पांचरात्र : एक वैष्णव भक्तिसंप्रदाय व अनेक तंत्रमार्गांपैकी एक मार्ग. याला ‘सात्वत’, ‘भागवत’, ‘नारायणीय’ अशाही संज्ञा आहेत. वासुदेव हे विष्णूचे एक नाव आहे. वासुदेवाची भक्ती व पूजा ज्या शास्त्रात सांगितली आहे, त्यास पांचरात्र तंत्र म्हणतात. या शास्त्राचे ज्ञान, योग, क्रिया आणि चर्या असे इतर तंत्रांप्रमाणेच चार पाद म्हणजे भाग आहेत. ज्ञान म्हणजे तत्त्वज्ञान पहिल्या भागात ध्यान वा समाधियोग दुसऱ्या भागात वासुदेव व त्याचे निरनिराळे आविष्कार यांच्याकरिता निर्माण करावयाचे मंदिर आणि त्यांच्या मूर्ती कशा करावयाच्या याची क्रिया म्हणजे निर्माणपद्धती तिसऱ्या भागात आणि विविध प्रकारची पूजा करण्याचे विधी चौथ्या भागात सांगितलेले असतात. पांचरात्र विषयांमध्ये सामान्यपणे कमीजास्त प्रमाणात तत्त्वज्ञान, विविध प्रकारचे मंत्र, यंत्र म्हणजे विविध रेखाकृती, मायायोग म्हणजे जादूटोणा, ध्यान म्हणजे समाधियोग, मंदिरे व मूर्ती निर्माण करण्याची पद्धती, मंदिरांमध्ये मूर्तींची स्थापना करण्याचे विधी, दैनंदिन धार्मिक कृत्ये व संस्कार, वर्णाश्रम धर्म, उत्सव व यात्रा हे विषय येतात.

शंकराचार्यांनी ब्रह्मसूत्रशांकरभाष्यात (२·२·४२–४५) पांचरात्र आगम हा अवैदिक आहे, असे सिद्ध केले आहे. या तंत्राचा प्रवक्ता ऋषी शांडिल्य याला वेदांपासून समाधानप्राप्ती झाली नाही त्यात त्याला श्रेय सापडले नाही म्हणून या शास्त्राकडे तो वळला, अशी आख्यायिका तेथे शंकराचार्यांनी उद‌्धृत केली आहे परंतु शुक्ल यजुर्वेदाच्या ‘एकायन’ नांमक शाखेमध्ये पांचरात्र तंत्र सांगितले आहे म्हणून पांचरात्र तंत्र हे वेदमूलक आहे, अशी माहिती या संप्रदायाच्या पारमेश्वरसंहिता  या ग्रंथामध्ये सांगितली आहे (ज्ञानपाद १·३२,३३,५६,५७). या संप्रदायाच्या ईश्वरसंहिता  या ग्रंथात (३१·५३१) या शाखेला रहस्याम्नाय आणि आद्य एकायन वेद असे म्हटले आहे परंतु हा एकायन वेद  वा रहस्याम्नाय  ग्रंथ उपलब्ध नाही. तो कधीच अस्तित्वात नव्हता केवळ आपला संप्रदाय वेदमूलक आहे, हे दाखविण्याकरिताच तो कल्पिला आहे, असे अनेक संशोधकांचे व जुन्या पंडितांचेही मत आहे. ‘पांचरात्र’  ही संज्ञा या संप्रदायास दिली याचे कारण असे असणे शक्य आहे, की पाच दिवसपर्यंत ओळीने वार्षिक समारंभ या संप्रदायात चालत असावा, अशी कल्पना करता येते.  ‘पांचरात्र’ ही संज्ञा का पडली, यासंबंधी निरनिराळ्या उपपत्ती सांगितल्या आहेत: (१) पाच रात्रींमध्ये म्हणजे पाच दिवसांमध्ये शांडिल्य, औपगायन, मौंजायन, कौशिक आणि भारद्वाज या पाच योग्यांना परमेश्वराने हे शास्त्र शिकविले म्हणून यास पांचरात्र म्हणतात. (२) एका प्रातःकालापासून दुसऱ्या प्रातःकालापर्यंतचे पाच विभाग पाडून क्रमाने भक्तियुक्त अंतःकरणाने अभिगमन, उपादान, इज्या, स्वाध्याय व योग अशी पाच कर्मे करावयाची. प्रातःकाली ब्राह्म मुहूर्तावर उठल्यानंतर जप व ध्यान करीत, स्तोत्रे म्हणत, देवापाशी जायचे, यास अभिगमन म्हणतात. नंतर फुले – फळे व इतर पूजासामग्री गोळा करावयाची, याला उपादान म्हणतात. त्यानंतर पूजेत वेळ घालवायचा, या पूजेस इज्या म्हणतात. त्यानंतर धर्मग्रंथांचे पठन, श्रवण व चिंतन करणे, यास स्वाध्याय म्हणतात. संध्याकाळी पुन्हा पूजा करून योगाभ्यास करायचा व ध्यान करीतच निद्रावश व्हावयाचे. या पाच कालखंडांना पंचरात्र आणि या पाच कालखंडात जी धार्मिक कृत्ये करावयाची त्यांस पांचरात्र म्हणतात. असा हा प्रतिदिन आचरावयाचा मार्ग होय. (३) या संप्रदायाच्या भारद्वाजसंहितेमध्ये म्हटले आहे, की ब्रह्मरात्र, शिवरात्र, इंद्ररात्र, नागरात्र आणि ऋषिरात्र अशा पाच रात्री होत. म्हणून यास पांचरात्र म्हणतात. पांचरात्र ग्रंथांची, उदा., महासनत‌्कुमारसंहितेची, अशी प्रकरणे आहेत म्हणूनही या संप्रदायास पांचरात्र म्हणत असावेत. (४) शतपथ ब्राह्मणात (१३·६·१) पंचरात्रसत्र म्हणजे पाच दिवस चालवायचा आत्मयज्ञ सांगितला आहे. तो नारायण या ऋषीने सर्वात्मभावप्राप्तीकरता केला आणि त्याप्रमाणे त्याला फलप्राप्ती झाली. पांचरात्र या संज्ञेचे हे वेदातील मूळ होय, असे पांचरात्र आगमांचा संशोधक जर्मन पंडित एफ्. ओटो श्रडर याने म्हटले आहे. पांचरात्र तत्त्वज्ञानाचा महाभारतामध्ये (शांतिपर्व ३४८·६२–६३ आश्वमेधिक पर्व ११८·३३) उल्लेख आहे. विष्णुपुराणासारख्या पुराणांमध्येही याचा निर्देश आहे. महाभारतात म्हटले आहे, की या पांचरात्र विद्येचा साक्षात भगवान नारायणाने नारदास उपदेश केला हे महान उपनिषद आहे याच्यात चारही वेद व सांख्य आणि योग यांचा समावेश झाला आहे. रा.गो. भांडारकर यांनी हा वासुदेवभक्तिसंप्रदाय इसवी सनाच्या चौथ्या शतकापूर्वीपासून भारतात प्रचलित आहे, हे सिद्ध केले आहे.

भगवद‌्भक्तीने मोक्ष प्राप्त करून घेणे हे या मार्गाचे उद्दिष्ट आहे. मृत्यूनंतर दिव्य वैकुंठामध्ये साक्षात परब्रह्म अशा वासुदेवाच्या सान्निध्यात राहून त्याचा अनंत कालापर्यंत साक्षात्कार अनुभवणे म्हणजे मोक्ष होय. या वासुदेवाला ‘पर वासुदेव’ अशी संज्ञा आहे. वैकुंठप्राप्तीच्या पूर्वी मुमुक्षू जीवात्म्याने, या वासुदेवाची जी विविध रूपे आहेत, त्यांची भक्ती आणि पूजा निरंतर केल्याने मोक्ष प्राप्त होतो. परब्रह्मवासुदेवाचे पर, व्यूह, विभव (अवतार), अर्चा (पूजेच्या मूर्ती) आणि अंतर्यामी असे पाच प्रकार आहेत. त्यांची पूजा म्हणजेच भक्ती होय. परब्रह्म असा वासुदेव निर्गुण आहे म्हणजे सत्त्व, रज आणि तम हे गुण त्याच्यामध्ये नाहीत परंतु त्याच्या ठिकाणी ज्ञान, ऐश्वर्य, शक्ती, बल, वीर्य आणि तेज असे दिव्य सहा गुण आहेत. या गुणांचे विवेचन असे: चेतन व अचेतन यांनी भरलेला हा जो विश्वप्रपंच आहे, त्या सर्वांचे ज्ञान त्याला आहे. जगाची उत्पत्ती, स्थिती व लय करण्याची शक्ती त्याच्यामध्ये आहे. विश्व निर्माण करीत असताना किंवा नष्ट करीत असताना त्याला कसलेही श्रम होत नाहीत याचाच अर्थ त्याच्या ठिकाणी बल आहे. स्वतःच्या इच्छामात्रेकरून सर्व काही घडविण्याचे त्याच्या ठिकाणी सामर्थ्य आहे, हे सामर्थ्यच ऐश्वर्य होय. दुधाचे दही बनल्यानंतर दूध शिल्लक राहत नाही परंतु हा परमेश्वर विश्वात्मक बनला तरी विश्वातीत व शुद्ध स्वरूपात तसाच परिपूर्ण राहतो, हे त्याचे वीर्य होय. सृष्टी निर्माण करण्याकरिता त्याला कशाचेही साहाय्य लागत नाही, असे हे त्याचे स्वातंत्र्य म्हणजे तेज होय.

त्या निर्गुण वासुदेवाच्या ठिकाणी जी शक्ती आहे, तिलाच लक्ष्मी म्हणतात. विश्वाची विविध रूपे म्हणजे तिचेच स्वरूप होय. म्हणून तिला भूतिशक्ती म्हणतात आणि जगात विविध क्रिया सुरू आहेत, या क्रिया म्हणजे तिचेच स्वरूप होय. या स्वरूपाला क्रियाशक्ती म्हणतात. अशा या लक्ष्मीसहित परमेश्वरास लक्ष्मीनारायण अशी संज्ञा आहे. 

एका ज्वालेतून दुसरी ज्वाला निघावी त्याप्रमाणे परब्रह्मातून (१) कृष्णवासुदेव, (२) संकर्षण बलराम, (३) प्रद्युम्न व (४) अनिरुद्ध यांचे क्रमाने प्रकटीकरण होते. हेच व्यूह होत. कृष्णवासुदेव हा पूर्णावतार व विश्वाचा नियंत्रक परमेश्वर होय. संकर्षण ही देवता सर्व जीवात्म्यांची अधिष्ठात्री प्रद्युम्न सर्व मनांची आणि अनिरुद्ध सर्व अहंकारांची अधिष्ठात्री देवता होय. वरील सहा गुणांपैकी ज्ञान व बल हे गुण संकर्षणामध्ये अधिक उत्कर्षाने प्रकट होतात. वैकुंठाचेही प्रकटीकरण तोच करतो. ऐश्वर्य, वीर्य प्रद्युम्नात आणि त्याप्रमाणे शक्ती व तेज अनिरुद्धात प्रकर्षाने व्यक्त होतात. 

विभव म्हणजे अवतार मत्स्य, कूर्म, वराह इ. दशावतार या व्यूहांपासून निर्माण होतात. काही ठिकाणी पद्मनाभ, ध्रुव, अनंत, शक्तीश, मधुसूदन, विद्याधिदेव इ. ३८ अवतार सांगितले असून त्यांच्यातच कूर्म, वराह, नृसिंह, वामन, कृष्ण, परशुराम, राम व कल्की हे प्रसिद्ध अवतार अंतर्भूत केले आहेत तर काही ठिकाणी बुद्ध आणि मत्स्य यांचाही इतर अनेक अवतारांमध्ये अंतर्भाव केला आहे. अर्चावतार म्हणजे बद्रीनाथ, द्वारका, कांची इ. तीर्थक्षेत्रांतील वा कोणतीही मंत्रपूर्वक स्थापन केलेली पूजार्ह अशी वैष्णव भक्तिसंप्रदायातील मूर्ती होय. अवतार दोन प्रकारचे मुख्य व आवेश. परशुरामादी अवतारांना मुख्य अवतार म्हणत नाहीत ते अावेशावतार होत. त्यांच्यामध्ये परमेश्वर त्या त्या श्रेष्ठ कार्याकरिता प्रवेश करतो आणि कार्य झाल्याबरोबर निघून जातो. अंतर्यामी म्हणजे हृदयामध्ये परमेश्वराचे जे स्वरूप आहे ते होय. योगी लोक याचेच ध्यान करतात. 

परमेश्वराची लक्ष्मी ही जी शक्ती आहे, तीच त्रिगुणात्मक प्रकृती बनते आणि त्या प्रकृतीपासून सांख्य तत्त्वज्ञानात सांगितल्याप्रमाणे जडविश्वाचा विस्तार होतो. सांख्यांची प्रकृतीसह चोवीस तत्त्वे किंवा एका अर्थी संपूर्ण सांख्य तत्त्वज्ञान पांचरात्र तंत्राने स्वीकारले आहे. सांख्यदर्शनाचा षष्टितंत्र  नावाचा ग्रंथ दीड हजार वर्षांपूर्वी लुप्त झाला. त्याच्यातील साठ प्रकरणांचा उल्लेख पांचरात्राच्या अहिर्बुध्न्यसंहितेमध्ये आहे. यावरून असा निष्कर्ष निघतो, की या पंथाने काही शैव आणि शाक्त तंत्रांप्रमाणेच सांख्य तत्त्वज्ञानाचा स्वीकार केला आहे. या तंत्राचे सु. अडीचशे ग्रंथ निर्दिष्ट केलेले आढळतात परंतु ते सर्व आज उपलब्ध नाहीत. जयाख्यसंहिता, सात्वतसंहिता, लक्ष्मीतंत्र, नारदीय संहिता  इ. मूळ १६ ग्रंथ आतापर्यंत मुद्रित झाले आहेत. हस्तलिखित ग्रंथांपैकी ३४ मूलग्रंथ सापडतात. पंडितांनी लिहिलेले ८१ ग्रंथ लिखित किंवा मुद्रित स्वरूपात मिळतात. 

पहा : काश्मीर शैव संप्रदाय तंत्रमार्ग व तांत्रिक धर्म वैष्णव संप्रदाय शाक्त पंथ. 

संदर्भ : १. पंडित. व्ही. कृष्णमाचार्य, संपा. लक्ष्मीतन्त्रम्, उपोद‌्घात, अड्यार, मद्रास, १९५९.

    २. भट्टाचार्य, बी. संपा. जयाख्यसंहिता, प्रस्तावना, बडोदा, १९३१.

    ३.रामानुजाचार्य, एम्. डी. संपा. श्रीपांचरात्रागमांतगर्ता अहिर्बुध्न्यसंहिता, भाग ४ था, अड्यार, मद्रास, १९६६.  

जोशी, लक्ष्मणशास्त्री