असुर : देव आणि असुर यांचे झगडे ब्राह्मणग्रंथांपासून पुराणांपर्यंत वर्णिले आहेत. शुक्राचार्य व त्यांचे चार पुत्र असुरांचे गुरू होत. अमरकोशात असुरांना ‘पूर्वदेव’ म्हटले आहे. निंद्य गोष्टींना ‘आसुर’ हे विशेषण रूढ झाले. उदा., आसुर-विवाह, आसुरी आनंद इत्यादी. गीतेत आसुरी संपत्ती वर्णिली आहे. ऐतिहासिक काळात आर्यांनी त्यांच्याहून वेगळ्या अशा वन्यादी जमातींना ‘असुर’ म्हटले आहे.

वरुण, मित्र, अग्नी इ. देवांना ऋग्वेदात असुर हे आदरार्थी विशेषण लावले आहे. ‘असुर’ शब्दाची व्युत्पत्ती ‘असु+र’ ह्या शब्दापासून असून, ‘असु’ म्हणजे ‘प्राणशक्ती’ आणि ‘र’ हा ती ‘जवळ असणारा’ ह्या अर्थी प्रत्यय. दिव्य-बलशाली, श्रेष्ठप्राणशक्तियुक्त असा त्याचा मूळ अर्थ होतो. इंडो-इराणियन आर्य एकत्र असताना अत्यंत पूज्य दिव्यशक्तीला ‘असुर’ या संज्ञेने संबोधीत असत. इराणी भाषेत ‘अहुर’ हा शब्द ‘असुर शब्दाशीच संबद्ध असून तो चांगल्या अर्थाचा आहे. इंडो-इराणियन लोकांत झालेल्या कलहातून आणि फाटाफुटीतून काही शब्द भारतीयांमध्ये वाईट अर्थाचे, तर काही इराण्यांच्या अवेस्ता धर्मग्रंथात चांगल्या अर्थाचे राहिले. ह्याउलट काही शब्द भारतीयांमध्ये चांगल्या अर्थाचे राहिले, तर अवेस्तामध्ये वाईट अर्थाचे. ह्या प्रक्रियेतूनच ‘असुर’ शब्दाला ऋग्वेदोत्तर संस्कृतात वाईट अर्थ प्राप्त झाला. प्रजापतीच्या अदिती या पत्नीचे पुत्र देव आणि दिती व दनू या पत्नीचे पुत्र दैत्य वा दानव वा असुर, असे पुराणांमध्ये म्हटले आहे. सुर नव्हे ते असुर, ही व्युत्पत्ती वेदोत्तर संस्कृतात येते, ती चुकीची आहे. ‘सुर’ हा शब्दच मुळी ‘असुर’ या शब्दाच्या खोट्या व्युत्पत्तीतून संस्कृतात आला.

जोशी, लक्ष्मणशास्त्री