वी स्नान करावे. शरीर व मन शुद्ध असावे. रिक्त हस्ताने मंदिरात जाऊ नये. पादत्राणे बाहेर ठेवावीत वा घरापासूनच अनवाणी जावे. प्रथम घंटा वाजवावी. देवाला हात जोडून किंवा साष्टांग नमस्कार करावा. प्रार्थना करून दक्षिणा टाकावी. तीर्थ घ्यावे, कपाळाला अंगारा लावावा. मंदिराला प्रदक्षिणा घालावी. देवदर्शनानंतर लगेच परत न फिरता मंदिरात थोडावेळ बसावे वा थांबावे इत्यादी.

पुण्यप्राप्ती, पापमुक्ती, नवस, कीर्ती, इतर पंथांतील लोकांशी स्पर्धा, शत्रूवर किंवा वैदिकेतर पंथांवर मिळविलेला विजय इ. हेतूंनी मंदिराची उभारणी केली जाते. मंदिर बांधणे किंवा त्याचा जीर्णोद्धार करणे, हे इष्टापूर्त कर्मांपैकी ‘पूर्त’ कर्म होय. देऊळ बांधण्याचा विचार मनात येताच पंचमहापातके नष्ट होतात यांसारख्या फलश्रुती पुराणांतून आढळतात. नवस फेडण्याच्या अथवा एखाद्या अन्य हेतूने देवतेस अनेक वस्तू अर्पण केल्या जातात. मंदिर–परिसरात पुष्करिणी, तलाव, विहिरी, धर्मशाळा, उद्याने इत्यादींची सोय केली जाते. मंदिरांच्या व्यवस्थेसाठी जमीन अथवा इतर स्वरूपात वतने दिली जातात. भारतातील काही मंदिरांची मालमत्ता कोट्यावधी रुपयांची असून त्यांचे वार्षिक उत्पन्नही प्रचंड असते.


इतिहासकाळात मुसलमान व ख्रिस्ती लोकांनी अनेक हिंदू व बौद्ध मंदिरांचा विध्वंस केला आहे. राजसत्ता बदलल्यावर मूळ मंदिराचे रूपांतर विजयी पंथाच्या अथवा धर्माच्या वास्तूत करण्याच्या घटनाही घडल्या आहेत. काही मंदिरांच्या गाभाऱ्यात सामान्यतः पुजाऱ्याखेरीज इतर कोणालाही प्रवेश नसतो. कोणत्या वर्णाच्या व्यक्तीने देवाचे दर्शन कोठून घ्यावे, याविषयी असलेल्या संकेतांमुळे अस्पृश्यांना मंदिरांत प्रवेश नव्हता त्यांना दुरूनच कळसाचे दर्शन घ्यावे लागे. परंतु स्वातंत्र्यानंतर मात्र सर्वांसाठी मंदिरप्रवेश खुला करण्याचा कायदा करण्यात आला आहे. काही मंदिरे महत्त्वाची असतात, त्यांच्या तीर्थयात्रा केल्या जातात. त्या त्या मंदिरातील देवता आपल्या परिसरातील भक्तांचे संरक्षण करते, असे मानतात. पूर्व ही सूर्योदयाची दिशा असल्यामुळे पूर्वाभिमुख मंदिरांची संख्या अधिक असते. गावातील कोणतेही घर तेथील मंदिरापेक्षा अधिक उंच असू नये, असा संकेत होता. प्रत्येक गावात किमान एक तरी मंदिर असतेच परंतु काही गावांतून व विशेषतः तीर्थस्थानी मंदिरांची व काही मंदिरांतून मूर्तींची गर्दी झालेली आढळते. भारतात लक्षावधी मंदिरे आहेत परंतु त्यांतील कित्येक उपेक्षित आहेत. मंदिरांतील मूर्तीचे शास्त्रसंमतीने विधिपूर्वक विसर्जन करता येते किंवा त्यांना अन्यत्र नेता येते.

पूर्जाअर्चा, कथाकीर्तन, भजनप्रवचन, धार्मिक ग्रंथांचे पारायण, चर्चासत्रे, धर्मसभा, पाठशाळा, उत्सव, जत्रा, कौल लावणे, दिव्य करणे, न्यायनिवाडा करणे इत्यादींमुळे देवालयांना संस्कारकेंद्रांचे व ज्ञानपीठांचे स्वरूप प्राप्त झालेले होते. पूर्वी क्रांतिकारक महापुरुष महत्कार्यासाठी मंदिरांतून शपथा घेत. अनेक संतांची चरित्रे मंदिरांच्या परिसरात घडली आहेत अनेक धर्मग्रंथ तेथे लिहिले गेले आहेत. नृत्य, वादन, गायन, शिल्प, धातुकाम, विणकाम, वास्तुकला, चित्रकला, मूर्तिकला इ. कलांना मंदिरांमुळे उत्तेजन मिळाले. म्हणूनच प्राचीन संस्कृती व इतिहास यांचे ज्ञान होण्यास मंदिरांची मोठी मदत होते. पूर्वी सांस्कृतिक व धार्मिक दृष्टींनी गावावर मंदिराचेच प्रभुत्व असे. मनःशांती देणारे पवित्र स्थान म्हणून भाविक लोकांच्या जीवनात मंदिरांना महत्त्वाचे स्थान असते.

संदर्भ : पालकर, ना. ह. मंदिरांची कथा आणि व्यथा, आवास (जि. कुलाबा), १९६५.

साळुंखे, आ. ह.