अतीश दीपंकर : (९८२–१०५४). एक भारतीय बौद्ध भिक्षू. ‘अतीश’ किंवा ‘दीपंकर’ तसेच ‘दीपंकर श्रीज्ञान’ अशीही त्याची नावे आहेत. अतीश हा शब्द तिबेटी भाषांतरात अतिशय, श्रेष्ठ अशा अर्थाने वापरलेला दिसतो. त्याचा जन्म बिहारमधील भागलपूर येथे एका राजघराण्यात झाला. नालंदा येथील महाविहारात व विक्रमशील विहारात त्याचे शिक्षण झाले. वयाच्या ३१ वर्षांच्या आत तो त्रिपिटक व तंत्रग्रंथ यांत प्रवीण झाला. आपले ज्ञान परिपूर्ण करण्याकरिता सुवर्णद्वीप म्हणजे हल्लीचे सुमात्रा बेट येथे वास्तव्य करणाऱ्या धर्मपाल ह्या महापंडिताकडे तो गेला. त्याचे शिष्यत्व पतकरून तेथे तो दहा वर्षे राहिला. नंतर भारतात परत येऊन विक्रमशील विद्यापीठात तो आचार्य म्हणून राहिला. तेथे मोठ्या आठ विद्वान आचार्यांत त्याची गणना होऊ लागली. ह्या काळात तांत्रिक धर्माला महत्त्व येऊ लागले होते. तिबेटमध्ये विद्वान माणसे आणवावीत म्हणून सतत प्रयत्न सुरू होते. दीपंकर श्रीज्ञान ह्यास तेथील बोलवणे आले असता बरेच आढेवेढे घेतल्यानंतर त्याच्या गुरूने त्याला तेथे जाण्याची अनुज्ञा दिली. तिबेटमध्ये गेल्यावर त्याने अनेक भारतीय ग्रंथांची तिबेटी भाषेत भाषांतरे केली व बोधिपथ प्रदीप नावाचा ग्रंथ लिहिला. त्याचे तिबेटी भाषांतर आजही उपलब्ध आहे. तिबेटच्या निरनिराळ्या विभागांत तो एकंदर तेरा वर्षे राहिला. कालचक्र नावाच्या ग्रंथावर त्याने टीकाही लिहिली. ल्हासाजवळील ने तान येथे तो निवर्तला. तिबेटमध्ये त्याला सर्वत्र मोठे स्थान आहे.

बापट, पु. वि.