त्वष्टा :  वैदिक देवतासमूहातील एक देवता. ऋग्वेदात याचे बरेच उल्लेख आहेत. हा देवांचा कारागीर होता. याने इंद्राचे वज्र तयार केले, ब्रह्मणस्पतीसाठी लोखंडाची कुऱ्हाड तयार केली, तर सोमपान करण्यासाठी ‘चमस’ नावाची पात्रे तयार केली. आईच्या उदरात बालकाची घडण त्वष्टाच करतो. स्वर्गीय, दैवी, मानवी, पशुसृष्टी तसेच वृक्षवेली हे सर्व त्वष्ट्यानेच घडविले आहे. म्हणून त्याला विश्वकर्मा, विधाता, प्रजापती म्हटले आहे. त्वष्टा हा पशूंचा देव. तो घोड्यांना गती देतो. त्याने आपली मुलगी सरण्यू सूर्याला दिली. सूर्याचे तेज सरण्यूला सहन न झाल्याने त्वष्ट्याने सूर्याला तासले असे म्हटले आहे. सरण्यूपासून सूर्याला यम व यमी हे जुळे झाले. ‘त्वष्ट्ट’ शब्दाची व्युत्पत्ती ‘त्विष्’ (प्रदीप्त होणे), ‘त्वक्ष्’ (लहान करणे) किंवा ‘तक्ष्’ (तासणे) या धातूपासून झाली आहे.

त्वष्टा हा चित्रा नक्षत्राचा स्वामी आहे. त्वष्ट्याला तीन मस्तके असलेला विश्वरूप नावाचा मुलगा होता. तो इंद्राच्या गायींचे रक्षण करी. एका अपराधाची शिक्षा म्हणून इंद्राने विश्वरूपाचा वध केला. त्वष्टा हा ब्राह्मण होता. ब्राह्मणपुत्राला मारल्याने इंद्राला ब्रह्महत्येचे पातक लागले. त्वष्ट्याने इंद्राचा सूड उगविण्यासाठी यज्ञ केला. त्यातून वृत्र जन्मला. म्हणून ‘वृत्र कोण?’ याचे उत्तर इतिहासज्ञ ‘त्वाष्ट्र असुर’ असे देतात, असे निरुक्तात म्हटले आहे. बारा आदित्यांपैकी त्वष्टा हा एक होय. निरनिराळ्या पुराणांत त्वष्ट्याची माहिती आढळते. त्वष्टा हा शुक्र व गौ यांचा पुत्र असून त्याला त्रिशिरा, विश्वरूप व विश्वकर्मा हे तीन पुत्र होते, असे ब्रह्मांडपुराणात (३·१·८७) सांगितले आहे. यालाच प्रजापती आणि विश्वकर्मा अशीही नावे पडली आहेत. कारण हस्तकौशल्याने जे करावयाचे त्याचा अधिकार यासच होता, असा उल्लेख ब्रह्मांडपुराणात (३·१·८६) आहे. यानेच धृतराष्ट्राकरिता इंद्रप्रस्थ (महाभारत, आदिपर्व, २२७·५९), कृष्णाकरिता द्वारका (भागवत १०·५०) व इंद्राकरिता लंका (रामायण, उत्तरकांड, ५) निर्माण केली. सेतू बांधणारा नळ हा याचाच मुलगा होय.

विश्वकर्म्याचा धृताची अप्सरेशी संबंध आला. त्यामुळे ब्रह्मदेवाने त्या अप्सरेला शाप दिला. तिने गोपाच्या घरी जन्म घेतला. विश्वकर्म्याला ब्राह्मणाचा जन्म प्राप्त झाला. प्रयागक्षेत्री यांची भेट झाली आणि त्यांच्यापासून माळी, कासार, शिंपल्याचे काम करणारे, सोनार, पाथरवट वगैरे लोक निर्माण झाले असे ब्रह्मवैवर्तपुराणात (१·१०) म्हटले आहे. ब्राह्मणापासून जन्म झाल्यामुळे आपणास वेदाध्ययनाचा अधिकार आहे, असे हे लोक मानतात. पांचाळ, त्वष्टाकासार इ. नावांनी कासार समाज महाराष्ट्रात ओळखला जातो. त्वष्टा हे एका संकर जातीचे नाव असल्याचे अमरकोशात (२·१०·९) म्हटले आहे.

भिडे, वि. वि.