अकलंकदेव : (सु.७३०-?). एक दाक्षिणात्य दिंगबर-जैन तत्त्वज्ञ. त्यांचा जन्म राष्ट्रकूटांची राजधानी मान्यखेट (मालखेड, कर्नाटक राज्य) येथे झाला. त्या वेळी राष्ट्रकूटवंशीय शुभतुंग अथवा पहिला कृष्णराज याची कारकीर्द होती. अकलंकांचे पिता पुरुषोत्तम ऊर्फ लघुहव्व व माता जिनमती. लघुहव्व हे शुभतुंगाचे मंत्री होते. ते नृपती होते असेही एके ठिकाणी म्हटले आहे. उपनाव साहसतुंग. अकलंकांनी ⇨उमास्वातीच्या तत्त्वार्थाधिगमसूत्रावर व ⇨समंतभद्रकृत  आत्ममीमांसेवर अनुक्रमे राजवार्तिक  व अष्टशती  हे टीकाग्रंथ लिहिले. अकलंकांचे हे ग्रंथ जैनदर्शनात मूलभूत समजले जातात. यांशिवाय लघीयस्त्रयश्रावकाचार, न्यायविनिश्रय, प्रमाणसंग्रह इ. स्वतंत्र ग्रंथही त्यांनी लिहिले आहेत. न्यायविनिश्चयावर अनंतवीर्य व वादिराजसूरी यांच्या टीका व अष्टशतीवर विद्यानंदाची टीका आहे. अकलंकदेवांचे शतक हे भारतीय तत्त्वदर्शनांचा विकासविस्तार करणाऱ्या आचार्यांचे शतक म्हणावे लागेल. कारण धर्मकीर्ती, धर्मोत्तर, कुमारिल भट्ट, मंडनमिश्र, शांतरक्षित हे एकाच शतकात मागेपुढे होऊन गेलेले दर्शनकार आचार्य होत. अकलंकदेव हे जैन तत्त्वज्ञान व तर्कशास्त्र यांची सर्वांगीण मांडणी करणारे पहिले व श्रेष्ठ जैन तत्त्ववेत्ते होते. 

पहा : जैन दर्शन. 

संदर्भ : पं. महेंद्रकुमारशास्त्री, अकलंक ग्रंथत्रयम्, अहमदाबाद-कलकत्ता, १९३९.

जोशी, लक्ष्मणशास्त्री