सोमयाग : सोम वनस्पतीचा रस काढून वेदांमध्ये सांगितलेल्या पद्धतीने त्याचा देवतांसाठी करावयाचा यज्ञ. ज्याने विधिपूर्वक श्रौताग्नीची स्थापना केली आहे, असा यजमान आपल्या पत्नीसह या यज्ञाचा अधिकारी असतो. हा यज्ञ करण्यापूर्वी त्याने दर्शपूर्णमासेष्टी [ ⟶ दर्शपूर्णमास], ⇨ चातुर्मास्य आणि पशुयाग हे केलेले असले पाहिजेत. वसंत ऋतूत मुख्यत्वेकरून हा याग करावयाचा असतो. ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद यांतील मंत्र त्यासाठी उपयोगात आणावयाचे असतात. या यज्ञासाठी एकूण सोळा ऋत्विज (यज्ञीय पुरोहित) लागतात. त्यांचे चार गट असतात. वरील तीन वेदांचा प्रत्येकी एक गट असतो. यजुर्वेदी ऋत्विजांमध्ये ‘अध्वर्यू’ हा प्रमुख असतो. ऋग्वेदीयांमध्ये ‘होता’ आणि सामवेदीयांमध्ये ‘उद्गाता’ प्रमुख असतो. ‘ब्रह्मा’ हा चौथ्या गटाचा प्रमुख असतो. यांशिवाय सदस्य नावाचा एक ऋत्विज असतो. तसेच दहा किंवा अकरा चमसाध्वर्यू असतात.
स्वर्गप्राप्ती ही सोमयागाची मुख्य कामना आहे. अल्प कामनांच्या पूर्तीसाठीही सोमयाग करतात तथापि नित्य सोमयाग कामनारहित असतो. ज्या यागात सोमाचे हवन एकच दिवस असते, त्या यागाला एकाह असे नाव आहे. एकाहात अग्निष्टोम हा प्रकृतिभूत याग आहे. त्यात काही बदल करून आणि भर घालून इतर एकाह सोमयाग होतात. अग्निष्टोम, अत्यग्निष्टोम, उकथ्य, षोडशी, वाजपेय, अतिरात्र व अप्तोऱ्याम या सोमयागाच्या सात संस्था आहेत.
सोमयागासाठी यजमान आणि यजमानपत्नी यांनी ⇨ दीक्षा घ्यावयाची असते. दीक्षेचे किमान तीन दिवस असतात. यज्ञासाठी स्वतंत्र यागशाळा उभारलेली असते. तीत यजमानाचे गार्हपत्य, आहवनीय आणि दक्षिण नावाचे श्रौताग्नी आणले जातात. दीक्षेच्या वेळी यजमानास दण्ड दिला जातो. यजमान व त्याची पत्नी कमरेभोवती दर्भाची मेखला बांधतात. दीक्षणीया नावाची इष्टी केली जाते. त्यानंतर प्रारंभदर्शक प्रायणीया इष्टी होते. सोमवल्ली विकत घेतली जाते. सोमाच्या आदरार्थ आतिथ्या इष्टी होते. पुढे तीन दिवस प्रवग्यर्र्विधि व उपसद् नावाची इष्टी सकाळी आणि संध्याकाळी केली जाते. चवथ्या दिवशी महावेदी मापून घेतात व उत्तरवेदीचा ओटा तयार करतात. पशूसाठी यूप (खांब) पुरतात. या दिवशी पशुयाग होतो. पशूऐवजी तुपाची आहुती देण्याचीही प्रथा आहे. पाचव्या दिवशी पहाटेपासून अनुष्ठान सुरू होते. त्यात प्रातःसवन, माध्यंदिन सवन आणि तृतीय सवन (सायंसवन) असे तीन भाग असतात. माध्यंदिन सवनात ऋत्विजांना दक्षिणा दिली जाते. तिन्ही सवनांत मिळून शस्त्र नावाचे ऋचांचे बारा समूह म्हटले जातात आणि सामगानाची बारा स्तोत्रे गायिली जातात. स्तोत्रांनंतर शस्त्र व त्यानंतर सोमरसाचा याग असा क्रम चालतो. शेवटी अवभृथ नावाचा उपसंहारात्मक विधी होतो. त्यांत यजमान, पत्नी व ऋत्विज यज्ञसमाप्तिदर्शक स्नान करतात. सोमाने लेपलेली पात्रे वाहत्या पाण्यात सोडून देतात. तेथे पाण्यातच वरुण देवतेसाठी अवभृथ नावाचीच इष्टी होते. अवभृथानंतर परत येताना समिधा गोळा करून यज्ञमंडपात सर्वजण येतात. शालामुखीय अग्नीवर त्या समिधांची आहुती देतात. तेथेच उदयनीय इष्टी केली जाते. शेवटी मंडप विसकटून उरलेले दर्भ आहवनीयावर जाळून टाकतात. देवतांची प्रार्थना करून यजमान व त्याची पत्नी अग्नीसह तेथून निघतात. दुसरीकडे उदवसानी इष्टी करतात.
घरी परतल्यानंतर संध्याकाळी ⇨ अग्निहोत्र होमाचे अनुष्ठान केले जाते. ज्या यागांत एकच दिवस सोमाहुती देतात, त्यास एकाह म्हणतात. दोन पासून बारा दिवसांपर्यंत दररोज एक याप्रमाणे सोमयाग केले तर त्यास अहीन म्हणतात बारा दिवस सोमाच्या आहुती दिल्या जाणाऱ्या यागास द्वादशाह म्हणतात. द्वादशाह हा अहीन आणि सत्ररूप असा दोन प्रकारचा आहे. बारापेक्षा अधिक दिवस सोमाहुती दिल्या जाणाऱ्या यज्ञास सत्र म्हणतात. एक वर्ष किंवा त्याहून अधिक काळ सोमाहुती दिल्या जाणाऱ्या यज्ञास अयन असेही म्हणतात. सत्रात सर्व ऋत्विजही यजमान समजले जातात. म्हणून सत्रात दक्षिणा दिली जात नाही.
पहा : यज्ञसंस्था श्रौत धर्म सोम.
काशीकर, चिं. ग. धर्माधिकारी, त्रि. ना.