देवोत्पत्तिशास्त्र: (थिऑगनी). विश्वातील सर्व वस्तू व प्राणी यांची जशी उत्पत्ती झालेली असते, तशीच देवदेवतांचीही उत्पत्ती झालेली असते, असा विचार मांडून देवोत्पत्तिची चर्चा करणारे शास्त्र म्हणजे देवोत्पत्तिशास्त्र होय. पुराणकथांमध्ये विश्वाची उत्पत्ती सांगत असतानाच देवांचीही उत्पत्ती सांगितलेली असते आणि म्हणूनच देवोत्पत्तिशास्त्र हे विश्वोत्पत्तिशास्त्राचाच एक भाग असते. अपवाद एवढाच, की अजन्मा वा अजरामर, अनाद्यनंत, शाश्वत, उत्पत्ती व विनाश नसलेला देव प्रगल्भदशेस पोहोचलेल्या धर्मांमध्ये वा धर्माच्या प्रगल्भ उन्नत अवस्थेत वर्णिलेला दिसतो. अथर्ववेदात व उपनिषदांत परब्रह्म वा महेश्वर असा एकच अजब व अमर देव मानला आहे. यहुदी, ख्रिस्ती, इस्लाम इ. धर्मांमध्येही ईश्वर अज व अमर मानला आहे. उपनिषदांनंतर ब्रह्मा, विष्णू, शिव, शक्ति इत्यादींपैकी एक अज व अमर मानून इतर देवांची त्याच्यापासून उत्पत्ती सांगितली आहे. जगातील बहुतेक सर्व संस्कृतींमध्ये देवांची उत्पत्ती सांगणाऱ्या पुराणकथा आढळतात, या कथांमध्ये बऱ्याच वेळा देवांना अमर मानलेले असले, तरी ‘अज’ मात्र मानलेले असत नाही. त्यामुळेच या कथांतून देवांच्या जन्माविषयीच्या अद्‌भुत घटना, त्यांच्या आईवडिलांची नावे, त्यांची जन्मस्थाने, त्यांच्या वंशावळी इ. विषयांची चर्चा असते. देवांची उत्पत्ती स्त्रीपुरुषसंबंधातून न होता इतर कोणत्या तरी अद्‌भुत पद्धतीने झाली, असे वर्णन अनेकदा आढळते. त्यामुळेच देवांची परस्परांशी असलेली नाती ही कित्येकदा गूढ, विलक्षण व अनिश्चित असतात. जगातील बहुतेक सर्व लोकांनी देवोत्पत्तिच्या घटनेमागे पृथ्वी व आकाश यांचे महत्त्वाचे स्थान मानलेले दिसते. जलतत्त्वापासून देवांची उत्पत्ती होते, ही कल्पनाही अनेक ठिकाणी आढळते. जगातील प्रमुख संस्कृतींमध्ये आढळणाऱ्या देवोत्पत्तीविषयीच्या काही समजुती पुढीलप्रमाणे :

वैदिक देवतांची उत्पत्ती सांगणाऱ्या अनेक कथा वेदांत आढळतात. पुराणादी ग्रंथांतून हिंदूंच्या देवांची उत्पत्ती सांगणाऱ्या अनेक कथा आढळतात. पृथ्वी व स्वर्ग (किंवा आकाश) हे देवांचे आईवडील आहेत जलतत्त्वापासून देवांची निर्मिती झाली विश्वनिर्मितीनंतर देवांची निर्मिती झाली उषा ही सूर्याची जननी आहे ती सर्व देवांची माता आहे प्रजापती, ब्रह्मणस्पती किंवा सोम हा देवांचा पिता आहे इ. मते ऋग्वेदात आढळतात. विशेषतः ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलाप्रमाणे (सूक्त ७२) देवांच्या पूर्वीच्या युगात असतातून सत् झाले. अदितीपासून दक्ष व दक्षापासून अदिती झाली. अदितीच्या देहातून आठ आदित्य झाले. तैत्तिरीय ब्राह्मणात हे आठ पुत्र म्हणजे मित्र, वरूण, धाता, अर्यमा, अंश, भग, विवस्वान् व इंद्र होत असे म्हटले आहे. आठवा मार्तांड (सूर्य) होय, असे ऋग्वेदावरून दिसते. अथर्ववेदात एके ठिकाणी ‘असता’ पासून देवांची निर्मिती झाली, असे म्हटले आहे तर दुसऱ्या एका ठिकाणी काही देवांना पिता व काहींना पुत्र म्हटले आहे. ब्रह्मदेवाचा जन्म विष्णूच्या नाभिकमलातून, तर विष्णूचा जन्म अदितीच्या पोटी झाला मित्र, वरुण इ. आदित्य हे कश्यप व अदिती यांचे पुत्र होत लक्ष्मी समुद्रमंथनातून जन्माला आली पार्वती ही हिमालयाची मुलगी आहे कार्तिकेय व गणेश हे शंकराचे पुत्र होत इ. कथा पुराणांतून आढळतात.

हीसिअड या ग्रीक कवीने इ. स. पू. आठव्या शतकात लिहिलेल्या थिऑगनी म्हणजेच देवोत्पत्तिशास्त्र या नावाच्या काव्यात ग्रीक देवांच्या जन्मविषयक कथा दिल्या आहेत. त्याने या काव्यात विश्वनिर्मिती, देवांच्या अनेक पिढ्यांची निर्मिती आणि नंतरची मानवी युगे यांची वर्णने दिली आहेत. त्यांमध्ये देव व मानवस्त्रिया किंवा मानवपुरुष व देवस्त्रिया यांच्या संबंधांतून निर्मिती झाल्याच्या कथाही आहेत. त्याच्या मते प्रथम केऑस किंवा शून्य होते. त्यातून जीआ (पृथ्वी) आणि ईरॉस (काम) यांची निर्मिती झाली. पृथ्वीने प्रथम युरानस (स्वर्ग), पर्वत आणि समुद्र यांना जन्म दिला. नंतर युरानस बरोबर झालेल्या तिच्या संयोगातून बारा टाइटन्स निर्माण झाले. त्यांतील सर्वांत धाकटा क्रोनस हा होता. क्रोनसला त्याची बहीण रीया हिच्या पासून हेस्टिआ, डीमीटर व हेरा अशा तीन मुली आणि हेडीझ, पोसायडन व झ्यूस असे तीन मुलगे झाले. या सर्व देवता होत. झ्यूसला अथीना ही मुलगी आणि अपोलो हा मुलगा झाला. याखेरीज अफ्रोडाइटी, एरीझ, हर्मीझ इ. देवतांच्या जन्मविषयक कथा आहेत. ग्रीस मध्ये इ. स. पू. सहाव्या शतकापासून इसवी सनाच्या प्रारंभापर्यंत ऑर्फिअस या लेखकाच्या लिखाणावर आधारलेल्या ऑर्फिक तत्त्वांच्या प्रभावामुळे अनेक देवोत्पत्तिशास्त्रे निर्माण झाली. ती हीसिअडच्या परंपरेपासून बरीच वेगळी होती आणि त्यांना फारशी लोकप्रियताही लाभली नाही.

चीनमध्ये जेड एम्परर म्हणजेच यू-ह्‌वांग हा देव सर्वश्रेष्ठ मानला जातो. त्याची मुलगी, पत्नी, बहिणीची मुलगी इत्यादींनाही देवता मानले आहे. या नात्यांवरून देवोत्पत्ती मानण्याची वृत्ती दिसून येते. जपानमध्ये शिंतो धर्माच्या पुराणकथांतून देवतांच्या जोड्या निर्माण झाल्याचे वर्णन आढळते. त्यांपैकी ईझॅनगी व ईझॅनमी ही एक जोडी होय. या दोघांपासून नंतरच्या सर्व शिंतो देवता निर्माण झाल्या. समुद्र, वायू, वृक्ष, पर्वत, अग्नी, सूर्य व चंद्र या देवता ईझॅनमीपासून निर्माण झाल्या अशा कथा आहेत. पॉलिनीशियामध्ये पृथ्वीमाता व आकाशपिता यांपासून सर्व देवतांची उत्पत्ती झाली, अशा कथा आहेत. आकाश व पृथ्वी यांपासून रंगी आणि पपा हे आद्य दांपत्य निर्माण झाले आणि त्यांच्यापासुन तेन, तंगारो, तू, रोंगो, हौमिया व तव्हिरी या देवांचा जन्म झाला.


मेक्सिकन आणि मध्य अमेरिकन पुराणकथांत अत्यंत सामर्थ्यशाली मानल्या जाणाऱ्या काते-झाल-को-अत्ल या देवतेचा जन्म को-अत्लीक या मातेच्या उदरी झाल्याचे प्रसिद्ध आहे. ब्राझीलमधील अनेक जमातींची देवता जुरुपरी म्हणजे जननेंद्रिय नसलेल्या एका कुमारिकेला झालेले अपत्य होय, अशी समजूत आहे.

ईजिप्तमधील पुराणकथांत अतम या देवाने नन या आद्य समुद्रातून स्वतःची उत्पत्ती केली, असे मानले आहे. त्याने (अथवा ‘रा’ वा ‘रे’ या देवाने) इतर देवांना निर्माण केले. त्यांपैकी शू हा याचा मुलगा व तेफ्नूत ही मुलगी होय. शू व तेफ्नूत यांना गेब (पृथ्वी) हा मुलगा व नट (आकाश) ही मुलगी झाली. गेब व नट यांना इसिस, ओसायरिस, नेफ्थिस आणि सेत ही चार मुले झाली. इसिस व ओसायरिस यांना होरस हा मुलगा झाला. काही कथांत होरस याला गेब व नट यांचा मुलगा मानले आहे, तर काही ठिकाणी नट ही सर्व देवांची माता असे म्हटले आहे.

सुमेरियन कल्पनेनुसार अन (आकाश) आणि की (पृथ्वी) यांच्यापासून एन्लिल ही वायुदेवता निर्माण झाली. एन्लिल आणि निन्लिल यांच्यापासून नन्ना ही चंद्रदेवता जन्मली. नन्ना आणि निंगल यांच्यापासून उतू ही सूर्यदेवता जन्मली. बॅबिलोनियन लोकांच्या मते अप्सू (गोड पाण्याचा समुद्र) आणि तैमात (खारट पाण्याचा समुद्र) यांच्या संयोगातून देव निर्माण झाले. त्यांचा श्रेष्ठ देव मार्डुक हा एआ नावाच्या देवतेपासून जन्मला. आशिया मायनरमधील हिटाइट लोकांच्या कथांतून त्यांच्या ‘अनुस’ सारख्या देवतांच्या जन्मकथा आढळतात.

साळुंखे, आ. ह.