बिशप : ख्रिस्ती चर्चमधील धार्मिक अधिकाराचे एक महत्त्वपूर्ण पद. ‘बिशप’चा पर्याय म्हणून वापरल्या जाणाऱ्या ‘एपिस्कोपोस’ ह्या मूळ ग्रीक शब्दाचा अर्थ ‘देखरेख ठेवणारा’ वा ‘अध्यक्ष’ (ओव्हर-सीअर) असा आहे. ‘वडील’ (एल्डर) वा प्रेसबिटर हेही पर्यायी शब्द त्यासाठी वापरल्याचे दिसते. ‘बिशप’ ही इंग्रजी संज्ञा नंतर रूढ झाली. बिशप हे पद चर्चमध्ये सर्वोच्च वा उच्च मानले जाते. रोमन कॅथलिक, अँग्लिकन, ईस्टर्न ऑर्थोडोक्स, अमेरिकेतील मेथडिस्ट, एपिस्कोपल, काही ल्यूथरन चर्चेस-उदा., स्कँडिनेव्हिया, मोरेव्हिया-यांतून हे पद आहे.

ख्रिस्तमंडळीमध्ये नेतृत्व करण्याची पद्धत टप्प्याटप्प्याने वाढत गेली. धर्मदूतांच्या (अपॉसल्स) काळात बिशप किंवा अध्यक्ष हे यहुदेतर ख्रिस्ती जनांचे पुढारी होते आणि यहुदी-ख्रिस्ती लोकांचे पुढारी त्यांच्यातील वडीलवर्ग किंवा प्रेसबिटर होते. हळूहळू या दोन पद्धती एकमेकींत मिसळल्या गेल्या. यहुदेतर ख्रिस्ती लोकांचे नेतृत्व करणारे बिशप आणि यहुदी-ख्रिस्ती लोकांचे नेतृत्व करणारा वडीलवर्ग यांनी मिळून प्रमुखांचा स्वीकार केला आणि फक्त प्रमुखच पुढे ‘बिशप’ म्हणून ओळखले जाऊ लागले. धर्मदूतांच्या निधनानंतर कालांतराने ख्रिस्तमंडळाच्या नेतृत्वाचे धर्मदूतांचे कार्य प्रत्येक शहरामध्ये किंवा विभागामध्ये एकेका व्यक्तीने पुढे चालू ठेवले. बिशपच्या ख्रिस्तमंडळनेतृत्वाचे अशा अधिकारपद्धतीत झालेले रूपांतर अँटिऑकच्या सेंट इग्नेशिअसच्या (मृ. ११०) अनेक पत्रांत स्पष्टपणे व्यक्त करण्यात आले आहे. थोडक्यात, प्रत्येक शहरामध्ये बिशपचा अधिकार गटामध्ये नव्हे, तर एका व्यक्तीमध्ये केंद्रित झाला. ⇨येशू ख्रिस्ताने धर्मदूतांना दिलेल्या अधिकारातूनच बिशपांना असलेले त्यांचे अधिकार मिळतात. अगदी प्रथमपासूनच बिशप होणाऱ्या व्यक्तीच्या मस्तकावर एक किंवा अनेक बिशप हात ठेवून तिला दीक्षा प्रदान करण्याची प्रथा होती. ही प्रथा तेव्हापासून आजतागायत परंपरेने चालत आली आहे. अशा रीतीने बिशपांना धर्मदूतांकडून अधिकृत रीत्या मिळालेले अधिकार व कर्तव्ये यांना ‘धर्मदूतांचा वारसानुक्रम’ (अपॉसलिक सक्सेशन) असे म्हणतात. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चर्चच्या व्यासपीठाचा मुख्याधिकारी (बिशप) नेमण्यात येतो व तो इतर धर्मगुरूंपेक्षा (प्रिस्ट्स) श्रेष्ठ मानला जातो. बिशपांना ‘धर्मदूतांचे वारसदार’ म्हणून संबोधण्याचे तत्त्व बायबलमध्ये जरी लिहिलेले नसले, तरी वस्तुतः धर्मदूतांनी त्यांच्या जबाबदाऱ्या आणि अधिकार त्यांच्या वारसावर कसे सोपविले, हे बायबलमध्ये सांगितलेले आहे. (तीतीला पत्र १ : ५, तीमथ्याला दुसरे पत्र २ : २ इ.).

आइरेनियस (सु. १४०-२०२) व टर्टल्यन (सु. १६०-२३०) यांनी बिशप हे धर्मदूतांचे वारसदार आहेत, असे आग्रहाने प्रतिपादन केले. आइरेनियसने रोमच्या धर्मपीठासाठी संपूर्ण ‘धर्मदूतांची वारसानुक्रमयादी’ तयार केली. रोमन कॅथलिकांच्या दुसऱ्या व्हॅटिकन धर्मपरिषदेत (१९६३-६५) बिशप ‘धर्मदूतांचे वारसदार’ आहेत, याचा पुनरुच्चार करण्यात आला.

येशू ख्रिस्ताचे मुख्य शिष्य सेंट पीटर हे ‘आद्य बिशप‘ मानले जातात. रोमन कॅथलिकांचा असा दृष्टिकोन आहे, की धर्मदूतांच्या वारसाचा एक भाग म्हणून पीटर यांचे पद पुढे चालू ठेवायचे आहे तसेच पीटर यांचे पद हे बिशपांमध्ये विशेषाधिकाराने पहिल्या क्रमांकाचे आहे आणि म्हणूनच पोप यांचेही. पोप यांची कामे कालानुसार बदलत जाऊन अनेक पद्धतींनी ती व्यक्त करण्यात आली. पूर्वीच्या काळात ती तक्रारनिवारणार्थ किंवा मतभेदांसंबंधी लवादी संस्थेसारखी होती. पोप ग्रेगरी सातवे (१०२३ – ८५) यांनी आध्यात्मिक सत्ता ही सम्राटांच्या सत्तेपेक्षा श्रेष्ठ आहे, असे मानून त्याप्रमाणे आपले निर्णय दिले. आपले हक्क सांगण्यापेक्षा आज सेंट पीटर यांचे कार्य आपल्या सेवेद्वारे प्रत्यक्ष दाखविण्यात यावे, असा रोमन कॅथलिकांचा विशेष आग्रह आहे. काही चर्चेसमध्ये बिशपांचा हुद्दा हा धर्मोपदेशकांतून नेमणूक वा निवडणूक करून दिला जातो. देशाची विभागणी वेगवेगळ्या धर्मप्रांतांत करून ह्या धर्मप्रांतांचे मुख्य बिशप असतात. काही चर्चेसमध्ये नंतर नवे बिशप त्या व्यासपीठाचे प्रमुख व सल्लागार मंडळाचे मार्गदर्शक होतात. बिशप यांच्यावर प्रमुख बिशपांची व रोमन कॅथलिक चर्चेसमध्ये पोप यांची सत्ता असते. बिशपपद हे तहहयात असते. त्यांच्या नेमणुकी वा निवडणुकीबाबत तसेच त्यांच्या अधिकारक्षेत्राबाबत पंथोपपंथांनुसार थोडेफार फरक आहेत. बिशपांच्या अंगी निष्कलंकत्व, नेमस्तपणा, मिताचार, शांतचित्तता, आत्मसंयम, सज्जनत्व, आतिथ्यशीलत्व, अध्यापनकौशल्य इ. गुण असावे लागतात. ते औरसपुत्र व धर्मशास्त्रातील मान्यवर विद्वान असावे तसेच त्यांचे वय ३० वर्षांहून कमी नसावे इ. अटी ह्या पदासाठी आहेत. लोभामुळे नव्हे, तर देवाची इच्छा म्हणूनच आनंदाने देवाच्या कळपाचे (अनुयायांचे) पालन करणे, कमकुवत मनाच्या लोकांना धीर देणे, दीनदुबळ्यांना आधार देणे, इतरांकरिता सदैव जागृत राहणे, त्यांना आध्यात्मिक मार्गदर्शन करणे व प्रोत्साहन देणे ही त्यांची कर्तव्ये होत. ते देवाचे ‘कारभारी’ मानले जातात. अंगठी, हातमोजे, गुराख्यासारखा हातात लांब आकडायुक्त दंड, लाल रंगाचा झगा, जांभळे प्रावरण व लाल रंगाची हॅट असा त्यांचा औपचारिक पोशाख असतो. इ. स. चौथ्या शतकापासून बिशप हे ब्रह्मचारी असावेत ही प्रथा पाश्चिमात्य ख्रिस्तमंडळीत सार्वत्रिक झाली आणि रोमन कॅथलिक व ईस्टर्न ऑर्थोडॉक्स चर्चमध्येदेखील ही प्रथा आजतागायत चालू आहे.

देशाची विभागणी वेगवेगळ्या धर्मप्रांतांत (डायसीस) करून ह्या धर्मप्रांतांचे प्रमुख म्हणून बिशप असतात. आर्चबिशप एका महाधर्मप्रांताचे (आर्चडायसीसचे) प्रमुख धर्मगुरू असतात. संबंधित असलेल्या धर्मप्रांतांच्या काही बाबीत देखरेख करण्याचा अधिकार आर्चबिशपांना असतो. काही जुन्या महत्त्वाच्या धर्मपीठांवर असलेल्या बिशपांना व इतर काही बिशपांना पेट्रिआर्क असे म्हणतात. उदा., गोवा येथील आर्चबिशप. पोपचे सल्लागार आणि चर्चचा कारभार चालविण्यासाठी मुख्य मदतनीस म्हणून कार्डिनल आहेत. हल्ली सर्व कार्डिनल हे बिशप असून ते पोप यांना मदत करतात. कार्डिनल यांची संख्या हल्ली १२० पर्यंत आहे. नवीन पोप निवडण्याचा अधिकार त्यांनाच आहे. भारतातील ‘चर्च ऑफ साउथ इंडिया’ व  ‘चर्च ऑफ नॉर्थ इंडिया’ यांच्या प्रमुख बिशपांना ‘मॉडरेटर’ म्हणतात.

महाराष्ट्रात कॅथलिकांमध्ये मुंबई व नागपूर येथे आर्चबिशप आणि पुणे, औरंगाबाद, अमरावती व चंद्रपूर येथे बिशप आहेत. प्रॉटेस्टंटांच्या चर्च ऑफ नॉर्थ इंडियामध्ये मुंबई, नागपूर, कोल्हापूर व अहमदनगर या ठिकाणी बिशप आहेत. मुंबईमध्ये मेथडिस्ट चर्चचेही एक बिशप आहेत. काही बिशपांना साहाय्यक (ऑग्झिल्यरी) बिशप मदत करतात. मुंबई येथे दोन रोमन कॅथलिक साहाय्यक बिशप आहेत. 

पहा : आर्चबिशप ख्रिस्ती धर्मातील पदाधिकारी पोप.

 संदर्भ : 1. Rahner, K. Bishops : Their Status and Function, London, 1964.

           2. Telfer, William, The Office of a Bishop, London, 1962.

 आयरन, जे. डब्ल्यू. (इं.) साळवी, प्रमिला (म.)