शरीयत : ‘शरा’ या अरबी शब्दाचा अर्थ ‘मार्ग असा आहे. इस्लामी परिभाषेत ‘शरा’ म्हणजे अल्लाहप्रती नेणारा मार्ग. त्यापासून ‘शरिया’ किंवा ‘शरीयत’ हे शब्द बनलेले असून ‘शरिया’ किंवा ‘शरीयत’ म्हणजे, पवित्र कुराणाद्वारे अवतरित झालेला अल्लाहचा पवित्र कायदा होय. म्हणजेच, पवित्र कुराणाची शिकवण व संदेश, ⇨ मुहंमद पैगंबरांची (स.) वचने (हदीस) आणि आचरण (सुन्ना किंवा सुन्नत) यांतून प्रस्थापित झालेला, इस्लामचा पवित्र कायदा, यास ‘शरीयत’ असे म्हटले जाते. प्रत्येक मुस्लीम व्यक्तीची धार्मिक कर्तव्ये, तसेच व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवनातील व्यवहार निश्चित करणारा पवित्र कायदा म्हणजे ‘शरा’ किंवा ‘शरीयत’ अशी व्याख्या इस्लामी कायदेपंडित जोसेफ शाक्ट यांनी केली आहे.]
प्रेषित मुहंमद याने (स.= सल्लल्लाहू अलैही सल्लम-ही दरुद किंवा सलामतीची दुआ आहे) आचरण (सुन्नत) व वचने (हदीस) ही कुराणांतील आदेशानुसार असल्याने, ‘शरियत’चा कायदा ईश्वरी आणि पवित्र मानला जातो. या मूळ ‘शरीयत’चा आधार ⇨ कुराण, ⇨ हदीस व सुन्ना किंवा सुन्नत हेच आहेत. हा शरीयतचा कायदा चिरंतन, सर्वस्पर्शी, सार्वकालिक असून त्याचे पालन करणे, हे प्रत्येक मुसलमानाचे कर्तव्य मानले गेले आहे.
कुराण, हदीस आणि सुन्नत यांमधून शरीयतचा कायदा अभिव्यक्त होत असल्याने शरीयतचा वेगळा असा ग्रंथ नाही. गेल्या चौदाशे वर्षांत या शरीयतच्या आधारे जे कायदेशास्त्र विकसित झालेले आहे, त्यास फिका असे म्हटले जाते. या फिकाचा विकास अनेक उत्पत्तिसाधनांतून झाला आहे. ‘इज्मा’ म्हणजे मान्यवर धर्मपंडितांनी, आपले ज्ञान आणि विवेकबुद्धी यांनुसार कुराण, हदीस आणि सुन्नतनुसार, आपल्या समोरील प्रश्नांचे अर्थ लावून घेतलेले निर्णय यांत ‘इज्तिहाद’ म्हणजे आपल्या प्रज्ञेचा वापर करून, शरीयतचा लावलेला कालसापेक्ष अन्वय हादेखील अंतर्भूत असतो. ‘कियास’ म्हणजे तर्कशास्त्रातील निगमन पद्धतीचा वापर करून तयार केलेला कायदा. यातून इस्लामी ‘फिका’चा विकास झालेला आहे. [→ इज्तिहाद].
कालौघात सुन्नी आणि शिया पंथाचे आपापले स्वायत्त कायदेशास्त्र प्रस्थापित झाले. तसेच इस्लामी कायदेशास्त्राचे (फिकाचे) चार मुख्य प्रवाह किंवा संप्रदाय निर्माण झाले. ते म्हणजे हनफी, मलिकी, (मालिकी), शाफई (शाफी) आणि हंबली (हनबली) या कायदेपद्धती. भारतातील इस्लामी ‘फिका’चे हे चार आधारस्तंभ आहेत. याशिवाय हिदाया, शरा-ए-इस्लाम, फतवॉ-ए-आलमगिरी आणि दाईम्-अल्-इस्लाम यांसारखे मध्ययुगीन धर्मपंडितांनी कायदेशास्त्रावर लिहिलेले ग्रंथ हेदेखील शरीयतच्या विवेचनासाठी साहाय्यभूत म्हणून वापरले जातात.
मुसलमानांचा व्यक्तिगत कायदा हा शरीयतचा एक भाग असून त्यात विवाह, घटस्फोट, वारसहक्क, स्त्रियांचे हक्क, मालमत्तेच्या वाटणीचे कायदे यांचा समावेश होतो. मूळ इस्लामी शरीयतमध्ये आणि कायदेशास्त्रात ‘व्यक्तिगत कायदा’ अशी स्वतंत्र संज्ञा किंवा तसे कायद्याचे वर्गीकरण नाही. भारतातील व्यक्तिगत कायदे ही ब्रिटिशांची निर्मिती आहे.
ब्रिटिश न्यायाधीशांनी व कायदेपंडितांनी वर उल्लेखिलेले मध्ययुगीन ग्रंथ आणि कुराण व हदीस यांचा स्वतः अर्थ लावून तयार केलेले मुसलमानांचे कायदे व व्यक्तीगत कायदे, हे भारतीय न्यायशास्त्रात शरीयत कायदा म्हणून ओळखले जातात. यामध्ये १९३७ चा शरीयत कयदा आणि १९३९ चा मुस्लिमांच्या विवाहविच्छेदनाचा कायदा यांचा अंतर्भाव होतो. मॅकनाट्न, बेली, फिट्जरॉल्ड, डी. ए. मुल्ला, सक्सेना, फौजी यांसारख्या कायदेपंडितांनी लिहलेल्या ग्रंथांत हे कायदे दिलेले आहेत. परंतु हे कायदे मूळ इस्लामी शरीयतपासून अनेक बाबतींत ढळलेले असून ताहीर महंमद यांच्यासारख्या तज्ज्ञांच्या मते अनेक ठिकाणी मूळ शरीयतचा त्यांत विपर्यास केलेला दिसून येतो.
पहा : इस्लाम धर्म मुसलमानी विधी.
संदर्भ : 1. Engineer, A. A. A. The Right of women in Islam, New Delhi, 1992.
2. Fyzee, A. A. A. The Reform of Muslim Personal Law, Bombay, 1971
3. Hughes, Thomas Patrick, Dictionary of Islam, New Delhi, 1992.
4. Mahmood, Tahir, Muslim Personal Law, New Delhi, 1977.
5. Mahmood, Tahir, Personal Laws in Crisis, New Delhi, 1986.
६. राचमाचीकर, न. त्रिं. मुसलमानी शरा, पुणे, १९२७.
बेन्नूर, फकरुद्दीन