प्रसाद : देवता, गुरू, संत, ऋषी इत्यादींनी संतुष्ट होऊन कोणत्याही व्यक्तीला दिलेला विशिष्ट पदार्थ म्हणजे प्रसाद होय. तो देवतादिकांनी स्वतः प्रसन्न होऊन दिलेला असेल अथवा देवतादिकांना अर्पण केलेला असेल. ‘प्रसाद’ या शब्दाने आकाशाची निरभ्रता, पाण्याची निर्मलता आणि मनाची प्रसन्नता दर्शविली जाते. देवादिकांचा प्रसाद म्हणजे त्यांची प्रसन्नता, हा मूळचा अर्थ होय. देवाला वा पूज्य व्यक्तीला अर्पण केलेल्या वा त्याने स्वीकारलेल्या पदार्थाचा भाग आणि कथापुराणांच्या वाचनानंतर जो श्रोत्यांत वाटण्यात येतो, त्यास प्रसाद म्हटले जाते. हा प्रसाद म्हणजे देवादिकांच्या प्रसन्नतेचे मूर्त प्रतीक होय. मूर्तीच्या अंगाला तांदूळ वा फुलांच्या पाकळ्या चिटकवून कौल लावण्याचा क्रियेला कोकणात ‘देवाचा प्रसाद घेणे’, असे म्हणतात. हिंदू लोक मूर्तीला स्नान घालून त्या पाण्याचे जे तीर्थ घेतात, ते प्रसादाशी निगडित असल्यामुळे ‘तीर्थप्रसाद’ असा शब्द तयार झाला आहे. असेच तीर्थ झ्यूनी इंडियन लोकही घेतात. गोल्डकोस्टमध्ये जेव्हा एखादे कुटुंब विभक्त होई, तेव्हा पुरोहित एका मूर्तीचे चूर्ण करी व ते एका द्रवात मिसळून त्याचा एक घोट प्रत्येक कुटुंबियाला देई. हा प्रकार प्रसादाच्या संकल्पनेशी जुळणाराच आहे. येशूने स्वतःच्या अटकेपूर्वी आपल्या अनुयायांना द्राक्षारस व भाकरीचे तुकडे दिले होते, या गोष्टीचीही प्रसादाशी तुलना करणे शक्य आहे.

बहुसंख्य प्रसाद हे अन्नद्रव्ये, फळे, वस्त्रे, फुले इ. स्वरूपांत असतात. नरबळीनंतर बळीचे मांस खाण्याची प्रथा काही लोकांत होती. प्रसादाचा एक अंश हा संपूर्ण प्रसादाइतकाच प्रभावी मानला जातो. अनुग्रहाच्या भावनेने मस्तकावर हात ठेवणे, स्पर्श करणे, कल्याणाचा आशीर्वाद देणे इ. कृतीही प्रसादच होत. क्वचित गुरूच्या लाथा–बुक्क्या वा त्याचे उष्टे अन्न हाही प्रसाद मानला जातो.

अर्पण केलेल्या अन्नाचा काही भाग देवता सेवन करते, त्या अन्नाचे ती फक्त दर्शन घेते वा केवळ त्यांचा गंध, रस, रक्त, सत्त्व इत्यादींनी तृप्त होते, असे लोक मानतात. उरलेले अन्न पवित्र, सामर्थ्यशाली व कल्याणकारक असल्यामुळे त्याला देवाचा प्रसाद मानून ते भक्तांनी खाणे, हे स्वाभाविकच आहे. फिजी बेटातील लोक आणि दार्जिलिंगचे लिंबू लोक देवासाठी प्राणी अर्पण करताना त्याचे प्राण देवाला आणि शरीर भक्तांना, असे मानत. इझ्राएल, बॅबिलन, ग्रीस, रोम, ईजिप्त इ. ठिकाणी आणि ट्यूटॉनिक लोकांतही देवांना अन्न अर्पण केल्यानंतर उरलेले अन्न खाण्याची प्रथा होती. ही पद्धत भारतीयांच्या प्रसादकल्पनेशी बऱ्याच प्रमाणात समान आहे.

प्रसादाच्या रूपाने देवतेची वा श्रेष्ठ व्यक्तीची शक्ती आपल्या पाठीशी उभी राहते प्रसादामुळे संतती, संपत्ती, आरोग्य, साम्राज्य इ. प्राप्त होतात प्रसाद आप्तेष्टांना वाटावा तो डाव्या हाताने घेऊ नये त्याचा अव्हेर करू नये इ. समजूती हिंदूंमध्ये आहेत. प्रसादाचा अव्हेर केल्यामुळे प्रचंड हानी झाल्याच्या आणि तो स्वीकारल्यामुळे कल्याण झाल्याच्या अनेक पुराणकथा आढळतात.

देवादिकांचे सामर्थ्य आपल्यापेक्षा अधिक असल्यामुळे त्यांच्या क्रोधाने आपले अहित होते आणि त्यांना क्रोध आला असल्यास प्रसादाने तो दूर होऊन आपले कल्याण होते, हे प्रसादामागचे गृहीत तत्त्व होय. आपण काही पाप केल्यामुळे देव आपल्यावर रागावला आहे, असे भक्ताला वाटत असेल, तर प्रसाद हे ईश्वराचा राग दूर झाल्याचे चिन्ह ठरते. आपल्याला काहीतरी हवे असताना देवाची पूजा केली असल्यास, प्रसाद हे ईश्वर आपल्याला ती वस्तू देणार असल्याचे चिन्ह ठरते.

साळुंखे, आ. ह.