प्रह्‌लाद : हिंदू पुराणांतील एक आदर्श विष्णुभक्त. प्रह्‌लाद असुर कुलातील होता. ब्रह्मा–मरीची-कश्यप (किंवा ब्रह्मा–कश्यप) – हिरण्यकशिपु–प्रह्‌लाद असा त्याचा वंशक्रम आढळतो. प्रह्‌लादानंतर विरोचन–बली (वामनावतारात पराभूत झालेला) –बाण असा क्रम असून बाणकन्या उषा व श्रीकृष्णाचा नातू अनिरुद्ध यांचा विवाह झाला होता. प्रह्‌लादाच्या आईचे नाव कयाधू. प्रह्‌लादाला विरोचन, कुंभ, निकुंभ इ. पुत्र व विरोचना नावाची कन्या होती. तैत्तिरीय ब्राह्मणात (१·५·९) कयाधू, प्रह्‌लाद व विरोचन यांचा निर्देश आहे. प्रह्‌लाद या संस्कृत शब्दाचा अर्थ ‘अत्यधिक आनंद’ असा होतो. इराणमधील ‘परधात’ वा ‘पेशदात’ आणि प्रह्‌लाद हे दोघे एकच असावेत, असे काही विद्वानांचे मत आहे.

प्रह्‌लाद गर्भात असतानाच नारदाने त्याला विष्णुभक्तीचा उपदेश केला असल्यामुळे हा उपजतच विष्णुभक्त होता, असे म्हटले जाते. त्याने विष्णुभक्ती सोडावी म्हणून हिरण्यकशिपूने खूप प्रयत्न केले तथापि ते विफल झाल्यावर त्याच्या हत्येचेही अनेक प्रयत्न त्याने केले परंतु विष्णुभक्तीमुळे तो वाचला व मुक्त झाला. शेवटी विष्णूने ⇨ नृसिंहाचा (नरसिंहाचा) अवतार घेऊन हिरण्यकशिपूचा वध केला व प्रह्‌लादाला पाताळातील असुरांचा सम्राट केले. त्याने विष्णूला आपल्या वडिलांचा उद्धार करण्याची प्रार्थना केली. यावरुन तो पितृभक्तही असल्याचे दिसून येते. एकदा सुधन्वा नावाचा मुनी व आपला पुत्र विरोचन यांच्या संघर्षात सुधन्वाची बाजू योग्य असल्याचा निःपक्षपाती निर्णय त्याने दिला होता. अंधक नावाच्या चुलत भावाकडे राज्य सोपवून त्याने तप केले होते. एकदा त्याचे नर-नारायणांबरोबर युद्ध झाले होते. त्याने इंद्राचा युद्धात पराभव केला होता तसेच इंद्रपदही मिळविले होते. (वामनपुराण ७–८ विष्णुपुराण १·१६–१७ भागवत-सप्तम स्कंध इ.) इ. कथा आढळतात.

हिरण्यकशिपूपासून बाणापर्यंतच्या असूर राजांचा देवांबरोबर झालेला संघर्ष हा केवळ पुराणकथात्मक नसावा, तर त्यात दोन लढाऊ समूहांतील ऐतिहासिक संघर्ष असण्याची शक्यता आहे. प्रह्‌लादाच्या विविध कथांचा व उपाख्यानांचा भारतीय साहित्य व संस्कृती यांवर बराच प्रभाव आढळतो. त्याचे माहात्म्य मोठे असल्यामुळे दैत्यांमध्ये मी प्रह्‌लाद आहे, असे श्रीकृष्णाने भगवद्‌गीतेत (१०·३०) म्हटले आहे.

साळुंखे, आ. ह.