नारद : एक देवर्षी व ऋग्वेदातील एक सूक्तकार. ज्याच्या ठिकाणी देवत्व आणि ऋषित्व या दोहोंचा समन्वय झालेला असतो त्यास देवर्षी म्हणतात. असे एकूण आठ देवर्षी असल्याचा उल्लेख वायुपुराणात (अध्याय ६१·८३ —८५) येतो. त्यांतील नारद हा अग्रगण्य आहे असे ‘देवर्षीणां च नारदः’ या गीतावचनावरून (१०·२६) दिसते.

नारद हा यज्ञवेत्ता होता असे अथर्ववेदात (५·१९·९) म्हटले आहे. त्याच्या बरोबरच येथे पर्वतनामक व्यक्तीचा उल्लेख येतो. कण्वकुलात उत्पन्न झालेला कण्व नारद हा सूक्तद्रष्टा होता. त्याच्या नावावर ऋग्वेदातील काही सूक्ते आहेत. सामवेदाचा शिक्षाग्रंथ त्याने लिहिला पण वैदिक साहित्याशी संबंध असलेला नारद पौराणिक नारदाहून भिन्न असावा.

नारद हा ब्रह्मदेवाचा मानसपुत्र असून तो परमभागवत, धर्मज्ञ, तत्त्वज्ञ, राजनीतिज्ञ व संगीतज्ञ होता. त्याचा जन्म व चरित्र यांचे उल्लेख भागवत, वराह, ब्रह्मवैवर्त, हरिवंशलिंग ही पुराणे व नारदपंचरात्र यांत येतात. त्यांतील भागवतवराहपुराण यांतील भाग आत्मचरित्रात्मक असून अन्यत्र त्याचे चरित्र आले आहे. नारद नावाच्या अनेक पौराणिक व्यक्ती असाव्यात. त्यामुळे नारदाच्या जन्माच्या व कार्याच्या अनेक कथा पुराणांत आढळतात व या कथांमध्ये फरक व विरोधही आढळतो, हे पुढील विवरणावरून ध्यानात येते. नारदाचे अनेक जन्म सांगितले आहेत, यावरूनही अनेक नारद होते, हे सूचित होते. भागवतात तो दासीपुत्र असून वराहपुराणात त्याच्या विप्रपुत्रत्वाचा उल्लेख येतो. या नावाच्या व्युत्पत्त्या ब्रह्मवैवर्तात येतात (ब्रह्म खंड २१·७ – ९). हा वीतरागी, ब्रह्मचारी होता, हे खरे पण त्याच्या विवाहाची आणि संसाराची कथा ब्रह्मवैवर्त (१३०·२४) व नारदपंचरात्र (१·१०·३८·३९) यांत येते. तसेच विवाहप्रयत्नाच्या संबंधात नारदाचे कपिमुख झाल्याचा उल्लेख महाभारत (द्रोणपर्व, अ. ५५), शिवपुराण (रुद्रसंहिता – सृष्टिखंड, अ. २) आणि लिंगपुराण (अ. ७६) यांत येतो पण हे सर्व शापप्रभावामुळे झाले असून ह्या सर्व कथा त्याच्या पूर्वकल्पांतील जन्माच्या होत. चालू कल्पात त्याचे ब्रह्मचर्य अबाधित आहे, असे म्हटले आहे. नारद ‘जातिस्मर’ म्हणजे पूर्वजन्मातील स्मरण असणारा होता.

नारद हा ब्रह्मदेवाच्या मानसपुत्रांपैकी एक होता. ब्रह्मदेवाने त्यास उत्पन्न केल्यावर दारसंग्रह करून प्रजा निर्माण करण्याची आज्ञा केली पण ती त्याने प्रथम अमान्य केल्यामुळे ‘तू योषिल्लुब्ध क्रीडामृग होशील’ असा ब्रह्मदेवाने त्यास शाप दिला (ब्रह्मवैवर्तपुराण अ. ८). त्याप्रमाणे उपबर्हण गंधर्वरूपात त्याचा गृहस्थाश्रम झाल्यावर त्याची शापातून मुक्तता झाली.

ब्रह्मदेवाने, दुसरा मानसपुत्र जो दक्षप्रजापती, यासही प्रजा उत्पन्न करण्याची आज्ञा केली. त्याने प्रथम प्रभूत पुत्रोत्पत्ती करून त्या मुलांना मैथुनधर्माने प्रजा उत्पन्न करण्याचा आदेश दिला पण नारदाने त्या मुलांना विरक्त बनवून दारसंग्रहापासून परावृत्त केले. त्याचा क्रोध येऊन दक्षाने त्यास ‘तुला गर्भवास घडेल’ (हरिवंश ३·२५) व ‘तू कोठेही एका ठिकाणी स्थिर होणार नाहीस’ (भागवत ६·५·४३) असा शाप दिला. असाच अस्थिरत्वाचा शाप विवाहाची विनंती अमान्य केल्यामुळे दुर्भगानामक एका मुलीकडूनही त्यास मिळाला होता (भागवत ४·२७·२२).

नारद वीणेवर नामस्मरण व हरिगुणसंकीर्तन करीत त्रैलोक्यात फिरत असतो, असे जरी सर्वत्र वर्णन असले, तरी त्याचा स्वतःचाही एक आश्रम होता असा एकुलता एक उल्लेख भागवतात (७·७·१२) येतो. नारदाचे स्वरूपवर्णन अनेक पुराणांत येते. त्यावरून तो गौरवर्णाचा, ब्रह्मतेजाने युक्त, उंच, मस्तकावर जटाभार धारण करणारा, हातात वीणा असणारा, सुवर्णाचे यज्ञोपवीत धारण करणारा, चंद्रकिरणांप्रमाणे शुभ्र अशी दोन इंद्रदत्त वस्त्रे परिधान करणारा, दंड-कमंडलू बाळगणारा व पाहणाऱ्यांवर एकदम छाप पाडणारा होता, असे दिसते.  त्याच्या शेंडीचा उल्लेख फक्त एकाच ठिकाणी (महाभारत, वनपर्व अ. ७ दाक्षिणात्य पाठ) येतो. एरव्ही सर्वत्र त्याच्या जटाभाराचेच उल्लेख आहेत.

 नारद हा मुख्यतः भक्तिमार्गप्रवर्तक व कीर्तनसंस्थेचा आदिप्रवर्तक असला, तरी त्याला अध्यात्म, राजनीती, धर्मशास्त्र, यज्ञप्रक्रिया, सर्पज्ञान, संगीत इ. अनेक विषयांचे ज्ञान होते. तो बृहस्पतीचा शिष्य होता. बृहस्पतीपासून वेदवेदांगे, सनत्कुमारापासून ब्रह्मज्ञान व ब्रह्मदेवापासून विष्णुमंत्र यांची त्यास प्राप्ती झाली. गानबंधूकडून त्याने संगीतज्ञान मिळविले व विष्णुकृपेने कृष्णावतारात त्याने त्या विद्येत विशेष प्रावीण्य मिळविले (लिंगपुराण अ. ७४).

नारदाच्या कलहप्रियतेची प्रसिद्धी फार आहे पण त्याला ‘कलहप्रिय’ हे विशेषण महाभारत (शल्यपर्वणि गदापर्व ५४·२०) व हरिवंश (५४·९ – ११) येथेच गौण रीतीने आले आहे. अन्यत्र त्याच्या कलहप्रियतेचा उल्लेख नाही. तशी उदाहरणेही मोजकीच आहेत. सत्यभामा व रुक्मिणी यांत त्याने भांडण लावले होते (गर्गसंहिता अ. ५५). देवकीची मुले मारावयास कंसास त्यानेच प्रवृत्त केले (भागवत १०·१·६२ आणि देवीभागवत ४१·१८). याउलट त्याच्या समेटप्रियतेची उदाहरणे पुष्कळच आहेत. नारदाने इतरांस शाप दिल्याची फक्त दोनच उदाहरणे उपलब्ध आहेत (भागवत १०·१०·७ आणि ११·१·१६) पण हे शाप अनुग्रहरूप होते. ब्रह्मदेवास अपूज्यत्वाचा जो शाप त्याने दिला, ती केवळ प्रतिक्रिया होती (नारदपंचरात्र, १·१०·३१). त्याने अनेकांना ज्ञानप्रवृत्त केले व भक्ती शिकविली. त्यांत व्यास, वाल्मीकी, प्राचीनबर्ही अशा व्यक्ती होत्या.

नरकासुराच्या बंदीशाळेतील सोळा हजार राजकन्यांशी कृष्णाने विवाह केल्यावर त्याचा हा अजस्त्र संसार पहावयास नारद गेला होता पण प्रत्येक घरी त्यास कृष्णाचे दर्शन झाले (भागवत १०·६९). विष्णूच्या मायेने नारदास स्त्रीरूप प्राप्त झाल्याची कथा पद्मपुराणात (द्वितीय खंड, अ. ३३) येते. नारदास देव व दानव या दोघांतही सारखाच मान होता. देव व माणूस यांतील दुवा म्हणून त्याची पुराणांत विशेष प्रसिद्धी आहे. नारद सर्वतोगामी व चिरंजीव आहे, अशी समजूत आहे.

नारदाच्या नावावर नारदभक्तिसूत्रे, नारदस्मृति, नारदपंचरात्र, लघुनारदीय, बृहन्नारदीय, नारदपुराण, नारदसंहिता, नारदपरिव्राजकोपनिषद्, नारदोपनिषद्, संगीत मकरंद, रागनिरूपण, पंचसारसंहिता, दत्तिल नारदसंवाद इ. ग्रंथ आहेत.

संदर्भ : सावळापूरकर, पां. कृ. देवर्षिनारद, नागपूर, १९७७.

सावळापूरकर, पां. कृ.