कुराण : मुसलमानांचा सर्वश्रेष्ठ धर्मग्रंथ. ‘कर आ’ (वाचणे, म्हणणे) या अरबीतील धातूचे ‘कुर्आन’ (कुराण) हे कृदंत आहे. स्वर्गात ईश्वराजवळ स्वयंसिद्ध कुराणाची मूळ प्रत आहे. ईश्वराने आपला देवदूत  गॅब्रिएल याच्यामार्फत मुहंमद पैगंबराकडून याचे हप्त्याहप्त्याने एकंदर बावीस वर्षांच्या कालावधीत (इ.स. ६१० ते ६३२) वाचन करवून घेतले, अशी मुसलमानांची श्रद्धा आहे. मुहंमदाच्या मुखावाटे जो भाग वाचला जाई, तो त्याचे अनुयायी ताबडतोब पाठ करून घेत असत आणि काही वेळा ताडपत्रावर लिहून ठेवीत असत. आदमपासून मुहंमदापर्यंतच्या शेकडो प्रेषितांमार्फत ईश्वराने आपला दिव्य संदेश धाडला होता. परंतु लोक तो संदेश विसरून जात आणि त्यात सरमिसळही करत म्हणून प्रेषित मुहंमदामार्फत तोच संदेश अखेरीचा म्हणून धाडण्यात आला. यानंतर परमेश्वर दुसरा कोणी प्रेषित धाडणार नाही आणि पुन्हा तोच संदेश पाठवणार नाही, अशीही धर्मश्रद्धा आहे. इस्लामचे अनुयायी कुराण  हा एक दैवी चमत्कारच आहे असे मानतात. कुराणाचा उल्लेख ‘अल्‌-किताब’ ‘अल-जिक्र’ इ. नावांनीही केला जातो. तसेच ‘शरीफ’, ‘मजीद’, किंवा ‘पाक’ ही उपपदे योजूनही त्याचा उल्लेख केला जातो. कुराणातील प्रत्येक श्लोकाला ‘आयत’ किंवा या ‘दैवी चमत्काराची खूण’ असे नाव दिले आहे. कुराणाची एकूण अक्षरसंख्या ३,२३,६२१ व शब्दसंख्या ७७,९३४ एवढी आहे. कुराणात एकूण ३,२२६ आयते आहेत आणि ती एकूण ११४ प्रकरणांतून विभागली आहेत. प्रकरणाला ‘सूरा’ असे नाव आहे. ‘सुरा’ याचा अर्थ विटेचा थर, शिडी, पायरी किंवा सोपान. पहिल्या सुरेला ‘फातिहा’ किंवा प्रारंभ असे नाव आहे. त्यात ईश्वराची प्रार्थना आहे. दुसऱ्या सूरेपासून ११४ व्या सूरेपर्यंत (नवव्या सूरेचा अपवाद वगळता), सुरुवातीसच ‘परमदयाळू आणि कृपावंत परमेश्वराच्या नावाने’ असे शब्द येतात. तसेच प्रत्येक ‘सूरा’ मक्केची का मदीनेची तेही स्पष्ट केलेले आहे. कारण संबंध कुराणाचे वाचन मुहंमदाच्या मुखावाटे हप्त्याहप्त्याने बावीस वर्षे चालू होते. त्यांपैकी पहिली बारा वर्षे मक्केत आणि उरलेली दहा वर्षे मदीनेत मुहंमदाचे वास्तव्य होते. कुराणातील श्लोक किंवा आयते या कविता नसून गद्य काव्य आहे. कुराणाच्या शैलीचे हे एक वैशिष्ट्य आहे.कुराणाची भाषा अत्यंत प्रभावी आहे आणि योग्य पद्धतीने कुराणाचे पठण चालू असले, तर अरबी न जाणणाऱ्या श्रोत्यावरही तिचा प्रभाव पडतो, असे अनेकांचे मत आहे. ती भाषा लयबद्ध व अत्यंत प्रवाही असून अरबी गद्याचा सर्वोत्कृष्ट अविष्कार तीत झालेला आढळतो. कुराणाने लयबद्ध गद्याचा जो आदर्श घालून दिला, त्याचेच अनुकरण आजही अरबी गद्यलेखक करताना आढळतात. 

कुराणाची अधिकृत प्रत तयार करण्याचा प्रयत्न अबू बकर याच्या कारकीर्दीत (६३२–३४) झाला. नंतर तिसरा खलीफा उस्मान याच्या कारकीर्दीत (६४४–५६) ही प्रत तयार झाली. पाठभेद होण्यास सुरुवातझाल्यामुळे, उस्मानने झैद इब्न थाबित आणि इतर तीन पंडितांना कुराणाच्या अधिकृत संकलनांसाठी हुकूम दिला. अधिकृत प्रत तयार झाल्यावर इतर अनधिकृत प्रती नष्ट करण्यात आल्या. पुढे मुसलमानांत अनेक पंथोपंथ निर्माण झाले. परंतु सर्वजण या अधिकृत प्रतीलाच प्रमाणभूत मानतात. त्यामुळे इतर धर्मग्रंथांप्रमाणे कुराणाचे पाठभेद अस्तित्वात आलेच नाहीत. जे काही आहेत, ते अत्यंत क्षुल्लक आहेत आणि ते सुद्धा उच्चारण्याच्या पद्धतीतील भेदांमुळे निर्माण झाले आहेत. अर्थदृष्ट्या या पाठभेदांना फारसे महत्त्व नाही. झैद इब्न थाबित व इतर संपादकांनी मुहंमदाने ज्या क्रमाने कुराणाचे वाचन केले, त्या क्रमाने संकलन केलेले नाही. त्यामुळे मक्केच्या सुरा अगोदर आणि मदीनेच्या नंतर असा क्रम अधिकृत संकलनात आढळत नाही. फतिहानंतरची दुसरीच सूरा मदीनेत प्रकट झालेली आहे. शेवटच्या अनेक सूरा मक्केच्या आहेत. सूरांतील आयतांची संख्या सारखी नाही. सर्वांत मोठी सूरा (‘सूरे बक्र’) २३६ आयतांची आहे, तर दोन छोट्या सूरा प्रत्येकी फक्त तीन आयतांच्या आहेत. सूरेतील एखाद्या विशिष्ट शब्दावरून सूरेचे शीर्षक ठरविण्यात आले आहे. त्यामुळे शीर्षकावरून सूरेत चर्चिलेल्या विषयाची कल्पना येईलच, असे नाही. संपादकांनी सर्वांत मोठ्या सूरा प्रथम आणि छोट्या सूरा शेवटी अशी मांडणी केलेली आहे. प्रत्येक सूरा मक्केची किंवा मदीनेची हे स्पष्ट हे स्पष्ट केलेले असले, तरी मक्केच्या अनेक सूरांमध्ये मदीनेची आणि मदीनेच्या सूरांमध्ये मक्केची आयते आढळतात. एकूण ११४ सूरांपैकी ९० मक्केच्या व २४ मदीनेच्या असाव्यात, असे स्थूलमानाने मानले जाते.

कुराणाची भाषा ही ईश्वरी वाणी असल्यामुळे तिचे इतर भाषांत भाषांतर होणे शक्य नाही आणि जरी ते शक्य झाले, तरी करू नये असे सनातनी अरबांचे ठाम मत होते व अजूनही आहे. तथापि नवव्या शतकात सिरिॲक भाषेत कुराणाचा अनुवाद झाल्याचा उल्लेख आहे. दहाव्या शतकात फार्सी भाषेत, अकराव्या शतकात तुर्कीत, बाराव्या शतकात लॅटिनमध्ये, सोळाव्या शतकात इटालियन भाषेत आणि सतराव्या शतकात जर्मन, डच, फ्रेंच आणि इंग्रजी या भाषांतून कुराणाचे अनुवाद झाले. अठराव्या शतकात त्याची रशियनमध्ये व हिंदुस्थानात पुन्हा फार्सीत भाषांतरे झाली. चालू शतकात जवळजवळ सर्व ज्ञात भाषांतून कुराणाची भाषांतरे झालेली आहेत. कुराणाचे सुवाच्च आणि सुंदर लेखन करण्याची एक कलाच निर्माण झाली होती. इस्लामी शिल्पकलेत कुराणातील आयते संगमरवरी आणि इतर दगडी जाळ्यातून कोरून भरण्याला विशेष स्थान आहे. कुराण १५३० मध्ये प्रथम छापण्यात आले.

कुराणाच्या अनेक सूरांवरून असे दिसते की, एका प्रकरणामध्येच विविध विषय चर्चिले आहेत. अनेकदा पुनरक्ती झालेलीही आढळते. त्यामुळे रिचर्ड बेल या पंडिताने प्रत्येक सूरेतील आयतांची विषयवार मांडणी करून, दोन खंडांत कुराणाचे इंग्रजी भाषांतर प्रसिद्ध केले (१९३७–३९). आय्.एम्. रॉडवेल या पंडितांच्या इंग्रजी भाषांतरात (१८६१) कुराणाची क्रमशः मांडणी केलेली आढळते. दाऊद या मुस्लिम पंडितानेही क्रमवार संकलन करून कुराणाचे इंग्रजी भाषांतरप्रसिद्ध केले आहे.

 नवव्या ते तेराव्या शतकांपर्यंत अनेक अरबी विद्वानांनी कुराणावर भाष्ये लिहिली. अल्‌-तबरी (सु. ८३८–९२३) हा कुराणाचा पहिला भाष्यकार. त्यानंतर अल्‌-झमकशरी (१०७५–११४४), अल्-राझी (११४९–१२०९), अल्‌-बैदावी (? – सु. १३००) आणि अस्‌सुयूती (१४४५–१५०५) यांची भाष्ये तयार झाली. अल्‌-बैदावी याच्या भाष्याला सर्वांत अधिक मान्यता मिळाली. चालू शतकात मौलाना अबुल कलाम आझाद (१८८८–१९५८) यांनी कुराणावरील अगदी वेगळे भाष्य तयार केले आहे. त्यांच्या या नव्या भाष्याला सर्व मुस्लिम जगतात एक आगळेच स्थान प्राप्त झाले आहे. कुराणाच्या भाष्यकारांना आपापल्या काळातील धर्मशास्त्रीय समस्या सोडविण्याची दृष्टी होती. कुराणातील काही आयते दुर्बोध आहेत, तर काही परस्परविसंगत आहेत. यांमुळे कुराणाच्या प्रमाणभूत अर्थाबाबत फार मोठे वाद निर्माण झाले. मुहंमद पैगंबराच्या वचनांच्या आधारे कुराणाचा अर्थ लावण्याची पद्धती तेव्हापासूनच सुरू झाली. परस्पर विसंगत वचनांच्या बाबतीत ‘नासिख-मन्सूख सिद्धांत’ मांडण्यात आला. या सिद्धांतानुसार कालक्रमाने अगोदरची म्हणजे पूर्ववर्ती वचने, नंतरच्या म्हणजे उत्तरवर्ती किंवा नासिख वचनांनी रद्दबातल वा मन्सूख होतात. नासिख-मन्सूख सिद्धांताला ⇨ मुताझिला पंडितांचा तीव्र विरोध होता. त्यांच्या मते कुराण हे संपूर्ण आहे. त्यातील कोणताही भाग रद्द मानता येणार नाही. आठव्या आणि नवव्या शतकांत कुराण  ही ईश्वरी वाणी म्हणजे परमेश्वराची एक कृती किंवा निर्मितीच आहे आणि कुराणाचा अर्थ बुद्धीला आणि तर्काला पटेल असाच केला पाहिजे, असा दावा मुताझिला पंडितांनी मांडला होता, परंतु सनातन धर्मगुरूंनी कुराण  ही एक ईश्वराची निर्मिती आहे, या कल्पनेला सक्त विरोध केला आणि कुराण  हा एक स्वयंसिद्ध दैवी ग्रंथ आहे, असा आग्रह धरला. त्यांच्या मते कुराणाचा अर्थही मुहंमदाच्या वचनांच्या आधारेच केला पाहिजे. मुताझिला पंडितांना प्रथम राजाश्रय होता. नंतर ते खलीफांच्या मर्जीतून उतरले आणि त्यांचा व त्यांच्या ग्रंथांचा नाश करण्यात आला. अर्थातच अल्‌-तबरी आणि इतर भाष्यकारांनी कुराण  हे ईश्वरनिर्मित नसून स्वयंसिद्ध आहे आणि त्याचा अर्थ पैगंबरांची वचने, आख्यायिका यांच्या आधारावरच लावला पाहिजे, या भूमिकेतून आपली भाष्ये लिहिली. त्यानंतरची जवळजवळ सर्वच भाष्ये या भूमिकेशी सुसंगत आहेत. अपवाद फक्त मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या तर्जुमानुल कुर्आ(अपूर्ण) ह्या सभाष्य अनुवादाचाच आहे.


सर्वसामान्य मुसलमानावर कुराणाचा फार मोठा प्रभाव अगदी पहिल्यापासूनच पडत आला. त्यातील विचारांइतकेच त्याच्या भाषेचेही त्या दृष्टीने महत्त्व आहे. कुराणामुळे ⇨ अरबी भाषेचा फार मोठा उत्कर्ष झाला. भाषाशास्त्राच्या दृष्टीने अरबी भाषेचा कुराण  हा मोठा आधार आहे. इस्लामच्या पहिल्या तीनचार शतकांतच अरबी भाषा अरबस्तानपलीकडे सिरिया, इराक, जॉर्डन, इजिप्त, उत्तर आफ्रिका इ. प्रदेशात पसरली. सध्याचे अरबी जगत मोरोक्कोपासून बगदादपर्यंत पसरले आहे. कुराणाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यातच मुहंमद पैगंबरांचे चरित्र समाविष्ट झालेले आहे. धर्मप्रसाराच्या कामात मुहंमदाला आलेल्या अडचणी, लोकांनी विचारलेल्या शंकाकुशंका, त्याला झालेला विरोध, काही प्रमाणात त्याचे वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवन, त्याने केलेला राजसत्तेचा वापर, त्याने केलेल्या लढाया, ज्यू आणि ख्रिश्चनांशी मुंहमदाचे संबंध इ. अनेक प्रकारचा तपशील कुराणात आढळतो. मुंहमदाच्या मृत्यूनंतर आयेशा हिने तर मुहंमदाविषयी माहिती हवी असेल, तर ती कुराणात शोधा असे सांगितले होते. कुराणामार्फत अल्लाने मुहंमदाला अनेकदा धीर दिला, मार्गदर्शन केले, लोकांनी विचारलेल्या शंकाकुशंकांना उत्तरे दिली आणि लोकांना काय सांगावे, याचा आदेशही दिला.

एका दृष्टीने पाहता इतर अनेक धर्मग्रंथांप्रमाणे मानवाने केलेला ईश्वराचा शोध आणि त्याला झालेला ईश्वरी साक्षात्कार या पद्धतीचे कुराण  नसून, ईश्वराने स्वतःहून मानवाला घडविलेला साक्षात्कार, अशा स्वरूपाचे ते आहे. ईश्वर आपणहून साक्षात्कार घडवितो आणि मुहंमदाला तसेच इतर मानवांना तपशीलवार मार्गदर्शन करतो. कुराणात ईश्वरासंबंधीची कल्पना पुनःपुन्हा स्पष्टपणे मांडली आहे. ईश्वर हा एकमेवाद्वितीय आहे. तो सर्व सृष्टीचा निर्माता आहे, आपल्या विविधप्रकारच्या निर्मितींना त्याने एक शिस्त घालून दिलेली आहे व सर्व भूतमात्रांनी, जड वस्तूंनी या शिस्तीच्या चौकटीत राहिले पाहिजे, असा त्याचा आग्रह आहे. तो सर्वशक्तिमान, सर्वज्ञ आणि कर्ताकरविता आहे. प्रत्येक मानवाने ईश्वराची प्रार्थना केली पाहिजे आणि त्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे आचरण ठेवले पाहिजे, जड मूर्तीची पूजा ही ईश्वराची पूजा नव्हे. उलट मूर्तिपूजेने ईश्वराचा कोपच होतो. मानवाला पुनर्जन्म नाही. एकदाच जन्माला यायचे आणि मृत्यूनंतर अखेरच्या न्यायदानाच्या दिवशी पुन्हा परत येऊन सत्कृत्ये आणि दुष्कृत्ये यांचे तराजूत मोजमाप झाल्यावर,  ईश्वरी इच्छेप्रमाणे स्वर्गसुखाचे किंवा अत्यंत दुःखदायक अशा नरकयातनांचे भागीदार व्हायचे. तथापि ईश्वर दयाळू आणि कृपाळूही आहे. कोणतीही चूक केली आणि लगेच पश्चाताप झाला, तर ईश्वर अपराध पोटात घालील. याशिवाय ईश्वराच्या दयेची आणि कृपेची शक्यता आहे. कुराणातील ईश्वराला विशेष नामे नाहीत तथापि त्याच्या अनेक छटा दाखविणारी एकूण ९९ विशेषणे आहेत.

ऐहिक जीवनात मानवाचा सैतानाशी एकसारखा संघर्ष चालू आहे. वास्तविक पाहता सृष्टीच्या निर्मितीनंतर आपली एक सर्वोत्कृष्ट कृती म्हणून ईश्वराने मानवाला निर्माण केले. अगोदरच्या देवदूतांना आदिमानवाला वंदन करण्याची आज्ञा केली. सर्व देवदूतांनी ही आज्ञा पाळली. अपवाद फक्त सैतानाचा. सैतान स्वतःला मानवापेक्षा श्रेष्ठ समजत होता. त्यामुळे अल्लाने रागावून त्यालाही पृथ्वीवर धाडले. तेव्हापासून ईश्वरी मार्गदर्शनापासून मानवाला च्युत करण्याचा अविरत उद्योग सैतानाने चालू ठेवला आहे. आदमपासून मुहंमदापर्यंत असंख्य प्रेषित अल्लाने धाडले आणि पुनःपुन्हा तोच संदेश दिला. परंतु काही वेळा दुरभिमानाने, विस्मरणाने आणि सैतानाच्या अधीन झाल्यामुळे मानव हा संदेश विसरत राहिला. या संदेशात भेसळ करण्यात आली.  मूर्तिपूजा होऊ लागली. काही वेळा च्युत झालेल्या जनसमुदायाला ईश्वरी कोपाने नष्ट व्हावे लागले. परंतु ईश्वरी कृपा अगाध असल्यामुळेच पैगंबर धाडण्यात आले.

कुराणात आदम, अब्राहम, नूह इसाक, मोझेझ, जेकल, झकारिया, जोसेफ, येशू आदी पैगंबरांच्या कथा आहेत. जुन्या करारात या सर्वांचा उल्लेख आढळतो. परंतु कुराणात हे सर्वजण प्रेषित होते, त्या सर्वांनी ईश्वरी संदेश लोकांना समजावून सांगितला, एकेश्वरवादाचा पुरस्कार आणि मूर्तिपूजेचा धिक्कार केला, त्यांना ईश्वराची कृपा लाभली आणि त्यांनी स्थानिक जनतेचा विरोध सहन करून अन्यायाविरूद्ध लढा दिला. परंतु मानवाचे पुन्हा अधःपतन होणे चालू राहिले आणि शेवटी मुहंमदाला धाडण्यात आले. मूर्तिपूजेखेरीज लहान मुलींना ठार मारणे, अनाथांच्या मालमत्तेचे अपहरण करणे, सावकारी करणे, व्यापारात लबाडी करणे इ. तत्कालीन चालीरितींचा कुराणात तीव्र निषेध केला आहे. मुहंमदाकडे मदीनेचे राज्य आल्यानंतर अनेक कायदे ईश्वरप्रेरणेने अमलात आणले गेले. यासंबंधीही कुराणात उल्लेख आहे. त्यामुळेच इस्लामी कायद्याला कुराण आधारभूत आहे. नीति-अनीतीसंबंधी कुराणाची एक विशेष दृष्टी आहे. कुराणातील मार्गदर्शनाप्रमाणे केलेले आचरण ही खरी नीतिमत्ता आणि ईश्वराने कुराणात धिक्कारलेले आचरण म्हणजे अनीती. गुलामगिरीची पद्धती कुराणात गृहीत धरलेली आहे परंतु गुलामांची मुक्तता करणे म्हणजे पुण्यचरण हेही सांगितले आहे आणि गुलाम स्त्रियांशी संबंध ठेवण्यास मान्यताही त्यात आहे. ईश्वरी इच्छेपुढे संपूर्ण शरणागती पतकरणे, ईश्वराच्या आज्ञांचे संपूर्ण पालन करणे, ईश्वराने निषिद्ध मानलेल्या आचरणापासून दूर राहणे आणि होणारी प्रत्येक गोष्ट अल्लाच्या मर्जीनेच होते, यावर दृढ विश्वास ठेवणे, हे कुराणाच्या मार्गदर्शनाचे सार आहे. ईश्र्वरी इच्छेपुढे संपूर्ण शरणागती पतकरणे, ईश्र्वराच्या आज्ञांचे संपूर्ण पालन करणे, ईश्र्वराने निषिद्ध मानलेल्या आचरणापासून दूर राहणे आणि होणारी प्रत्येक गोष्ठ अल्लाच्या मर्जीनेच होते, यावर द्दढ विश्वास ठेवणे, हे कुराणाच्या मार्गदर्शनाचे सार आहे.

पहा : इस्लाम धर्म मुहंमद पैगंबर. 

संदर्भ : 1. Arberry, A.J. The Koran Interpreted, 2 Vols., London, 1955.

           2.Azad, Maulana Abul Kalam, Ed. &amp Trans. Latif, Syed Abdul, The Tarjuman al-Qur’an, 2  Vols., Bombay, 1962.

           3. Bell, Richard, The Qur’an, Translated with a Critical Arrangement of the Surahs – 2 Vols., Edinburgh,  1937-39.

           4. Jeffery, A. Materials for the History of the Text of the Qur’an, Leiden,  1937.

           5. Pickthall, M. The Meaning of the Glorious Koran, London, 1957.

           6. Sell, E.S. The Historical Development of the Koran, Madras, 1898.

           7. Stauton, H.U.W. The Teaching of the Qur’an, London, 1919.

           8. Watt, W. Montgomcry, Companion to the Qur’an, London, 1967.

           9. भालदार, मोहंमद इस्माइल, सार्थ मराठी कुराण, पुणे, १९५०.  

    १०. मीर मोहमंद याकूब खान, वित्र कुराणाचे सटीक मराठीभाषांतर, २ खंड, मुंबई, १९१६.  

करंदीकर, म. अ.