उलेमा : इस्लामी धर्म अथवा कायदा अथवा दोन्हीही जाणणारे तज्ञ अथवा व्यावसायिक धर्मशास्त्रवेत्ते तसेच त्यांनुसार न्यायदान करणारे कादी (न्यायाधीश), मुफ्ती (फतवा काढणारा धर्मशास्त्री), इमाम (नमाजाचे संचालन करणारा नेता) ह्या सर्वाना ‘उलेमा’ (उलमा) ही संज्ञा लावली जाते. अरबीतील ‘अलीम’ म्हणजे सर्वज्ञ, महाज्ञानी ह्या शब्दांचे ‘उलमा’ हे अनेकवचन असून ह्या अर्थीच ‘उलेमा’ ही संज्ञा वापरली जाते. ‘आरिकां’प्रमाणे हे ज्ञान उलेमांना ईश्वरी साक्षात्काराने लाभलेले नसते तर इस्लामी परंपरा, अधिकृत धर्मग्रंथ व इतर धार्मिक साहित्य, पूर्वसूरींचे मार्गदर्शन आणि स्वत:ची बुद्धी यांद्वरा उलेमांनी हे धार्मिक ज्ञान मिळविलेले असते. इस्लामी राज्यातील शासकीय पदाधिकाऱ्यांची परिषद ह्या अर्थीही प्रस्तुत संज्ञा रूढ आहे. उलेमांचे अधिकार सर्वसाधारणपणे रोमन साम्राज्यातील ख्रिस्ती धर्मोपदेशकांच्या बरोबरीचे असतात. तुर्कस्तानात शेख-उल्-इस्लाम हा उलेमांचा प्रमुख गणला जातो.

करंदीकर, म. अ.