महायान पंथ : महासंघिक पंथातून महायान पंथ अस्तित्वात आला. ह्याचा उगम आंध्र प्रदेशात झाला असला, तरी त्याच्या लोकप्रिय आचाराने तो भारतातील सर्व प्रांतांत व बाहेरील देशांतही लवकरच प्रसृत झाला. ह्या पंथाच्या पुढे माध्यमिकवाद व विज्ञानवाद अशा दोन शाखा झाल्या. महायानिकांच्यामते बुद्धाला अतिमानुषत्व प्राप्त झाले व मार्गाचे अनुसरण करणाऱ्या बोधिसत्त्वाला मान्यता प्राप्त झाली. त्याच्या ठायी इतर लोकांबद्दल कारूण्य प्राप्त झाले व त्यांनाही बुद्धत्व प्राप्त करून घ्यावे, ह्याबद्दल तो अहर्निश झटत असे. इतर लोकांनाही बुद्धत्व प्राप्त व्हावे म्हणून तो स्वतःचे बुद्धत्व प्राप्त करून घेणे लांबवतो. ह्या पंथात प्रज्ञा व करूणा ह्यांना महत्त्व मिळाले. करूणेच्या पोटी बोधिसत्त्व वाटेल ते करावयास तयार झाला. करूणेच्या प्रभावात येऊन गृहस्थाश्रमी बोधिसत्त्व वाटेल तो अनाचार करण्यास प्रवृत्त झाला, असे बोधिसत्त्वभूमि ह्या ग्रंथात (वोगिहार आवृत्ती, पृ. १६७ दत्त आवृत्ती, पृ. ११४−१५) म्हटले आहे.

महायान पंथाने आपली तात्त्विक भूमी बदलली. श्रावकयान पंथाने शाश्वत आत्म्याचे अस्तित्व मान्य केले नव्हते. त्यांचे केवळ ‘पुद्‌गल-नैरात्म्य’ होते. महायान पंथाने ह्याच्या जोडीला ‘धर्मनेरात्म्य’ मान्य केले. म्हणजे त्यांच्या दृष्टीने ह्या जगातील सर्व संस्कृत धर्म ‘प्रतीत्य-समुत्पाद’ जन्य आहेत. म्हणजे ते परावलंबी किंवा परिकल्पित आहेत. त्यांना स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व नसून ते स्व-भाव-शून्य आहेत. महायान पंथीयांनी जगाच्या बुडाशी एकच तत्त्व-माध्यमिकांच्या मते ‘शून्यता’, स्व-भाव-शून्यता म्हणजे प्रतीत्यसमुत्पन्नता व वैज्ञानिकांच्या मते ‘आलय-विज्ञान’ –आहे. पण जगातील नेहमीच्या वागण्यात बोलण्यापुरते सत्य, सांवृतिक सत्य, मान्य केले. ‘सांवृति’ म्हणजे पाली भाषेतील ‘सम्मुति’ म्हणजे लोकांनी ज्याला मान्यता दिली आहे अशी संमती. श्रावकभूमीमध्ये प्रत्येकाने ‘ज्ञान’ स्वतःच्या खटपटीने मिळवावयाचे असते, तर महायान पंथाने एकाने केलेला पुण्याचा साठा इतरांना विभागून देता येईल असे मान्य केले. श्रावकयानाने प्रगतीच्या मार्गावर चार टप्पे सांगितले आहेत तर महायानाने दहा भूमी सांगितल्या आहेत. ह्या भूमींतून जाणाऱ्यालाच शेवटचा टप्पा−बुद्धत्वाचा−प्राप्त होतो. ह्या दहा भूमी अशा : (१) प्रमुदिता, (२) विमला व (३) प्रभाकरी (ह्या भूमी थेरवादींच्या ‘अनागामित्व’ पदावर नेणाऱ्या आहेत), (४) अर्चिष्मती, (५) सु-दुर्जया व (६) अभिमुखी (ह्या थेरवादींच्या ‘अर्हत्व’ पदाशी जुळणाऱ्या आहेत), (७) दूरगमा, (८) अभिमती वा अचला, (९) साधुमती व (१०) धर्ममेघा. शेवटच्या चार भूमी (७ ते १०) केवळ महायानिकांच्या आहेत. शेवटल्या अवस्थेत मेघाप्रमाणे उपदेशाचा पाऊस पडतो. महारश्मी बाहेर येऊन सर्व लोकांना सुख देतात. ह्या अवस्थेला ‘अभिषेक-भूमी’ असेही नाव आहे.

महायान पंथाने अनेक बुद्ध व बोधिसत्त्व व त्यांच्या शक्तींचा स्वीकार करून त्यांच्या विषयीची भक्ती संपादन केली व त्यामुळे जनसामान्यात मानाचे स्थान मिळविले. ह्यामुळे ते लोकप्रिय झाले.महायानाने एका वेळी अनेक बुद्धांचे अस्तित्व मान्य केले. ह्या बुद्ध-बोधिसत्त्व व शक्ती मान्य केल्याने त्यांच्या रूपाचे प्रदर्शन, दगडात मूर्ती कोरून किंवा त्यांच्या मूर्ती बनवून किंवा चित्रे काढून करावे लागले. ह्यामुळे कलांनाही ऊर्जितावस्था आली. मूळ एक तत्त्वाच्या मान्यतेमुळे महायानी लोक भारतीय हिंदू धर्माला जवळ आले.

ह्या पंथाची धार्मिक व तात्त्विक विचारसरणी  ⇨बौद्ध धर्म  व  ⇨बौद्ध दर्शनात दिलेली आहे.

माध्यमिक पंथाचे सुप्रसिद्ध आचार्य नागार्जुन (इ.स.दुसरे शतक), आर्यदेव (तिसरे शतक), बुद्धपालित व भावविवेक (पाचवे शतक), चंद्रकीर्ती (सहावे शतक) आणि शांतिदेव (सातवे शतक), तसेच विज्ञानवादी आचार्य मैत्रेय नेमिनाथ (तिसरे शतक), असंग व वसुबंधू (चौथे शतक), स्थिरमती (पाचवे शतक), दिङ्नाग (सहावे शतक), शांतरक्षित व कमलशील (आठवे शतक) हे होत.

पहा : बौद्ध धर्मपंथ.

संदर्भ : 1. Murti, T. R. V. The Central Philosophy of Buddhism, London, 1955.

            2. Suzuki, D. T. Outlines of Mahayana Buddhism, London, 1907.

बापट, पु. वि.