अहिंसा : जगातील सर्व धर्मांमध्ये या ना त्या प्रकारे अहिंसातत्त्वाल महत्त्वाचे स्थान मिळालेले आहे. वैदिक धर्मात पशुयज्ञाचे स्थान महत्त्वाचे आहे. पण प्रत्यक्ष पशूची हत्या करण्यास सांगितले असूनही, पशुहत्या- विषयक विवेचनात गूढ रूपाने ही हिंसा नसून अहिंसाच आहे, असे सांगण्याचा ब्राह्मणग्रंथांत प्रयत्न केलेला दिसतो. ह्यावरून अहिंसाकल्पनेची बीजे वैदिक कर्मकांडातच सापडतात हे कळून येते. पशुयज्ञ ही संस्था मुळात वेदपूर्वकालीन वैदिक आर्यांच्या आदिम स्थितीतील संस्था आहे. ब्राह्मणग्रंथांच्या काळी ही यज्ञीय पशुहिंसा मनास खुपू लागली. म्हणून ‘पशू मृत होतो’ असे पशुयज्ञात न म्हणता ‘तो स्वर्गाला जातो’ असे म्हणावे, नाहीतर मृत्यू यज्ञ करणाऱ्याचा पाठलाग करील, असे ब्राह्मणग्रंथांत म्हटले आहे. जसे करावे तसे भरावे, हा कर्मसिद्धांत याच सुमारास आर्यांच्या मनात डोकावू लागला. हिंदुधर्मातील संन्याशाला जी व्रते पाळावी लागतात, त्यांमध्ये अहिंसा हे पहिले व्रत आहे. जैन साधूला जी पाच महाव्रते पाळावी लागतात, त्यांमध्येही पहिले महाव्रत अहिंसा हे आहे. त्याचप्रमाणे बौद्ध धर्मातील ‘अष्टांगशील’ किंवा ⇨पंचशील यांमध्येही अहिंसेला पहिले स्थान आहे. अहिंसा दोन प्रकारची : निषेध-स्वरूपाची व विधि-स्वरूपाची. येशू ख्रिस्तानेही आपल्या अनुयायांना ‘तू प्राणिहत्या करू नकोस’ अशी एक आज्ञा दिलेली आहे. ‘दया धर्म का मूल हे’ (तुलसीदास) किंवा ‘सर्व प्राण्यांकडे आत्मौपम्य-दृष्टीने पाहावे’ अशा अर्थांच्या वाक्यांतून अहिंसेचे हे दोन्ही अर्थ प्रकट होतील.

‘अहिंसा परमो धर्म:’ म्हणजे अहिंसा हा श्रेष्ठ धर्म होय, असे महाभारतात व अन्यत्र हिंदुधर्मग्रंथांत वारंवार सांगितले आहे. राज्यव्यवस्था समाजधारणेकरिता करावी लागते, असे राजधर्म प्रकरणात सांगितले आहे. ‘समाजधारणा म्हणजेच अहिंसा’ असा अर्थ महाभारतात केला आहे. सबळाने दुर्बळाचा नाश करू नये, हा राजधर्माचा एक मुख्य उद्देश होय.

महाभारतातील अहिंसेची साधकबाधक चर्चा अशी आहे : सार्वत्रिक अहिंसा अशक्य आहे कारण ‘जीवो जीवस्य जीवनम्’ असा जीवसृष्टीचा नियम दिसतो प्रत्येक माणसाकडून सूक्ष्मजंतूंचा नाश नकळत होतच असतो. म्हणून शक्यतो जाणूनबुजून हिंसा होणार नाही, इतकाच प्रयत्न माणसाला शक्य आहे. बलदंड व आततायी अशा मनुष्याचा प्रतिकार करताना त्याची हिंसा करणे कित्येकदा अपरिहार्य ठरते. परंतु प्राणिमात्रावर दया करणे हा विधायक दृष्टिकोन व परोपकार हे अहिंसा धर्माचे विधायक स्वरूप प्रशस्त होय.

भारतवर्षामध्ये ऋषि-मुनींपासून महात्मा गांधींपर्यंत संतांनी जीवनात अहिंसेला मुख्य स्थान दिले आहे. हिंसा, मग ती कोणत्याही कारणासाठी घडणारी असो, अधर्म होय, अशी विचारसारणी पूर्वीपासून प्रचलित आहे. सामान्यपणे हिंसा वर्ज्य असली, तरी जीवनार्थ वा धर्मकार्यामध्ये घडणारी हिंसा क्षम्य आहे, अशीही एक दुसरी विचारसरणी प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. हिंसा त्याज्य आहे आणि हिंसेमध्ये इतर अनेक पापे उद्भवतात म्हणून धर्माचरण करणाऱ्या माणसाने कोणत्याही स्वरूपातील स्थूल अगर सूक्ष्म हिंसा टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे, हे क्रमप्राप्त होते. म्हणूनच भारतामध्ये अनेक जमाती शाकाहारी आहेत. त्यांमध्ये जैन धर्माचे अनुयायी प्रमुख आहेत. जैन समाजाचे अहिंसाधर्मामुळे उद्योगधंदेही मर्यादित झाले आहेत.

जैन आचारशास्त्रात साधूसाठी अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य व अपरिग्रह ही पाच महाव्रते सर्वसंग्राहक म्हणून सांगितलेली आहेत. बाकीची इतर व्रते गौण आहेत. या पाच महाव्रतांमध्येसुद्धा अहिंसाच प्रमुख आहे. अहिंसाव्रताचे अधिक चांगल्या रीतीने पालन इतर महाव्रतांमुळे होते. अहिंसातत्त्वाची मीमांसा जैन धर्मामध्ये अतिशय बारकाईने केलेली आहे. एखाद्या जीवाचा वध करणे किंवा त्याला दु:ख देणे म्हणजे हिंसा, असा ‘हिंसा’ या शब्दाचा ढोबळ अर्थ आहे. राग-द्वेषाच्या आधीन होऊन अगर निष्काळजीपणामुळे मनुष्य जेव्हा दुसर्‍या जीवाला दु:ख देतो, तेव्हा ते कृत्यही ‘हिंसा’ या संज्ञेस पात्र होते. अशुभ भावनेने केलेले कोणतेही कृत्य हिंसा या दोषास पात्र होते. परंतु मुलास चांगले वळण लागावे या हेतूने त्याला शिक्षा करणारा बाप हिंसक ठरत नाही. ज्यावेळी आपल्या मनामध्ये अशुभ भाव उत्पन्न होतात, त्या वेळी आपल्याच आत्म्याची हिंसा होत असते. याच्या उलट, एखादा मनुष्य सद्‌हेतूने प्रेरित होऊन संयमाने वागत असला आणि त्याच्या हातून जीववध घडला किंवा दु:ख उत्पन्न झाले, तरी ती हिंसा दोषास्पद होत नाही. साधू आपल्या हातून हिंसा घडू नये यासाठी संयम पाळतो, तो राग, द्वेष किंवा क्रोध, मान, माया, लोभ हे कषाय, म्हणजे दोष, उत्पन्न होऊ देत नाही. कारण प्राणव्यपरोपण (प्राणनाश) दुसऱ्याचे होते तसे आपलेही होते. हिंसेचे ‘स्थूल हिंसा’ व ‘सूक्ष्म हिंसा’ असे दोन प्रकार आहेत. साधूला या दोन्ही प्रकारच्या हिंसेचा त्याग करावा लागतो. खरा साधू शक्य तेवढी हिंसा टाळतो. परंतु काही प्रमाणात सूक्ष्म हिंसा ही घडणारच. अशा वेळी त्याचे भाव जर शुभ असतील आणि तो जर संयत असेल, तर ती सूक्ष्म हिंसा दोषपात्र ठरत नाही.

गृहस्थधर्माच्या हिंसेचे चार प्रकार केलेले आहेत : (१) संकल्पी हिंसा : इरादापूर्वक केलेली हिंसा. शिकार खेळणे, मांसभक्षण करणे इ. गोष्टी या सदरात येतात. गृहस्थाला काया-वाचा-मनेकरून हिंसेचा त्याग करावा लागतो. (२) विरोधी हिंसा : आपल्यावर हल्ला झाला असता, आत्मसंरक्षणासाठी करावी लागणारी हिंसा. स्वतःच्या अगर स्वकीयांच्या किंवा देशाच्या रक्षणासाठी गृहस्थ हिंसा करू शकतो. जैनधर्मीय क्षत्रिय कुळातील राजांनी युद्धे केलेली आहेत. (३) आरंभी हिंसा : जीवनयात्रा चालविण्यासाठी किंवा भोजन-पान तयार करण्यासाठी अनेक क्रिया कराव्या लागतात. अशा क्रिया करताना होणारी हिंसा ही आरंभी हिंसा होय. (४) उद्योगी हिंसा : उदरनिर्वाहासाठी गृहस्थाला एखादा उद्योग अगर नोकरी करावी लागते त्या उद्योगात अंतर्भूत असलेली हिंसा ही उद्योगी हिंसा होय. जैनधर्मी गृहस्थाला हिंसाप्रचुर उद्योग करता येणार नाही. परंतु राजाची नोकरी करता येईल, सैनिकी पेशा पतकरता येईल आणि स्वामीची आज्ञा म्हणून युद्धही करता येईल. अहिंसाचार पाळणाऱ्या गृहस्थाला मांसाहार वर्ज्य करावा लागतो, यात मात्र शंका नाही.

बौद्ध धर्माच्या अष्टांगशीलामध्ये अहिंसेला महत्त्वाचे स्थान आहे आणि बौद्धधर्मी भिक्षूंचा आचारही अहिंसेला पोषक असाच आहे. परंतु सध्या चीन, जपान इ. देशांमध्ये जे बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत, ते मांसाहार निषिद्ध मानीत नाहीत. अशोकाने बौद्ध धर्मातील अहिंसेचे स्वत: आचरण केले व लोकांना धडा घालून दिला. आपल्या शिलालेखांतून त्याने एकंदर प्राण्यांवर दया करण्यासंबंधी आणि त्यांचे रक्षण-पोषण करण्यासंबंधी लोकांना आज्ञा दिल्या. त्याने राजवाड्यातील प्राणिहत्या थांबविली.

हिंदू संस्कृतीतील अहिंसेचे स्थान सुस्पष्ट आहे. वैदिक धर्मामध्ये धार्मिक महत्त्व असलेल्या यज्ञात पशुहत्या विहित आहे. परंतु कालांतराने पशुहत्यायुक्त यज्ञ बहुश: बंद पडले आणि भक्ति-ज्ञानावर अधिष्ठित असा मोक्षमार्ग प्रचलित झाला. अहिंसा, सत्य, ब्रह्मचर्य इ. तत्त्वांवर आधारलेला धर्म हिंदुधर्माचा प्राण बनला. हिंदू धर्म, बौद्ध धर्म व जैन धर्म संन्यासधर्माच्या बाबतीत एकरूप आहेत. योगदर्शनात अहिंसाधर्म मुख्य मानला आहे.

महात्मा गांधी हे चालू युगातील अहिंसेचे थोर उपासक होते. गांधींच्या जीवनावरही जैन धर्माचा आणि जैन गुरूंचा बराच परिणाम झालेला होता. गांधींनी आपल्या जीवनाचे सर्व तत्त्वज्ञान अहिंसा व सत्य यांवर अधिष्ठित केले होते. जीवनाच्या सर्व अंगोपांगांना त्या अहिंसेने स्पर्श केला होता. खाजगी जीवनात त्याचप्रमाणे सामाजिक व राजकीय जीवनातही अहिंसातत्त्व कार्यान्वित करण्याचे त्यांनी हिरिरीने प्रयोग केले. राजकारणात त्यांनी सत्याग्रहाचे नवीन तंत्र उपयोगात आणले.


अहिंसेच्या बाबतीत पाश्चात्त्यांची विचारधारा वेगळी आहे. आपल्याकडे धर्म आणि आहार यांचा जितका निगडित संबंध आहे, तितका पाश्चात्त्य विचारवंत किंवा धार्मिक लोकांत तो नाही. शाकाहाराची कल्पना नसलेला मनुष्यही तिकडे धार्मिक, सच्छील किंवा दयावंत असू शकतो मांसभक्षण व मद्यपान धार्मिकतेच्या आड येऊ शकत नाहीत.

धर्मामध्ये सांगितलेली अहिंसा ही वैयक्तिक आत्मकल्याणासाठी सांगितलेली असली, तरी समाजाचे धारण-पोषण अहिंसेमुळे सुलभ होते, हे सहज दिसून येईल. दुसऱ्याने कष्ट करून मिळवलेल्या धनाचे अपहरण न करणे, स्वार्थासाठी असत्य वचनाचा उपयोग न करणे, परस्त्रीचा अभिलाष न धरणे, स्वत:कडेच अपरिमित संपत्तीचा साठा न करणे इ. गोष्टी अहिंसेमध्येच येतात. उदा., एखाद्याने कष्ट करून मिळविलेली संपत्ती कोणी चोरणे म्हणजे त्याचे बाह्य प्राण हिरावून घेण्यासारखेच आहे. वर निर्दिष्ट केलेल्या गोष्टींमुळे दुसऱ्याला दु:ख प्राप्त होते. म्हणजे ती हिंसा आहे. म्हणजे अहिंसा पाळल्याशिवाय समाजाला स्थैर्य प्राप्त होणार नाही.

अहिंसाधर्माला अनेक कारणास्तव मर्यादा पडतात. कोणत्याही प्राण्याची हिंसा होऊ न देता मानवाला जगता येणे अशक्य आहे. सूक्ष्मजंतूंचा मानवाच्या हातून आपोआप नाश होतो. कारण हवेत, जलात, निरनिराळ्या खाद्यपदार्थांत सूक्ष्मजंतू असतात. शेती, लोहारकाम इ. धंद्यांत जंतूंची आपोआप हिंसा घडतेच. वनस्पतींना प्राण आहे असे मानले, तर वनस्पतींवाचून जगणे अशक्य आहे. दुसरे असे, की आनादिकाला – पासून अन्नाचा तुडवटा असल्यामुळे माणसाला मांस व मत्स्य यांचा आहारात वापर केल्याशिवाय जगणे अशक्य झाले असते. मानवी शरीराला पोषक असलेली उच्च प्रतीची प्रथिने मुख्यत: प्राणिज पदार्थांपासूनच प्राप्त होऊ शकतात. प्रथिनांवाचून मानवी शरीर दुर्बल व रोगग्रस्त होते. अनेक प्रकारचे रोगजंतू नष्ट केल्याशिवाय आरोग्यप्राप्ती होऊ शकत नाही.

मानवी स्वभाव संघर्षशील असल्यामुळे स्वीयसंपत्तीचे व स्वकीयांचे रक्षण करण्याकरिता युद्ध हे कोणत्या ना कोणत्या स्वरूपात त्याला आत्मरक्षणार्थ अपरिहार्य ठरते. त्याकरिता वीरवृत्तीची जोपासना व वाढ करणेही मानवाचे कर्तव्य असल्याचे इतिहासावरून दिसते. वीरवृत्तीच्या योगाने व युद्धप्रवणतेमुळे मानवी समाजांची प्रगती झाली आहे, असेही एक युद्धसमर्थक तत्त्वज्ञान जगातील काही तत्त्ववेत्त्यांनी प्राचीन काळापासून मांडले आहे. परंतु हिंसात्मक युद्धामुळेच मनुष्याचे पराक्रम इ. सद्‌गुण वाढीस लागतात असे म्हणता येणार नाही. हिंसक युद्धाशिवाय पराक्रमाची कला, ज्ञान, नीती इ. क्षेत्रे मानवाला प्रथमपासून उपलब्ध आहेत.        

सामाजिक जीवनामध्ये आणि आंतरराष्ट्रीय व्यवहारामध्ये अहिंसेचा उपयोग होऊ शकेल पण त्यासाठी लोकशाहीची मूल्ये समाजात दृढमूल व्हावी लागतील वांशिक भेद मिटावे लागतील बुद्धिवादाची वाढ व्हावी लागेल आणि वर्गकलह नष्ट व्हावे लागतील.

पहा : जैन धर्म बौद्ध धर्म गांधी, महात्मा.

संदर्भ : 1. Gandhi, M. K. Non-Violence in Peace and War, Vols. I, II, Ahmedabad, 1948, 1960.

           2. Miller, W. R. Non-Violence : A Christian Interpretation, London, 1964.

           ३. सुभेरुचंद्र दिवाकर, जैन शासन, बनारस १९५०.

पाटील, भ. दे.