तप : देह, इंद्रिय व मन यांचे पावित्र्य वा आध्यात्मिक शक्ती संपादन करून त्याच्या योगे मोठे उद्दिष्ट साधण्याकरिता आवश्यक असे श्रम वा कष्टकारक आचरण उदा., उपवास, ध्यानधारणा, इंद्रियसंयम, जप, यात्रा इत्यादी. तप (संस्कृत–तपस्) हा शब्द ‘तप’ म्हणजे तापणे, तापविणे या धातूपासून सिद्ध झाला आहे. अर्थात मूलतः तो उष्णतेचा निदर्शक आहे. वेदांमध्ये उष्णता या अर्थाने जसा वापरला आहे तसा वरील अर्थानेही वापरला आहे. सृष्टी निर्माण करण्यासाठी वा अन्य अभिप्रेत वस्तू संपादण्यासाठी प्रजापतीने तप केल्याचे निर्देश ब्राह्मणग्रंथांत वारंवार आढळतात. उपनिषदांमध्ये तप या शब्दाचा वरील अर्थ स्पष्ट झाला आहे. कोणतेही सत्कर्म दीर्घकाल कष्ट सोसून करणे, असाही तप शब्दाचा अर्थ आहे. कोणतेही ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी आत्मशुद्धी करणे म्हणजेही तप होय. ब्रह्मज्ञानासाठी तपाचरणाची आवश्यकता प्राचीन उपनिषदांत प्रतिपादिली आहे. उदा., स्वाध्याय आणि प्रवचन म्हणजे तप होय अनशन तप होय दम, शांती, सत्य, अध्ययन, दान, यज्ञ, उपासना, इ. म्हणजे तपच होय, असे तेथे म्हटले आहे. छांदोग्य उपनिषदात वानप्रस्थ हा अरण्यात तप आचारण्याचा आश्रम आहे, असे म्हटले आहे. सत्त्वगुणांचा परिपोष म्हणजे तप किंवा मन व इंद्रिये यांची एकाग्रता हे परमतप होय, असे महाभारतात सांगितले आहे. भगवद्‌गीतेत तपाचे कायिक, वाचिक आणि मानसिक तसेच सात्त्विक, राजस आणि तामस असे भेद केलेले आहेत. धर्मशास्त्रात तप शब्दाचा प्रायश्चित्त असा अर्थही सांगितला आहे. तपाने म्हणजे प्रायश्चित्ताने पाप नाहीसे होते, असे धर्मसूत्रे सांगतात. आपापल्या वर्णाश्रमधर्माचे पालन हेच तप, असे मनुस्मृतीत म्हटले आहे. तपामध्ये शारीरिक व मानसिक शुद्धी अंतर्भूत आहेत. तपश्चर्येचा उपयोग निरनिराळ्या लहान मोठ्या कामनांच्या पूर्तीसाठी सांगून तशी पूर्ती झाल्याची अनेक उदाहरणे पुराणांत सांगितली आहेत.

तप आचरून पूर्वीची कर्मे नष्ट करावी, असे बौद्ध धर्मात सांगितले आहे तथापि आत्यंतिक आत्मक्लेशाचा मार्ग गौतम बुद्धाला पसंत नव्हता. जैन धर्मात मात्र आत्मक्लेशाला महत्त्वाचे स्थान आहे. बाह्य आणि आभ्यंतर असे तपाचे मुख्य भेद जैन धर्मात सांगितले आहेत. बाह्य तप म्हणजे शारीरिकक्लेश आणि आभ्यंतर तप म्हणजे चित्तशुद्धीचा प्रयत्न. या प्रत्येकाचे अनेक प्रकार सांगितले आहेत. पूर्वजन्मार्जित कर्म नष्ट करणे म्हणजे निर्जरा तिच्यासाठी तपाची आवश्यकता मानली आहे. ग्रीक लोकांमध्ये अध्यात्माच्या आणि तपाच्या कल्पना दृढमूल झाल्या होत्या. ग्रीक ख्रिश्चन (ईस्टर्न ऑर्थोडॉक्स चर्च) चर्चमध्येही या कल्पना प्रसृत आहेत. रोमन कॅथलिक चर्च व प्रॉटेस्टंट चर्च हे दोन्हीही त्या कल्पनेपासून दूर रहिले तथापि  पापाची कबुली देऊन (कन्फेशन) त्याबद्दल पश्चाताप व्यक्त करून क्षमायाचना करणे आणि योग्य प्रायश्चित्त घेणे, या स्वरूपात तपाची कल्पना सामान्यतः ख्रिस्ती धर्मात रूढ आहे. मुहंमद पैगंबरांपूर्वी अरब लोकांना ख्रिस्ती धर्माच्या तत्त्वांचा परिचय झाला होता. त्यामुळे ख्रिस्ती संतांच्या तपोमय मार्गाची त्यांना माहिती होती तथापि इस्लाम धर्मात तपाच्या कल्पनेचा आढळ होत नाही. मात्र मध्ययुगीन काळात त्या धर्माच्या सूफी पंथात ही कल्पना रुजली होती.

काशीकर, चिं. ग.