जिहाद : ‘जिहाद’ या शब्दाचा अर्थ सतत प्रयत्‍न असा आहे. इस्लामी धर्मशास्त्राची उभारणी होत असताना त्याला ‘धर्मयुद्ध’ असा अर्थ प्राप्त झाला. आत्यंतिक मताच्या इस्लामी धर्मगुरूंनी सारे जग इस्लामसाठी जिंकणे, हे मुस्लिम समाजाचे आणि ह्या धर्मयुद्धात भाग घेणे, हे प्रत्येक मुसलमानाचे व्यक्तिगत कर्तव्य आहे, असा दावा मांडला. विजिगीषू सुलतानांना आणि सेनाधिकाऱ्यांना हा दावा फार उपयुक्त ठरला. इस्लामेतर गटांविरुद्धच्या प्रत्येक लढाईस संबंधितांनी ‘जिहाद’ वा ‘धर्मयुद्ध’ नाव दिले. काही धर्मगुरूंच्या मते ‘जिहाद’ चार प्रकारची असते : (१) वाणी, (२) हात, (३) मन किंवा हृदय आणि (४) तरवार. वाणी आणि हाताच्या जिहादने सत्कार्याला पाठिंबा आणि दुष्कृत्यांना विरोध करावा. मनाच्या किंवा हृदयाच्या जिहादने चित्तशुद्धी करून सैतानाशी सामना करावा. तरवारीच्या जिहादने अश्रद्धांशी आणि शत्रूंशी लढावे. आताच्या युगात इस्लाम शांततेचा पुरस्कर्ता असल्यामुळे, शस्त्राने आक्रमक युद्धाचे आवाहन कधीच करीत नाही, असेही मत अलीकडे काही जण मांडू लागले आहेत तथापि दुसऱ्या महायुद्धानंतर मुस्लिम राष्ट्रांनी लढलेली प्रत्येक लढाई ही धर्मयुद्धच आहे, असे जाहीरपणे सांगितले गेले आहे.                           

करंदीकर, म. अ.