कौरव : ‘कुरूचे वंशज’ या अर्थाने सर्व कुरुवंशीयांना ‘कौरव’ असे म्हणतात. म्हणून ⇨पांडव सुद्धा ‘कौरव’ आहेत. तथापि धृतराष्ट्राचे पुत्रच कौरव या नावाने प्रसिद्ध आहेत. कुरुपासून आठवा वंशज विचित्रवीर्य. तो वारल्यानंतर त्याच्या अंबिका नावाच्या एका भार्येच्या ठिकाणी व्यासाने नियोगपद्धतीने धृतराष्ट्र हा पुत्र उत्पन्न केला. धृतराष्ट्रापासून गांधारीला व्यासाने दिलेल्या वरामुळे शंभर पुत्र झाले.⇨कुंतीला आधी पुत्र झाल्याचे कळल्यामुळे दुःखाने गांधारीने गर्भपात केला व कठीण मांसाचा गोळा बाहेर पडला. व्यासाच्या सांगण्यावरून त्या गोळ्यावर पाण्याची धार धरल्यामुळे त्याचे शंभर भाग झाले. ते भाग तुपाने भरलेल्या शंभर कुंड्यांत ठेवले. काही काळाने त्या कुंड्यांतून दुर्योधनादी शंभर पुत्र उत्पन्न झाले. त्या शंभर पुत्रांत दुर्योधन, दुःशासन, विकर्ण आणि चित्रसेन हे चार प्रमुख होते. कौरवांनी पांडवांना अत्यंत छळले आणि राज्यभ्रष्ट केले. शेवटी भारतीय युद्धात सर्व कौरव मारले गेले.

गांधारीच्या पुत्राचा हस्तिनापुराच्या राजपदावर अधिकार नव्हता, हे दाखविण्याकरिता गांधारीच्या गर्भपाताची अशक्य कथा कोणीतरी रचली असावी. दुर्योधन, दुःशासन इ. काही पुत्र वगळले, तर सर्व शंभर पुत्र गांधारीचे औरस पुत्र नसणे, हे स्वाभाविक आहे. अतिप्राचीन काळी राजापासून अन्य स्त्रियांच्या ठिकाणी झालेले पुत्रही पट्टराणीचेच पुत्र मानण्याची प्रथा असावी. त्यामुळे शंभर कौरव पट्टराणी गांधारीचे पुत्र मानले असावेत.

एका पश्चिमी विचारवंताचे असे मत आहे, की कौरव व पांडव हे भिन्नवंशीय लोक होते त्यांच्यात अनेक वर्षे हस्तिनापुर येथील कौरवांच्या राजपदाबद्दल लढत चालली त्यात अखेरीस निकाली युद्ध होऊन कौरवांचा पराभव झाला आणि पांडवांच्या घराण्याकडे राजपद आले.

जोशी, रंगनाथशास्त्री जोशी, लक्ष्मणशास्त्री