शाकाहारवाद : शाकाहार हा मांसाहारापेक्षा श्रेष्ठ असून तोच मानवाचा आदर्श आहार आहे, ही भूमिका `शाकाहारवाद’ ह्या संज्ञेने निर्दिष्ट केली जाते. शाकाहार हा मांसाहाराच्या विरोधी असल्याचे सामान्यत: मानले जात असले, तरी जे मांसाहार करतात, त्यांना शकाहाराचे वावडे असल्याचे दिसत नाही. तथापि जे शाकाहारी असतात, ते मात्र मांसाहार वर्ज्य मानतात. शाकाहारात कोणत्या अन्नपदार्थांचा समावेश असावा, ह्याबद्दल काही थोडे मतभेदही आढळून येतात. काहींच्या मते शाकाहार म्हणजे शुद्ध सस्याहार (धान्याचा आहार) किंवा शुद्ध वनस्पतिज पदार्थांपासून बनविलेल्या अन्नाचे सेवन. त्यांच्या मते अंडी वा दूध हे दोन्ही पदार्थ प्राणिज असल्यामुळे त्यांचा शाकाहारात समावेश होऊ शकत नाही. काहींच्या मते शाकाहारात दुधाचा समावेश करायला हरकत नाही परंतु अंड्यांचा समावेश नसावा. आणखी काहींच्या मते दूध आणि अंडी हा शाकाहाराचाच भाग मानला, तरी चालेल.

भूक हा शरीरधर्म आहे. काहीतरी अन्न खाल्ल्याशिवाय मनुष्य जगू शकत नाही. अशा परिस्थितीत मनुष्याचा आहार त्याला सुलभतेने कोणत्या प्रकारचे अन्न उपलब्ध होते, ह्यावर बऱ्याच प्रमाणात अवलंबून असतो. त्यामुळे निरनिराळ्या लोकसमूहांच्या आहारात फरक पडतो. मांस वा मासे हे काही लोकसमूहांचे मुख्य अन्न झाले, ह्याचे हे एक महत्त्वाचे कारण आहे. जे नेहमी मांसाहार करतात, तेही लोक काही विशिष्ट दिवशी धर्मपालनार्थ मांसाहार वर्ज्य करतात.

शाकाहार हा मांसाहारापेक्षा श्रेष्ठ असून तो मानवाचा आदर्श आहार आहे, ही भूमिका वैज्ञानिक (शरीरक्रियाविज्ञान तथा पोषणमूल्ये इ.) आणि नैतिक अशा दोन वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून मांडण्यात येते. वैज्ञानिक भूमिका थोडक्यात अशी : शाकाहार हा माणसाचा स्वाभाविक आहार आहे. त्याचे शरीरावर होणारे परिणाम आयोग्यदायी आहेत. मानवी शरीराची संपूर्ण रचना शाकाहारासाठीच आहे व वाढत्या हृदयविकाराचे व कर्करोगाचे एक कारण मांसाहार आहे, या बाबी विज्ञानसिद्ध आहेत, असेही म्हटले जाते. तथापि हे सर्व शास्त्रीय पुराव्यांनी सिद्ध करणे अवघड आहे. ह्याउलट शाकाहारात अंतभूर्त असलेले साखर आणि पिष्टमय पदार्थ ह्यांचे सेवन, विशेषत: पिष्ठमय पदार्थांचे अतिरेकी सेवन, हे मांसात आढळणाऱ्या युरिक अम्लाइतकेच अनिष्ट आहे, असेही मत मांडले जाते. मांसाहार हा लैंगिक वासना वाढवितो, त्यामुळे ज्यांना संयमी जीवन जगायचे आहे, त्यांनी मांसाहार वर्ज्य करावा, असेही सांगण्यात येते. तथापि ह्या मतालाही निर्णायक असे प्रमाण मिळत नाही कारण विषयासक्त वृत्तीची शाकाहारी माणसेही आढळतात. शाकाहार हा निसर्गाचे संतुलन राखणारा व पर्यावरणाचा ऱ्हास थांबवणारा आहे, असेही मत असून त्यास वैज्ञानिक आधार असल्याचा दावा करण्यात येतो. शाकाहारवादामागची नैतिक भूमिका ही मुख्यत: भूतदयेच्या विचारावर आधारलेली आहे. फळे, भाज्या ह्यांचे सेवन करून माणसाला राहता येत असेल, तर प्राणिहत्या का करावी? तसे करण्यात माणसाचा स्वार्थीपणा दिसून येतो. मांसासाठी प्राण्याची हत्या करताना ती शक्य तितकी वेदनारहित होईल, अशी यंत्रणा आधुनिक खाटिकखान्यांतून असते असा दावा केला जात असला, तरी मुळात प्राण्याचा जीव घेऊन त्याचा जगण्याचा हक्क हिरावून घेणे, हेच अनैतिक आहे. शिवाय आपल्या शरीराचे लचके तोडल्यास आपल्याला जसे दु:ख होईल, तसेच ते प्राण्यालाही होत असते. आपल्याला कोणी गळा दाबून गुदमरविल्यास आपल्याला जशा यातना होतील, तशाच त्या पाण्याबाहेर ओढून आणलेल्या माशाला होत असतात. महात्मा गांधी हे शाकाहाराचे कट्टर पुरस्कर्ते होते. मांसाहार वर्ज्य करावा, हा विचार म्हणजे हिंदू धर्मातील अहिंसेचे उत्कृष्ट प्रत्यंतर होय, असे ते म्हणत. बौद्ध व जैन धर्मांतील प्राणिहिंसा निषिद्ध आहे. सूफी पंथीय लोकही निरामिष आहार घेतात.

जैन धर्मात एकेंद्रिय वनस्पतीही ‘जीव’ मानल्या गेल्या आहेत. त्यामुळे प्राणिमात्रांवर दया करावयाची असल्यास, ती वनस्पतींवरही केली पाहिजे. असे ह्या धर्मात मानले गेले. जैन मुनी तर अहिंसेच्या बाबतीत अत्यंत आग्रही आहेत. आपल्या आहारात ते दूध वर्ज्य मानतात त्याचप्रमाणे ज्या धान्यातून पुढे उत्पत्ती होणार नाही, असे तीन वर्षांहून जुने धान्य ते खातात.

इ. स. अठराव्या शतकात युरोपात नव्या आर्थिक, वैज्ञानिक व नैतिक विचारप्रणाल्यांमुळे शाकाहारवादाची ठळकपणे ओळख होऊ लागली. तथापि शाकाहारवादाची चळवळ एकोणिसाव्या शतकातच सुरू झाली. तथापि मांसाहार निषिद्ध मानण्याची प्रवृत्ती मात्र खूप जुनी आहे. विशिष्ट धार्मिक विधी तसेच उपासना यांसाठी प्राचीन काळी मांसाहार तात्पुरता किंवा कायमचा वर्ज्य करण्यात येत असे. ग्रीक गणितज्ञ व तत्त्वज्ञ ⇨पायथॅगोरसने प्रथम मांसाहार वर्ज्य करण्याची शिकवण दिली होती. अर्थात त्यामागे पशुपक्ष्यांच्या हिंसेचा, विशेषत: धार्मिक विधींमध्ये पशूंचे बळी देण्याच्या प्रथेचा निषेध करण्याची भूमिका होती. पश्चिमी प्रबोधन काळात जी मानवतावादी विचारप्रणाली पुढे आली, त्यामुळे पशुपक्ष्यांची हत्या आणि अनुषंगाने मांसाहार यांविरुद्ध विचार पुढे येऊ लागले. १८०९ मध्ये मँचेस्टर येथे बायबल ख्रिश्चन चर्चच्या काही सदस्यांनी मद्य-मांस वर्ज्य करण्याची शपथ घेतली. यातूनच १८४७ मध्ये स्वतंत्र अशा शाकाहारवादी संस्थेची स्थापना झाली. अमेरिका, जर्मनी व फ्रान्स येथे अशा प्रकारच्या शाकाहारवादी संस्था अनुक्रमे १८५०, १८६७ व १८९९ मध्ये सुरू झाल्या. १९०८ साली उत्तर आयर्लंडमध्ये ‘इंटरनॅशनल व्हेजिटेरिअन युनियन’ स्थापन झाली. या संस्थेतर्फे शाकाहारास पूरक व पोषक अशा प्रकारची माहिती नियतकालिकाच्या रूपाने प्रसिद्ध करण्यात येते. विसाव्या शतकात शाकाहारी उपाहारगृहे, शाळा, विश्रांतिगृहे वगैरे स्वतंत्रपणे सुरू झाल्याचे दिसते.

उपाध्ये, आ. ने. कुलकणी, अ. र.

भारतात ‘वर्ल्ड व्हेजिटेरिअन्‌ कॉंग्रेस’ या जुन्या व मोठ्या अशा आंतरराष्ट्रीय संस्थेची शाखा कार्यरत आहे. त्याशिवाय ब्यूटी विदाउट क्रूएल्टी, पेटा, सर्व जीव मंगल प्रतिष्ठान, साधू वासवानी मिशन, इस्कॉन, ओशो कम्यून, महावीर अहिंसा, बह्मकुमारी ट्रस्ट अशा अनेक स्वयंसेवी संस्था व संघटना शाकाहारवादाचा प्रसार करीत आहेत. महाराष्ट्रातील वारकरी तसेच इतरही धार्मिक संप्रदाय शाकाहाराचे पुरस्कर्ते आहेत. अनेक साधुसंतही शाकाहारवादाचा पुरस्कार करतात. भारतात जागतिक शाकाहार परिषदेचेही नित्यनेमाने आयोजन केले जाते. शाकाहारवादाचा प्रसार करणाऱ्या व्यक्ती, संस्था, संघटन इत्यादींना पुरस्कारही दिले जातता. उदा., द व्हेजिटेरिअन्‌ ऑफ द इअर, महावीर अहिंसा पुरस्कार, शाकाहार-प्रिय पुरस्कार इत्यादी.

पहा : अहिंसा आहार व आहारशास्त्र आहार व औषधी मांस उद्योग.

संदर्भ : १. गंगवाल, कल्याण, शाकाहारच का? पुणे, १९९७.

           २.पानसे, के.वि. शाकाहार व मांसाहार, पुणे, १९६६.

           ३. भागवत, रा. स. कुंटे, बाळ हरि, शाकाहार की मांसाहार, पुणे.

गंगवाल, कल्याण