कलाम : या अरबी शब्दाचा मूळ अर्थ अनेक शब्दयुक्त उद्‌गार. कुराणात एके ठिकाणी भाषण या अर्थाने आणि दुसऱ्‍यांदा इस्लामचा आशय या अर्थाने हा शब्द आला आहे. इस्लाम ही परमेश्वरी वाणी अशी जरी सर्व मुसलमानांची श्रद्धा असली, तरी काही आयतांच्या दुर्बोधतेमुळे आणि काही ठिकणी उलटसुलट विचार असल्यामुळे कुराणाचा अर्थ कसा लावावा, हा वाद निर्माण झाला. ईश्वरवाणी म्हणजे एका प्रकारे ईश्वराच्या इतर निर्मितींप्रमाणेच एक निर्मिती म्हणून कुराणाचा अर्थ प्रत्येकाने बुद्धीला आणि तर्काला धरून करावा पंडित सांगतील तोच अर्थ खरा मानू नये, असा मुद्दा आठव्या शतकातच मुताझिला विद्वानांनी मांडला. प्रत्येक मानवी कृत्य सर्वशक्तिमान परमेश्वराच्या इच्छेमुळे होते, माणसाला आचारस्वातंत्र्य नाही हे प्रस्थापित धर्मगुरूंचे मतही मुताझिलांना अमान्य होते. एकमेकांविरुद्ध मते असलेल्या कुराणातील आयतांचा अर्थ लावताना कालक्रमाने आधी सांगितलेले मत नंतर सांगितलेल्या मताने रद्द (मनसुख) होते, या पंडितांच्या मतालाही मुताझिलांनी विरोध केला. यातून वादंग निर्माण झाले. अल्-खल्दूनसारख्या काही पंडितांनी ईश्वर सर्वज्ञ असून व्यर्थ चर्चा करण्यात स्वारस्य नाही, असे मत मांडले. उलट मुताझिला विद्वानांच्या हाताखाली शिक्षण घेतलेल्या आणि मागाहून धर्मपंडित झालेल्या अल्-अशअरीने (८७३–९३५) मुताझिलांना त्यांच्याच पद्धतीने, म्हणजे तर्कशुद्ध वाटणार्‍या युक्तिवादाने उत्तरे देण्यास सुरुवात केली. पुढे खलीफांच्या दरबारांत मुताझिलांचे वजन कमी झाले आणि त्यांचे ग्रंथ जाळून टाकले गेले तरी अल‌्- अशअरीची युक्तिवादाची पद्धती इतर धर्मपंडितांनी चालूच ठेवली. या पद्धतीला कलाम असे नाव पडले. नंतर अल्-गझालीच्या (१०५८–११११) वेळेपर्यंत धर्मशास्त्राची घडण चालू होती. गझालीने धर्मशास्त्र पूर्ण केले आणि प्रत्येक प्रश्नावर त्यात सांगितलेली मते, तसेच पंडितांनी लावलेला कुराणाचा अर्थ सर्वमान्य झाला. शेवटी कलाम म्हणजे धर्मशास्त्र आणि मुतकल्लिम म्हणजे धर्मशास्त्रज्ञ असे अर्थ रूढ झाले.                

करंदीकर, म. अ.