अप्सरा : इंद्रसभेतील नर्तकी वा स्वर्गलोकातील सुस्वरुप देवांगना. त्यांना ⇨गंधर्वांच्या स्त्रिया म्हणून ‘गांधर्वी’ असेही म्हणतात. त्यांची संख्या वायुपुराणात  चौतीस सांगितली आहे. घृताची, मेनका, रंभा, ⇨उर्वशी, तिलोत्तमा, सुकेशी व मंजुघोषा ह्यांचा अमरकोशात प्रसिद्ध अप्सरा म्हणून उल्लेख आहे. अप्+सरस् म्हणजे जलात क्रीडा करणाऱ्या त्या अप्सरा, अशी सायणाचार्यांची व्युत्पत्ती आहे. इंद्रसभेत नृत्यगायन करून देवांना व स्वर्गस्थ पुण्यवान पुरुषांना शृंगारसुख देणे हे त्यांचे कार्य होय.

वेदांमध्ये गंधर्वांसोबतच अप्सरांचा उल्लेख येतो. महाभारतातही त्यांचे अनेक उल्लेख आहेत. समुद्रमंथनातून

इंडोचायनामधील अप्सरा

त्यांची उत्पत्ती झाली, असे भागवतात म्हटले आहे. ब्रह्मांडपुराणात, मेरूपर्वतावर त्यांचे वास्तव्य असून ⇨कामदेव  हा त्यांचा अधिपती असल्याचे सांगितले आहे.

एखाद्याच्या उग्र तपामुळे इंद्रपदास धोका असेल, तर त्याचा तपोभंग करण्यासाठी अप्सरांची रवानगी होत असे. अप्सरांचे चौदा गण सांगितले आहेत व त्यांचे ‘दैविक’ व ‘लौकिक’ असे भेद आहेत. काही अप्सरा ब्रह्मा व मनू यांच्या मानसकन्या मानल्या असून काही देवांच्या व ऋषींच्या स्त्रिया व माता मानल्या आहेत.

खजुरोहो येथील अप्सरा शिल्प

भूतलावर येऊन त्या मनुष्यावरही प्रेम करतात, अशी कल्पना पुरूरवा–उर्वशीच्या कथेत दिसते. जलाशय, गर्द राया, नद्या, समुद्र व काही वृक्ष ही  त्यांची आवडती स्थाने. नृत्य, सुगंधी मद्य, मांस व स्नान ह्या त्यांच्या आवडीच्या गोष्टी. महाराष्ट्रातील ‘आसऱ्या’ किंवा ‘आसरा’ म्हणून ज्या देवतांचा उल्लेख केला जातो त्या अप्सरा असाव्यात. ग्रीक पुराणकथांतील ‘निंफ्स’चेही अप्सरांशी साम्य आढळते.

सुर्वे, भा. ग.