पंचमहाभूते :भारतीय दर्शनांतील एक संकल्पना. भौतिक सृष्टीच्या वा विश्वाच्या उत्पत्तीला कारण असणारी ही मूलतत्त्वे होत. पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश या पाच तत्त्वांना पंचमहाभूते म्हणतात. भौतिक सृष्टीच्या घटक द्रव्यांचे वर्गीकरण करून सृष्टीस कारणभूत असलेली मूलभूत घटक द्रव्ये सांगण्याचा प्रयत्न जगातील सर्वच दर्शनांनी कमीअधिक प्रमाणात केलेला आहे. ⇨ग्रीक तत्त्वज्ञानात सृष्टीला कारणभूत असलेली विविध मूलभूत तत्त्वे सांगितली आहेत. त्यांना महाभूते म्हणता येईल. अनेक पाश्चात्त्य व भारतीय तत्त्वज्ञानांनी मूलभूत अशी चारच तत्त्वे मानली आहेत. आकाश हे इंद्रियगम्य नसल्यामुले ते स्वतंत्र तत्त्व मानण्याची जरूरी नाही, असे मत याबाबत त्यांनी मांडले आहे. बौद्ध व चार्वाक वा लोकायत दर्शनांनीही हीच चार तत्त्वे मानली.

ही पंचमहाभूते कशी निर्माण झाली याची चर्चा न्याय, वैशेषिक, वेदान्त इ. दर्शनांनी केली आहे. ही तत्त्वे आत्म्यापासून निर्माण झाली, असे उपनिषदांनी म्हटले आहे. छांदोग्य उपनिषदाने (६·३·३.) अग्‍नी (तेज), आप (जल) व पृथ्वी या तीनच तत्त्वांचा उल्लेख केला असून त्यांच्या संयोगातून सृष्टीची उत्पत्ती होते, असे म्हटले. तैत्तिरीय उपनिषदात (२·१) आकाश, वायू, अग्‍नी, आप व पृथ्वी अशी पाच तत्त्वे उत्पन्न झाली, असे म्हटले आहे.

सांख्यदर्शनाने मूलतः पुरुष व त्रिगुणात्मक प्रकृती ही दोन तत्त्वे मानली आहेत. प्रकृतीपासून बुद्धी आणि अहंकार ही तत्त्वे निर्माण होतात. अहंकारातील रजोगुणाचा प्रकर्ष होऊन त्यातून मन व पाच ज्ञानेंद्रिये उत्पन्न होतात. अहंकारातील तमोगुणाचा प्रकर्ष होऊन त्यातून शब्द, स्पर्श, रूप , रस व गंध ही पाच तन्मात्रे निर्माण होतात आणि यांपासून पंचमहाभूते निर्माण होतात. तन्मात्रांपासून पंचमहाभूतांची उत्पत्ती होत असल्यामुळे हे सर्व गुण थोड्याफार प्रमाणात प्रत्येक महाभूतात आढळतात. ⇨सांख्यदर्शनात याबाबत विस्ताराने चर्चा केली आहे.

न्याय-वैशेषिकांच्या मते, ही आकाशव्यतिरिक्त महाभूते परमाणुरूपाने नित्य आहेत आणि कार्यरूपाने अनित्य आहेत. या पाचही तत्त्वांचा परस्परसंसर्ग येत असला, तरी त्यांच्यात कार्यकारणभाव नाही. वेदान्तशास्त्राने मात्र यांच्यात कार्यकारणभाव मानला आहे. सृष्टीची उत्पत्ती साक्षात या भूतांच्या परस्परसंसर्गाने होत असते. अशा प्रकारच्या मिश्रणाला ‘पंचीकरण’ म्हणतात. प्रत्येक महाभूतात स्वतःचा / अंश व इतर चार महाभूतांचा प्रत्येकी / अंश असतो. काही उपनिषदांनी तीनच तत्त्वे मानली असल्याने त्यांच्या संसर्गास ‘त्रिवृत्‌करण’ असे म्हटले आहे. प्रत्येक महाभूतात तन्मात्रे म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे गुण असतातच. पंचीकरण कसे सिद्ध होते, ते पुढील कोष्टकावरून समजून येईल :

 

आकाश 

वायू 

अग्नी 

आप 

पृथ्वी 

आकाश 

/ 

/ 

/ 

/ 

/ 

वायू

/

/

/

/

/

अग्नी

/

/

/

/

/

आप

/

/

/

/

/

पृथ्वी

/

/

/

/

/

ही पंचमहाभूते सृष्टीच्या उत्पत्तीला कारण आहेतच पण त्यांची  शक्ती अचाट आहे. कित्येक वेळा ती मानवाच्या संहारालाही कारण होते. या महाभूतांना वश करून घेऊन त्यांच्या शक्तीचा उपयोग मानवाच्या कल्याणासाठी करून घेण्याचा आधुनिक शास्त्रज्ञांचा प्रयत्न आहे. प्राचीन काळीही या महाभूतांना संतुष्ट करण्यासाठी अनेक प्रकारे प्रार्थना केली जाई.

भिडे, वि. वि.