अब्राहम : (सु. २००० इ.स.पू.) बायबलच्या ‘जेनसिस’ नावाच्या भागात वर्णिलेला पहिला ज्यू प्रेषित.त्याचे मूळ नाव एब्रम होते. त्याचा जन्म मेसोपोटेमियात झाला. ईश्वरी साक्षात्कारानुसार तो कनान लोकांच्या प्रदेशात (पॅलेस्टाइनला) आला. तेथे त्याला साक्षात्कार झाला, की त्याचे वंशज राज्य करतील. औरस संतान नसल्यामुळे पत्‍नी साराय (साराह) हिच्या सूचनेवरून, तिच्या दासीपासून त्याला वयाच्या ८६ व्या वर्षी इश्मेएल नावाचा मुलगा झाला. वंशातील सर्व मुलांचा आठव्या वर्षी सुंता करावा,  असा अब्राहमला ईश्वरादेश मिळाला. पुढे त्याच्या पत्‍नीलाही आयझाक हा मुलगा झाला. मुलाला बळी देण्याचा ईश्वरी आदेश येताच अब्राहम त्यासाठी सिद्ध झाला तेव्हा आकाशवाणी झाली, की ‘बळी देऊ नकोस, तुझी परीक्षा घेतलीआशीर्वाद देतो, की तुझा वाढता वंश राज्य करील.’ अब्राहम पावणेदोनशे वर्ष जगला असे मानतात. इस्लामधर्मीय त्याला ‘हजरत इब्राहीम’ संबोधतात.

पहा : ज्यू धर्म बायबल.

माहुलकर, दि. द.