महाबोधि सोसायटी : बौद्ध धर्मप्रसाराचे व संवर्धनाचे काम करणारी प्रसिद्ध संस्था. ही संस्था  ⇨अनगारिक धम्मपाल  ह्यांच्या प्रयत्नाने १८९१ मध्ये कोलंबोत स्थापन झाली. बौद्ध धर्माच्या प्रसाराचे कार्य भारतात व्हावे म्हणून ठिकठिकाणी ह्या संस्थेच्या शाखा स्थापन झाल्या. कलकत्यात ही संस्था नोंदणीकृत झाली व १९१५ साली सर आशुतोष मुकर्जी हे ह्या संस्थेचे पहिले अध्यक्ष झाले. १९२० च्या नोव्हेंबर महिन्यात धर्मराजिक चैत्य विहार कलकत्त्यात स्थापन झाला. हे संस्थेचे मुख्यालय आहे. ह्या संस्थेच्या प्रयत्नामुळेच ⇨गया  येथील बौद्ध मंदिराच्या व्यवस्थेकरिता बिहार सरकारने १९४९ साली एक स्वतंत्र कायदा करून तेथील मंदिर व सभोवतालच्या परिसराची व्यवस्था हिंदू महंतांच्या हातांतून काढून घेऊन ती एका मंडळाकडे सोपविली. मंडळात बुद्धानुयायांचे चार प्रतिनिधी असावेत असे ठरले. ह्या संस्थेच्या प्रयत्नामुळेच गौतम ⇨बुद्धाने ज्या ठिकाणी आपला पहिला धर्मोपदेश केला, त्या ⇨सारनाथ  येथील ऋषिपत्तनाचा संपूर्ण कायापालट होऊन आता त्या ठिकाणी संस्थेने ‘मूलगंधकुटी विहार’ स्थापून अनेक शिक्षण संस्था चालविलेल्या आहेत. ह्या संस्थेच्या शाखा हल्ली भारतात नवी दिल्ली, लखनौ, मुंबई, मद्रास, नौतनवा, गया, अजमीर, भुवनेश्वर वगैरे ठिकाणी स्थापन झाल्या आहेत. भारताबाहेर परदेशांतूनही संस्थेच्या लंडन, न्यूयॉर्क, शिकागो, लॉस अँजेल्स, टोकिओ, कोलंबो, तैवान इ. ठिकाणी शाखा असून त्यांच्या द्वारा नियतकालिके, ग्रंथप्रकाशनादी द्वारे कार्य चालते. भारतातील नवबौद्धांच्या धार्मिक चळवळीला ह्या सोसायटीकडून पाठिंबा व नैतिक साहाय्य मिळते. १९४९ साली ह्या सोसायटीचा सुवर्ण महोत्सव साजरा झाला. ⇨सांची  येथे सारिपुत्त व मोग्गल्लान ह्या नावाच्या बुद्धाच्या प्रत्यक्ष शिष्यांचे शारीरिक अवशेष (धातू) ब्रिटिश संग्रहालयाकडून परत मिळून त्यावर स्तूप बांधण्याच्या समारंभाने ह्या महोत्सवाची सांगता झाली. होनोलूलू (हवाई बेट) येथील श्रीमती मेरी ई. फॉस्टर नावाच्या अमेरिकन महिलेकडून ह्या सोसायटीला मोठ्या देणग्या मिळाल्या आहेत. संस्थेचे द महाब्रोधी  नावाचे (स्था. १८९२, अनगारिक धम्मपाल) मासिक मुखपत्र इंग्रजीतून कलकत्त्याहून प्रसिद्ध होते. डॉ. यू. धम्मरतन हे त्याचे विद्यमान संपादक आहेत. सिंहल बौद्धाम  हे सिंहली भाषेतील साप्ताहिक संस्थेची कोलंबो शाखा प्रसिद्ध करते. तसेच बौद्ध धर्मावरील इंग्रजी, हिंदी, बंगाली व मराठी भाषेतील ग्रंथही भारतातील महाबोधी सोसायटी प्रसिद्ध करते. संस्थेच्या इतरही अनेक संस्था व संघटना आहेत. त्यांत कलकत्ता येथील महाबोधी ग्रंथालय, ‘अनगारिक धम्मपाल ध्यान केंद्र’, ‘महाबोधी संडेस्कूल’ तसेच सारनाथ येथील महाबोधी महाविद्यालय, महाबोधी मोफत विद्यालय, बिर्ला धर्मशाळा, महाबोधी दवाखाना सारनाथ, गया, सांची, नवी दिल्ली, लखनौ येथील पुस्तक-केंद्रे (बुक एजन्सी) सारनाथ, सांची, नवी दिल्ली, लखनौ येथील विहार तसेच सांची येथील आंतरराष्ट्रीय ग्रंथालय इत्यादींचा समावेश आहे.

बापट, पु. वि.