कलि : कृत, त्रेता, द्वापर या तीन युगांनंतरचे कली हे शेवटचे युग. त्याचा एकूण काळ ४,३२,००० वर्षांचा. त्यांपैकी शके १८९६ (इ. स. १९७४) पर्यंत ५,०७५ वर्षे भुक्त आणि ४,२६,९२५ वर्षे अद्यापि भोगावयाची बाकी आहेत. भारतीय युद्ध चालू असता कलियुगास प्रारंभ झाला म्हणून त्यास ‘भारतयुद्धसंवत’ अथवा ‘युधिष्ठिरशक’ असेही म्हणतात. काही तज्ञ हा प्रारंभकाल इ. स. पू. ३,१०२ वर्षे मानतात. तथापि तज्ञांत त्याबाबत मतभेद आहेत. कलियुगात धर्म एकपाद व अधर्म चतुष्पाद असतो म्हणून या युगात लोकांची प्रवृत्ती अधर्माकडे अधिक असते. त्रिगुणांतील तमोगुण हा या युगाचा प्रमुख गुण असतो, असे पुराणांत म्हटले आहे. धर्मशास्त्रात कलिवर्ज्य म्हणून अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. विष्णूचा ⇨कल्की अवतार होईल तेव्हा हे कलियुग संपून परत कृतयुगास प्रारंभ होईल, असे भागवतपुराणात म्हटले आहे.  

पुराणांत एक युगवाचक व्यक्ती म्हणूनही कलीचे वर्णन आढळते. क्रोध व हिंसा यांचा कली हा पुत्र असून भय व मृत्यू ही त्याची अपत्ये होत. परीक्षित राजाने कलीचा पराभव करून मद्य, द्यूत, सुवर्ण, स्त्रिया व हत्त्या ही पाच निवासक्षेत्रे त्याला दिली. नल राजाच्या शरीरात कलीने प्रवेश केला होता इ. पौराणिक कथा आहेत.

जोशी, रंगनाथशास्त्री