कल्प : भारतीय कालगणनेचे हे एक प्रचंड पौराणिक परिमाण आहे. ह्या परिमाणास ब्रह्मदेवाचा दिवस म्हणतात. मानवाचे एक वर्ष म्हणजे देवांचा एक दिवस आणि मानवाची ३६० वर्षे म्हणजे देवांचे एक वर्ष. यामुळे देवांची वर्षे मानवी वर्षांत किंवा मानवी वर्षे देववर्षांत रूपांतरित करावयास १ : ३६० या गुणोत्तराचा उपयोग करावा लागतो.

निरुक्त, मनुस्मृती तसेच पुराणे व ज्योतिषग्रंथ यांत युगपद्धती सांगितली आहे. युगसंख्या एकूण चार असून त्यांना अनुक्रमे कृत, त्रेता, द्वापर आणि कली अशी नावे आहेत. ही सर्व युगे मिळून एक महायुग होते. अशी १,००० महायुगे मिळून एक कल्प होतो. बह्मदेवाची रात्रदेखील कल्पाइतकीच मोठी आहे. त्यामुळे दोन कल्प मिळून ब्रह्मदेवाची एक अहोरात्र होते.

प्रत्येक युगाचे तीन भाग असतात. युगाच्या प्रारंभीची काही ठराविक वर्षे संध्यावर्षे म्हणून, तर युगान्तीची तेवढीच वर्षे संध्यांशवर्षे म्हणून ओळखली जातात. या दोन वर्षसंख्यांमध्ये युगाचा मुख्य भाग असतो. खालील कोष्टकात प्रत्येक युगातील देववर्षांच्या आणि मानवी वर्षांच्या संख्या मांडून महायुगातील आणि कल्पातील वर्षसंख्या दाखविल्या आहेत :

युग

देववर्षे

मानववर्षे

संध्य

मुख्य भाग

संध्यांश

एकुण

संध्या

मुख्य भाग

संध्यांश

एकूण

कृत

४००

४,०००

४००

४,८००

१,४४,०००

१४,४०,०००

१,४४,०००

१७,२८,०००

त्रेता

३००

३,०००

३००

३,६००

१,०८,०००

१०,८०,०००

१,०८,०००

१२,९६,०००

द्वापर

२००

२,०००

२००

२,४००

७२,०००

७,२०,०००

७२,०००

८,६४,०००

कली

१००

१,०००

१००

१,२००

३६,०००

३,६०,०००

३६,०००

४,३२,०००

महायुग

 —

 —

 —

१२,०००

 —

 —

 —

४३,२०,०००

कल्प

 —

 —

 —

१,२०,००,०००

 —

 —

 —

४,३२,००,००,०००

गुर्जर, ल. वा.